धरलं तर चावतं,सोडलं तर पळतं !

५० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडल्यानंतर शिवसेनेच्या पक्षांतर्गत अडचणी कमी झालेल्या नाहीत
धरलं तर चावतं,सोडलं तर पळतं !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा, त्यांचा जनमानसावर असलेला प्रभाव, त्यांचा परखडपणा, त्यांची आक्रमकता, त्यांची ठाकरी भाषा या त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि नेतृत्वामुळे मजबूत झालेल्या शिवसेना या संघटनेला बाळासाहेबांच्या हयातीतच फुटीचे ग्रहण लागले होते. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे या नेत्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर बाळासाहेबांनादेखील शिवसेनेच्या भवितव्याची चिंता वाटत होती, त्यामुळे उद्धव आणि अन्य नेत्यांना त्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळेस आलेल्या अडचणींना तोंड दिले खरे; पण पक्षात सारे काही आलबेल नव्हते. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असताना ५० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांचा गट बाहेर पडल्यानंतर शिवसेनेच्या पक्षांतर्गत अडचणी कमी झालेल्या नाहीत. भाजपच्या मदतीने शिंदे गट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. भरीस भर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी मुंबईत आले असता त्यांनी उद्धव यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता, याचा पुनरुच्चार करून उद्धव यांना डिवचले. तर दसरा मेळाव्याला मैदान मिळू न देणे ही शिंदे गटाची एक खेळी आहे. मुंबईसह राज्यात होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत उद्धव यांच्यापुढे सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान आहे.

राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेलाच धडा शिकवला. तेव्हापासून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात जो संघर्ष सुरू आहे, तो दिवसागणिक वाढतो आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही शिवसेनेत बंड झाली होती; परंतु त्यावर जितक्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या, तेवढ्या आता उमटलेल्या नाहीत. त्यावेळी बंडखोरांना फिरणे मुश्कील व्हायचे. शिवसैनिक राडा करायचे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यानंतर शिवसेनेच्या राडा संस्कृतीत बदल केला. बाळासाहेब जरी दरबारी राजकारण करीत होते, तरी त्यांचा एक दबदबा होता. ते ठरावीक वेळी लोकांना भेटायचे. त्यांचे दरवाजे सातत्याने सताड उघडे नव्हते. राज्यात ते दौरे करायचे; परंतु निवडणूक वगळता फारसे दौरे नसायचे. त्यांच्या सभा लाखोंच्या व्हायच्या. त्यांच्या शब्दावर जीव ओवाळून टाकणारे लाखो शिवसैनिक होते. गद्दारांना धडा शिकवला जायचा. शिवसैनिक इतके आक्रमक होते की, बंड करण्याअगोदर बंडखोर अनेकदा विचार करायचे. शिवसेनेचा एवढा दरारा होता. आता बाळासाहेबांइतका दरारा राहिलेला नाही. उद्धव मवाळ आहेत. बाळासाहेबांइतके ते कडवे नाहीत. शिवसेनेला हिंदुत्वाबरोबरच प्रबोधनकारांच्या मार्गावरून नेण्याचा उद्धव यांचा प्रयत्न आहे. उद्धव यांचा येथे वैचारिक गोंधळ दिसतो आहे. हिंदुत्व सोडवत नाही आणि पुरोगामी विचारांच्या पक्षांबरोबर तर जायचे आहे. ‘धरलं तर चावतं अन‌् सोडलं तर पळतं’ अशी त्यांची अवस्था आहे. बाळासाहेबांच्या काळात ‘मातोश्री’ने कायम रिमोट कंट्रोलचे काम केले. शिवसैनिकांना बळ दिले. बाळासाहेब घराणेशाहीवर तुटून पडत. आता तीच टीका उद्धव यांच्यामुळे शिवसेनेवर व्हायला लागली आहे. आदित्य ठाकरे विधानसभेला निवडून आले, तर उद्धव विधानपरिषदेवर. ‍बाळासाहेबांनी शिवसेनेत जातपात मानली नाही. गरीब, कमी शिकलेले सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना आमदार केले. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरानंतर महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय समाजाने त्यांना साथ दिली. मराठा समाज शिवसेनेबरोबर नव्हता; परंतु आता शिवसेनेने मराठा समाजाची मते मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाची साथ घेतली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर ५० आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. आणखी काही आमदारही नाराज असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. शिंदे गट बाहेर पडल्यानंतर राहिलेल्या शिवसेनेत एकवाक्यता नाही. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि नगर जिल्ह्यातील राहाता येथे ठाकरे सेनेत झालेले राडे, वाद हे कशाचे द्योतक आहे? पूर्वीही शिवसेनेत गटबाजी होती, ती प्रत्येक पक्षात असतेच. एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत मजल जायची; परंतु बाळासाहेबांचा आदेश आला की, नंतर वादावर पडदा पडायचा.

शिंदे आणि ठाकरे यांच्यात खरी शिवसेना कुणाची याचा फैसला करण्यासाठी न्यायालयीन आणि निवडणूक आयोगाच्या पातळीवर संघर्ष सुरू आहे. शिवसेनेतून आम्ही बाहेर पडलेलो नाही, असा दावा शिंदे गट मोठ्या हुशारीने करीत आहे. कोणत्याही पक्षात विलीन व्हायचे त्यांनी टाळण्यामागेही अपात्रतेची कारवाई होऊ नये, हेच कारण आहे. शिंदे आणि ठाकरे गटाने लाखो प्रतिज्ञापत्र दिली आहेत. ज्या पद्धतीने शिंदे गट ठाकरे यांच्यावर एकामागून एक आरोप करीत आहे, ते पाहता ठाकरे यांना सहजासहजी सुखाची झोप घेता येणार नाही, याची तजवीज केलेली दिसते. न्यायालयीन लढे एकीकडे चालू असताना जनतेच्या दरबारात जायची तयारी शिंदे यांनी केली आहे. उद्धव हेही जनतेच्या दरबाराची भाषा करीत आहेत; परंतु बंड झाल्यानंतरच्या दोन महिन्यांत उद्धव यांनी लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. मातोश्रीचे दरवाजे सताड उघडे करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी राज्यात बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन मोठमोठ्या सभा घेतल्या. त्यांच्या सभांना चांगली गर्दीही झाली. ते बंडखोरांवर तुटून पडले. शक्तिप्रदर्शनात ते यशस्वी झाले; परंतु पक्षप्रमुख म्हणून उद्धव यांनी शिवसैनिकांच्या मनात जो विश्वास निर्माण करायला हवा होता, तो केला नाही. बाळासाहेब तसे करायचे आणि शिवसैनिक निष्ठेने त्यांच्या सोबत राहायचे. बाळासाहेबांच्या काळात एवढे मोठे बंड झाले असते, तर त्यांनी त्यातून उस्कटलेली शिवसेनेची घडी बसवण्याचा प्रयत्न केला असता. उद्धव यांना बाळासाहेबांच्या तुलनेत मर्यादा आहेत. खरे तर त्यांनी आता बाहेर पडले पाहिजे. राज्यात सैरभैर झालेल्या शिवसैनिकांना धीर द्यायला हवा. बंडखोरांचे बंड मोडीत काढून पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभी राहील, असा विश्वास द्यायला हवा; परंतु तसे करण्यात उद्धव कमी पडले आहेत. पुढच्या काही महिन्यांत उद्धव दौरे करणार असले, तरी त्यांची खरी परीक्षा आता येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हापरिषदा, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत आहे. शिंदे गटाने भाजपसोबत जाऊन शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी व्यूहनीती आखली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेत जे परस्पर सामंजस्याचे नाते असायला हवे, त्यांच्यात परस्पर विश्वास असायला हवा, गैरसमज दूर करायला हवेत. त्या दिशेने प्रयत्न होताना दिसत नाही. राज्यात शिवसेनेत बंड झाले, सत्ता शिवसेनेमुळे गेली. त्यामुळे शिवसेना अधिक आक्रमक व्हायला हवी होती; परंतु शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच अधिक आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी विशेषत: अजित पवार यांनी राज्य पिंजून काढायला सुरुवात केली आहे. शरद पवार वडीलकीच्या नात्याने तीनही पक्षांची भूमिका मांडत असताना उद्धव यांना घरात बसणे परवडणारे नाही.

दसरा म्हटले की, मुंबईतील शिवसेनेचा मेळावा. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे या मेळाव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. दसऱ्याला मुंबईत जाऊन बाळासाहेबांच्या विचाराचे सोने लुटायचे, हा शिवसैनिकांचा परिपाठ. या वेळी विचाराचे सोने मिळणार की नाही, हाच संभ्रम आहे. बाळासाहेब गल्लीतल्या राजकारणापासून आंतरराष्ट्रीय घटनांपर्यंत कोणत्याही मुद्द्यावर भाष्य करीत. आता उद्धव यांनी मेळाव्याची ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे. राज्य आणि देशातील घटनांवर ते भाष्य करतात. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर होणारा हा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा. त्यामुळे या मेळाव्याला महत्त्व आहे. या मेळाव्याची तयारी फार अगोदरपासून केली जात असते. मुंबई महापालिकेवर गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे. आता मात्र महापालिकेवर प्रशासक आहे. राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असताना त्यांच्या हातातील यंत्रणांचा वापर सरकार करीत आहेत. शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने ‘ईडी’चा प्रतिवाद केला, तसा प्रतिवाद, प्रतिकार शिवसेनेला करता आला नाही. खासदार संजय राऊत तुरुंगात आहेत, अनिल परब यांच्या रिसोर्टवर कधीही हातोडा पडू शकतो. या ना त्या कारणाने दगडाखाली हात गुंतलेले असल्याने शिवसेनेचे मित्रपक्ष असलेले सत्ताधारीच त्यांची कोंडी करीत आहेत. आता तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला मैदानच मिळू नये, अशी व्यूहनीती शिंदे-भाजप आणि मनसेने आखली आहे. ती ठाकरे कशी भेदणार, वैचारिक गोंधळाचा तिढा कसा सोडविणार आणि शिवसैनिकांना कोणती दिशा देणार हा प्रश्न आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली या महानगरपालिकांत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न राज यांना सोबत घेऊन शिंदे-भाजप करीत आहे, ती ठाकरे फोडतात की त्यातच अडकतात, हे निवडणुकीत दिसेल.

logo
marathi.freepressjournal.in