महाराष्ट्राला ड्रग्सचा विळखा

'महाराष्ट्र आता थांबणार नाही' अशी घोषणा देऊन महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकली. प्रचंड बहुमताने सत्तेत आल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि गुन्हेगारी घटनांमध्ये झालेली प्रचंड वाढ पाहता आता गुन्हेगारी थांबणार नाही, असे म्हणावे की काय, अशी भयंकर परिस्थिती समोर आली असून, ड्रग्स माफियांनी महाराष्ट्राला विळखा घातला आहे.
महाराष्ट्राला ड्रग्सचा विळखा
Published on

- दखल

- श्रीनिवास बिक्कड

'महाराष्ट्र आता थांबणार नाही' अशी घोषणा देऊन महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकली. प्रचंड बहुमताने सत्तेत आल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि गुन्हेगारी घटनांमध्ये झालेली प्रचंड वाढ पाहता आता गुन्हेगारी थांबणार नाही, असे म्हणावे की काय, अशी भयंकर परिस्थिती समोर आली असून, ड्रग्स माफियांनी महाराष्ट्राला विळखा घातला आहे.

मुंबई -पुण्यापासून ते मराठवाड्यातील परांडा- तुळजापूरपर्यंत सगळीकडे अगदी खुलेआम पणे अंमलीपदार्थांची विक्री सुरू आहे. शाळा, कॉलेज परिसरात म्यावं- म्यावं, कुत्ता गोली अशा विविध प्रकारात व वेगवेगळ्या नावाखाली अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. २०२४ या एका वर्षांत राज्यात १४ हजार २३० जणांना अंमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, चार हजार २४९.९० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. राज्यात ड्रग्स बाळगणे व विक्री केल्याप्रकरणी चार हजार ७३८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, तीन हजार ६२७ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, अंमली पदार्थाच्या व्यापार आणि सेवनात राज्याची सांस्कृतीक आणि शैक्षणिक राजधानी पुणे आघाडीवर असून एकट्या पुण्यात या प्रकरणी १२९ गुन्हे नोंद झाले असून, २०४ जणांना अटक करण्यात आली आहे व तीन हजार ६७९ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मुंबईतही खुलेआम अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन सुरू असून, या प्रकरणी एक हजार १५३ गुन्हे नोंद करण्यात आले असून, एक हजार ३४२ जणांना अटक करण्यात आली. तसेच ५१३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यावरून जप्त न केलेले आणि पोलिसांची नजर चुकवून राज्यात किती मोठ्या प्रमाणात ड्रग्स आले असतील आणि त्यांची विक्री झाली असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. अंमली पदार्थाच्या व्यवसायातून प्रचंड मोठी कमाई होते. या पैशांचा वापर करून ड्रग तस्कर पोलीस आणि राजकारण्यांकडून संरक्षण मिळवतात, हे सत्य अनेकदा समोर आले आहे. सगळीकडे याची चर्चा होते पण या प्रकरणांच्या मुळापर्यंत जाऊन बड्या धेंडांवर कारवाई काही होत नाही.

राज्याच्या विविध भागात ड्रग्सचे कारखाने

गेल्यावर्षी पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम लॅबोरेटरीज कंपनीतून जवळपास चार हजार कोटी रुपयांचे एक हजार ८३६ किलो ड्रग्सचा साठा जप्त केला होता. त्यापूर्वी नाशिकमध्ये ललित पाटील नावाच्या माफियाने अंमली पदार्थाचा कारखाना उघडला होता. सोलापूर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यातूनही कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिणा या छोट्याश्या खेड्यातही मेफाड्रान हा अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना सुरू होता. विशेष म्हणजे, मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारीच हा कारखाना चालवत होता. केंद्र सरकारच्या महसूल गुप्तचर विभागाने या कारखान्यावर कारवाई करेपर्यंत स्थानिक पोलिसांना याची कल्पनाच नव्हती यावर सर्वसामान्यांनी विश्वास कसा ठेवायचा. ही फक्त काही प्रातिनिधीक उदाहरणे आहेत, राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या अशा कारखान्यांच्या बातम्या आपण सातत्याने वर्तमानपत्रातून वाचत असतो वृत्तवाहिन्यांवरून पाहत असतो.

विद्येचे माहेरघर की ड्रग्सचे?

पुण्यातील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करतात. पुण्यातील अशाच एका हॉटेलच्या स्वच्छतागृहात तरुण ड्रग्ज घेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा झाली. समाजमाध्यमांवर अशा प्रकारचे विविध व्हिडीओ फिरत आहेत. राज्यात सर्वात जास्त प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन पुण्यात होते, हे सरकारी आकडेवरूनच दिसून येत आहे. पुण्याच्या शहरातील हॉटेल्स पब परिसरात हे अंमली पदार्थ अगदी सहजरित्या उपलब्ध होतात, असेच दिसते.

तुळजापूर ड्रग्स प्रकरण

धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे काही महिन्यापूर्वी अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका पेडलरला अटक केल्यानंतर अंमली पदार्थांचे सेवन व विक्री ही फक्त शहरी भागापुरती मर्यादित नसून ड्रग माफियांनी ग्रामीण भागातही हातपाय पसरल्याची धक्कादायक बाब समोर आली. तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील माहिती आणि या प्रकरणातील आरोपींची संख्या पाहता या संपूर्ण परिसराला अंमली पदार्थाचा व्यापार आणि सेवन करणाऱ्यांनी किती मोठ्या प्रमाणात पोखरून काढले याची कल्पना येते. पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले असून, त्यात ३६ आरोपी आहेत, आरोपींच्या यादीत प्रतिष्ठीत राजकीय व्यक्तींचाही समावेश आहे.

राज्यभरात गेल्या काही वर्षांत सातत्याने अंमली पदार्थाचा पुरवठा विक्री आणि सेवनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे तर सरकारी आकडेवरूनच स्पष्ट झाले आहे.

शहरांसोबत ग्रामीण भागातील तरुणाई या जाळ्यात अडकली आहे, ही चिंतेची बाब आहे. अंमली पदार्थांचे कारखाने आणि विक्रीसंदर्भात झालेल्या अनेक कारवायांमध्ये पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा थेट सहभाग आढळला आहे, ही त्याहून चिंतेची बाब आहे. राज्यातील गुन्हेगारीत झालेल्या प्रचंड वाढीमागे अंमली पदार्थाची विक्री आणि सेवन हेसुद्धा एक प्रमुख कारण आहे.

युवा पिढीसोबत महाराष्ट्राचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा मोठा धोका राज्यातील अंमली पदार्थाच्या व्यवसायामुळे निर्माण झाला आहे. सरकारने या बाबतीत तातडीने पावले उचलून राज्यातील अंमली पदार्थांचे कारखाने शोधून नष्ठ केले पाहिजेत. ड्रग्स पुरवठादार पेडलर यांच्यावर कठोर कारवाई करून जरब बसवली पाहिजे. अन्यथा प्रगतीशील विकसित महाराष्ट्राचा 'उडता महाराष्ट्र' होईल!

माध्यम समन्वयक,

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

logo
marathi.freepressjournal.in