
- शिक्षणनामा
- रमेश बिजेकर
शिक्षण व्यवस्था कोणत्याही समाजाच्या सामाजिक रचनेचे प्रतिबिंब असते. भारतीय उपखंडात वर्णव्यवस्थेच्या प्रभावामुळे गुरुकुल, जैन शिक्षण केंद्रे आणि बौद्ध विद्यापीठांचा उदय झाला. सुरुवातीला ज्ञानप्राप्तीसाठी विविध संधी उपलब्ध असल्या, तरी पुढे ब्राह्मणी महाविद्यालये आणि मंदिरांशी संलग्न मठांच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था वर्णाधारित बनली. शिक्षणावर नियंत्रण ठेवून सामाजिक उतरंड कायम राखली गेली.
प्रभुत्वशाली विचारसरणी व संस्कृतीचा प्रभाव शिक्षण व्यवस्थेवर असतो. हे वारंवार सिद्ध झाले आहे. वर्णव्यवस्थेत ब्राह्मणी गुरुकुल व्यवस्था अस्तित्वात आली व वर्णव्यवस्था समर्थनाचे काम करत राहिली. त्याचा प्रतिवाद जैन परंपरेने केला व वर्णव्यवस्था विरोधी शिक्षण केंद्रे सुरू केली. वर्णव्यवस्थेच्या मावळतीच्या काळात बौद्ध तत्त्वज्ञानाने निर्णायक भूमिका पार पाडली व वर्णव्यवस्था नष्ट केली. उगवत्या जातिव्यवस्थेचा प्रतिवाद केला. सौत्रांतिकवादातून जातिव्यवस्थेला आव्हान उभे केले. त्यातून बौद्ध परंपरेतील तक्षशिला, नालंदा विद्यापीठे अस्तित्वात आली व वर्णजाती विरोधाची भूमिका या विद्यापीठांनी घेतली. जातिव्यवस्था कर्मठ होईपर्यंत गुरुकुल (ब्राह्मणी) शिक्षण केंद्र, जैन (अनेकांत सर्वजीववादी) शिक्षण केंद्र व तक्षशिला, नालंदा (बौद्ध) शिक्षण केंद्रे समातंर कार्यरत होती. इसवीसन ५०० ते ६०० पर्यंत जातिव्यवस्था कर्मठ झाल्यानंतर ब्राह्मणी शिक्षण व्यवस्था प्रभुत्वशाली झाली.
जातिव्यवस्था जसजशी घट्ट होत गेली, तसतशी ब्राह्मणी शिक्षण केंद्रे विस्तारत गेली. तिला राजाश्रय मिळाला. नवव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत या शिक्षण केंद्रांना भरपूर देणग्या मिळाल्या. या काळात भरपूर मंदिरे बांधली गेली. ही मंदिरे म्हणजे वैदिक शिक्षण देणारी केंद्रे होती. दक्षिण भारतातील राजांनी यात पुढाकार घेतल्याचे दिसते. नंबुद्री ब्राह्मणांच्या घरी व मठात वेदपठण शिकवले जात होते. हे मठ मंदिराशी संलग्नित होते. वेदांतिक तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी एकट्या त्रिपुर जिल्ह्यात त्रोटका, सुरसेवरा, हस्तमालाका आणि पद्मपादा या चार मठांची स्थापना नवव्या शतकात केल्याची नोंद इतिहासकारांनी घेतली आहे. नृतूगा राज्यातील स्थानिक प्रमुख मार्तंडा यांनी पांडेचरीमधील वागुर येथील विद्यास्थानाला तीन गावे देणगी दिली. इसवीसन ८५०च्या आसपास ब्राह्मणी विद्यापीठ वा शिक्षण संस्थेला दिलेली ही पहिली मोठी देणगी होती. इतकेच नव्हे, तर करातून सूट दिल्याची नोंद हाटमाट शार्फ यांनी त्यांच्या पुस्तकात घेतली आहे. केरळमध्ये पार्थिवासेक्कपुरम या गावात वैदिक महाविद्यालय होते, जे विष्णू मंदिरात होते. राजा करुनांतादख्खन यांनी या महाविद्यालयातील ९५ विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली. इसवीसन ९४५ मध्ये राजा राष्ट्रकुटाने कृष्ण महाविद्यालयाला जमीन दान देऊन मोठे सभागृह बांधून दिले. शिक्षकांचे निवासालय बांधून दिले. हे महाविद्यालय त्रायीपुरुसादेवा या मंदिराशी संलग्नित असल्याचे पुरावे सापडतात.
इसवीसन ११०७ ते १२६१ या दीडशे वर्षांच्या कालखंडात देशाच्या विविध राज्यात ब्राह्मणी शिक्षण केंद्राच्या विस्तारासाठी राजांनी संकुले निर्माण केली. कर्नाटकमधील तुम्बुला, धारवाड, मध्य प्रदेशमध्ये जबलपूरजवळ गोलकी मठ, आंध्र प्रदेशमधील गुटूंर येथे तिथल्या स्थानिक राजांनी संकुल उभी केली. या संकुलात, देऊळ, मठ, महाविद्यालये, विद्यार्थी निवास व आरोग्य केंद्रे यांचा समावेश होता. यात वेद, पुराण, व्याकरण, तत्त्वज्ञान, ऋगवेद, यजुर्वेद, साहित्य शिकवले जात होते. अपवादात्मक महाविद्यालयात बौद्ध तत्त्वज्ञानाचा सहभाग होता. गंगा कोंडाकोलापुरम येथील कल्लुरी कॉलेजमध्ये उत्तर भारत, मध्य भारत (दख्खन) बंगाल या प्रांतातून विद्यार्थी शिकायला येत असल्याची महत्त्वपूर्ण नोंद हाटमाट शार्फ यांनी घेतली आहे. आठव्या शतकाच्या शेवटी ते १३व्या शतकापर्यंत ब्राह्मणी शिक्षण केद्रांचा केवळ दक्षिणेतच विस्तार झाला असे नाही, तर भारताच्या इतर भागातही ब्राह्मणी शिक्षण केंद्रे विस्तारली. कृष्ण मंदिर मथुरा, सोमनाथ (शिवमंदिर), मालवा, सरस्वती, जगन्नाथ, पुरी ही मंदिरे शिक्षणाची प्रमुख केंद्रे होती. या महाविद्यालयात, मंदिरात व मठात वैदिक (ब्राह्मणी तत्त्वज्ञान) तत्त्वज्ञान शिकवले जात होते. वैदिक प्रथा, कर्मकांड व वेद शास्त्राचे शिक्षण देण्यासाठी पुरोहित असत. हे पुरोहित ब्राह्मण असत. या ठिकाणांना घटिका किंवा मठ, असे म्हणत असत. पुढे-पुढे यातील काही मंदिर व मठ राजकीय केंद्रे बनली व धनवान झालीत.
वर्ण व्यवस्थेतील झाडाखाली वा आश्रमातील गुरुकुले जाती व्यवस्थेत मंदिर व मठात परिवर्तित झाली. परंतु वर्ण व्यवस्थेतील उतरंड, अधिकार व कर्तव्याची विभागणी जातिव्यवस्थेत कायम राहिली. उलट ती जास्त टोकदारपणे उत्तरोत्तर अंमलात आणल्या गेली. स्मृती व अर्थशास्त्राच्या निकषाप्रमाणे उच्च वर्णीयांमधून आलेल्या जातींनाच या स्वरूप बदललेल्या ब्राह्मणी शिक्षण व्यवस्थेत प्रवेश होता.
शिक्षक होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता. द्विज वर्णातील जातींना एकसारखा अभ्यासक्रम नव्हता. क्षत्रियांना युद्ध कौशल्य व वैश्यांना व्यापार या चौकटीत शिक्षण दिल्या जात होते. वेदांतिक एकसुरी ज्ञानाचा पुरस्कार हे या शिक्षण व्यवस्थेचे अनन्य वैशिष्ट्य राहिले. शूद्र व स्त्रियांना प्रवेश निषिद्ध होता. उत्पादक श्रम करणे एवढेच त्यांच्या वाट्याला आले होते. या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे, जो जिथे आहे, त्यांनी तिथेच रहावे हे होते. शिक्षणातून व्यवस्था बदलाचा अवकाश निर्माण होण्याची संभावना असते. शिक्षण बंदीने ही संभावना निर्माण होऊ दिली नाही.
जनतेचा शिक्षण जाहीरनामा, शिक्षण बचाव समन्वय समिती, महाराष्ट्र,
ramesh.bijekar@gmail.com