सुसंस्कृत महाराष्ट्रात, नको अभद्र भाषा

आज दिल्लीशहा महाराष्ट्रावर स्वारी करण्यासाठी आला आहे. इथल्या सह्याद्रीला आव्हान देण्यासाठी गल्ल्याबोळात कर्कश्श किंकाळ्या ठोकत आहे. अभद्र भाषेचा धनी आपली आतली घाण ओसंडून वाहत असताना अंगी सुसंस्कृतपणा नसल्याची पावती देत फिरतोय.
सुसंस्कृत महाराष्ट्रात, नको अभद्र भाषा

- रघुनाथदादा पाटील

मत आमचेही

आज दिल्लीशहा महाराष्ट्रावर स्वारी करण्यासाठी आला आहे. इथल्या सह्याद्रीला आव्हान देण्यासाठी गल्ल्याबोळात कर्कश्श किंकाळ्या ठोकत आहे. अभद्र भाषेचा धनी आपली आतली घाण ओसंडून वाहत असताना अंगी सुसंस्कृतपणा नसल्याची पावती देत फिरतोय. पण इथले मावळे, हे मरहट्टे असे कळस कापून घेतील की तुमच्या घोड्या-गाढवांना इथल्या पाण्यात इथले संताजी धनाजी पुन्हा दिसतील. असे सर्व पुण्यात्मे आजही महाराष्ट्रात स्वराज्यासाठी पहारा देत आहेत. आपली शिव ओलांडून कोणती ‘भटकती आत्मा’ आमच्या महाराष्ट्रात हैदोस घालत आहे ह्याचा विचार करा. एवढे वणवण का फिरावे लागत आहे? जवळपास सगळेच सोबत घेतले आहेत. तरी आता कुणाची भीती मानगुटीवर बसली आहे? हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. नैतिकतेची चाड असणारा समाज या अभद्रतेला कंटाळला आहे.

शेतकऱ्यांचा माल स्वस्तात घेतला तरच व्यापारी आणि उद्योजकांचे खिसे भरले जातात. त्यासाठी शेतमाल बाजारात निघाला की निर्यात बंद करायची. गरज वाटली तर प्रसंगी शेतमाल आयात करून भाव पाडायचे. आणि शेतकऱ्यांकडील माल व्यापाऱ्यांनी अल्प दराने खरेदी केला की निर्यात खुली करून व्यापाऱ्यांना कमाईची संधी द्यायची. निर्यात वाढल्याने देशात कृत्रिम तुटवडा निर्माण करायचा आणि सर्वसामान्य ग्राहकांना महागाईत ढकलायचे. पुन्हा शेतमाल महाग झाला म्हणून लोक आवाज उठवतात. परिणामी कमाई सगळी दलाल किंवा व्यापाऱ्यांची होते. ग्राहक नागवला जातोच, पण या सर्व व्यवहारात शेतकरी मात्र उध्वस्त होतो. वरून नागरी जनतेची सहानुभूती गमावून बसतो. आपण निवडलेले सरकारच शेतकरी आणि ग्राहकांना लुबाडत आहे.

ज्या पक्षाला आपण भरभरून मतदान केले, जो पक्ष सत्तेत आला, तोच पक्ष शेतकरी आणि ग्राहक दोघांचेही शोषण करतो. कारण पक्षनिधी आणि सत्ताधाऱ्यांचे खिसे गरम करायला व्यापारी आणि उद्योजक आपल्या गडगंज कमाईतून भलामोठा हिस्सा यांना देतात. मग कमाईची जेवढी संधी तेवढा हिस्सा, ह्या कराराने भाव पाडले जातात. आयात-निर्यात धोरण ठरवले जाते. त्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा, साठा करण्यावरील बंधने, सरकारची सार्वभौम शक्ती ह्या सगळया अधिकारांचा वापर केला जातो. अशा वेळी आपल्यातीलच लोक धर्मासाठी काही पण करू, या आवेशात असतात किंवा अमुक पक्षाने काय केले, तमुक पक्षाने का नाही केले, असे निर्बुद्धपणाचे प्रश्न तोंडावर मारतात. पण आपण निवडलेल्या सरकारने शेतकरी उद्धस्त केला आणि ग्राहकांना लुबाडले म्हणून संतुलित भूमिका घेतल्याचे अपवादानेच दिसते.

कमरेचे सोडून डोक्याला बांधलेले लोक आता मुंडासेदेखील काढून फेकू लागले आहेत. बारामतीत नैतिकतेच्या सर्व मर्यादा झुगारून नामसाधर्म्य साधत शरद पवार नावाची दुसरी एक व्यक्ती शोधून त्या व्यक्तीला बारामतीमध्ये निवडणुकीत उभे केले. तरीही पराजय समोर दिसू लागताच एका अपक्षाला तुतारी चिन्ह देवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत लोकशाहीची थट्टा करणारी खेळी केली गेली. अशीच खेळी शिरूर मतदारसंघात देखील केली गेली.

विवेकबुद्धी थोडी तरी शिल्लक असल्याची पावती काल छगन भुजबळ यांनी दिली. एकाच लोकसभा क्षेत्रात असे संभ्रम निर्माण करणारे चिन्ह देणे हे सर्वथा चुकीचे आहे, असे सांगून थोडीतरी नैतिक भूमिका घेतली. याचा अर्थ ही मंडळी अशा अनैतिक राजकारणाला कंटाळली आहेत. जनतेतील रोष ह्या जाणकार लोकांना उघड उघड दिसत आहे. असे कमरेचे सोडून डोक्याला बांधलेले जनतेला रुचणार नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना आली आहे. पुढील सत्ता भाजपची नसेल ह्याची खात्री पटू लागल्याने अँलन मस्क यांनी कसा दौरा पुढे ढकलला तसे हळूहळू हे लोकदेखील भूमिका बदलू लागले आहेत.

हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. भाजपाचे भक्त, तथाकथित सवर्ण वगळता नैतिकतेची चाड असणारा समाज भाजपाला कंटाळला आहे. त्यांचे हे अमानुष वर्तन कुणालाच पचनी पडेना.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचे अंदाज असेही भाजपाविरोधी असल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी मोदी हताश होऊन एका सभेत अत्यंत भावूक होत म्हणाले की, इच्छा असेल त्यांना मतदान करा. याचा अर्थ फुग्यातील हवा निघाली आहे. एकंदरीत भाजपची एका तरफेवर चालणारी नाव गटांगळ्या खाऊ लागली आहे. मोदींच्या नावाने जिंकू शकत नाही ह्याची जाणीव झाल्याने असे नामसाधर्म्य साधणारे उमेदवार, संभ्रम निर्माण होईल अशा चिन्हांचे वाटप, निवडणूक आयोगाच्या भेदभावपूर्ण वर्तनामुळे ह्या बाबी अधिकच ठळकपणे उघड झाल्यात आणि विझण्यापूर्वीची जास्तीची फडफड वाटावी अशी विषगुरूची विधाने त्यात भर घालत आहेत. ज्यात काँग्रेस तुमच्या माता भगिनींच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेऊन ते विकून त्याचे पैसे मुसलमान लोकांना वाटणार असे हास्यास्पद आरोप करत सुटलेत. या हुकुमशाहीच्या अशा फुटलेल्या फुग्यामध्ये बळजबरीने प्राणवायू फुंकून छातीचा खकाना करुन घेण्यात त्यांच्या पक्षातील नेत्यांनादेखील उत्साह राहिलेला नाही, याची प्रचिती येत आहे.

त्यांच्या गल्लीबोळातील सभा पाहता सभांना आता गर्दी जमेना. जी गर्दी जमतेय ती देखील स्वयंस्फूर्तीने जमा झालेली नाही. ही गर्दी पैसे देऊन जमवली होती, असे व्हिडिओ समाज माध्यमावर फिरत आहेत. ही गर्दी जनमतावर प्रभाव टाकून मतपरिवर्तन करायला वापरली जाते. स्त्रियांना ३०० रुपये आणि पुरुषांना ५०० रुपये, सोबत नाश्ता आणि येण्याजाण्याची सोय केलेली असते, अशी चर्चा वरचेवर ऐकायला मिळते.

आपल्या कामावर मते मागण्याचे धाडस नसले की पाकिस्तान, चीन इथून सुरू झालेला प्रवास शेवटी हिंदू, मुस्लिम आणि विरोधी पक्षांवर येऊन स्थिरावतो. आपलेच मुद्दे सोडून नवीन मुद्द्यांची कास धरून रडगाणे गाण्याची गरज भासते. गल्लीबोळात जाऊन सभा घ्याव्या लागताहेत ह्याचे दुःख आणि आपण ह्या शरद पवार नावाच्या उत्तुंग माणसासमोर किती खुजे आहोत ही भावना अनावर झाली की विषगुरू अशी वायफळ बडबड करतात. हा महाराष्ट्र आहे साहेब, इथला सावळ्या देखील ‘खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या’ म्हणतो. तिथे शरद पवार तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि अढळ असणारा सह्याद्री आहेत.

औरंगजेब असाच आला होता. असाच महाराष्ट्रभर दौडी मारत इथल्या आमच्या छत्रपतींना बोल लावत तोंडाच्या वाफा गमावत होता. शेवटी इकडेच चिरनिद्रा घ्यावी लागली आणि त्याच्याच राजवटीचा अंत झाला. इतिहास फिरसे दोहराया जायेगा. आजही दिल्लीशहा महाराष्ट्रावर स्वारी करण्यासाठी आला आहे. इथल्या सह्याद्रीला आव्हान देण्यासाठी गल्लीबोळात कर्कश्श किंकाळ्या ठोकत आहे. अभद्र भाषेचा धनी आपली आतली घाण ओसंडून वाहत असताना अंगी सुसंस्कृतपणा नसल्याची पावती देत फिरतोय. पण इथले मावळे, हे मरहट्टे असे कळस कापून घेतील की तुमच्या घोड्या-गाढवांना इथल्या पाण्यात इथले संताजी-धनाजी पुन्हा दिसतील. असे सर्व पुण्यात्मे आजही महाराष्ट्रात स्वराज्यासाठी पहारा देत आहेत. आपली शिव ओलांडून कोणती ‘भटकती आत्मा’ आमच्या महाराष्ट्रात हैदोस घालत आहे ह्याचा विचार करा. एवढे वणवण का फिरावे लागत आहे? जवळपास सगळेच सोबत घेतले आहेत. तरी आता कुणाची भीती मानगुटीवर बसली आहे?गल्लीबोळात सभा घेण्याची गरज केव्हा भासते? आपण हरणार अशी खात्री पटली की, बेताल होत अपशब्द वापरले जातात. आत सुरू असलेली घालमेल दिसू लागते. इथला ‘वुई द पीपल ऑफ इंडिया’ मधला सामान्य माणूस हा सर्व हैदोस शांतपणे पाहत असतो. मनोमन काही नोंदी घेत असतो. देश वाचवणे हीच आता आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे, हे मनोमन ठरवत पुन्हा आयुष्याच्या मशाली पेटवण्यासाठी हात पुढे करतो. देश जिंकावा यासाठी रणशिंग फुंकून प्राणपणाने तुतारी वाजवतो. या नव्या इंडियाचे, भारतवर्षाचे सारथी, बारामतीचे शारदाबाई आणि गोविंदराव यांचे आठवे अपत्य या निवडणुकीचा गोवर्धन करंगळीवर तोलून धरणारे शरदचंद्र पवार आजही सह्याद्रिसम डौलदारपणे उभेच आहेत.

(लेखक शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in