इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार

आज पाकिस्तानात पुन्हा एकदा हेच नाटक रंगले आहे. आता तिथे ‘माजी पंतप्रधान इम्रानखान विरूद्ध लष्कर’ असे नाटक सुरू झालेले आहे.
इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार

पाकिस्तानच्या राजकीय जीवनात ‘सूडाचे राजकारण’ हा प्रकार तसा नवीन नाही. मात्र यात नेहमी दोन पात्रं असतात. एक म्हणजे राजकीय नेते आणि दुसरे म्हणजे लष्कर. यांच्यात अनेकदा मैत्रीचे संबंध असतात तर बरेचदा ते एकमेकांच्या विरोधात उभे असतात. त्यातही एक समान धागा दिसून येतो. तो म्हणजे काही तुरळक अपवाद वगळता अनेक नेते सुरूवातीला लष्कराच्या आशीर्वादाने मोठे झालेले असतात. यथावकाश लष्कराच्या दृष्टीने त्यांची उपयुक्तता संपलेली असते. मग लष्कर त्यांना एका झटक्यात बाजूला सारते. यानंतर तो नेता आणि लष्कर यांच्यात जुंपते. आज पाकिस्तानात पुन्हा एकदा हेच नाटक रंगले आहे. आता तिथे ‘माजी पंतप्रधान इम्रानखान विरूद्ध लष्कर’ असे नाटक सुरू झालेले आहे.

ताज्या बातम्यांनुसार माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यांनी जरी सध्या संरक्षित जामीन घेतला असला तरी या जामीनाची मुदत संपल्यानंतर काय, हा प्रश्‍न आहे. इम्रान खान यांनी शनिवार, २० ऑगस्ट रोजी इस्लामाबाद येथे घेतलेल्या एका सभेत पोलीस, न्यायसंस्था आणि अन्य सरकारी स़ंस्थांना धमकावल्याचा आरोप असून त्यांच्याविरोधात दहशतविरोधी कायद्याच्या सातव्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच कारणांसाठी त्यांना अटक होणार होती. मात्र जामिनामुळे ती लांबणीवर पडली आहे.

सोमवार २३ ऑगस्ट रोजी पोलिसांनी इम्रान खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतल्यापासून पाकिस्तानात तणाव निर्माण झाला. आमच्या नेत्याला जर अटक झाली तर पाकिस्तानातील प्रत्येक गावांत दंगे होतील, असा इशारा इम्रान यांच्या पक्षाने म्हणजे ‘पाकिस्तान तहरिक - ए इन्साफ’ तर्फे देण्यात आला आहे. आताच्या बखेडयाची सुरूवात मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी झाली. इम्रान खान यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या श्रीयुत शेहबाज गील यांनी दूरदर्शनवर बोलतांना काही प्रतिक्रिया, काही शब्दं असे काही वापरले जे ‘पाकिस्तान मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटी’ला आक्षेपार्ह वाटले. त्यांच्या मते शेहबाज गील यांनी राजद्रोह करणारे शब्दं वापरले तसेच शेहबाज गील यांनी लष्कराला बंड करण्याचे आवाहन केले. (हाच आरोप जयप्रकाश नारायण यांनी दिल्लीला २५ जून १९७५ च्या संध्याकाळी केलेल्या भाषणावर ठेवला होता. याचा वापर करूनच इंदिरा गांधी यांनी त्याच रात्री अंतर्गत आणिबाणी जाहीर केली होती.).

काही अभ्यासकांच्या मते इम्रान खान यांना आज पाकिस्तानी जनतेची सहानुभूती मिळत आहे. त्याचा वापर करून इम्रान खान यांना पाकिस्तानात लवकरात लवकर सार्वत्रिक निवडणुका व्हाव्यात असे वाटत आहे. तसं पाहिलं तर एप्रिल २०२२ मध्ये इम्रान खानची लोकप्रियता फार कमी झाली होती. मात्र त्यांच्या विरोधात अविश्‍वासाचा ठराव मंजूर झाल्यापासून ते पुन्हा लोकप्रिय झालेले दिसत आहेत. अलीकडच्या त्यांच्या भाषणांत त्यांनी सतत अमेरिकेवर टीका केलेली दिसून येते. त्यांच्या मांडणीनुसार ते पाकिस्तानचे परराष्ट्रीय धोरण देशाचे हितसंबंध डोळयांसमोर ठेवून आखत होते. नेमके हेच अमेरिकेला मान्य नव्हते. अमेरिका इतर देशांवर अनेक मार्गांनी प्रभाव टाकत असतो आणि अनेक देशांचे परराष्ट्रीय धोरण स्वतःला अनुकूल होईल असे आखून घेतो. इम्रान खान यांच्या आरोपांनुसार अमेरिकेला हे मान्य नव्हते. म्हणून त्यांना अमेरिकेने पंतप्रधानपदावरून घालवले. इम्रान खान यांची मांडणी आजच्या पाकिस्तानातील मध्यमवर्गाला, खास करून तरूणांना आवडलेली आहे.

या संदर्भातील काही घटनाक्रम डोळयांसमोर ठेवला पाहिजे. १० एप्रिल २०२२ रोजी इम्रान खान यांना राजीनामा द्यावा लागला. ते काही दिवस शांत होते. जुलै २०२२ मध्ये पाकिस्तानातील पंजाब प्रांतात विधानसभेच्या पोटनिवडणूका झाल्या. या पोटनिवडणूका वीस जागांसाठी होत्या. यातील पंधरा जागा इम्रान खान यांच्या पक्षाने दणदणीत बहुमताने जिंकल्या. या यशामुळे इम्रान खान यांचे विरोधक हबकले तर दुसरीकडे इम्रान खान यांना नवीन ऊर्जा मिळाली. त्यांनी नंतर देशभर जाहीर सभा घेण्याचा धडाका लावला. या जाहीर सभांतून केलेल्या भाषणांतून इम्रान खान विद्यमान सरकारवर तोफा डागत आहेत. त्यांना लोकसभा विजर्जित करून निवडणुका घ्याव्यात, असे वाटत आहे.

वरवर पाहता आता पाकिस्तानात सुरू असलेली वादावादी ही दोन राजकीय पक्षांतील आहे. यात लष्कर कोठेही नाही. असे असले तरी पाकिस्तानातील सर्व महत्वाच्या घटनात लष्कराची भूमिका निर्णायक ठरतेच. शेहबाज गील यांनी केलेल्या वादग्रस्त भाषणांत म्हणाले की इम्रान खान यांच्या मागे लष्करातील मध्यम पातळीवरचा अधिकारी वर्ग आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. पाकिस्तान सरकारने हे विधान फार गंभीरपणे घेतले आणि शेहबाज गील यांना अटक केली. गेली अनेक दशकं पाकिस्तानच्या राजकारणात लष्कर महत्वाची भूमिका बजावत असते. असे म्हणतात की जेव्हा इम्रान खान यांना त्यांच्या हकालपट्टीचा अंदाज आला होता तेव्हा त्यांनी आपल्या मर्जीतील लष्करी अधिकारी लेफ्ट. जनरल फैज अहमद यांना लष्करप्रमुख करण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रयत्न फसले आणि परिणामी इम्रान खान यांची गच्छंती अटळ झाली. मात्र आजही इम्रान खान लष्करातील काही अधिकाऱ्यांत कमालीचे लोकप्रिय आहेत असे बोलले जाते. म्हणूनच इम्रान खान विरोधी लष्करी अधिका यांना इम्रान खान यांना आता मिळत असलेली लोकप्रियता खुपत आहे. जर पुढच्या लोकसभा निवडणुकांत इम्रान खान यांच्या पक्षाने यश मिळवले आणि इम्रान खान पुन्हा जनादेश घेऊन पंतप्रधान झाले तर अशी व्यक्ती लष्कराच्या दबावाखाली काम करणार नाही, अशी रास्त भीती जेष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना आता वाटत आहे.

आता या संदर्भातील काही घटनांचा विचार केला पाहिजे. विद्यमान लष्करप्रमुख जनरल जावेद बाजवा यांचा कार्यकाळ लवकरच म्हणजे येत्या नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. ते मुदतवाढ मिळवून स्वतःहून या पदावर अधिक काळ राहण्याचा प्रयत्न करतील. या बाबतीत ‘वय’ हा घटक त्यांच्या बाजूने आहे. आज त्यांचे वय ६१ वर्षं आहे. पाकिस्तानातील लष्करी सेवेच्या नियमानुसार लष्करप्रमुख वयाच्या ६४ व्या वर्षांपर्यंत त्या पदावर राहू शकतो. याबद्दल स्पष्टता यायला सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उगवेल.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे पुढच्या वर्षी पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका व्हायच्या आहेत. पाकिस्तानातील निवडणुका आयोगाने एप्रिल २०२२ मध्ये जाहीर केले होते की त्यांना मे 2023 च्या आधी सार्वत्रिक निवडणुका घेता येणार नाही. पाकिस्तानात जानेवारी 2022 मध्ये खास जनगणना झाली आहे. त्याच्या आधारे निवडणूक आयोगाला मतदारसंघांच्या सीमारेषांची पुनर्रचना करायची आहे. त्यासाठी त्यांना वेळ लागणार आहे.

पाकिस्तानातील घटनांना आणखी एक आयाम आहे. तेथील निवडणूक आयोगाने अलिकडेच जाहिरपणे मान्य केले की इम्रान खान यांच्या पक्षाला परदेशातून देणग्या मिळालेल्या आहेत. पाकिस्तानातील कायद्यांनुसार हे बेकायदेशीर आहे आणि अशा देणग्या मिळालेल्या पक्षावर बंदी घालता येते. इम्रान खान यांचे राजकीय विरोधक ही मागणी करत आहेतच.

लंडनमध्ये बसलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ मोठया उत्सुकतेने पाकिस्तानातील राजकीय चित्र बघत आहेत. नवाझ शरीफ एकेकाळी लष्कराचे आवडते नेते होते. त्याकाळी थोरले शरीफ लष्कराच्याच आशीर्वादाने पंतप्रधान झाले होते. नंतर मात्र त्यांचं आणि लष्कराचे बिनसलं आणि त्यांची उचलबांगडी झाली. आता त्यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी आहेत. काही अभ्यासकांच्या मते लष्करशहा कदाचित थोरल्या शरीफ यांच्याऐवजी धाकटया शरीफांना समोर करून स्वतःचे वर्चस्व अबाधित ठेवतील. आज तेथील स्थिती इतकी विचित्र आहे की काहीही ठामपणे सांगता येत नाही. अजून काही महिने गेल्यावर चित्र स्पष्ट होईल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in