भाजपचे कवित्व सुरू

महाराष्ट्रात महायुतीचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने या पराभवाचे कवित्व भाजपमध्ये सुरू झाले आहे.
भाजपचे कवित्व सुरू
Published on

- अरविंद भानुशाली

सह्याद्रीचे वारे

महाराष्ट्रात महायुतीचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने या पराभवाचे कवित्व भाजपमध्ये सुरू झाले आहे. गेली काही वर्षे भाजप हा प्रथम क्रमांकावर होता. त्यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी दंड थोपटले होते. परंतु लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे त्यांचे मनसुबे विरले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने हक्काच्या जागा गमावल्या आहेत. परत मागे वळून विजय संपादन करणे हे भाजपला जड जाणार आहे. यासाठी संघटनात्मक बदल, आपापसातील गटबाजी तसेच देवेंद्र यांच्याभोवती असलेला गोतावळा दूर करणे, हे बदल करावे लागतील.

आता शिवसेना बाळासाहेबांची राहिली नसून ती उद्धव ठाकरे यांची झाली आहे. त्यामुळे नकली कोणती, असली कोणती याचा निर्णय विधानसभा निवडणुकीत लागेल. कारण शिंदेंच्या ओरिजिनल शिवसेनेपेक्षा लोकसभेत उबाठाच्या केवळ दोनच जागा जास्त आल्या आहेत. शिंदे गटाकडे ४२ आमदार आहेत. तेव्हा ही रंगत विधानसभा निवडणुकीतच दिसणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत सर्वात अधिक नुकसान भाजपचे झाले आहे.

महायुतीमध्ये लोकसभेसाठी निवडणूकपूर्व जागावाटप झाले नव्हते. त्यामुळे शेवटपर्यंत जागावाटपात मतैक्य नसल्याने व चुकीचे उमेदवार दिल्याने भाजप-राष्ट्रवादीला तडाखा बसला. त्या मानाने एकनाथ शिंदे यांनी बऱ्यापैकी खेळी खेळून ठाण्यातील प्रतिष्ठेच्या दोन्ही जागांसह सात हा आकडा गाठला. अजित पवारांनी सुरुवातीलाच लोकसभेच्या चार जागा मागितल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने ४०-४२ आमदार घेऊन अजितदादा सरकारमध्ये आले होते. शिंदेंनी लोकसभेच्या १५ जागा घेतल्या. पण २५ टक्केही यश मिळाले नाही. याचा मोठा फटका नरेंद्र मोदी यांना दिल्लीत बसला. माजी मुख्यमंत्री चव्हाण भाजपमध्ये येऊनही पराभूत झाले आणि नांदेडची जागा गेली.

संपूर्ण मराठवाड्यात भाजपचा झेंडा खाली पडला. केवळ संभाजीनगर येथे एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराने बाजी मारली. विदर्भातही भाजपचे गडकरी व धोत्रे चिरंजीव वगळता उर्वरित नऊ जागा मिळाल्या नाहीत, ही भाजपच्या दृष्टिकोनातून मोठी शोकांतिका आहे. आता या पराभवाचे कवित्व सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ केला होता. आता सध्या तरी हे नाट्य थांबले असले तरी महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठे बदल होणार यात शंका नाही. महाराष्ट्रात भाजपने आपल्या पराभवाचे खापर आता सोशल मीडियावर फोडले आहे. फेक नरेटिव्हला उत्तर देण्यास आम्ही असमर्थ ठरलो, असे फडणवीस म्हणाले.

नरेंद्र मोदी यांचे वादळ २०१४ मध्ये आले. त्यांना त्याकाळी मोठी प्रसिद्धीही मिळाली. त्यावेळी देशात काँग्रेसची सत्ता होती आणि गैरव्यवहार, भ्रष्टाचार या मुद्द्यांवर ती निवडणूक लढवली गेली होती. त्यात त्यांना यशही आले आणि मोदी पंतप्रधान झाले. २०१९ मध्ये मोदी शिखरावर चढले. २०२४ मध्ये हिंदू विरुद्ध अल्पसंख्यांक, दलित असा सामना झाला. विरोधी पक्षाने मोदींच्या ४०५ चा नारा आपल्या प्रचारात घेऊन संविधान बदलले जाणार आहे, हा मुद्दा घेतला. तो निवडणुकीत प्रभावी ठरला. मोदी-शहा यांनी कितीही ओरडून सांगितले की, घटना बदलता येणार नाही, परंतु त्याचा परिणाम झाला नाही. तर अयोध्येत राम मंदिराच्या निमित्ताने हिंदुत्व हा मुद्दा पुढे आल्याने अल्पसंख्यांक एकत्र झाले. विशेष म्हणजे यावेळी अल्पसंख्यांकांनी नुसता विरोध केला नाही तर मोदींविरोधात एक गठ्ठा मतदान केले. विशेष म्हणजे ज्या अयोध्येत श्रीराम सोहळा दणक्यात झाला तेथे भाजपचा पराभव व्हावा हे पाहता धार्मिक ध्रुवीकरण किती मोठ्या प्रमाणात झाले हे दिसून येते.

२०२४ च्या निवडणुकीत हिंदुत्व विरुद्ध अल्पसंख्यांक हा मुद्दा प्रभावी ठरला. भिवंडीत २०१४-२०१९ मध्ये भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना अल्पसंख्यांक समाजाने मोठे मतदान केले होते. परंतु यावेळी काँग्रेस आघाडीने भाजपचे जातीय राजकारण पुढे आणल्याने या अल्पसंख्यांकांची मते भाजपच्या विरोधात गेली. विशेष म्हणजे उमेदवार कोण आहे याचा विचार न करता यावेळी भाजपचा किंवा युतीचा उमेदवार असला तर त्याला पराभूत करायचे असा चंग बांधून झाडून मतदान केले गेले. तो प्रकार बहुसंख्यांकांच्या मतदानाच्या बाबतीत झाला नाही. हे कारण पुढे मोठ्या प्रमाणात जाचक ठरू शकते. याचबरोबर मुस्लिमांना आरक्षण देता येत नाही, हा मोदींचा मुद्दा हाती घेऊन विरोधकांनी भाजपला रोखले. त्याचा मोठा फटका उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात बसला. आदिवासी, ओबीसींचे आरक्षण काढून इतरांना दिले जात आहे, असा प्रचार केला गेला पण तरीही आदिवासी व ओबीसी समुदाय मोदी यांच्या सोबत आलेला दिसत नाही. याउलट काँग्रेसने प्रचारात मुस्लिमविरोधी भूमिकेला प्राधान्य देऊन मुस्लिमांचे मतदान वळवले.

नांदेडची जागा काँग्रेसचे अशोक चव्हाण विरोधात असतानाही भाजपने जिंकली होती. यावेळी दस्तुरखुद्द अशोक चव्हाणच भाजपमध्ये आले असतानाही भाजप तेथे पराभूत झाला. दक्षिण मुंबईत मुरली देवरा, मिलिंद देवरा यांचे पूर्वीपासून प्राबल्य होते. ते शिंदे यांच्या शिवसेनेत आले म्हणून दक्षिण मुंबईतील मुस्लिमांनी शिंदेंच्या उमेदवाराला मत न देता उद्धव ठाकरे यांच्या उबाठाच्या उमेदवारास मत दिले हे सत्य महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडले. महायुतीला दक्षिण मुंबईत चांगलाच फटका बसला. जनता कामे केली, विकास केला, मुंबईत मोठा बदल केला म्हणून मतदान करीत नाही. आयत्या वेळी जे मुद्दे पुढे येतात त्यावर हे सत्ताकारण चालते.

महाराष्ट्रात यावेळी जाती-पातीचे राजकारण खूप चालले. भिवंडी मतदारसंघात कुणबी-आगरी असा वाद झाला. हे पुढे राज्याच्या दृष्टीने हानिकारक ठरणार आहे. मुळात भाजपने ४०५ आकडा काढला तो त्यांच्यावर बुमरँग ठरला. प्रत्यक्षात भाजपकडे हा ४०५ आकडा आला कुठून? तर काश्मीरचे ३७० कलम उडवताना त्यांनी ३५ कलमही उडवले होते. हे ध्यानी घेऊन भाजपला ३७० आणि एकूण एनडीएला ४०५ असा प्रचार सुरू झाला. त्यावर भाजपला ४०५ जागा घटना बदलण्यासाठी आवश्यक आहेत, भाजप संविधान बदलणार, हा एकच मुद्दा विरोधकांनी घेतला आणि त्याचा मोठा फायदा विरोधकांना मिळाला. मोदींनी दुसरा मुद्दा पुढे केला तो धार्मिक आरक्षणाचा. वास्तविक निवडणूक काळात ते आवश्यक नव्हते. परंतु कर्नाटकात काँग्रेसने ओबीसी, एससींच्या आरक्षणामधून मुस्लिमांना आरक्षण दिले आहे, असे सांगून ओबीसी, एससीची मते घेण्याचा प्रयत्न भाजपने केला. तो फोल ठरला. केवळ भाजपच्या प्रचारातील या दोन मुद्द्यांमुळे संपूर्ण निवडणूक फिरली.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले असले तरी त्यांना २०१४–१९ प्रमाणे विजय संपादन करता आला नाही. २०१४ मध्ये, २०१९ मध्ये मोदींनी भाजपला निर्विवाद बहुमत मिळवून दिले होते. तसे बहुमत भाजपला २०२४ मध्ये मिळवता आले नाही. किमान २७२ जागांऐवजी २४० जागा भाजपला मिळाल्या. त्यामुळे त्यांना सत्तेसाठी एनडीएच्या घटक पक्षांवर अवलंबून राहावे लागले. समर्थन देणारे आरजीडीचे नेते नितीशकुमार व आंध्र प्रदेशच्या तेलुगु देसमचे चंद्राबाबू नायडू हे दोन्ही नेते अविश्वसनीय असले तरी त्यांना भाजपच्या पाठिंब्यावर आंध्र, बिहारमध्ये आपले राज्य टिकवून ठेवायचे आहे. त्यामुळे ते फारसे अविश्वासू वर्तन सध्या तरी करणार नाहीत. चंद्राबाबू यांनी यापूर्वी मोदी यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला असला तरी आता परिस्थिती बदलली आहे. आंध्रात नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. नायडू-भाजप आघाडीचा विजय झाला आहे. आता आंध्र प्रदेशनंतर भाजपने ओदिशातही मुसंडी मारून नवीन पटनाईक यांना चांगलाच धडा दिला आहे. ओदिशातून भाजपला लोकसभेच्या १९ जागा मिळाल्या आहेत.

राहुल गांधी यांच्या दोन यात्रांमुळे विरोधकांसाठी वातावरणनिर्मिती झाली, हे नाकारता येणार नाही. मोदी यांनी रोड शो केले. त्यातून भाजपच्या बाजूने थोडीफार वातावरणनिर्मिती झाली. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे त्याचा मोठा फायदा झाला, हे नाकारता येणार नाही. मोदींनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती. ‘तुमचे मत उमेदवारासाठी नाही, तर मला आहे’, अशी मिनतवारीही त्यांना करावी लागली. रायबरेलीत तर स्मृती इराणी माझी बहीण आहे. तिला मतदान करणार की नाही? असा सवाल ते सभेत करीत होते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. उत्तर प्रदेशमध्ये जिथे भाजपचे ६७ ते ७० जागांचे स्वप्न होते, ते भंगले आणि अखिलेश यादवची जादू चालली. समाजवादी पार्टी भाजपवर वरचढ ठरली. भाजपसाठी ही धोक्याची घंटा आहे. समाजवादी पार्टीबरोबर राहिल्याने उत्तर हिंदुस्थानात काँग्रेसचा फायदा झाला. रायबरेली व अमेठी या दोन्ही जागा काँग्रेसकडे गेल्या. दहा वर्षांत हे प्रथम घडले.

(लेखक ज्येष्ठ राजकीय भाष्यकार आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in