अंधश्रद्धेचे अजून किती बळी ?

सर्वत्र या विषयाची वेगवेगळ्या प्रकारची व भिन्न भिन्न तर्कावर चर्चा झाली
अंधश्रद्धेचे अजून किती बळी ?

सांगली जिल्ह्यातील कर्नाटकच्या सरहद्दी जवळ असलेल्या म्हैसाळ गावात परवा एकाच कुटुंबातील नऊ सदस्यांनी सामुदायिक आत्महत्या केल्या. सर्वत्र या विषयाची वेगवेगळ्या प्रकारची व भिन्न भिन्न तर्कावर चर्चा झाली. समाज माध्यमातून अनेकांनी अनेक मतं मांडली. पोलिसांनी या सामुदायिक आत्महत्येस खासगी सावकारी जबाबदार असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला. १०-१५ खासगी सावकारांना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली. म्हैसाळ हे गाव तसे नदीकाठी असलेले समृद्ध व सधन गाव आहे. संपूर्ण शेतीचे क्षेत्र बागायती आहे. गावात अनेक उद्योग व्यवसाय सुरू आहेत. अनेक जण विविध क्षेत्रात नोकऱ्या करत आहेत. ज्या कुटुंबाने आत्महत्या केली आहे, ते कुटुंबही आर्थिक दृष्टीने चांगले सक्षम आहे. त्या दोन भावांपैकी एक जण नावाजलेल्या शिक्षण संस्थेत नोकरीस होता, तर दुसरा स्वतःचा पशुवैद्यकीय व्यवसाय करत होता. दोघांचाही सुखी संसार होता. कुटुंबं छोटी होती. स्वतःच्या पायावर उभी होती. स्वतःच्या कमाईतून त्यांनी उत्तम प्रकारची घरं बांधली होती. गावात अनेक

राष्ट्रीयीकृत, व्यापारी व सहकारी बँका आहेत. पतसंस्था, सोसायट्या सारख्या अनेक वित्तीय संस्था कार्यरत आहेत. तिथं सुलभपणे कर्जपुरवठा होतो. असे असताना त्या कुटुंबाला खासगी सावकाराकडून कर्ज घेण्याची बिलकूल गरज नसावी. असे एकंदरीत दिसते. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी खासगी सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याज दराने पैसे का घेतले असतील? असा साहजिकच प्रश्न निर्माण होतो. इतके भरमसाठ कर्ज काढून त्याचा विनियोग त्यांनी कसा व कुठे केला याचाही विचार गांभीर्याने करणे आवश्यक आहे. पोलीस त्याच्या खोलात गेले असता त्यांना एक विदारक सत्य सापडले. ते कुटुंब गुप्तधनाच्या लालसेपोटी गुप्तधन मिळवून देणाऱ्या मांत्रिकाच्या नादी लागल्याचे निदर्शनास आले आहे. त्या मांत्रिकाने सांगितलेले विधी अत्यंत खर्चिक असल्याने त्यासाठी त्यांचा मोठा खर्च झाला आहे. तो खर्च त्यांच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा कित्येक पटीने जास्त होता. त्यामुळे त्यांनी वित्तीय संस्थाकडून आणि खासगी सावकाराकडून भरमसाठ कर्जे घेतलेली दिसतात. खरं तर हे शिकले सवरलेले लोक. त्यातला एक जण विज्ञानाचा पदवीधर. दुसरा माध्यमिक शिक्षक. त्यांनी अंधश्रद्धा बाळगणे, गुप्तधन मिळण्याची अभिलाषा बाळगणे हे धडधडीत अशास्त्रीय व अविवेकी होते व आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस प्रा. संजय बनसोडे यांच्यासोबत मी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीमने म्हैसाळ या गावी समक्ष भेट दिली. खासगी सावकाराकडून कर्ज घेण्यामागे कुणी भोंदूबाबा आहे काय? त्यांनी या कुटुंबास नादी लावले होते काय? या बाजूनेही पोलीस यंत्रणेने तपास करावा, असे निवेदन आम्ही पोलीस प्रमुखांना दिले. गावात ठिकठिकाणी जाऊन स्थानिक नागरिकांशी बोललो. लोक स्पष्ट बोलत नाहीत; परंतु त्यांच्यात एक कुजबुज दिसते. त्या गावात असलेल्या सुबत्तेने गावातील बऱ्याच जणांना अंधश्रद्धा व गुप्तधन याच्या नादी लावलेलं आहे. यापूर्वीही अनेक शिकले सवरलेले लोक मांत्रिक व भोंदूबाबा यांच्या नादी लागलेले होते. त्यांनाही गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवून थातुरमातुर विधी करायला भाग पाडले होते. त्यासाठी मोठा म्हणजे त्यांच्या आवाक्याबाहेरचा खर्च करावयास लावला होता. त्या खर्चासाठी खासगी सावकाराचे त्यांनी कर्ज घेतले होते.

गुप्तधन हे केवळ आमिष होते. असं कुठलंही गुप्तधन कधीही कुणालाही मिळालेलं नाही. सावकारी कर्जाच्या तगाद्याला वैतागून त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. गेल्या काही वर्षांत त्या गावात असा एक सुप्त संदेश फिरतो आहे की, हे गाव पुरातन काळातील आहे. तिथले वाडे जुन्या काळातील आहेत. तिथं असणाऱ्या जुन्या वाड्यात मोठ्या प्रमाणात गुप्तधन आहे; मात्र ते गुप्तधन मिळविण्यासाठीचे विधी खर्चिक आहेत. जो ते विधी करेल त्यास ते मिळेल. तो संदेश पसरविणारे हे भोंदूबाबा व मांत्रिक आहेत. त्यांच्या नादी लागणारे शिकलेले आहेत; पण त्यांनी त्यांचा विवेक गुंडाळून ठेवला आहे. ते अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत. माणसं नुसती शिकून उपयोग नाही. ती माणसं विचार करणारी, विज्ञानवादी, विवेकी आणि कार्यकारण संबंधाची चिकित्सा करणारी असली पाहिजेत, याचसाठी तर डॉ. नरेंद्र दाभोलकर हयातभर लढले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अनेक सहकारी ‘विवेकाचा आवाज बुलंद करू या’ हे घोषवाक्य घेऊन नेटाने काम करत आहेत. समाजातील काही जण ‘अंधश्रद्धा संपल्या’, असं साळसूदपणे म्हणत आहेत. शिक्षणाने अंधश्रद्धा कमी होतात, असेही काही जण म्हणत आहेत. हे सगळे भ्रम आहेत. सामुदायिक आत्महत्येने हे आता अधोरेखित केले आहे. आपण अजून किती बळी गेल्यानंतर जागे होणार आहे. समाजाला गदागदा हलवून त्याच्या मानगुटीवर बसलेलं अंधश्रद्धेचं भूत उतरविण्याची नितांत गरज आहे. यापुढे आणखी बळी जाण्याची वाट पाहावी लागू नये.

शिकलेल्या माणसांमध्ये कष्ट करून पैसे मिळविण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यांना इझी मनी हवा आहे. त्यासाठी त्यांची काम करण्याची अजिबात तयारी नाही. कमी श्रमात जास्त पैसे मिळविण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. संपत्ती श्रमातूनच निर्माण होते, हा जागतिक पातळीवरील अर्थशास्त्राचा सिद्धान्त सोईस्करपणे टाळला जातोय. त्याऐवजी अंधश्रद्धा, बुवाबाजी, भोंदू, मांत्रिक यांच्या कच्छपी शिकलेली माणसं लागलीत. हे संपूर्ण समाजाला घातक आहे. मोठ्या प्रमाणात जागृती आणि प्रबोधन होण्याची नितांत आवश्यकता आहे. हे काम केवळ सरकारचे अगर पोलिसांचे नाही. समाजाची ही सामूहिक जबाबदारी आहे, समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या कामाचा परीघ रुंदावला पाहिजे. आपला समाज आता आपणच वाचविला पाहिजे. आपल्या घरापुरती असलेली आपली बांधीलकी समाजापर्यंत नेली पाहिजे. यासाठी आपणच लढले पाहिजे. लढ्यात सातत्य ठेवले पाहिजे. आपल्यावरील समाजाचे ऋण फेडण्याची आपली जबाबदारी आहे. ती पार पाडली पाहिजे. आपण समाजाचे देणे लागतो. ही भावना ठेवूनच विवेकी वाटचाल करावी लागणार आहे. त्यामार्गाने आपण जाणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in