चर्चा तर होणारच...आ जाओ बॉस दिखा दूंगा...

इंस्टाग्रामवर Property Transaction Guru नावाने रिल्स करणारा भावेश इथपर्यंत नेमका पोहचला कसा ?
चर्चा तर होणारच...आ जाओ बॉस दिखा दूंगा...
Published on

सध्याचा जमाना हा व्हायरलचा जमाना आहे असे म्हणायला हरकत नाही. तुम्ही केलेली एखादी गोष्ट कधी कोणाला आवडेल आणि ती तुमची ओळख बनेल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या रिल्स आणि शॉर्ट्सच्या खजिन्यामध्ये असे बरेच रत्न हाताला लागत आहेत. अशातच आता सध्या सर्वांच्या तोंडावर सतत एक वाक्य आहे ते म्हणजे "आ जा ओ बॉस दिखा दूंगा... आणि डी मार्ट के उपर..."

आता ज्यांनी या रिल्स बघितल्या असतील, त्यांना नेमकं कळालं असेल की, आपण कशाबद्दल बोलतोय; मात्र या सर्व फेमस व्हायच्या आधीचा स्ट्रगल देखील आपल्याला कधी कधी माहित असणं गरजेचं आहे. सेंट्रल, हार्बर किंवा वेस्टर्न कुठेही घर घ्यायचं बघत असाल तर त्याचं उत्तर एकच आहे, “आ जा ओ दिखा दुंगा" असे म्हणत लहान-थोरांपासून सर्वाना आपल्या या वेगळ्या धूनची सवय लावणारा भावेश कावरे रातोरात फेमस झाला आहे.

रिअल इस्टेटमध्ये कार्यरत असणारा भावेश घर दाखवण्याचा वेगळ्या पद्धतीमुळे सध्या आपल्या बिझनेसमध्ये चांगलाच रुळला आहे. नेहमीची ठराविक वाक्य बोलून आपले प्रोडक्ट दाखवण्याचे एक वेगळेच कसब त्याला प्राप्त झालं आहे. इंस्टाग्रामवर Property Transaction Guru नावाने रिल्स करणारा भावेश इथपर्यंत नेमका पोहचला कसा ? याबाबत त्याने नुकत्याच एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. मुळचा आळेफाट्याचा असलेला भावेश शिक्षणाच्या बाबतीत तेवढा हुशार नव्हता, दहावीनंतरच त्याने शिक्षणाला रामराम केला.

आजोबानी सुरू केलेल्या भाजीच्या व्यवसायात वडिलांसोबत हातभार लावत वडिलांसोबत कोंबड्या विकायचा ही व्यवसाय त्याने आजमावला. वडिलांसोबत काम करत करत आज त्यांची ८ दुकाने आहेत असे तो अभिमानाने सांगतो. आजही कधी वेळ मिळाल्यास तो आपल्या दुकानांवर जाऊन वेळ घालवतो. पूर्णवेळ व्यवसायामध्ये येण्याआधी भावेशचे टिकटॉकवर ६० हजारहुन अधिक फॉलोवर्स होते. २०१९ नंतर त्याने पूर्णवेळ या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देत रिअल इस्टेट डीलिंगच्या  विश्वात एक स्वतःचे वेगळे ग्लॅमर मिळवले आहे. भावेशच्या फेमस लाईन्स, "आ जा ओ दिखा दूंगा,  घर पाहिजे असेल तर भावेश भाईला कॉल करा, डी मार्ट के सामने" अशा अनेक ओळींवर सध्या चांगलेच मिम्स फिरू लागलेत. 

logo
marathi.freepressjournal.in