त्याचं तोंडही पाहायचं नाही...

प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा. प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे. त्यानुसार एकमेकांशी संबंध प्रस्थापित करण्याचा हेतू बदलत जातो.
त्याचं तोंडही पाहायचं नाही...

माणूस हा समाजशील प्राणी आहे. आजूबाजूला माणसं हवी असतात. तो माणसांशिवाय एकटा राहू शकत नाही, असं असताना त्याच्याकडे माणसं निवडण्याचं मात्र संपूर्ण स्वातंत्र्य नसतं. जन्मजात मिळालेली रक्ताची नाती तो बदलूच शकत नाही. जोडलेली नाती काही वेळा कायमस्वरूपी टिकवू शकत नाही.

प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा. प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे. त्यानुसार एकमेकांशी संबंध प्रस्थापित करण्याचा हेतू बदलत जातो. एखाद्याचा व्यक्तिगत हेतू वाईट असूही शकतो. अशी वाईट प्रवृत्तीची माणसं समोरच्या व्यक्तीच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. त्या व्यक्ती अशा का वागतात, याची कारणं शोधण्यात सगळी ऊर्जा वाया घालवण्यात काही अर्थ नसतो. कुणालाही दुष्ट म्हणण्याइतपत माणसं काही वाईट नसतात; परंतु काही माणसं अशी असतात की, जी आपल्याला आवडतच नाहीत. त्यांचा प्रचंड राग येतो. याचा अर्थ त्यांच्याशी इतरांचंही नातं असतं, असं नाही. जर ती माणसं सगळ्यांसाठीच तशी दुष्ट असतील, तर त्यांना कितीही सांभाळा, त्यांच्यासाठी काहीही करा, ते त्यांचं वागणं बदलत नाहीत. ही त्या माणसांची एक प्रवृत्ती असते किंवा ते मानसिक रुग्ण असू शकतात.

एखाद्या व्यक्तीच्या वर्तनातील खूप छोट्या छोट्या गोष्टीही आपल्याला आवडत नाहीत. एखादा माणूस दारातच का बसतो. तो अमुक पद्धतीचे कपडे का घालतो. किती ओरडून बोलतो हा माणूस. हा माणूस भेटला आणि पैसे नाही मागितले, असं कधीच होत नाही. अशा अनेकविध स्वभावाशी आपण जर मिसमॅच असू, तर अशी माणसं आपल्याला आवडत नाहीत. यांचा राग यायला लागतो. यातील काही लोक आपल्या अगदी जवळचे असतात. बऱ्याच वेळा आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांना आपण खूप जवळचे समजतो, अशी माणसं आपला आपला अपमान करणे, लोकांमध्ये आपल्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवणे, आपण समोर दिसलो की, वाद घालायला सुरुवात करणे, काहीही कारण नसताना आपल्याला उद्देशून टोमणे मारणे, आपण करत असणाऱ्या गोष्टी कशा वाईट आहेत, यावर मोठमोठ्याने चर्चा करणे, चार लोक एकत्र करून आपल्यावर नको नको ते आरोप करणे, बाजू मांडण्याची संधी न देणे, सतत त्रास देणे, एका त्रासातून आपण बाहेर पडतो न पडतो की, दुसरा वार करणे, पुन्हा पुन्हा आघात करत राहणे, टारगेट करून वार करत राहणे, अशाप्रकारे वागतात.

माणसांच्या या वागण्याचे आपल्यालाच आश्चर्य वाटत राहते. हा माणूस असा कसा काय वागला, जेव्हा काही माणसं जाणीवपूर्वक आपल्याशी वाईट वागतात, तेव्हा अशा माणसांबद्दल मनात, डोक्यात तिडीक निर्माण होते. परत हा माणूस समोर नको यायला. इतक्या टोकाचं मत त्या माणसाबद्दल होतं.

एक शेजारी रोज भांडतो. भांडणासाठी कधी कचरा त्याच्या दारात जातो. कधी झाडाची फांदी त्याच्या कम्पाउंडच्या आत जाते, कधी पत्ता विचारायला कुणी अनोळखी व्यक्ती त्याच्या दारात जाते, कधी मुलांचा दंगा त्याच्या कानात घुसतो, कधी पाणी त्याच्या अंगणात जातं, कधी गाड्यांचं पार्किंग त्याच्या गेटसमोर होतं, कधी दारासमोर उभं राहून कुणी हॉर्न वाजवतं, कुकरची शिट्टी, मिक्सरचा आवाज, पाहुण्यांचं बोलणं, अशा कोणत्याही कारणाने मला त्याचं तोंडही पाहायचं नाही, असं वाटायला लागतं. अशी कितीतरी नाती असतात. ज्यांच्याशी रोज जुळवून घ्यावं लागतं. तडजोडी कराव्या लागतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती असतेच, जिला पाहता क्षणी तोंड फिरवावे असे वाटते. अशी व्यक्ती आपल्या कुटुंबात, शेजारी, नातेवाईकांमध्ये असते. ज्यांच्याबरोबर आपण एका घरात राहतो. एका कार्यालयात एकत्र काम करतो. अशा व्यक्तींचं काय करायचं. यांच्याबरोबर जीवन कसं व्यतीत करायचं किंवा कार्यालयीन कामं कशी करायची? रोजचा हा ताण कसा सहन करायचा. या माणसांनी नीट वागायला हवं. या माणसांना समजायला हवं, आपल्यामुळे लोकांचं मन दुखावलं जातंय. हे लोक दुसऱ्यांचा विचार का करत नाहीत. असे प्रश्न पडतात खरं.

गीता आणि संजय यांच्या लग्नाला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नानंतर तिसऱ्या- चौथ्या वर्षापासूनच त्यांच्यात तडजोडीचा संसार सुरू झाला होता. हळूहळू त्यांच्यात छोट्या-छोट्या गोष्टीवरून वाद सुरू झाले. सुरुवातीला शीतयुद्ध असणारी भांडणं नंतर घराचं घरपण हिरावून घेऊ लागली. पती-पत्नीला एकमेकांचं तोंड बघू वाटेना. गोष्टी घटस्फोटाच्या चर्चा करण्यापर्यंत पोहोचल्या. घटस्फोट फक्त भांडणापुरता मुद्दा होता. ते कधीच घटस्फोट घेऊ शकणार नव्हते, तसंच प्रेमानेही राहू शकणार नव्हते. याचा मनस्ताप दोघांनाही होत होता. एकमेकांना सोडायचं पण नाही आणि धरायचं पण नाही. दोघांनाही वाटायचं दुसऱ्याने बदललं पाहिजे. खरंतर प्रत्येक माणसाला भावनिक आणि वैचारिक मेंदू असतो. सर्वसामान्य माणसं भावनिक मेंदूनी निर्णय घेतात आणि त्यातच वाहवत जातात. माणूस आपल्या सवयींचा गुलाम असतो, असं आपण म्हणतो; पण सवयी ज्या संस्कारांमधून निर्माण होतात, ते संस्कार ह्या सर्व मानसिक त्रासांच्या मुळाशी असतात. माणसांची जडणघडण नातेसंबंध टिकवते किंवा संपवते.

चांगलं म्हणजे काय, वाईट म्हणजे काय, हे संस्कार इतके वेगवेगळे आणि खोलवर असू शकतात की, त्यापासून वेगळे होऊन माणूस समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यात असमर्थ ठरतो. त्यामुळे मी म्हणजे शहाणा आणि समोरचा नेहमीच चोर असा प्रतिवाद आयुष्य जगायला सोपा ठरतो. ज्यामुळे काही बदलायचा प्रयत्न करण्याचं कारण उरत नाही. समोरचा बदलणार नाही, असं म्हणताना आपण नक्की किती बदललोय, हा प्रश्न बहुतांश माणसांना पडत नाही.

हे अगदी खरं आहे की, माणसं जाणीवपूर्वक काही वेळा चुकीची वागतात, तर कधी अजाणतेपणी ते चुकतात; मात्र माणसं दुष्ट असतात आणि तो त्यांचा स्थायीभाव असतो हे पूर्णसत्य नाही. वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे आणि अंगुलीमाल बुद्धाच्या शिकवणीने साधू बनल्याची उदाहरण आहेतच.

मी तडजोड करणार नाही. मला राग येतच नाही. माझं चुकत नाही. तेच चुकीचं वागतात. तेच भांडतात, अशा वृत्तीच्या माणसांना प्रतिक्रिया न देणे हेच योग्य. कारण अशी माणसं फक्त दुसऱ्यांवर आरोप करतात. स्वत: बदलण्याचा काडीमात्र प्रयत्न करत नाहीत. घर असो किंवा कार्यालय, माणसं वाचता आली पाहिजेत. माणसाचं बाह्यरंग जितकं सुंदर असेल तितकं अंतरंग शुद्ध, निर्मळ असेलच असे नाही. तेव्हा कोण कसं का वागतं? याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाच्या वागण्याला एक कारण नक्कीच असतं, ते शोधण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला त्रास देऊन समोरच्या व्यक्तीला आनंद होत असेल तर त्याला आनंदात राहू द्यायचं की, आपण आपला आनंद हरवून जायचं हे ठरवायला हवं. त्याला देऊ दे त्रास कितीही, आपण त्रास करून घ्यायचा नाही, हे आपलं लक्ष्य असायला हवं.

आपल्या दोघांच्या वैयक्तिक नात्यांकडे एकदा नीट बघायला हवं. या नात्यातील कमतरतांचं निरीक्षण करायला हवं. आपल्याच माणसांकडे अनोळखी नात्याप्रमाणे बघण्यापेक्षा किमान मैत्रीभाव जोपासता येईल का, याचा विचार करावा. जेव्हा तोडूच शकत नाही, तेव्हा काठावरून हळूहळू उंबरठ्यातून आत सरकण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. सहन करणे हा एकच पर्याय आपल्या हातात आहे की, अनेक पर्यायांचा आपण विचार करू शकतो. पर्याय खूप असतात; पण रागाच्या भावनेने नकोच ते हा पर्याय निवडलेला असतो. इतर पर्यायांचा विचार व्हायला हवा. नाहीतर हताश व्हायला होतं. निर्णय चुकू शकतात.

स्वीकार, करुणा भाव आणि माफी हेच खरंतर सगळ्या समस्यांवरचं उत्तर आहे. कृष्ण, पैगंबर, ख्रिस्त, बुद्ध आणि महावीर सर्वच थोर महात्म्यांनी एकच संदेश दिलाय, प्रेमाचा, करुणेचा आणि माफीचा... दुसरा मार्गच नाही. ख्रिस्त सुळावर चढताना आपल्याला सुळावर चढवणाऱ्या लोकांसाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो, यापेक्षा मोठा संदेश दुसरा कोणता आहे?

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in