
आपले महानगर
तेजस वाघमारे
सुरक्षा नंबर प्लेट लावण्यासाठी टू व्हिलर गाडीसाठी ३०० ते ५००, चारचाकी गाडीसाठी ६०० ते १२०० आणि व्यावसायिक वाहन १५०० ते २ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. या शुल्कालाही वाहनचालकांकडून विरोध होत आहे. गाडी खरेदीवेळी टॅक्स, विमा घेण्यात येतो. त्यानंतर सरकार सुरक्षा नंबर प्लेट लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत असल्याबद्दल वाहनचालक नाराजी व्यक्त करत आहेत.
सर्व वाहनांसाठी हायसिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी देशभरात सुरू झाली आहे. त्यानुसार राज्य सरकारने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना एचएसआरपी बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यापूर्वी नंबर प्लेट बनविणाऱ्या आणि रेडियमचे काम करणाऱ्या लाखो व्यावसायिकांवर संक्रात येणार आहे. एचएसआरपी दिलेल्या मुदतीत वाहनावर न लावल्यास वाहनचालकांना दंडाला सामोरे जावे लागणार आहे. या भीतीपोटी याचे फायदे- तोटे माहीत नसतानाही वाहनचालकांना वाहनावर एचएसआरपी बसवावी लागत आहे.
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी परिवहन विभागाने वाहनांना ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदत दिली होती. या मुदतीमध्ये उच्च सुरक्षा नंबर प्लेट बनविण्यासाठी नागरिकांची लूटमार झाली. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना नंबरप्लेट बसविण्यात गोंधळामुळे मनस्ताप सहन करावा लागला. ग्रामीण भागातील लोकांना ऑनलाइन अर्ज भरता येत नसल्याने याचा फायदा एजंटनी घेतला. यातून शहरांसह ग्रामीण भागातील नागरिकांची प्रचंड लूटमार झाली.
राज्यातील अनेक भागात सुरक्षा नंबर प्लेट बसविण्याच्या कामात गोंधळ झाला. फिटमेंट सेंटर अचानक बंद करणे, दिलेल्या दिवशी नंबर प्लेट न येणे, वेबसाइट बंद पडत असल्याने सुरक्षा नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाने ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
राज्यातील सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट बसवावी लागेल. हे काम पूर्ण झाल्यास वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची त्वरित ओळख पटविणे, वाहन क्रमांक पाटीमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखण्यात येणार असल्याचा दावा परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे. दिलेल्या मुदतीमध्ये सुरक्षा नंबर प्लेट न लावल्यास वाहनचालकांना दंड भरावा लागणार आहे.
सुरक्षा नंबर प्लेट का लावावी याबाबत जनजागृती नसल्याने वाहनचालकांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यात परिवहन विभागाला अपयश आले आहे.
सुरक्षा नंबर प्लेट बसविण्याकरिता ३ कंपन्यांची परिवहन विभागामार्फत निवड केली आहे. देशभरात या तीन कंपन्या काम करत आहेत. या कंपन्यांना पोसण्यासाठी सुरक्षा नंबर प्लेटचे नाव पुढे करण्यात येत असल्याचा आरोप जाणकार व्यक्त करत आहेत. या कंपन्यांमार्फत आकारण्यात येणारे शुल्क राज्यात अधिक असल्याचा आरोप झाला. मात्र नवीन सुरक्षा नंबर प्लेटमुळे यापूर्वी नंबर प्लेट बनविणारे आणि रेडियमचे काम करणाऱ्या लाखो व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे. या व्यवसायासाठी अनेकांनी आवश्यक असणाऱ्या लाखो रुपयांच्या मशिनरी खरेदी केल्या. मात्र सुरक्षा नंबर प्लेटमुळे त्यांचा व्यवसाय बंद होऊन अनेकांना बेरोजगार व्हावे लागणार आहे.
यापूर्वी उपलब्ध असलेल्या नंबर प्लेट काढता येत होत्या. यामुळे गाडी नंबरचा गैरवापर होत होता. यामुळे वाहनचोरीमध्ये वाढ झाली होती. चोरीचे वाहन शोधणे पोलिसांना शक्य होत नव्हते. मात्र आता नवीन नंबर प्लेट लावल्यास वाहनचोरीच्या घटना कमी झाल्याचा दावा परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.
सुरक्षा नंबर प्लेट लावण्यासाठी टू व्हिलर गाडीसाठी ३०० ते ५००, चारचाकी गाडीसाठी ६०० ते १ हजार २०० आणि व्यावसायिक वाहन १ हजार ५०० ते २ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. या शुल्कालाही वाहनचालकांकडून विरोध होत आहे. गाडी खरेदीवेळी टॅक्स, विमा घेण्यात येतो. त्यानंतर सरकार सुरक्षा नंबर प्लेट लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत असल्याबद्दल वाहनचालक नाराजी व्यक्त करत आहेत. देशभरातील कोट्यवधी वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट लावण्यात येणार आहेत. या नियमाच्या अंमलबजावणी अडून कंपन्यांचे उखळ पांढरे तर होत नाही ना, अशी शंका नागरिक उपस्थित करत आहेत.
राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार जरी राज्यासह देशभराच एचएसआरपी नंबर प्लेट लावणे अनिवार्य केले असले, तरी सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या जुन्या म्हणजेच २०१९ पूर्वीच्या वाहनांची नंबर प्लेट बदलण्यासाठी का खर्च करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्यामध्ये एकीकडे सरकारकडून एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास दंडाची भीती आणि दुसरीकडे खिशाला कात्री लावून नंबर प्लेट लावण्याची दुहेरी संकटात सर्वसामान्य नागरिक सापडल्याचे चित्र सुद्धा दिसून येत आहे.
दुसरी बाजू म्हणजे, या एचएसआरपी नंबर प्लेटमुळे दादा, बाबा, काका किंवा चार क्रमांकाची नंबर प्लेट सुद्धा असताना १ नंबर टाकून रस्त्यांवर फिरणाऱ्या राजकारण्यांना सुद्धा आता चार अंकी एचएसआरपी नंबर प्लेट लावूनच फिरावे लागणार आहे. मात्र, जर का त्यांनी एचएसआरपी नंबर प्लेट न लावल्यास अशा राजकीय, उद्योगपती, अधिकारी किंवा व्हीआयपी, व्हीव्हीआयपी वाहनमालकांच्या अडचणी वाढणार हे मात्र खरं आहे.
अशी असेल एचएसआरपी नंबर प्लेट
हायसिक्युरीटी नंबर प्लेट (एचएसआरपी) ही अॅल्युमिनियमपासून बनवलेली नंबर प्लेट आहे. जी गाडीच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला लावली जाते. एचआसआरपी नंबर प्लेटच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात ब्ल्यू क्रोमियम-आधारित अशोक चक्र होलोग्राम असेल. त्याच्या डाव्या कोपऱ्यात एक यूनिक लेसर-ब्रँडेड १० अंकी स्थायी ओळख क्रमांक (पिन) दिलेला असणार आहे.
रजिस्ट्रेशन क्रमांकाच्या अंकावर आणि अक्षरांवर एक हॉट-स्टॅम्प फिल्म लावली जाते. त्यासोबत ब्ल्यू कलरमध्ये ‘IND’ लिहिले आहे. विशेष म्हणजे वाहनाच्या डिजिटल रजिस्ट्रेशननंतर एचएसआरपी नंबर प्लेट जारी केले जाते.
tejaswaghmare25@gmail.com