आईस्क्रीमच खाताय ना?

उन्हाळ्याच्या सुट्टीत आईस्क्रीम खाल्ले नाही असा कोणी विरळाच. पण मला एक सांगा, तुम्ही खाताय ते नक्की आईस्क्रीम आहे, याची खात्री आहे तुम्हाला?
आईस्क्रीमच खाताय ना?

वार्षिक परीक्षा संपल्या आम्ही भावंडे एकमेकांच्या घरी राहायला जात असू. त्यावेळचा आणखी एक कार्यक्रम की भावंडांपैकी कोणाचे तरी टॉन्सिल चे ऑपरेशन योजलेले असायचे. ऑपेरेशन झाल्यावर भाऊ/ बहीण हॉस्पिटलमधून घरी आली की एक दिवस सर्वांना आईस्क्रीमची पार्टी ठरलेली असे. तो दिवस म्हणजे सुट्टीतील 'हायलाईट'. त्यामुळे असे गार्रेगार आईस्क्रीम अगदी रोज खावेसे वाटत असे. आजची गोष्ट जरी वेगळी असली तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत आईस्क्रीम खाल्ले नाही असा कोणी विरळाच. पण मला एक सांगा, तुम्ही खाताय ते नक्की आईस्क्रीम आहे, याची खात्री आहे तुम्हाला?

लेखक : वसुंधरा देवधर

तुम्ही म्हणाल आता हा काय प्रश्न विचारताय? लहानपणी आईस्क्रीम म्हणता येत नसेल त्यावेळेपासून आम्ही खातोय की! हे तुमच म्हणण खरच आहे. पण समजा तुम्ही बटाटेवडा मागवला आणि त्यात बटाटा नसेल, कदाचित कांदे-पोहे भरलेले असतील, तर खाल्ल्याबरोबर तुम्हाला लगेच कळेल. किंवा समजा तुम्ही खूप गरमी झाली म्हणून टेट्रा पॅक मधली लस्सी घेताय आणि चुकून दुकानदाराने दुधाचा छोटा टेट्रा पॅक दिला तर तुम्ही त्यावर वाचून लगेच समजाल की मी हे मागितलं नाही. तस तुम्हाला आईस्क्रीम हव असताना दुसराच एखादा, रंग रूपाने आईस्क्रीम सारखा पण खरखुर क्रीम नसणारा टब/कोन/स्कूप दिला तर तुम्हाला कळेल?

आता तुम्ही नक्की विचारात पडला असाल, की आईस्क्रीम सारखा दिसणारा असा कोणता पदार्थ असेल बर बाजारात ? खरंच असेल का उग्गीच काहीतरी ? तर असे आईस्क्रीम सदृश पण आईस्क्रीम नसणारे जे असते ते डेझर्ट या नावाने विकले जाते पण....त्यावर डेझर्ट असे स्पष्ट ठळक लिहिलेले असेलच असे नाही, कुठेतरी लिहिलेले मात्र असलेच पाहिजे. पण ते शोधेपर्यंत आतला पदार्थ पाघळायला लागेल ना, तो आधीच गट्टम केला पाहिजे. प्रसिद्ध ब्रँडचे डेझर्ट, निरनिराळ्या आकार, प्रकारात मिळतात, आईस्क्रीम सारखे दिसतात. तुमच्या आजी-आजोबांच्या काळात ‘क्वालिटी आईस्क्रीम –अ ड्रीम विथ क्रीम’, अशी एक छान जिंगल रेडियोवर लागतं असे. (त्यावेळी टीव्ही नव्हताच). तर हा जो क्रीम नावाचा शब्द आहे ना, तो दुधातील मलई /साय यासाठी वापरला जातो. म्हणजे क्रीम आहे तिथे दूध आहे आणि तेच खरे आईस्क्रीम आहे. बाकी डेझर्ट अगर जेलाटो . या सगळ्या उत्पादनात जे स्वाद असतात, ते खूपसे सारखे असतात. म्हणजे, चॉकलेट, व्हॅनिला, बटर स्कॉच, ब्लॅक करंट, स्ट्रॉबेरी, बदाम/पिस्ते/ बेदाणे यांचे तुकडे खच्चून रचून सजवलेले कोन ..... ही नावं लिहिताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटतंय! मग असं काही प्रत्यक्षात समोर असेल त्यावेळी मज्जेत खायचं सोडून ते नक्की काय आहे, त्याचा शोध कोण घेत बसेल ?

अगदी बरोबर, पण माहिती तरी असली पाहिजेच की नाही? तर हे जे क्रीम नसणारे पण आईस्क्रीमचा आभास निर्माण करणारे पदार्थ आहेत, त्यात दूध किंवा दुधातील घन-पदार्थ असले पाहिजेत अशी अट नसते. सर्वसामान्यपणे त्यात वनस्पती तेलापासून मिळवलेले स्निग्धांश असतात. कुणाला विशिष्ट तेलाची एलर्जी असेल तर त्यांनी नक्की सावध असले पाहिजे, कारण कोणत्या/कोणकोणत्या वनस्पतीची तेले वापरलीत हे सांगणे ही बंधनकारक नाही. दुसर असं की आईस्क्रीम किंवा तसे खास जिन्नस आपण खातो काही खास दिवशी किंवा सणासुदीला. त्यावेळी गप्पा टप्पा, गाणी –खेळ या मूडमध्ये जिभेवर विरघळणारा हा जो पदार्थ आहे, त्याचा स्वाद किंवा mouth फील जरा वेगळा आहे, हे लक्षात येण जरा कठीणच, नाही का ? मात्र रसना परजून असणाऱ्या खवैय्याना दुधातील स्निघता आणि वनस्पतीजन्य किंचित चिकटसर स्निग्धता यातला फरक लग्गेच कळतो बर का !

मुख्य म्हणजे जे आईस्क्रीम विकत नाहीत ते आपल्या दुकानावर, पॅकवर किंवा जाहिरातीतसुद्धा आईस्क्रीम हा शब्द कधीच वापरत नाहीत, ही खूण लक्षात ठेवायची खुणगाठ बांधा. बाल ग्राहकांनो, ही माहिती नीट समजून घ्या आणि आपल्या मित्र मंडळींनाही सांगा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in