गुरुंची अवहेलना अजुन किती?

चाकरमान्यांना चहापाणी, नाश्तावाटपासाठी राजापूर एसटी आगारात शिक्षकांना तैनात केल्याने शिक्षकांच्या संतापाचा कडेलोट झाला.
गुरुंची अवहेलना अजुन किती?

नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात, शिक्षकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्यापासून शिक्षकांना दिले जाणारे वेतन, घरभाडे भत्ता, शाळांची गुणवत्ता याबाबत विधिमंडळ सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. निषेध व्यक्त झाले. मोर्चे निघाले. हे कमी की काय म्हणून याच दरम्यान शिक्षण विभागाने शिक्षकांना आपापल्या वर्गात आपला फोटो लावण्याचे फर्मान काढले. त्यावरून रान पेटलेले असतानाच तिकडे कोकणात गणेशोत्सवासाठी गावोगावी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना चहापाणी, नाश्तावाटपासाठी राजापूर एसटी आगारात शिक्षकांना तैनात केल्याने शिक्षकांच्या संतापाचा कडेलोट झाला. यामुळे शिक्षकांची पदोपदी केली जाणारी अवहेलनेला, अध्यापनाऐवजी शिक्षकांवर लादली जाणारी अनेक अशैक्षणिक कामे आणि सातत्याने शिक्षकांची होणारी ससेहोलपट हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले. काल-परवा झालेल्या शिक्षक दिनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिक्षकांचा गौरव केला गेला. शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारी, शिक्षकांचा गौरव करणारी भाषणे झाली. सत्कार समारंभ झाले. काहींना पुरस्कार दिले गेले. किती हा शिक्षकांचा मान सन्मान! आणि दुसऱ्या दिवशी? शिक्षकांच्या वाट्याला काय, तर अवहेलना दुजाभाव, अपमान! मग हा दांभिकपणा कशाला हवा? समाज इतका असंवेदनशील कसा असू शकतो? माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे स्थान अनन्यसाधारण असेच आहे. गुरूशिवाय विद्या नाही अन‌् गुरूशिवाय जीवनाला अर्थही नाही! एका बाजूला गुरूंची थोरवी सांगणाऱ्या या समाजात गुरुपदाची इतकी अवहेलना कधीच झाली नसेल इतकी अवहेलना, गुरूंना वर्गावरून शाळेबाहेर काढून इतर अशैक्षणिक कामाला जपून केली जावी हे असंवेदनशीलतेचे गाठलेले टोकच म्हणावे लागेल. ज्या समाजाने दोन शिक्षकांना लोकशाहीतील सर्वोच्चपद असलेल्या राष्ट्रपतीपदी नेऊन बसवले, त्या समाजात शिक्षकांची प्रतिमा इतकी पायदळी तुडवली जावी, यापेक्षा दुर्दैव ते कोणते?

खरंतर राज्य असो किंवा केंद्र असो, शिक्षण आणि शिक्षक हा कोणाच्याही प्राधान्याचा विषय राहिलेला नाही. इतर राष्ट्रांच्या मानाने शिक्षणावर केला जाणारा खर्चही कमीच आणि शिक्षकांप्रति आदरही कमीच! सद्य:स्थितीत शिक्षक हा सरकारी कामगार बनला आहे. हे वास्तव आहे, ते कसे पुसणार? खरंतर शिक्षकाचे कार्य विद्यादानाचे; परंतु ते दुर्लक्षित करून त्याला शाळाबाह्य, अशैक्षणिक कामालाच जुंपण्यात सर्व संबंधित धन्यता मानत आहेत. एकीकडे शाळांची गुणवत्ता वाढली पाहिजे, दर्जा सुधारला पाहिजे, शाळा टिकल्या पाहिजे, एकही मूल शाळेबाहेर राहता कामा नये, असे मोठ्या थाटात सांगायचे; परंतु दुसरीकडे शिक्षकांना अशैक्षणिक कामांना जुंपून त्यांना जास्तीत जास्त काळ वर्गाबाहेर ठेवून त्यांची आणि विद्यार्थ्यांची नाळ तोडायची याला काय म्हणायचे? शैक्षणिक गुणवत्ता साधण्याचा हा कोणता मार्ग म्हणायचा? आता तर काय, ‘म्हणे गुरुजींचे फोटो वर्गात लावा;’ पण गुरुजीच वर्गात नसतील तर त्या फोटोकडे बघून मुले शिकतील असे म्हणायचे आहे काय? गुरूंचा फोटो समोर ठेवून विद्याग्रहण करण्याचा काळ पुन्हा एकदा आला की काय? शिक्षकांची हजारो पदे रिक्त ठेवणार, एक एका शिक्षकाच्या गळ्यात दोन-तीन वर्ग मारणार, त्याला वर्ग अध्यापनापेक्षा सतत शाळाबाह्य कामात गुंतवणार आणि दुसरीकडे त्याच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा करणार आणि ती गुणवत्ता दिसली नाही तर त्या शिक्षकाला शास्ती लावणार हा कोणता न्याय म्हणायचा? ‘आम्हाला वर्गावर शिकवू द्या’ हा राज्यभरातील शिक्षकांचा आक्रोश कुणी ऐकणार की नाही?

शिक्षकाचे खरे काम काय तर ज्ञानदानाचे! हा दोन जिवंत मनांशी असलेला अतिशय संवेदनशील संवाद! शिक्षण हक्क कायद्यातदेखील विद्यार्थी जीवनात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. जनगणना, निवडणुका यासारख्या राष्ट्रीय कार्याखेरीज शिक्षकांना अन्य कामे देऊ नयेत, शिक्षकांना सतत वर्गात राहू द्यावे, विद्यार्थीसंख्या आणि विषयानुरूप शाळांमध्ये शिक्षक द्यावेत, या आणि अशा अनेक शिफारशी शिक्षण हक्क कायद्यात केल्या गेल्या आहेत. हा कायदा होऊन एक तप लोटले, तरी शिक्षकांची ना अवहेलना संपली, ना त्यांच्यावरील अनेक शाळाबाह्य कामांचा बोजा कमी झाला! एकूणच प्रशासनापासून समाजापर्यंत सर्वच ठिकाणी शिक्षकाप्रति असणारे आदराचे स्थान कुठेतरी कमी होत जाताना दिसत आहे. अर्थात, याला काही अंशी शिक्षकदेखील जबाबदार आहेत, हेही नाकारता येणार नाही. राज्यात काही ठिकाणी शिक्षकांनी आपल्याच हाताने आपला मान, प्रतिष्ठा आपल्या विघातक कार्याने धुळीस मिळवल्याच्या येणाऱ्या बातम्या समाजमनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. मद्यप्राशन करून वर्गात जाण्यापासून दिवसेंदिवस शाळांचे तोंडही न बघणे, शिकवण्यापेक्षा या अशा गोष्टीत काही शिक्षकांचा सहभाग असावा, हा शिक्षकी पेशाला काळिमाच; परंतु अशा दुर्वर्तनी शिक्षकांचे प्रमाण अत्यल्प आहे; पण म्हणून त्याची शिक्षा सर्व शिक्षकांना कशी देता येईल? प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या विद्येचा श्रीगणेशा जेव्हा त्याने पहिले पाऊल शाळेत ठेवले, तेव्हा त्याच्या गुरूंनी इवल्याशा बोटांमध्ये पेन्सिल देऊन केला हे कसे विसरता येईल? ज्या गुरूंचे मानवी जीवनातील, समाज उभारणीतील स्थान इतके मोठे आहे, त्याच गुरूंची अवहेलना अजून आम्ही किती करणार आहोत? शिक्षकांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेल्या मागण्यांसाठी त्यांना रस्त्यावर उतरावे लागत असेल तर ते समाजाला कितपत भूषणावह ठरते?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांची तब्बल ३१ हजार ४७२ पदे रिक्त आहेत. आरटीनुसार ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अनिवार्य असताना राज्यातील नऊ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षकाविना शिक्षण घेत असतील तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडणार तरी कसा? महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीच्या मते तर राज्यातील तीन लाख सात हजार ५४२ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. तसे असेल तर परिस्थिती भयावह आहे. राज्यातील बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्रत्येक वर्गाला आणि प्रत्येक विषयाला शिक्षक नाहीत. आरटीनुसार सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित, विज्ञान या विषयांसाठी विशेष शिक्षकांची गरज असताना जिल्हा परिषद शाळांमध्ये भाषा, विज्ञान, गणित या विषयांच्या १७,८२२ जागा रिक्त आहेत. राज्यभरात बहुतांशी शाळांमध्ये एका शिक्षकाला किमान दोन ते तीन वर्ग घ्यावे लागत आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई याला अपवाद नाही. एक शिक्षकी शाळा ठेवायच्या नाहीत, असे धोरण असले तरी आजही राज्यात एक शिक्षकी शाळा आहेत. तर किमान आता बऱ्याच शाळा दोन शिक्षकांवर चालवल्या जात आहेत, अगदी मुंबईतदेखील! त्यामुळे येथील प्रत्येक शिक्षकाकडे दोन-तीन वर्गांची जबाबदारी द्यायची; पण वर्ग अध्यापनाऐवजी जास्तीत जास्त वेळ त्यांना शाळेबाहेर बाह्यकामात घालवण्यास लावायचा असेच होणार असेल, तर शिक्षणाची गुणवत्ता कशी उंचावणार? हातात लेखणी आहे म्हणून घसरलेल्या गुणवत्तेला एकट्या शिक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करता येईलही; परंतु त्यातून गुणवत्ता वाढणे केवळ अशक्यच! शाळेचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावणे हे शिक्षकाचे आद्य कर्तव्यच आहे. ते त्यांनी करायलाच हवे. तसे कोणी करत नसेल तर तो शिक्षेस पात्र ठरतो; परंतु त्याला त्याचे कर्तव्य करण्यासाठी आम्ही त्याला पूर्ण वेळ वर्गात ठेवणार आहोत की नाही? याचाही आता विचार करण्याची वेळ आली आहे. त्याला तसे वर्गात ठेवणार नसू आणि त्याच्या गळ्यात असंख्य अशैक्षणिक कामांच्या माळा घालणार असू, तर शिक्षणाच्या अध:पतनास आम्ही जबाबदार नाही काय? राज्यशिक्षक संघटना समन्वय समितीने शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या तब्बल १४१अशा शैक्षणिक कामांची यादीच प्रसिद्ध केली आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात शिक्षकांवर शैक्षणिक कामे लादली जावीत, यापेक्षा शिक्षकपदाची अवहेलना काय असू शकते? म्हणून शिक्षकाशिवाय शिक्षण देण्याची कल्पना तर पुढे येत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. शिक्षकदिनी राज्यातील शिक्षकांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत आश्वासन दिले आहे, तसे झाल्यास तो शिक्षक आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेसाठी सुदिन ठरेल!

कोरोनाकाळात शाळा आणि शिक्षकांशिवाय शिक्षण याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. त्यामुळे त्यातून तरी आम्ही काही धडा घेणार की नाही? गुरूंची अशीच अवहेलना होणार असेल, तर ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः’ असे म्हणण्यात अर्थ तो काय?

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in