-संजय सोनवणी
असेही असते
समण परंपरा अतिप्राचीन आहे. समण या शब्दाचा प्राकृत भाषेतील अर्थ आहे ‘सर्वांकडे समदृष्टीने जो पाहतो तो समण’. भगवती आराधना या ग्रंथात समण शब्दाची व्याख्या करताना म्हटले आहे की समणचा भाव सामन्न आहे. कोणत्याही गोष्टीचा राग, द्वेष न करणारी समता म्हणजे सामन्न. हरगोविंद सेठकृत प्राकृत शब्दकोशाताही ‘सम दृष्टीने पाहणारा म्हणजे समण’ असा अर्थ दिलेला आहे. समण परंपरेतील मूलभूत तत्त्वज्ञानाकडे ओझरती नजर जरी टाकली तरी प्राकृत समण हा शब्द या परंपरेला अत्यंत योग्य पद्धतीने अभिव्यक्त करतो हे आपल्या लक्षात येईल.
माणसा-माणसातील द्वेष, व्यक्तिगत हाव, हिंसा इत्यादी प्रवृत्तींचे निराकरण करत सर्व प्राणिमात्रात असणाऱ्या समान चैतन्यतत्त्वाची मांडणी करत भारतात ही समतेची संस्कृती अतिप्राचीन काळातच उदयाला आली होती असे पुरातत्त्वीय व ग्रांथिक पुरावे पाहून लक्षात येते. वेदपूर्व काळात भारतात संघटित धर्म ही कल्पना अस्तित्वात नव्हती. तसे कारणही नव्हते. भारतात देशभर असंख्य टोळ्या विखुरल्या होत्या. काही टोळ्या प्रगत अवस्थेला पोहोचत होत्या, तर काही अद्यापही रानटी होत्या. सोन नदीच्या खोऱ्यात ८०,००० वर्षं एवढे पुराष्मकालीन पुरातन सांगाडे सापडलेले आहेत. भीमबेटका येथे इसपू ४०,००० ते इसपू १०,००० या काळातील पुरामानवाचे सांस्कृतिक जीवन लक्षात येईल अशी शैलचित्रे सापडली आहेत. कोकणात याच काळातील खडकांवर कोरलेली कातळशिल्पेही असंख्य प्रमाणात मिळालेली आहेत. किंबहुना संपूर्ण देशभर तत्कालीन मानवाने आपले अस्तित्व हत्यारे, घरे, शैलगृहे, कलाकारी, कलात्मक वस्तूंच्या रूपात मागे ठेवलेले आहेत. माणूस त्या काळात टोळी करूनच राहत होता. प्रत्येक टोळीने आपापले भौगोलिक क्षेत्र कधी लढून तर कधी आसपासच्या टोळ्यांशी तह करून नक्की केलेले होते. प्रत्येक टोळीचे स्वत:ची ओळख दाखवणारे टोळीचिन्ह असे. टोळीचिन्हे नंतर देवस्वरूपात अथवा देवकांच्या रूपात बदलली. प्रत्येक टोळीचे आपापले समाजजीवन होते, प्रथा-परंपरा होत्या. अस्मिता होत्या व त्यामुळे आलेले टोळी-अहंकारही होते. आपापसात झगडे- लढाया या त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होत्या.
माणूस टोळीजीवनात होता तेव्हा त्याची आदिम दैवते होतीच. ही दैवते नावे वेगळी असली तरी बव्हंशी सुफलनता विधीशी संबंधित होती. शिवाय टोळीजीवनात माणसाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे मृत्यूचा. मग तो नैसर्गिक प्रकोपात आलेला असेल, रोगराईत आला असेल किंवा युद्धात, अपघातात किंवा नैसर्गिकरीत्या. कोणत्याही टोळीची मनुष्यसंख्या कमी-अधिक वेगाने कमी-जास्त होत असे आणि टिकण्यासाठी संख्या तर अधिक असणे गरजेचे होते. त्यामुळे स्त्रीला महत्त्व आलेले होते. स्त्रीला अपत्य जन्माला घालण्याच्या शक्तीमुळे तिला आद्य देवी मानले गेले. तंत्रशास्त्रांचा उगम याच गूढभावाला दैवीशक्ती मानत झाला. शिव-शक्ती संकल्पना उदयकाळी तांत्रिक सुफलनतेशीच (Fertility) संबंधित होती हे उघड आहे. अगदी सुरुवातीला योनीपूजा स्वतंत्रपणेच होत असे याचा इसपू ९००० वर्षं इतका जुना पुरावा आता मध्य प्रदेशातील सोन नदीच्या खोऱ्यात सिधी जिल्ह्यात बाघोर येथे झालेल्या उत्खननात उपलब्ध झाला आहे.
शेतीने अनेक नव्या व्यवस्थांना जन्म दिला असला, मानवी जीवन सुसह्य व सुरक्षित केले असले तरी असुरक्षितता कधीच कमी झाली नाही. उलट नव्या समस्या निर्माण होऊ लागल्या. सिंधू संस्कृती तर उत्पादन आणि व्यापारामुळे आर्थिकदृष्ट्या उत्कर्षस्थानी पोचली असली तरी संपत्तीचे वितरण समाजात सारखे असणे शक्य नव्हते. सिंधू संस्कृतीतील सापडलेल्या नगरांच्या अवशेषांत गृहरचना आणि एकंदरीत नगररचना शास्त्र यावरून एकंदरीत समाज म्हणून सधनता असली तरी सर्व सधन नव्हते हे स्पष्ट होते. विषमता अन्यायाला जन्म देते. स्थिर समाजाची ही अपरिहार्य स्थिती आहे.
प्रतिमा पूजा, निसर्ग पूजा, पूर्वज पूजा हे अदृश्य शक्तींना प्रसन्न करून घेण्यासाठी वा त्यांना संतुष्ट करण्यासाठी सुरुवातीला पुरेसे वाटले तरी हे बाह्य मार्ग आहेत, खरा मार्ग आंतरिकही असू शकतो याची जाणीव भारतीय विचारकांना फार प्राचीन काळीच झाली. अचिंत्य शक्तीचा शोध बाहेर प्रतिमांमध्ये घेण्यापेक्षा आपल्या अंतर्मनाच्या सहाय्यानेच तो घेता येईल असे वाटू लागल्याने विश्व आणि मानवी जीवन याचा अर्थ शोधण्यासाठी त्याने बाह्य मार्गांप्रमाणेच आंतरिक मार्गही शोधले.
या तत्त्ववेत्त्यांसमोर प्रारंभिक प्रश्न हे स्पर्धात्मक जगातले अपरिहार्यपणे निर्माण झालेले सामाजिक व व्यक्तिगत दु:खाचे निराकरण कसे करायचे? मृत्यू म्हणजे काय व मृत्योत्तर जीवन म्हणजे काय? कर्म करणे श्रेयस्कर की कर्म न करणे हेच योग्य? मोक्ष आहे की नाही? असल्यास कोणत्या प्रकारे जगल्यामुळे त्याची प्राप्ती होऊ शकते? ईश्वर किंवा देव आहे की नाही? असल्यास त्याचे नेमके स्वरूप काय आहे? कोणती समाजव्यवस्था मानवाला सुखी बनवू शकते? समाजव्यवस्था दैवी आहे की मानवनिर्मित? मुळात नियती म्हणजे काय? तिचे स्वरूप काय? ती खरेच असते की नाही? ती खरी असेल तर नियती अथवा भाग्य बदलवता येते की नाही? हे विश्व कोणी बनवले? ईश्वर एक आहे की अनेक? व असे असंख्य नैतिक/तात्त्विक प्रश्न या आद्य विचारकांसमोर उभे ठाकणे स्वाभाविक होते.
भारतीय समण संस्कृतीचा आद्य उद्गार म्हणजे जैनांचे पहिले तीर्थंकर ऋषभनाथ हे होत. त्यांची ऐतिहासिकता आता सिद्ध झाली असून त्यांचा काळ सनपूर्व २७०० इतका जुना आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. किंबहुना मानवी संस्कृतीची धारा त्यांच्यापासून सुरू झाली, अशी जैनांची श्रद्धा आहे. समण संस्कृतीने योग, संन्यास, त्याग, दया, सर्व जीवमात्राबद्दल अनुकंपा, अहिंसा अशा तत्कालीन समाजाला अपरिचित बाबींचा शोध लावला आणि मनुष्यमात्राला खऱ्या अर्थाने सुसंस्कृत बनवायला सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर वनस्पतीतही अन्य जीवांप्रमाणेच चैतन्य असते व तिलाही संवेदना असतात हा एकोणीसाव्या शतकापर्यंत जगाला अपरिचित असलेला शोध हजारो वर्षांपूर्वीच लावला. सूक्ष्म जीवसृष्टीचाही प्राधान्याने विचार केला व त्यांचीही हिंसा होऊ नये यासाठी कठोर व्रते धारण केली. थोडक्यात समण संस्कृतीने भारताला नैतिकदृष्ट्या शिखरावर पोचवले. याच विचारधारेतून इसपू सहाव्या शतकात बौद्ध व आजीवक हे धर्म निर्माण झाले. आज ही संस्कृती लयाला जाऊ पाहत आहे. स्वार्थ, हिंसा केवळ मानवी स्तरावरच उरलेले नाहीत तर त्याची लागण राष्ट्रांनाही कधीच झालेली आहे. या संस्कृतीचे पुनरुत्थान होणे ही काळाची गरज आहे.