‘क्राऊड पुलर’ नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जोरदार प्रचार सभा झाल्या. पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूर येथे या सभा गर्दी खेचणाऱ्या ठरल्या. ‘क्राऊड पुलर्स’चे नरेंद्र मोदी हे अनभिषिक्त सम्राट आहेत.
ANI
ANIX

- अरविंद भानुशाली

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जोरदार प्रचार सभा झाल्या. पुणे, कोल्हापूर, सातारा, लातूर येथे या सभा गर्दी खेचणाऱ्या ठरल्या. ‘क्राऊड पुलर्स’चे नरेंद्र मोदी हे अनभिषिक्त सम्राट आहेत.

पुणे येथे राष्ट्रवादीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार, शिरूरचे आढळराव पाटील, पुण्यात भाजपचे मोहोळ या तीन लोकसभा मतदारसंघांत प्रचार सभा ४०-४२ डिग्री अंश तापमान असताना झाल्या. कोल्हापूर येथे भाजपचा उमेदवार नसताना शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार असताना सभेत शत-प्रतिशत अनुभव आला. केवळ मोदींसाठी लाखांच्या वर लोक फक्त त्यांचे भाषण ऐकण्यासाठी व त्यांना जवळून पाहण्यासाठी जमले होते. कोल्हापूर, लातूर, पुणे, साताऱ्यात सभेला गर्दी होती. साधारणपणे सर्वच प्रचार सभेतील भाषणे जवळपास सारखीच असतात. या सर्व प्रचार सभांत मोदींचे आगमन सभास्थळी होते. त्यावेळी परिस्थिती पार बदलून जाते.

जनसामान्यांवरील पकड नरेंद्र मोदी यांची असामान्य आहे. ते प्रचार सभेत कोणाचीही पर्वा न करता ठासून बोलतात. नरेंद्र मोदी हे हैदराबाद जिल्ह्यातील प्रचार सभेत म्हणाले, ‘धर्माच्या आधारावर मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना आरक्षण देणार नाही’. यावेळी आठवण येते ती शिवसेनाप्रमुखांची! तेही कुठलीही पर्वा न करता फायदा-नुकसानीकडे न पाहता बेधडक बोलायचे! बाळासाहेबांप्रमाणे मोदी लोकांना ते स्वतःच्या इच्छेनुसार झुलवू शकतात, याचा प्रत्यय कोल्हापूरच्या सभेत आला. मी काश्मीरचे ३७० कलम रद्द केले चूक केली का? राज्यघटना बदलण्याच्या गोष्टी विरोधक करतात, मग ६० वर्षं जम्मू-काश्मीरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेची अंमलबजावणी का केली नाही? तेथील दलित, आदिवासी, ओबीसींना आरक्षण का मिळाले नव्हते. याला जबाबदार कोण? आणि आता तेच उलट्या बोंबा मारत आहेत.

मोदी ज्या-ज्या ठिकाणी जातात तेथील भौगोलिक माहिती घेऊन बोलतात. कोल्हापूरची आई महालक्ष्मी, लातूरला तुळजाभवानी याचबरोबर दिवंगत महापुरुषांना नमन करून मराठीमध्ये भाषणाची सुरुवात करतात. त्यावेळी मोदींची जनमानसात पकड असामान्य असते. कोल्हापूर हे फुटबॉल हब आहे. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले, आतापर्यंत मतदानाचे दोन राऊंड झाले आहेत. त्यात एनडीए दोन गोल, इंडिया आघाडीचा शून्य गोल आहे. असे म्हणताच कोल्हापूरचे फुटबॉलप्रेमी अक्षरशः बेफाम झाले. कोल्हापूरमध्ये जगात एक नंबर काय आहे? असा प्रश्न केला असता 'फिर एक बार मोदी, अबकी बार ४०० पार' या घोषणा झाल्यावर मोदी उपस्थितांना म्हणायचे, माझ्यानंतर तुम्ही बोला, ‘महिलाओं का सन्मान करणारे सरकार’ विकास के मार्ग पर चलनेवाली सरकार, अशा वेगवेगळ्या ५-६ घोषणा देत असत. समोरून ‘फिर एक बार’ असे प्रत्युत्तर जनसभेतून देण्यात येत होते. अन्य पक्षांच्या सभेत हा एल्गार दिसला नाही हे कटू सत्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचार केल्यानंतर प्रथमच त्यांनी सोशल मीडियावर हल्लाबोल केला. सध्या सोशल मीडियाच्या नावावर ‘फेक मीडिया’ सुरू आहे. त्याला पायबंद घाला. सरकारचे हात लांब आहेत, असाही इशारा दिला.

महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे प्रचार दौरे वाढले आहेत. राज्यात १७ लोकसभा मतदारसंघांत मतदान झाले आहे. ७ मे रोजी ११ लोकसभा मतदारसंघांत मतदान असून शेवटच्या दोन टप्प्यात ३७ मतदारसंघांतील मतदान आहे. मुंबई-ठाणे मिळून १३ लोकसभा मतदारसंघांत मतदान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उबाठाचे उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याच्या बातम्या येत आहेत. मुख्यतः नरेंद्र मोदी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खूप मानणारे. राज्यात युतीचे सरकार असताना मोठा भाऊ-धाकटा भाऊ अशी भूमिका घेत उद्धव ठाकरे हे माझे छोटे भाऊ आहेत हे म्हटल्याने वातावरण निवळले गेले. मात्र त्यानंतर जे काही राजकारण झाले त्यामुळे नरेंद्र मोदी हे स्वतः अस्वस्थ होते आणि त्याचाच परिपाक म्हणून यावेळी एकनाथ शिंदे यांना भाजपला झुकते माप देण्यास लावले. राष्ट्रवादीला लोकसभेच्या ४ जागा, शिवसेना शिंदे गटाला १५ जागा ज्या देण्यात आल्या हे केवळ मोदींमुळे, हे नाकारता येणार नाही. मोदी यांना अजूनही वाटते की शिवसेनेने हिंदुत्व म्हणून जवळ यावे. परंतु आता ही लोकसभा निवडणूक होईपर्यंत काही होईल असे वाटत नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in