इंडिया आघाडी एनडीएला कितपत टक्कर देणार?

भारतीय जनता पक्षाकडून विरोधी नेत्यांचा जनाधार कमी केला जात आहे. दुसरीकडे प्रचारात हिंदुत्ववादाची कास धरणे, सरकारी योजनांच्या जाहिराती करून भाजपने प्रचारात आधीच बाजी मारली आहे. आता पुढील काही दिवसांत...
इंडिया आघाडी एनडीएला कितपत टक्कर देणार?

-अभय जोशी

फोकस

भारतीय जनता पक्षाकडून विरोधी नेत्यांचा जनाधार कमी केला जात आहे. दुसरीकडे प्रचारात हिंदुत्ववादाची कास धरणे, सरकारी योजनांच्या जाहिराती करून भाजपने प्रचारात आधीच बाजी मारली आहे. आता पुढील काही दिवसांत आचारसंहिता लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारसभा राळ उडवून देतील. मोदी यांचा करिष्मा आणि उमेदवार कोणीही असो, ‘कमळ’ हाच उमेदवार समजून मते देण्याचे आवाहन त्यांनी आधीच केले आहे. सत्तेची ‘हॅट‌्ट्रिक’ साधण्यासाठी भाजपची जय्यत तयारी पाहिल्यानंतर जागा वाटपातील चर्चेचे गुऱ्हाळ, गांभीर्याचा अभाव पाहता विरोधकांची इंडिया आघाडी भाजपाला कितपत टक्कर देईल याबाबत शंका वाटते. कारण परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी संपूर्ण तयारी करणे गरजेचे असते. शेवटी जनताजनार्दनाचा कौल सर्वमान्य असतो.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील १०-१२ दिवसांत लागण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत अखेर सपा, आपबरोबर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीचे जागावाटप झाले. परंतु निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या सहा महिने आधी जागावाटप पूर्ण झाले असते तर इंडिया आघाडीला भारतीय जनता पक्षाला कडवे आव्हान देऊ शकली असते. शेवटपर्यंत चर्चेचा घोळ घातल्याने विरोधी आघाडी सशक्तपणे एनडीए आघाडीचा मुकाबला कसा करणार हे कोडेच आहे. भारतीय जनता पक्षाने तर दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी ओबीसी खासदारांना केंद्रात मंत्रिपद देऊन ओबीसींची मतपेढी आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओबीसीची मते हे निर्णायक ठ‌रू शकतात हे भाजपने हेरले आहे. त्यादृष्टीने त्यांनी आपली रणनीती ठरवली. त्यासाठी त्यांनी काँग्रेससह अनेक पक्षांतील विद्यमान खासदार, आमदार आणि मागील निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार यांनाही प्राधान्याने पक्षात प्रवेश दिला आहे. ते उमेदवार पराभूत झाले असले तरी त्यांची मतपेढी लक्षात घेऊन त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन त्यांना बळ देण्यात येत आहे. कारण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेवर आणून ‘हॅट‌्ट्रिक’ साधण्याचे भारतीय जनता पक्षाचे उद्देश आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी रणनीती ठरवली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून एकीकडे ओबीसींची मतपेढी बनवताना दुसरीकडे १६५ लोकसभेच्या जागांवर जेथे काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षाचे खासदार निवडून आले किंवा भाजपचे उमेदवार पराभूत झाले, त्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. अशा जागांवर भाजपने आपली तयारी दोन वर्षे आधीच सुरू केली होती. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना भाजपमध्ये मानाचे स्थान देत आहे. तर पुन्हा सत्तेच्या हॅट‌्ट्रिकसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी स्वपक्षातील नेत्यांची समजूत घातली जात आहे. विशेष म्हणजे मोदी आणि शहा यांच्या रणनीतीपुढे भाजपमधील नेतेही विरोधात पाऊल उचलण्याची सुतराम शक्यता नाही. भाजपचा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना ‘इस बार ३७० पार’ आणि ‘एनडीए ४०० पार’ जागा मिळवण्याचा आत्मविश्वास पाहता ‘इंडिया’ आघाडीत आत्मविश्वास सोडा, ताळमेळही दिसत नाही. शेवटपर्यंत चर्चेचे गुऱ्हाळ घातले. आघाडी होणार की नाही, इथपर्यंत संबंध ताणले गेले. मात्र, अखेरच्या टप्प्यात काँग्रेसने समाजवादी पार्टीबरोबर जागावाटप जाहीर केले. उत्तर प्रदेशमधील युती अधिक महत्त्वाची असून तिथे सपा ६३ जागा लढवणार आहे आणि काँग्रेस उर्वरित १७ जागा लढवणार आहे. भाजपचे तगडे आव्हान लक्षात घेता ही ‘परीक्षा’ सोपी नाही, मात्र, युतीचा लाभ काँग्रेसला काही प्रमाणात होऊ शकतो. कारण उत्तर प्रदेशात काँग्रेसचा जनाधार खूपच कमी झाला आहे, तर मध्य प्रदेशात सपाबरोबर आघाडी न केल्याने काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. त्यामुळे अखेर प्रियंका गांधी यांच्या मध्यस्थीने ही युती होणे काँग्रेससाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल. काँग्रेसने उत्तर प्रदेशामध्ये सपा आणि मध्य प्रदेशात आणि दिल्ली, हरयाणा, गुजरात, गोवा आणि चंदिगडमध्ये आम आदमी पार्टी (आप)सोबत करार केले आहेत. आम आदमी पार्टीनेही स्वतंत्र लढण्याचे जाहीर केले होते. कदाचित दबाव तंत्राचा भाग असावा, जो प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. मात्र, त्याचा लाभ भाजपला होईल, हे लक्षात घेऊन दिल्लीत काँग्रेस आणि ‘आप’ यांची युती झाली. दोन्ही पक्षांनी अनुक्रमे ३ आणि ४ जागा लढवण्याचे जाहीर केले. गुजरातमधील भरूच आणि भावनगर आणि हरयाणातील कुरुक्षेत्र या जागाही ‘आप’ लढवणार आहेत. पण पंजाबमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. प. बंगालमध्ये ४२ जागा आहेत. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी झाली असल्याने विरोधी मतांमध्ये फूट टाळण्याचा शहाणपणा दोन्ही पक्षांनी केला आहे. मात्र, परंतु सीपीएम आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या स्थानिक घटकांनी तृणमूलशी लढा दिल्याने दोन्ही पक्षांच्या केंद्रीय नेतृत्वांना ममता यांच्याशी वाटाघाटी करणे कठीण जात आहे. कम्युनिस्टांचा ममता बॅनर्जींना असलेला विरोध लक्षात घेता, तेथे विरोधकांच्या मतविभाजनाचा लाभ भाजपला मिळू शकतो.

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जनता दलाला (संयुक्त) ‘एनडीए’त आणून तेथील राजकीय समीकरणे बदलली. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांची राजकीय स्थिती कमकुवत केली. बिहारमधील जास्तीत जास्त जागा पदरात पाडण्याच्या रणनीतीवर भाजपने काम केले, तर जनताजर्नादनाचा कौल कोणाला मिळतो हे पाहणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आधीच ३९ जागांसाठी तडजोड झाली आहे. तर उर्वरित जागांसाठी लवकरच निर्णय होईल. भाजपच्या एनडीए आघाडीला सर्वच जागा मिळवायच्या आहेत, तर इंडिया आघाडीही जास्तीत जागा मिळवण्याचा दावा करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांच्या इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडी सामील होत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला आणखी बळ मिळेल, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने अद्याप भाजप-शिवसेना शिंदे गट, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत महायुतीत सामील होणार की नाही हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे एकीकडे राज ठाकरे भाजप, मोदींवर टीका करतात तर दुसरीकडे भाजपचे मुंबईचे प्रमुख आशिष शेलार हे अचानक राज ठाकरे यांची भेट घेऊन ‘सस्पेन्स’ कायम ठेवतात. त्यामुळे राज ठाकरे स्वतंत्रपणे लढणार की, भाजपच्या महायुतीत सामील होणार, यावर काही मराठी टक्का इंडिया आघाडी आणि एनडीएला लाभदायी ठरू शकतो. त्याचबरोबर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नका ही ओबीसी नेत्यांची मागणी आदी मुद्दे निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी दोन वर्षे आधीच तयारी सुरू केली. त्यासाठी ओबीसी नेत्यांना मंत्रिपदे देऊन ओबीसी मतपेढी आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांतील नेत्यांना पक्षप्रवेश, त्यांना बळ दिले जात आहे. मध्य प्रदेश, राजस्थानातील विधानसभा निवडणुकीत सत्ता काबीज करत काँग्रेसचे खच्चीकरण केले. एकूणच विरोधी नेत्यांचा जनाधार कमी केला जात आहे. दुसरीकडे प्रचारात हिंदुत्ववादाची कास धरणे, सरकारी योजनांच्या जाहिराती करून भाजपने प्रचारात आधीच बाजी मारली आहे. आता पुढील काही दिवसांत आचारसंहिता लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारसभा राळ उडवून देतील. मोदी यांचा करिष्मा आणि उमेदवार कोणीही असो ‘कमळ’ हाच उमेदवार समजून मते देण्याचे आवाहन त्यांनी आधीच केले आहे. सत्तेची ‘हॅट‌्ट्रिक’ साधण्यासाठी भाजपची जय्यत तयारी पाहिल्यानंतर जागावाटपातील चर्चेचे गुऱ्हाळ, गांभीर्याचा अभाव पाहता विरोधकांची इंडिया आघाडी भाजपला कितपत टक्कर देईल याबाबत शंका वाटते. कारण परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी संपूर्ण तयारी करणे गरजेचे असते. शेवटी जनताजनार्दनाचा कौल सर्वमान्य असतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in