
भवताल
ॲड. वर्षा देशपांडे
अतिरेकीविरोधी कारवाईचे नेतृत्व करणाऱ्या महिलांवर पुरुषसत्ताक आणि धर्मांध वृत्तीने टीका झाली. ‘सिंदूर’ या मिशनचे नाव देत महिलांचे दु:ख वापरले गेले. युद्धासारख्या मिशनला सिंदूर असे तथाकथित पुरुषसत्ताक व्यवस्थेला पुन्हा बळकटी देणारे नाव देऊन स्त्रियांच्या धैर्याला व धार्मिक सलोखा टिकवण्याच्या सहिष्णू वृत्तीला यांच्या तथाकथित स्त्रीविरोधी परंपरेत बसविण्याचा यांनी प्रयत्न केला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एक्स म्हणजेच ट्विटर हँडलवरून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी होत असल्याचे जाहीर केले. पहिल्यांदा असे घडले की, भारत देशाने पुकारलेल्या युद्धबंदीचा निर्णय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जगाला सांगितला. हे भारताच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाला आव्हान आहे. हे कोणाही भारतीयाला रुचले नाही.
गोपनीय अहवालाने पर्यटकांवर अतिरेक्यांच्या हल्लाची सूचना देऊनही २००० पर्यटक असलेल्या ठिकाणी कोणती सुरक्षा, मिल्ट्री किंवा पोलीस तैनात करण्यात आले नाहीत. निष्पाप भारतीय पर्यटकांवर त्यातही प्रामुख्याने पुरुषांवर अतिरेकी हल्ला होऊन २८ भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले. पळून गेलेले अतिरेकी आजतागायत मृत किंवा जिवंत सापडलेले नाहीत. या संदर्भातील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांची आणि अतिरेक्यांची माहिती ही त्यांच्या पत्नीने किंवा जवळच्या नात्यातील महिलांनी जगाला दिली. त्यांनी हा हिंदू-मुस्लिम असा प्रश्न नसून हा अतिरेक्यांनी केलेला हल्ला आहे. काश्मिरी मुस्लिम आमच्यासोबत आहेत, याला कोणीही धार्मिक रंग देऊ नये, देशात शांतता, सलोखा राखावा, असे आवाहन अतिव दुःखाच्या क्षणी त्यांनी केला. या सर्व सहिष्णू हिंदू आणि ख्रिश्चन भारतीय स्त्रिया आहेत. या कारणासाठी त्यांनाही तथाकथित मुस्लिम द्वेष्टे, फासीवादी, धर्मांध राजकारण्यांच्या समर्थकांनी ट्रोल केले. त्यांचाही छळ करायला यांनी मागेपुढे पाहिले नाही. अत्यंत खालच्या पातळीवर उतरून हीन दर्जाच्या कॉमेंट्स समाज माध्यमांवर पाहायला मिळाल्या. या खऱ्या अर्थाने धार्मिक असणाऱ्या धैर्यवान स्त्रियांचे कौतुक करण्याऐवजी, त्यांच्या दुःखाच्या समयी त्यांच्या समवेत राहण्याऐवजी त्यांना ट्रोल करणाऱ्यांची कीव येते. त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
अतिरेक्यांच्या नऊ वेगवेगळ्या ठिकाणांवर हल्ला करण्याच्या मोहिमेचे नाव ‘सिंदूर’ ठेवण्यात आले. घरातील कर्त्या पुरुषांना अतिरेकी हल्ल्यात गमावलेल्या स्त्रियांचा, कुटुंबाचा न्याय करण्याच्या मिशनचे नाव सिंदूर ठेवून त्यांनी आपण मनुवादी असल्याचेच अधोरेखित केले आहे. अचानक घडलेल्या घटनेने उद्ध्वस्त झालेल्या या भारतीय स्त्रिया ज्यांना या अतिरेक्यांनी स्त्रिया आहेत म्हणून मारले नाही त्या आज या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. हे तालिबानी अतिरेकी फासीवादी, स्त्रीविरोधीच असतात, हे आपल्याला माहीतच आहे. ते स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये, सिनेमा पाहू नये, पडदा केला पाहिजे वगैरे. त्यांच्या हल्ल्याने ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले त्या स्त्रियांचा न्याय करणाऱ्या तथाकथित अतिरेकीविरोधी मिशनला ‘सिंदूर’ नाव देऊन यांनीही ते कसे मनुवादी, परंपरावादी बिचाऱ्या स्त्रियांची ‘मांग उजड गयी’ असा विचार पुन्हा एकदा या विषयाच्या नावाने अधोरेखित केला. इतकेच नव्हे, तर खऱ्या संविधानप्रेमी, सहिष्णू, धार्मिक हिंदू आणि ख्रिश्चन शांतताप्रेमी भारतीय स्त्रियांचे गुन्हेगार असणाऱ्या अतिरेक्यांना त्यांच्यासमोर यांनी उभे तर केले नाहीच, त्यांना साधे पकडलेही नाही. स्त्रियांचे स्वातंत्र्य, धैर्य, निर्णय क्षमता यांनाही मान्यच नाही. म्हणून तर स्त्रिया माणूस म्हणून दिसण्याआधी त्या कोणत्या जातीच्या आहेत, कोणत्या धर्माच्या आहेत, कुमारी आहेत, विधवा आहेत, सधवा आहेत हे त्यांना आधी माहीत व्हावे लागते. म्हणून त्यांच्याही मिल्ट्री मिशनचे नाव ‘सिंदूर’ असतं. त्यांचे तथाकथित गुरुजी देखील पत्रकार महिलेला टिकली लाव म्हणून सांगतात. ज्या २८ निरपराध भारतीय पर्यटकांचा न्याय करण्याच्या नावाखाली पुन्हा एकदा २१ सैनिकांचे आपण बळी दिले. त्यांच्याच भाषेत सांगायचे, तर तितक्याच महिलांची ‘मांग उजड गयी’. या अशा सिंदूर मिशनला काय म्हणावे? युद्धासारख्या मिशनला सिंदूर असे तथाकथित पुरुषसत्ताक व्यवस्थेला पुन्हा बळकटी देणारे नाव देऊन स्त्रियांच्या धैर्याला व धार्मिक सलोखा टिकवण्याच्या सहिष्णू वृत्तीला यांच्या तथाकथित स्त्रीविरोधी परंपरेत बसविण्याचा यांनी प्रयत्न केला आहे. अशा दुःखद क्षणी सुद्धा आपली पुरुषसत्ताक, मनुवादी व्यवस्था टिकवणारी परंपरावादी भावनिक नाव ज्या कल्पकतेने या मिशनला दिले आहे, त्याला तोड नाही. या सगळ्याबाबत इन्फ्लुएन्सर नेहा राठोड मात्र सरकारला प्रश्न विचारतात, व्यवस्थेला प्रश्न विचारतात, यांची पोलखोल करतात. म्हणून तिला देशद्रोही ठरवून, तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ती निर्भयपणे व्यवस्थेला प्रश्न विचारते आणि न्यायालयीन प्रक्रियाही संविधानाला प्रमाण मानून सहन करते आहे. निर्भयतेचा एक महत्त्वपूर्ण वस्तुपाठ समाज माध्यमांवर घालून देते आहे. यांच्याविरुद्ध लढता येते हे दाखवते आहे.
सावित्रीबाई फुले, फातिमा दोघी एकत्र प्रत्यक्ष भेटल्या असे वाटावे, अशी ती 'पत्रकार परिषद' होती. सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग या दोघींनी भारतीय सेनेने केलेल्या कामगिरीची माहिती दिली. तेव्हा भारतीय म्हणून, एक स्त्री म्हणून समाधान वाटले. खरे तर ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ आणि अहिंसावादी गांधींना मानणारे आपण सारे भारतीय. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही देशाची आपण जाणूनबुजून कुरापत कधीच काढलेली नाही. विनाकारण हल्ले करून हिंसा केलेली नाही. परंतु तशी कोणी आमची आगळीक केल्यास त्यांना आम्ही वठणीवर आणतोच हे स्पष्ट करणारी ती पत्रकार परिषद. सावित्री आणि फातिमा यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात नव्हे, तर देशात पुण्यात पहिल्यांदा रोवली गेली. बहुजनांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा हक्क आणि समानतेसाठी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून म. जोतीराव फुले यांनी दिलेला सामाजिक चळवळीचा इतिहास या देशाला लाभला आहे. त्यांना गुरूस्थानी मानणाऱ्या डॉ. बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले आहे. या संविधानाच्या माध्यमातून अस्तित्वात आलेल्या सरकारमधील त्यावेळचे संरक्षण मंत्री शरद पवार यांनी १९९३ साली स्त्रियांनाही मिल्ट्री फोर्सेसमध्ये सैनिक म्हणून भरतीचा मार्ग खुला केला. शिक्षण, समता आणि संविधानिक हक्क याची जाण असणाऱ्या दृष्टीने आमच्या द्रष्ट्या महाराष्ट्रीयन नेत्याने जे पाऊल पुढे टाकले त्याचाच अविष्कार होता ही महत्त्वपूर्ण 'पत्रकार परिषद'.
शिक्षणाची लढाई लढणाऱ्या सावित्री, फातिमा एका बाजूला, तर इतक्या वर्षांनंतर अतिरेक्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांच्यात आम्हाला निखळ सोन्याहून ही अधिक झळाळी असणारे निव्वळ भारतीयत्व जाणवते, भावते आणि भारतीय म्हणून या देशाच्या सामाजिक राजकीय चळवळीचा आणि इतिहासाचा अभिमान वाटतो. परंतु फासीवादामुळे धर्मांधतेची कावीळ झालेल्यांना हे निखळ भारतीयत्व दिसतच नाही. म्हणून त्या विजय शहा नावाच्या नेत्याने सैनिक अधिकाऱ्याचा अपमान केला. त्या माणसाला तिचा धर्म आधी दिसला आणि आपला तथाकथित नेता किती ग्रेट आहे हे सांगण्यासाठी त्यांनी सोफिया कुरेशी या सैनिक अधिकारी महिलेला अतिरेक्यांची बहीण ठरवले. पावलोपावली आणि क्षणोक्षणी भारतीय मुस्लिमांवर सतत संधी साधून सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक हल्ले केले जातात. बरे झाले या मंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयानेच त्याला अटक करण्याचा आदेश दिला. स्वतंत्र भारतात महिला सैनिक अधिकाऱ्यांवर धार्मिक टिप्पणी करणाऱ्यांना न्यायालयाने त्यांची जागा दाखवली. या देशासाठी प्राणपणाला लावून लढल्यानंतर सन्मान मिळण्याऐवजी अशा वक्तव्याला आणि अपमानाला तोंड द्यावे लागत असेल, तर भारतीय म्हणून बाहेरून येणारे अतिरेकी आणि देशांतर्गत धर्मांध, दहशतवाद माजवणारे यांच्यात फरक तो काय राहिला?
पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये कुटुंबांतर्गत घरातील फासीवादाला, हिटलरला या देशातल्या बायका रोज तोंड देतात, हिंसाही सहन करतात. तरीही प्रसंग आला, तर माणुसकी सोडत नाहीत. हिंसेचे समर्थन करत नाहीत. धर्मांधतेला विरोधच करतात. अतिरेक्यांना अतिरेकी म्हणतात आणि कोणत्याही धर्मातील असले, तरी चांगल्या माणसांना चांगलेच म्हणतात. शिक्षणामुळे निर्भयतेने प्रश्नही विचारतात. गरज पडल्यास सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंगसह, सैनिक म्हणून, सैनिक अधिकारी म्हणून सरहद्दीवर जीवाची बाजी लावत लढायला उभ्या असतात. आम्ही भारतीय स्त्रिया आहोत. म्हणूनच घोषणा आहे, ‘हम भारत की नारी है, फुल नहीं चिंगारी है’.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेक लाडकी अभियानच्या संस्थापक