वातावरण बदलाचे संकट हे दुर्लक्ष धोकादायक!

हवामान वा वातावरणात होत असणारा हा अवाजवी व अनाकलनीय, अनपेक्षित बदल सर्व विश्वात सुरू आहे.
वातावरण बदलाचे संकट हे दुर्लक्ष धोकादायक!
Published on

- डॉ. संजय मंगला गोपाळ

लक्षवेधी

उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणासह देशातील सात राज्यांना धुळीच्या वादळांचा जोरदार तडाखा! शंभरहून अधिक मृत्युमुखी! (४ मे २०१८)

१० मे रोजी दिल्लीला आणि १३ मे रोजी मुंबईला प्रचंड वेगवान वाऱ्यासह धुळीच्या वादळाचा तडाखा. दिल्लीत यामुळे २ मृत आणि २३ जखमी तर मुंबईत अनधिकृत होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू. (१४ मे २०२४)

धुळीच्या वादळांची अनेक कारणे असली तरी भारत सरकारच्या हवामानशास्त्र शाखेच्या माजी मुख्य संचालकांनी सांगितल्याप्रमाणे धुळीच्या वादळाआधी ४-५ दिवस उष्णतेचा कहर असतो. भूमी प्रचंड तापते आणि त्यातून ही वादळे होतात.

स्वीस एअर मॉनिटरिंग बॉडीने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत हा जगभरातील १३४ देशांच्या यादीत तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित ५० शहरांमध्ये एकट्या भारतातील ४२ शहरांचा समावेश आहे. (१९ मार्च २०२४)

वाढत्या उष्म्यामुळे होणारी अंगाची लाहीलाही शमवण्यासाठी, थंडावा मिळवण्यासाठी घर, ऑफिस, दुकानांमधील वातानुकूलित यंत्रे, कूलर, पंखे तासन‌्तास सुरू. महावितरणाच्या एकट्या मुंबई मंडळात यंदा विजेची सर्वोच्च (पीक) मागणी नोंदवली गेली असून प्रथमच ती २५ हजार ८२९ मेगावॅट एवढी झाली. (३० मार्च २०२४ ची बातमी.)

केरळात यंदा दक्षिण-पश्चिम मानसूनचे आगमन लवकर झाले. तरीही इथल्या अनेक भागांत पहिल्या दहा दिवसांत झालेल्या अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. इथे गेल्या १२२ वर्षांतील जून महिन्यातील सर्वात कमी पाऊस मागील वर्षी झाला होता. (१० जून २०२४ )

ईशान्य भारतातही साधारणत: केरळ सोबतच मान्सूनचे आगमन होत असते. मात्र यंदा या भागातही पहिल्या ९ दिवसांत ८३% कमी पाऊस झाला. (१० जून २०२४)

खरे तर वाढलेला उष्मा, होणारी असह्य गरमी, वाढलेले प्रदूषण, पावसाबाबतची अनियमितता, या सगळ्यांमुळे वाढणारी रोगराई, औषधोपचारांवरील वाढलेला खर्च हे सारे सर्वसामान्य नागरिक रोज अनुभवतो आहे. वरील बातम्यांची उदाहरणे ही केवळ वानगीदाखल आहेत. जेव्हापासून वातावरणीय हवामान सूत्रांची व्यवस्थित नोंद ठेवली जातेय तेव्हापासूनच्या आकडेवारीचा अभ्यास केला तर २०१० सालापासून वैश्विक उष्णता दाह (Global Warming) वाढत्या वातावरणीय तापमानाच्या रूपात सतत वाढतोच आहे. औद्योगिकीकरण पूर्व, कोळसा-पेट्रोल-डिझेल- नैसर्गिक वायू आदी इंधनांचा उद्योग-दळण-वळण व वीज निर्मितीसाठी वापर सुरू होण्याआधीच्या पृथ्वीवरील सरासरी तपमानाशी तुलना केली तर १९६० साली तापमान वाढ केवळ ०.२ अंश सेल्सिअस इतकी होती. २०१० पर्यंत ती ०.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढली व २०२३ मध्ये ती १.१ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे.

हवामान बदल- मानव निर्मित

हवामान वा वातावरणात होत असणारा हा अवाजवी व अनाकलनीय, अनपेक्षित बदल सर्व विश्वात सुरू आहे. अशा घटनांची वारंवारिता गेल्या दहा वर्षांत वाढली आहे. हजार-दोन हजार वर्षांपूर्वीही पृथ्वीवर वातावरणीय बदलाच्या घटना घडत होत्या. मात्र त्यावेळी त्यांचा उलगडा होण्यासाठी विकसित विज्ञान तंत्रज्ञानाधारित विश्लेषण माणसाला उपलब्ध नव्हते. आता एकविसाव्या शतकात अशा घटनांचा वेध घेता येतो व शास्त्रीय चिकित्सा करून काही अनुमानेही मांडता येतात. त्या आधारे, एक गोष्ट निश्चितपणे सांगता येते. संयुक्त राष्ट्रसंघाने स्थापन केलेल्या वातावरणीय बदलाचा वेध घेण्यासाठीच्या आंतरसरकारीय परिषदेने (Inter-Governmental Panel on Climate Change) व अन्य शास्त्रज्ञांनी दाखवून दिल्याप्रमाणे या घटना पृथ्वी-वातावरण-अवकाश यातील आपापत: होणाऱ्या टोकाच्या घटनाक्रमांमुळे होत नसून या सर्व घडामोडींचा थेट संबंध माणसाच्या कृत्याशी जोडता येतो. विकासाच्या नावाखाली मनुष्यप्राणी आज पृथ्वीवर तथाकथित प्रगत तंत्रज्ञानाच्या मार्फत ज्या उड्या मारीत आहे त्यातून अशा प्रकारच्या वातावरण बदलाला आमंत्रण दिले जात आहे.

कार्बन डाय ऑक्साईड  व अन्य संबंधित वायूंना हरितगृह वायू असे संबोधले जाते. या हरितगृह वायूंची उष्णता धारण क्षमता प्रचंड प्रमाणात असल्याने, वातावरणातले यांचे प्रमाण जसे वाढत जाते तशी पृथ्वीवरची उष्णता व तापमान वाढत जाते. ४९ शास्त्रज्ञांच्या संयुक्त संशोधनातून असे मांडले गेले आहे की, १९९० ते २०१३ या काळात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ६१ टक्क्यांनी वाढले आहे. हे असेच सुरू राहिले तर २१०० सालापर्यंत तापमानवाढ तीन अंश सेल्सिअसपर्यंत पोहचू शकते. २००९ सालीच्या कोपनहेगन करारानुसार ही तापमानवाढ रोखण्यासाठी, कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन रोखणाऱ्या तंत्रज्ञान वापरावर भर देण्याचे ठरले, तर २०१५ साली झालेल्या पॅरिस करारानुसार सरासरी तापमानवाढ दोन अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. मात्र या दिशेने काही ठोस वाटचाल सुरू आहे, असे म्हणणे अवघड आहे.   

हवामान बदलातील धोक्यांकडे कानाडोळा

हवामान अभ्यासक, संशोधक व तंत्रज्ञ खरे तर गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून वातावरण बदलाच्या गांभीर्याबाबत लोकांना सजग करीत आहेत. आत्यंतिक टोकाचे हवामान पृथ्वीवर उत्पन्न होण्याचे प्रसंग वारंवार घडत जाणे ही धोक्याची पहिली घंटा होती. सर्वसाधारणपणे मनुष्यप्राणी गळ्याशी आल्याशिवाय जागा होत नाही. नाहीतर, अति उष्ण वा अति थंड वातावरणाचा वाढता व वारंवार होणारा कहर, दुष्काळ, अवकाळी पाऊस, पूर स्थिती, बर्फवृष्टी, ढगफुटी आदी आत्यंतिक टोकाचे वातावरणीय बदल वारंवार घडण्याच्या व ते अधिकाधिक विध्वंसक बनण्याच्या घटना वर वर्णन केल्याप्रमाणे अलीकडे जगभरात घडताना दिसून येत आहेत. वातावरण बदल, वाढती उष्णता आदींबाबत आपण गंभीर नसण्याचे अजून एक कारण म्हणजे वातावरणीय विज्ञान (Climatology) हे बरचसे गुंतागुंतीचे शास्त्र आहे. अनेक शास्त्रीय शाखांचे शास्त्रज्ञ एकाच वेळी वेगवेगळ्या वैज्ञानिक पद्धतीने वातावरण बदलाचा मागोवा घेत असतात. त्यात १००% अचूकता संभवत नसल्याने अनेकदा हे शास्त्रज्ञ, त्यांचे स्वतंत्र वा सामायिक अभ्यास एकत्रित मांडून त्याचे गणित सोडवतात. त्यावेळी अनेकदा येणारी ‘भयंकर’ उत्तरं ते वर सांगितलेल्या अनिश्चिततेमुळे थोडी सौम्य करूनच सांगत असतात.

वैज्ञानिक अंधश्रद्धा आणि सांपत्तिक माज जबाबदार

या वातावरणीय धोक्यांना फारशा गांभीर्याने न घेणे याला अजून एक गंभीर कारण आहे, ते म्हणजे ‘वैज्ञानिक अंधश्रद्धा’!  ‘अंधश्रद्धा’ आणि ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या संकल्पना आपण परस्परविरोधी अर्थाने वापरतो. असे असताना ‘वैज्ञानिक अंधश्रद्धा’ हा काय प्रकार आहे? तथाकथित मानवी प्रगती-विकास-भरभराट-ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान आदीमुळे ही पृथ्वी निर्माण होताना, त्यावेळी असणारे आकलन व आज पृथ्वीचे वय तीन लक्ष वर्षे झालेले असतानाचे आकलन म्हणजे आपण ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मारलेली उत्तुंग भरारी आहे. याचे रूपांतर या मानसिक गुलामगिरीत परावर्तीत होते की, इतकी अफाट प्रगती आपण ज्ञानाच्या क्षेत्रात केली आहे,  अचंबित करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे, तर आता धोक्यांना काय घाबरायचे? भविष्यात पृथ्वीतलावरील वातावरण बदल वा वाढती उष्णता आदी बाबीही नवीन तंत्रज्ञानाच्या शोधामुळे निकालात निघतील. अति आत्मविश्वासातून अशी ही विज्ञान-तंत्रज्ञानविषयक अंधश्रद्धा तयार होते.

या अंधश्रद्धेला जोड मिळाली आहे ‘बाजारवादी अर्थकारणातून’ निर्माण झालेल्या ‘सांपत्तिक माजाची’! पूर्वी माणसे निसर्गासमोर नतमस्तक होत. आदिवासी, मच्छिमार, पारंपरिक शेतकरी वा निसर्गावर आधारित जीवन जगणाऱ्या अन्य जन-जाती समूहातले लोक आजही जीवनाकडे,  निसर्गाकडे व त्या निसर्गातून निर्माण होणाऱ्या उपजीविका-आजीविका वा संपत्तीकडे याच नजरेतून पाहतात. मात्र या साऱ्या परंपरांना मागास,दरिद्री असे संबोधून ‘त्यांना काही कळत नाही’ असा निर्बुद्धतेचा शिक्का त्यांच्यावर बाजारवादी शास्त्रज्ञ, अधिकारी, सत्ताधारी बिनदिक्कतपणे मारतात. बाजारवादाला आपण इतके शरण गेलो आहोत की, आता हा बाजारवाद अमानवीय व धोकादायक वळणे घेत असताना आपण त्याला रोखण्यास असमर्थ ठरत आहोत. एकेकाळी निसर्गासमोर नतमस्तक होणारा माणूस आता बाजारावरील अंधश्रद्धाळू भरोशामुळे वातावरण बदलाच्या संकटाकडे राजरोस कानाडोळा करत आहे, हे धोकादायक आहे.

(लेखक सामाजिक, राजकीय कार्यकर्ते असून देशभरातील न्याय्य विकासवादी जनसंघटनांच्या समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. संपर्क : sansahil@gmail.com)

logo
marathi.freepressjournal.in