आपल्या दैनंदिन दिवसाची सुरवात म्हणजे सकाळची "न्याहरी"..आपल्या शरीराचं मीटर सुरु करण्यासाठी ऊर्जेची गरज असते, आणि तीच ऊर्जा आपल्याला सकस आणि पौष्टिक न्याहरीतून मिळू शकते. सकाळी काहीतरी खाल्ल्याने पूर्ण दिवसभर तुमचा मूड फ्रेश राहतो, कामात नीट लक्ष देता येतं म्हणजेच मन एकाग्र राहतं. आजकालच्या धावपळीच्या जगात खाण्या पिण्याकडे दुर्लक्ष करणं हे कित्येक जणांच्या अंगवळणी पडलंय. १२ तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यावर काही खाल्ल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. म्हणून नाश्ता न करण्याचे आरोग्यावर काय काय वाईट परिणाम होतात ते जाणून घ्या.
लठ्ठपणा :- न्याहरी न करणे आणि लठ्ठपणा यांचा नेमका संबंध काय आहे ? हल्ली कोणालाही विचारला लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय करावं तर तुम्हाला हेच उत्तर मिळेल कि सकाळचा नाश्ता टाळा किंवा काही खाल्लं तरी कमी खा. परंतु याउलट असं म्हटलं जातं कि, 'नाश्ता आणि दुपारचा जेवण हे श्रीमंतांसारखं करावं आणि रात्रीच जेवण हे फकीरासारखं करावं.' म्हणजेच सकाळी आणि दुपारी भरपेट खाऊन संध्याकाळी हलका आहार करा.
मधुमेह :- मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी तर नाश्ता करणे अत्यंत गरजेचे आहे. नाश्ता केल्याने रक्तातील इन्सुलिन स्पाईक कमी होते. पण जर नाश्ता टाळला तर मात्र शरीरातील इन्सुलिनची पातळी खालावते आणि दुपारच्या जेवणानंतर वाढते. आणि यामुळे टाईप २ मधुमेहाची वाढ होण्याची शक्यता असते.
हृदयविकार :- न्याहरी न केल्याने हृदयावर देखील परिणाम होतो. धान्य, इडली, पोहे, अंड अशा पदार्थांचा समावेश असल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने, कर्बोदके, कॅलरीज, कॅल्शिअम मिळते. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यास मदत होते व यामुळे हृदय विकाराचा धोका उद्भवत नाही.
चयापचयाच्या तक्रारी :- नाश्ता टाळल्यामुळे पचन क्रिया मंदावते व चयापचयाच्या तक्रारी उध्दभवू लागतात.
त्याचप्रमाणे स्मृतिभ्रंश, मायग्रेन, प्रतिकार शक्ती कमी होणे, चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा येणे, सुस्ती येणे इत्यादी अनेक समस्यांना देखील आपल्याला सामोरे जावे लागेल. म्हणूनच निरोगी शरीर, नियंत्रित वजन व आजारांपासून सुटका हवी असेल तर न्याहरी करणे अत्यंत गरजेचे आहे.