इराणमधील महिलांचा इल्गार

रूढीग्रस्ततेच्या ओझ्याखाली दबलेल्या जगभरातील स्त्रियांचा प्रतिकात्मक लढा बनला आहे.
इराणमधील महिलांचा इल्गार

कट्टरपंथीयांच्या जुलमी राजवटीखाली घुसमटलेल्या इराणी महिलांनी केलेल्या विद्रोहाने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अन्यायाचा अतिरेक होतो, तेव्हा एका टप्प्यावर अन्यायग्रस्त प्रतिकार करून अन्यायाचा निषेध करू लागतात. इराणमध्ये सध्या जे सुरू आहे, ते त्याचाच परिणाम आहे. हिजाब परिधान केला नाही म्हणून अटक केलेल्या महिलेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यामुळे इराणमधील महिलांनी त्याविरोधात एल्गार पुकारला आहे. हा एल्गार केवळ निषेध आणि आंदोलनापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर या महिलांनी आपल्या हिजाबची होळी केली आणि आपले केसही कापून टाकले. इराणी महिलांच्या या कृतीने जगभरातील महिला चळवळीला बळ मिळाले असून जगभरातून त्यांच्या कृतीचे जोरदार समर्थन केले जात आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या रणकंदनामध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या आंदोलनात आतापर्यंत ६० महिलांसह ७००हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. इराणमधील महिलांच्या आंदोलनाचे लोण जगभरात पसरले असून युरोपीय राष्ट्रांमध्ये राहणाऱ्या इराणी नागरिकांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. यावरून हा प्रश्न केवळ इराणच्या महिलांपुरता मर्यादित राहिला नसून रूढीग्रस्ततेच्या ओझ्याखाली दबलेल्या जगभरातील स्त्रियांचा प्रतिकात्मक लढा बनला आहे.

इराणच्या कुर्दिस्तान प्रांतातील २२ वर्षांची महिला महसा अमीनी राजधानी तेहरान शहरामध्ये आली होती. तिथे महिलांसाठी ड्रेस कोड असून त्यामध्ये हिजाब अनिवार्य आहे. या महिलेने हिजाब परिधान केला नसल्यामुळे ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून तिला अटक करण्यात आली. अटकेनंतर काही वेळातच तिचा अकस्मात मृत्यू झाला. तिचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर पोलिसांच्या छळामुळे अमीनीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर देशाच्या विविध भागांमध्ये महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी संस्कृतीरक्षक पोलिसांविरोधात आंदोलन सुरू केले. अनेक ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळण लागले असून, आंदोलनादरम्यान पाच जणांचा मृत्यू आणि अनेक लोक जखमी झाले, त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. आंदोलनादरम्यान झालेले मृत्यू गोळी लागून झाले असून, सरकारविरोधी शक्तींनी हे कृत्य केल्याचा दावा सरकारी प्रवक्त्यांनी केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी हिजाब उतरणे, हा गुन्हा मानला जात असला तरी अनेक ठिकाणी महिलांनी आपले हिजाब उतरून त्यांची होळी केली. आंदोलनाची तीव्रता वाढल्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांना लाठी हल्ल्याबरोबरच अश्रूधुराची नळकांडीही फोडावी लागली. दरम्यान, इराणमधील पत्रकार मसीह अलीनेजाद यांनी महिलांचे केस कापतानाचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला. इराणमध्ये महिलांवर अनेक निर्बंध असून, त्यामध्ये हिजाब परिधान करण्याचा समावेश आहे. सात वर्षांहून मोठ्या मुलीने तंग कपडे परिधान करण्यास बंदी आहे. स्त्रियांना फॅशनेबल कपडे आणि जीन्सही परिधान करता येत नाही. झगमगीत कपड्यांनाही विरोध आहे. सोशल मीडियावर हिजाबशिवाय फोटो पोस्ट करण्यास बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास १० दिवसांपासून दोन महिन्यांपर्यंतच्या कैदेची तसेच ५० हजार ते पाच लाख इराणी रियालचा दंड आहे. फटके खाण्याच्या शिक्षेचाही अंतर्भाव शिक्षेमध्ये आहे. इराणमध्ये स्त्रियांसाठी आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते किंवा नाही, हे पाहण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी संस्कृतीरक्षक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अशाच पोलिसांनी महसा अमीनीला अटक केली होती. तिच्या मृत्यूमुळे इराणमधील महिलांच्या परिस्थितीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. १९७९ साली इस्लामी क्रांती झाल्यापासूनच, स्त्रियांना डोके आणि मान झाकून बुरखा घालणे आणि केस लपवणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. बहुतांश महिला कायद्याच्या भीतीने त्याचे पालन करीत असल्या तरी बंडखोरी करणाऱ्या स्त्रियांची संख्याही अलीकडच्या काळात लक्षणीयरीत्या वाढू लागली आहे. मोठ्या शहरांमध्ये अनेक महिला बुरख्याबाहेर केसांच्या बटा सोडून निषेध व्यक्त करू लागल्या आहेत. काही बंडखोर महिला तर हिजाब काढतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करून निषेधाचा आवाज बुलंद करू लागल्या आहेत.

पाच वर्षांपूर्वीची अशीच एक घटना जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. तेहरानमधील रिव्होल्यूशन स्ट्रीटवर विदा मोवाहेद या तरुण महिलेने आपला हिजाब एका काठीवर घेऊन हवेत फडकावला होता. २०१७ मधील या घटनेची जगभरातील माध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. याच वर्षाच्या जुलै महिन्यात इस्लामी प्रजासत्ताकाने हिजाब आणि शुद्धता दिवस पाळला, तेव्हा महिलांच्या अनेक गटांनी या सक्तीच्या विरोधात सविनय कायदेभंगाची चळवळ केली होती. इराणमधील महिलांचा संघर्ष १०० वर्षांपूर्वीपासूनचा आहे. १९०६ ते १९११च्या घटनात्मक क्रांतीदरम्यान, पुरोगामी विचारांच्या इराणी महिलांनी शालेय शिक्षण आणि अभिव्यक्तीच्या अधिकाराची मागणी केली. १९७८ मध्ये मोहम्मद रजा शाह पहलवी यांना सत्ता सोडावी लागण्याच्या आधी इराणमधील विद्यापीठांत ३० टक्के महिला कार्यरत होत्या. असे असतानाही इराणी स्त्रिया १९७९ मध्ये कट्टरपंथी इस्लामच्या क्रांतिकारी भाषेकडे आकर्षित झाल्या आणि त्यातूनच पुढे त्यांनी स्वातंत्र्यावरील बंधने ओढवून घेतली. शरियतच्या प्रभावाखाली शिक्षणापासून सार्वजनिक ठिकाणांपर्यंत आणि अगदी कौटुंबिक पातळीवरील समारंभांतूनही स्त्रियांवर अनेक बंधने लादण्यात आली. १९७९ पासून कामाच्या ठिकाणी बुरखा घालण्याचा नवीन कायदा लागू झाला, तेव्हा तेहरानसह प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. हजारो स्त्रिया रस्त्यावर उतरल्या. इस्लामी फौजेच्या धडक कृती दलांनी निदर्शक महिलांवर हल्ले केले. आधीच्या काळात महिलांनी इस्लामी क्रांतीला पाठिंबा दिल्यामुळे तत्कालीन पुरोगामी गटांनीही महिलांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, इराणच्या सरकारने खासगी वा सार्वजनिक ठिकाणी महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार, महिलांविरुद्ध होणारी हिंसा रोखण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. तथाकथित ‘इस्लामी क्रांती’मागे इराणी महिलांचाही हात असला, तरी नंतरच्या काळात प्रत्येक टप्प्यावर इराणी महिलांनी आपले राजकीय-सामाजिक अस्तित्व दाखवून दिले आहे. शाह यांच्या राजवटीत महिलांना नागरी स्वातंत्र्य होते आणि कौटुंबिक कायद्यातही स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व झिरपत होते. या आधुनिकीकरणवादी सुधारणा इस्लामी राजवटीने रद्द केल्या. बहुपत्नीत्वावर मर्यादा घालणारे कायदे रद्द करून चार विवाह करण्याची मुभा इराणी पुरुषांना मिळाली. मुलींच्या विवाहाचे कायदेशीर वय १८ वर्षेपर्यंत वाढवणारे शाहकालीन कायदेही रद्द करण्यात आले. १९८९ मध्ये खोमेनी यांच्या मृत्यूनंतर आणि इराकशी आठ वर्षे चाललेल्या युद्धाच्या समाप्तीनंतर, इस्लामी राजवटीला पाठिंबा देऊन सुधारणांची मागणी करणाऱ्या इस्लामधार्जिण्या महिलांमध्ये नवीन वैचारिक प्रवाह उदयास आले.

इराणमधील राज्यकर्त्यांनी एकूण जगभरातील बदलते वारे आणि इराणमधील स्त्रियांच्या भावना लक्षात घेऊन दोन पावले मागे मागे घेतली, तर त्यातून महिलांच्या भावनांचा आदर होईलच, शिवाय देशातील वातावरणातील तणावही निवळेल; परंतु लोकभावनेपेक्षा राज्यकर्त्यांचा अहंकार वरचढ ठरतो, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेल्यावाचून राहत नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in