हनी ट्रॅप - पेग्वीन ट्रॅप

सैनिक (हातातील पाकीट पुढे करत) - मोठ्या राजेसाहेबांनी आपल्यासाठी खलिता पाठविला आहे.
हनी ट्रॅप - पेग्वीन ट्रॅप

स्थळ - ‘शिवतीर्थ’ नामे (कदाचित भविष्यातली) ऐतिहासिक वास्तू.

काळ - खायला उठलेला.

वेळ - संपता संपेना अशी.

चुलतराजे आपल्या महालातील दिवाणखान्यात अस्वस्थपणे येरझारा घालत आहेत. समोरच्या पडद्यातील फटीतून डायनिंग टेबलवर ठेवलेले खमण ढोकळा, समोसा, पातरा, जिलेबी, फाफडा असे गुजराथी पदार्थ दिसत आहेत. पार्श्वभूमीवर लता दीदींचे मधुर स्वर उमटत आहेत, ‘जरासी आहट होती हैं तो दिल सोचता हैं, कही ये वो तो नही।’ अचानक दारावरचा ‘सैनिक’ आत येतो. चुलतराजेंना मुजरा करतो. चुलतराजे नजरेनेच त्याला, ‘काय आहे रे?’ अशी विचारणा करतात.

सैनिक (हातातील पाकीट पुढे करत) - मोठ्या राजेसाहेबांनी आपल्यासाठी खलिता पाठविला आहे.

चुलतराजे नजरेनेच त्याला पाकीट टिपॉयवर ठेवण्याचा इशारा करतात. पाकीट टिपॉयवर ठेवून, परत मुजरा करून तो निघून जातो. चुलतराजे त्या पाकिटाकडे तुच्छतेने एक नजर टाकतात. मग मेलेलं झुरळ पकडावं तसं ते हातात धरून आतली चिठ्ठी बाहेर काढून वाचू लागतात.

‘प्रिय (खरंतर तुझ्या नावापुढे हा शब्द लिहिण्याची अजिबातच इच्छा नव्हती; पण दुसरं काही सुचलंच नाही.) चुलतराजे, ‘ते’ आले आणि तुला न भेटताच निघून गेलेत म्हणून तुझ्या झालेल्या अपेक्षाभंगासाठी तुझं सांत्वन करावं की, तू त्या ‘कमळाबाई’च्या ‘हनी ट्रॅप’पासून वाचलास म्हणून तुझं अभिनंदन करावं, तेच कळत नाहीये. असू दे. आशावादी राहा. हेही दिवस जातील. अरे, असंगाशी संग करण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलं. मी तुला आधीच सावध करणार होतो की, ते तुला फक्त गाजर दाखवतील. चारदा तुझं ‘उपयोगिता मूल्य’ तपासतील. काही कामाचा वाटलास तर कामापुरता जवळ घेतील आणि काम झाल्यावर दूर करतील. नाहीच गणित जमलं तर असाच झुलवत ठेवतील. वास्तविक, माझा अनुभव जमेस धरून तू ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा.’ या म्हणीप्रमाणे शहाणा व्हायला हवा होतास; पण तू आधीच थोडा जास्तच... जाऊ दे. बरंच झालं ते तुझ्या भेटीला नाही आलेत ते. हल्ली म्हणे ते बंद दाराआड काहीच करत नाहीत. सगळं उघड्यावरच करतात! शी! अंगावर काटाच आला ऐकून. कल्पना कर तुझ्याकडे आले असते तर काय काय केलं असतं, त्यांनी उघड्यावर! काळजी घे.

तुझा शुभचिंतक

उधोजीराजे (वांद्रेकर)

ता. क. - उगाच रिस्क नको म्हणून मी तर दाराला आतून मोठमोठे ओंडके लावून बसलो होतो. खमण ढोकळ्यात किती पैसे वाया घालवलेस? कळव.

- उधोजीराजे

चिठ्ठी वाचून चुलतराजेंच्या चेहऱ्यावर अजून दोन आठ्या उमटतात. कागद पेन घेऊन ते उत्तर लिहिण्यास बसतात.

‘आदरणीय बंधुराज, आपण (वयाने का होईना पण...) मोठे आहात म्हणून आपल्याला मान देणे भाग आहे; अन्यथा माझ्याकडे भरपूर शब्द आहेत.

आपल्याला माझ्यासाठी योग्य शब्द न सापडणं मी समजू शकतो. आपले ‘शब्दप्रभू’ सध्या सरकारी पाहुणचार घेत आहेत, त्यामुळे आपल्याला ‘शब्दटंचाई’ जाणवणे साहजिकच म्हणावं लागेल. मलासुद्धा जून महिन्यात असाच प्रश्न पडला होता की, देशातल्या सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला म्हणून त्याचं सांत्वन करावं की, त्याचा ‘असंगाशी संग’ सुटला म्हणून त्याचं अभिनंदन करावं? असो.

आपण म्हणता तसा मी थोडा जास्तच शहाणा आहे, हे मान्य; पण लोकांनी आपल्याला, ‘थोडा जास्तच बावळट’ म्हणून गंडवण्यापेक्षा ‘थोडा जास्तच शहाणा’ म्हणून टाळणं केव्हाही चांगलं. नाही का? माझ्याकडे कोण आलं, कोण नाही आलं, याची जितकी माहिती ठेवता ना, तितकी जर आपल्या आजूबाजूला काय घडतंय, याची ठेवली असती तर ‘आजी’च राहिला असता. ‘माजी’ झाला नसता. आपणच म्हणाला होतात ना की, ‘सर्वसामान्यांना बुलेट ट्रेन परवडत नाही. माझी तीन चाकी रिक्षा आहे, सर्वसामान्यांना परवडणारी.’ मग आता काय करता, एका रिक्षावाल्यानेच तुमची रिक्षा पळवली! आणि हो, माझ्याकडे आल्यावर कोणी उघड्यावर काय केलं असतं त्याची चिंता करू नका. ते मी पाहीन. तुमच्याकडे बंद दाराआड कोण काय करून गेलं की, अजूनही त्याची चर्चा होतेय, ते पाहा. मी काळजी घेईन. चिंता नसावी. आपण मात्र काळजी करावी, नाही तर उरले सुरलेही पळून जातील.

आपला हितचिंतक

‘शिवतीर्थ’ निवासी चुलतराजे

ता. क. - आता तुमच्याकडे ओंडकेच उरले आहेत. दुसरं काय लावाल? स्वतःला २५ वर्षे सडवण्यापेक्षा ढोकळ्याचे शे-दोनशे रुपये वाया गेलेले चालतात. नाही का? ‘हनी ट्रॅप’ सारखाच ‘पेंग्विन ट्रॅप’सुद्धा असतो का? उत्तर अपेक्षित नाही - चुलतराजे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in