आवडलं ते निवडलं

लेखकाला जे आवडलं ते त्यांनी निवडलं आणि त्याचं पुस्तक केलं त्यासाठीचं स्वातंत्र्य, सहकार्य त्यांना इतरांकडून मिळालं
आवडलं ते निवडलं

महाराष्ट्रात काव्यलेखन आणि काव्य सादरीकरणाचे अनेक नावीण्यपूर्ण प्रयोग करणारे सांगलीचे सुप्रसिद्ध कवी अभिजीत पाटील यांचं ‘आवडलं ते निवडलं’ नावाचं पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. मला या पुस्तकाचं नाव खूप आवडलं. खरंतर या पुस्तकाचं नाव आवडलं ते मी लेखासाठी निवडलं, इतकाच काय तो संबंध या पुस्तकाच्या नावाशी आहे.

लेखकाला जे आवडलं ते त्यांनी निवडलं आणि त्याचं पुस्तक केलं त्यासाठीचं स्वातंत्र्य, सहकार्य त्यांना इतरांकडून मिळालं. ही लेखकाच्या दृष्टीने सकारात्मक बाजू. असं स्वातंत्र्य दोन माणसांच्या नात्यांमधे प्रत्येक वेळी असतंच असं नाही. हा लेख लिहिताना माणसांमधलं नातं. नात्यांमधील अनेक दडलेल्या अशा गोष्टी, ज्या आवडल्या तरी बिघडतात आणि निवडल्या तरी बिघडतात किंवा समाजाला आवडतात म्हणून टिकवल्या जातात. ते आवडलं आणि निवडलं, यांच्या मध्ये बिटवीन द लाइन्स असं काहीतरी असतं. ते मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.

माणसाचा जन्म काही निवडपूर्ण नसतो. त्याला कुठे माहीत असतं, त्याचा जन्म कधी, कुठे, कुणाच्या पोटी, कसा होणार आहे. हा जन्म आवडीनिवडीतून होत नाही, त्यामुळे जन्माबरोबर आपल्याला मिळणारी नाती आई, वडील, मामा, मामी, काका, काकू, सख्खी, चुलत मावस भावंडं निवडण्याची संधीदेखील कोणालाच नसते. ही नाती आवडून घ्यावी लागतात आणि आवडत नसतील तरीही ही निसर्गतः मिळालेली नाती तडजोडी करून आयुष्यभर मनाविरुद्ध जपावी लागतात. भारतीय कुटुंब संस्कृती माणसं जोडायला शिकवते. तडजोडी करायला शिकवते. जगभरात तडजोड कौशल्य प्रशिक्षण केंद्र म्हणजे भारत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण आपल्या संस्कृतीत मत मांडणं, मोकळेपणाने व्यक्त होणं, इतरांच्या मताला विरोध करणं, अशा गोष्टी उद्धटपणाच्या मानल्या जातात. आजही बऱ्याच ठिकाणी आवाज हळू असणं, दबका असणं हे कौटुंबिक, सामाजिक शांततेसाठीचं चांगलं लक्षण मानलं जातं. कुटुंबात, कार्यालयात, सामाजिक गटात बोलण्याचं स्वातंत्र्य नसेल तर बहुतांश वेळा व्यक्ती स्वत:चा आवाज स्वत:च बंद करतात. तडजोड करत स्थिरावतात. कारणं ढीगभर असतील. बॉस असेल, नेतागिरी असेल, आर्थिक कटकटी असतील, अधिकारवाणीने बोलण्याची अक्षमता असेल, तरी या सर्वांचा शेवट एकच असतो, तो म्हणजे बोलती बंद पद्धत रुजते. मत मांडू दिलं जात नाही, अशी तक्रार असूही शकतेच; मात्र सर्व शक्तीनिशी मत मांडण्याचा प्रयत्न केला जात नाही, हे बऱ्याच वेळा होतं. अशावेळी आपले विचार स्वत:विरुद्धच काम करू लागतात. आपण कमजोर आहोत. ते बलशाली आहेत आणि आपल्याला शांत राहावं लागेल ही बंधनं जे मान्य करतात. ज्यामुळे इतरांशी जुळवून घेत आयुष्य ढकलत राहावं लागतं.

असं विशिष्ट नावडलेलं वातावरण आवडून घेऊन जवजवळ ८०-९० वर्षांचा काळ जगायचं म्हणजे मानवी मनाची मस्करी नाही का? परंतु जे लोक अशा अवस्थेत राहतात, त्यांनी ते स्वीकारलेलं असावं. जे स्वीकारत नाहीत ते मधूनमधून बंड करतात. संघर्ष करतात. पेटून उठतात. परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा यश येतं; पण तडजोड केंद्रामुळे अपयशी ठरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये ६०-७०च्या दशकापर्यंतची पिढी मोठ्या प्रमाणात असावी असं माझं मत आहे.

आत्ताची मुलं आपली मतं स्पष्ट मांडतात. जिथे आपलं शांतपणे ऐकून घेतलं जात नाही, तिथे मुलांचा आवाज चढतो, शब्द बदलतात. अशा मुलांवर उद्धटपणाचं लेबल लागतं. सूनबाई कमी बोलणारी असेल, घरातील सर्वांच्या सर्व मागण्या मान्य करणारी असेल, ऊठ म्हटलं तर उठणारी असेल तर निश्चितच सद्गुणाचं लेबल लागतं. याउलट तिचा स्वभाव असेल तर अर्थातच आगाऊ, हट्टी, आप्पलपोटी, स्वार्थी, आत्मकेंद्री वगैरे लेबल्स लावली जातात. कर्तव्यनिष्ठ, जबाबदार, समजूतदार, हुशार अशी लेबल्स समाजातील किती लोकांना लावली जातात, कुणास ठाऊक. कितीही चांगलं वागलं, आवडल्या-निवडल्या कोणत्याही गोष्टींना महत्त्व दिलं, तरी एखाद्या कमी गुणामुळे नकारात्मक लेबल लावणारे घटक आजूबाजूला असतातच. अनेक पर्यायातून आवडलं म्हणून निवडलं आणि निवडलंय म्हणून सांभाळलं, हे तडजोड विद्यापीठातलं पहिल्या क्रमांकाचं नातं असेल.

सुनिता आणि सॅम यानी लव्ह मॅरेज केलं. त्यानंतर दोघं सॅमच्या घरी राहू लागली. दोघंही एकाच कंपनीत काम करत. घर सांभाळून नोकरी सुरू होती. सगळ्यानी चांगलं म्हणावं, आपलं कौतुक करावं, या आशेने सुनिता कामं करत होती. तिच्या मूळच्या स्वभावानुसारच सगळ्यांशी छान बोलत होती. जुळवून घेत होती. आपण नोकरी करतो, घरच्याना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, याची जाणीव ठेवून ती सुट्टीच्या दिवशी कुटुंबीयांबरोबर राहायची. सॅमचे लोक दुखावू नयेत म्हणून काळजी घ्यायची. माहेरचं नावही ती काढत नव्हती. स्वत:चे आई वडील, बहीण सगळ्यांना जणू विसरलीच होती. सुनिताने या मर्यादा जरी स्वत:ला घालून घेतल्या असल्या तरी लहानपणापासून ती ज्या संस्कारात वाढली तिथे याच गोष्टी तिने बघितल्या होत्या. फरक होता तो तिथे स्त्रिया संख्येने मोठ्या प्रमाणात नोकरी व्यवसाय करणाऱ्या नव्हत्या. तरीसुद्धा सुनिता नेटका संसार करत होती; परंतु....? कालांतराने घडलं ते बिघडलं. सॅम बदलत गेला. तडजोड तंत्राचा सुनिताला कंटाळा यायला लागला. सॅम नीट वागत नाही तर मी किती समजून घेऊ, हा पवित्रा या नात्यासाठी हानिकारक ठरू लागला. सॅम आणि सुनिताच्या सततच्या वादामुळे मात्र सुनितावर भांडखोर, रागीट, बडबडी, दुसऱ्यांचा विचार न करणारी, बेजबाबदार, निष्कि्रय अशी कितीतरी लेबल्स मारली गेली. ज्यामुळे ती मानसिक खचली होती. तरीही स्वत:च्या निवडीची जबाबदारी तिने स्वीकारली होती, म्हणूनच सॅमला तिने सोडले नव्हते. अलीकडे कोणत्याही नात्याशिवाय राहणारी पिढी उदयाला येत आहे. समाजमान्य नात्याशिवाय राहणाऱ्या लोकांमध्ये संबंधामधली तडजोड समजायला, अजून काही काळ जावा लागेल; मात्र तडजोड असणार आणि त्यावर मात करताना स्वतःची मूल्यं सांभाळणं आणि समोरच्याच्या मूल्यांचा आदर करणं, हे खरंच खूप अवघड आहे; मात्र जर आपल्या आवडीचं काही, आपण स्वतःहून निवडलं असेल, तर त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायलाच हवेत नाही का? नातं कोणतंही असो. थोडीशी तडजोड करावीच लागते; परंतु मीच का आणि किती समजून घ्यायचं? असा प्रश्न कधीतरी मनात येतो. त्यामुळे एखाद्या तंदुरुस्त नात्यांचं रूपांतर अशक्त नात्यात होतं. एकदा का नात्यातील ताकद संपली तर त्याला जगवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. सकारात्मक ऊर्जा द्यावी लागते. नात्याची चांगली बाजू समजून घ्यावी लागते. समुपदेशकाचा सल्ला मार्गदर्शन उपयोगी पडतं. मनाने ठरवलं तर कोणतंही नातं पुन्हा जिवंत होऊ शकतं. माणूस माणसांशिवाय राहू शकत नाही. माणसाला नातीगोती समाज हवा असतो. नको असतो तो एखाद्याचा वाईट स्वभाव. आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी करणारी माणसं आजूबाजूला नको असतात; परंतु सर्व स्वभाव गुणदोष असणाऱ्या मंडळींनीच समाज बनलेला असतो. पैकी आपल्याला सगळं जसंच्या तसं आवडेल, असं काही नसतं. काही गोष्टी आवडून घ्याव्या लागतात हेच खरं.

तेव्हा आपल्या नात्यांकडे आपल्याला नव्याने सकारात्मक दृष्टीने बघायला हवं. नैसर्गिक अथवा निवडीने केलेल्या नात्याकडून आपल्या अपेक्षा आपल्याला तपासायला हव्या. आपल्याला एखादं नातं कसं हवंय, याचा विचार करायला हवा. एखादं नातं दुरावलंच असेल, तर ते नातं हवंय की नको, याचा नीट स्पष्ट, प्रामाणिकपणे विचार करायला हवा. एक निर्णय घेऊन पुढे जायला हवं. नातं हवं असेल तर भूतकाळ विसरून क्षमाशील राहून नात्याला नव्याने जन्म द्यायला हवा. इथे तडजोड केंद्राच्या परीक्षा थोड्या जास्तच अवघड असतात; पण नापास होण्याची भीती नसते. थोडंसं अवघडलेपण, रखडलेपण असू शकतं; परंतु काहीच कालावधीत सगळं सुरळीत होतं. पुन्हा एक नातं खुलतं, बहरतं आणि मोकळा श्वास घेऊ लागतं.

अभिजीत पाटील यांचं, ‘आवडलं ते निवडलं’ या पुस्तकामुळे कवी आणि वाचक हे नातं सदृढ होईल, यात शंकाच नाही. तसंच या लेखमालेमुळे नाती मोडण्याआधीच पुन्हा जुळावीत किंवा तुटलेले नात्याचे पुन्हा सूर जुळवावेसे वाटावेत, अशी अपेक्षा आहे. निसर्गतः मिळालेली नाती प्रामाणिकपणे निभावणं आणि आपल्याला हवीहवीशी वाटणारी नाती जोडणं हे दोन्ही करणं अवघड असलं तरी निश्चित शक्य आहे आणि ह्या दोन्ही प्रकारच्या नात्यामुळेच आपल्या आयुष्यामधील आनंदाचा समतोल आपण साधू शकतो.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in