
मुलुख मैदान
रविकिरण देशमुख
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ या ५६ वर्षीय तरुणाची निवड झाली. राजकारणात साठी उलटेपर्यंत तरुणच म्हटले जाते. तशीही सपकाळ यांची सत्तापदांची पाटी तशी कोरीच, त्यामुळे त्यांना ज्येष्ठ म्हणता येत नाही. अशा या तरुण काँग्रेस कार्यकर्त्याची निवड अनेकांना बुचकळ्यात टाकणारी ठरली आहे.
अनेक नामवंत नेते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पद स्वीकारण्यासाठी फारसे इच्छुक नाहीत, असे म्हटले जात होते. ते सत्ताधाऱ्यांशी दोन हात करू इच्छित नाहीत की इतर काही कारण त्यामागे आहे हे समजलेले नाही. पण या निमित्ताने एक जुनी गोष्ट आठवली. ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात सुशीलकुमार शिंदे हे ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष म्हणून परतले तेव्हा दिवाळखोरीत निघालेल्या बँकेचे चेकबुक आपल्याकडे सोपवले असल्याचे त्यांनी म्हटल्यावर बरीच चर्चा झाली. तेव्हा शिवसेना-भारतीय जनता पार्टी ही युती सत्तेत होती.
हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर सध्या आदर्शवत परिस्थिती नाही. तसेच ते काही कोणत्या साखर कारखान्याचे वा सहकारी बँकेचे चेअरमन किंवा शिक्षणसंस्थांचे जाळे असणारे शिक्षणसम्राट नाहीत. तेव्हा त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल ते काँग्रेसचे प्रदेश कार्यालय पूर्ण क्षमतेने चालवण्याचे. राज्यातील इतर कार्यालयांची जबाबदारी स्थानिक नेते थोडीफार पदरमोड करून सांभाळतील. पण राज्यातील काँग्रेसचे नेटवर्क उभे करणे आणि ते पूर्ण क्षमतेने चालवणे हे साधे आव्हान नव्हे. त्यासाठी मोठी साधन-सामग्री लागते.
सर्वोदयी विचारांशी बांधिलकी असलेले सपकाळ ही जबाबदारी कशी पेलवतात हे आगामी काळच सांगेल. पक्ष चालवताना सर्वोदयी विचार कितपत मदतीला येतील माहिती नाही. पण त्यांना राज्यातील बड्या काँग्रेस नेत्यांची मदत घ्यावी लागणार आहे. ती ते कशी मिळवतील हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मागील काळात काही कड्या सुटल्या आहेत आणि आता या कड्या जोडाव्या लागणार असल्याचे सांगत सपकाळ म्हणतात, ‘आपल्याकडे नेतृत्व आहे. पण कार्यकर्त्यांची कडी जोडायची आहे.’ म्हणजेच काँग्रेसचा संघटनात्मक पाया त्यांना मजबूत करायचा आहे. हे आव्हानात्मक काम पूर्ण केल्यानंतर जनमानसात काँग्रेसबद्दल विश्वास निर्माण करायचा असेल. आज काँग्रेसचा कार्यकर्ता सैरभैर आहे. समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावात, साधनसामग्रीची प्रचंड गरज असलेल्या काळात पक्षाचा, त्याच्या विचारधारेचा बचाव करणे हे कठीण काम बनले आहे.
काँग्रेस ही एक विचारधारा आहे, असे हा पक्ष म्हणतो. म्हणूनच की काय काँग्रेसची मतपेढी चांगलीच मजबूत राहिली. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस संपते की काय असे वाटत असताना ४२ जागा मिळाल्या आणि त्यापेक्षा प्रतिकूल परिस्थिती २०१९ मध्ये होती, तरीही ४४ आमदार निवडून आले. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले ते मतपेढीमुळेच. पण अवघ्या सहा महिन्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे वस्त्रहरण झाले आणि आजवरच्या निच्चांकी १६ जागा निवडून आल्या.
हा काँग्रेसवर झालेला फार मोठा आघात आहे. तो कसा झाला? अवघ्या सहा महिन्यांत लोकांचे मतपरिवर्तन होऊ शकते का? हे झालेच कसे? यात फार गुंतून राहता येणार नाही. पुढे काय, हा फार मोठा गहन प्रश्न काँग्रेसपुढे आहे. महाविकास आघाडी दोलायमान अवस्थेत आहे. शिवसेनेशी खटके उडत आहेत. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना स्वतंत्र लढली तर काँग्रेसलाही आपल्या मार्गाने जावे लागेल. आज मुंबई काँग्रेस असो वा प्रदेश स्तरावरचे संघटन, हे आतून पोखरले गेले आहे. त्याला एकत्र कसे आणायचे, आत्मविश्वास गमावलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांची मोट कशी बांधायची हे कठीण काम सपकाळांना करायचे आहे.
काँग्रेसचा पराभव काँग्रेसवालेच करू शकतात, असे म्हटले जात असे. ते खरेही होते. नेत्यांचे सवते सुभे उभे राहण्यामुळे त्यात भरच पडली. निष्ठेपासून निसटलेल्यांची काँग्रेसमध्ये गर्दी झाली आहे, हे स्व. बाळासाहेब भारदे यांचे विधान एकेकाळी खूप गाजले होते. सत्तेमुळे आलेला बेधुंदपणा काँग्रेसला कमजोर करत गेला. त्यात भर पडली ती संस्थानिक नेत्यांच्या वर्तनाची. त्यांनी आपापल्या भागात सत्तेच्या जोरावर संस्थांचे जाळे उभारले, पण ते पक्षापेक्षा आपापले आर्थिक आणि सामाजिक साम्राज्य सांभाळण्यासाठी वापरले. ते टिकविण्यासाठी राजकीय तडजोडी केल्या गेल्या.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेस नेत्यांचा खूप मोठा वाटा आहे ही धारणा बाळगत जनतेने या पक्षाला सतत सत्तेत बसवले. पण जनभावनेचा विचार दूर गेला आणि सत्तेचे केंद्रीकरण झाले तशी काँग्रेस विचारधारा मानणारा तरूणवर्ग दूर जाऊ लागला. यात सुधारणा करणे आवश्यक होते. पण नेत्यांनी एकतर आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा चमच्यांना प्राधान्य दिल्याने स्वाभिमानी कार्यकर्ता पक्षापासून दूर गेला. सर्वोदयी विचारांचे नवे अध्यक्ष यात कसा बदल करतात यावर काँग्रेसचे भविष्य ठरणार आहे.
सत्तेतून स्वसमृद्धी वाढली. इंदिरा गांधी यांनी ‘गरीबी हटाव’ची घोषणा देऊन पक्षाला प्रचंड यश मिळवून दिले. काँग्रेसच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी ही घोषणा आपल्यासाठीच आहे असे मानत आपापली गरिबी हटवून घेतली व ते संस्थानिक बनले. मराठवाड्यातील एक अत्यंत निरलस व प्रामाणिक नेते ९०च्या दशकात म्हणाले होते की, आमची काँग्रेस आता कुठे गरिबांची राहिली आहे? ती तर परमिट रूम आणि बिअर बारवाल्यांची झाली आहे.
तसेच राजीव गांधी यांचे ‘विकासासाठी दिलेल्या एक रुपयातील १५ पैसेच खालपर्यंत पोहोचतात’ हे विधानही खूप गाजले होते. हे १५ पैसे तरी कसे काय पोहोचतात असे मानणारा एक वर्ग होता. मग त्यांनी हळूहळू आपापले नातेवाईक आणि चेलेचपाटे यांनाच कंत्राटदार, पुरवठादार बनवले व सरकारी कामांत मक्तेदारी निर्माण केली.
आपले नेते पक्षाशी प्रामाणिक आहेत की तसा देखावा करताहेत, हे सपकाळ यांना पहावे लागेल. कारण विरोधात राहून राजकारण करता येत नाही, संस्था सांभाळता येत नाहीत, हे पाहून अनेकांनी सत्तापक्षासोबत दोस्ताना जमवलेला असतो. पक्ष वैगेरे नंतर पाहू, आधी आपापले पहा, हा विचार काँग्रेसचा जनाधार वाढवायला उपयुक्त ठरणार नाही. त्यातच वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा, तपास आणि खटले याने अनेकजण जेरीला आलेले आहेत. काहींनी पक्षांतर केले, तर काहींना स्थानिक राजकारणामुळे जमले नाही किंवा तुम्ही तिकडेच रहा व आवश्यक तेव्हा आम्हाला मदत करत रहा, असा संदेश त्यांना समोरून मिळालेला आहे.
लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जिवंत ठेवावा लागतो. नाहीतर एकाधिकारशाहीचे राज्य दिसू लागते आणि लोकांमध्ये नकारात्मकता वाढण्याचा धोका असतो. त्यातच भारत हा बहुभाषिक, बहुधर्मीय, अनेकविध जात-समाज यांचा देश आहे. त्याला एकाच सूत्रात बांधणे इतके सोपे नाही. जोवर ही व्यवस्था माझाही विचार करते असे त्याला वाटेल तोवर विविधता एक राहील. एका विशिष्ट दिशेने हे सर्व चाललेय आणि आपण त्यात नगण्य ठरतोय असे वाटले तर समस्या निर्माण होतील.
काँग्रेसपुढे केवळ कार्यकर्ता जोडण्याचे आव्हान नाही, तर लोकांमध्ये पक्षाचा विचार रुजवणे हे खरे आव्हान आहे. काँग्रेसला आधी अंतर्गत मानसिकतेशी लढायचे आहे आणि नंतर बलाढ्य सत्ताधाऱ्यांशी दोन हात करायचे आहेत, हे सपकाळ यांना लक्षात ठेवावे लागेल.
ravikiran1001@gmail.com