-अरविंद परांजपे
खास बात
आपल्या पहिल्या एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहानंतर भारताने अवकाश मोहिमांमध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. चेन्नईपासून साधारणपणे १३५ किलोमीटरवरील अवकाश केंद्रातून ‘पीएसएलव्ही’चे प्रक्षेपण झाले. या मोहिमेत ‘इस्रो’च्या अत्यंत भरवशाच्या प्रक्षेपकाने आपल्या साठाव्या मोहिमेत प्रमुख अभ्यास उपग्रहासह अन्य अवकाशीय अभ्यासाची उपकरणेही अवकाशात प्रक्षेपित केली आहेत. याची दखल घ्यायलाच हवी.
जागतिक पातळीवर भारताची छबी उन्नत करणाऱ्या संस्थांमध्ये इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशी तसेच परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून नावलौकिक मिळवणारी ही संस्था दिवसागणिक नवनवीन आणि महत्त्वाकांक्षी योजना हाती घेत यशस्वी करताना दिसत आहे. यातील एक नवी कडी म्हणजे ‘एक्स्पोसॅट’च्या प्रक्षेपणाकडे बघावे लागेल. या पहिल्या एक्स- रे पोलरिमीटर उपग्रहानंतर भारताने अवकाश मोहिमांमध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. चेन्नईपासून साधारणपणे १३५ किमी.वरील अवकाश केंद्रातून ‘पीएसएलव्ही’चे प्रक्षेपण झाले. या मोहिमेत ‘इस्रो’च्या या अत्यंत भरवशाच्या प्रक्षेपकाने आपल्या साठाव्या मोहिमेत प्रमुख अभ्यास उपग्रहासह अन्य अवकाशीय अभ्यासाची उपकरणेही अवकाशात प्रक्षेपित केली आहेत. या उपकरणांना पेलोड असे म्हणतात. विशेष नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे यातील एका उपकरणाची निर्मिती महिलांनी केली आहे. त्यामुळेच हे अवकाशक्षेत्रातील मोठे यश आहेच, खेरीज महिलांच्या विस्तारत्या विश्वाचे प्रतीक म्हणून याकडे बघावे लागेल. अशा सर्व अर्थाने ही मोहीम दखलपात्र म्हणावी लागेल.
यातील खगोलशास्त्राशी संबंधित भाग म्हणजे याद्वारे क्ष-किरणांचे निरीक्षण करण्याच्या कामी गती येणार आहे. ही क्ष-किरणे म्हणजेच एक्स-रे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत आणि दुसरा भाग असा की, हे एक्स-रे म्हणजे अत्यंत ऊर्जा असणाऱ्या तरंगलहरी असतात. एखादा तारा मोठा होतो वा गुरुत्वियबलामध्ये अडकतो तेव्हा अशा प्रकारच्या ताऱ्यांमधून खूप मोठ्या प्रमाणावर एक्स-रेज् येतात. ही त्या ताऱ्याच्या जीवनातील शेवटच्या टप्प्यातील फेरी असते. इथे आपण समजून घ्यायला हवे की, काही तारे प्रज्वलित होतात, प्रकाश देतात आणि हळूहळू त्यांच्याकडून मिळणारा प्रकाश मंद होत जातो. अशा ताऱ्यांपासून नंतर न्यूट्रॉन स्टार्स वा ब्लॅक होल्स म्हणजेच कृष्णविवरे तयार होतात. दोन तारे एकमेकांभोवती फिरत असताना एकातील वस्तुमान दुसऱ्यात पडते आणि या प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात क्ष-किरणे बाहेर पडायला लागतात. हे सगळ्या घटना ताऱ्याच्या जीवनक्रमाशी संबंधित वा संलग्न असतात. त्यामुळेच खगोलशास्त्राच्या दृष्टीने अशा खगोलीय घटनांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. हे लक्षात घेऊनच ‘इस्रो’ने हा नवा उपग्रह आणि अभ्यासाला उपयुक्त ठरणारी काही उपकरणे अवकाशात पाठवली आहेत. याद्वारे अशा पद्धतीच्या किरणांचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करणे शक्य होईल. या अभ्यासातून अतिऊर्जावान ताऱ्यांची उत्क्रांती कशी होते वा पुढे त्यांचा मृत्यू कसा होतो, याबद्दल सखोल माहिती मिळू शकेल.
ही क्ष-किरणे कृष्णविवरातूनही मिळतात. म्हणूनच अवकाशात एखाद्या बिंदूवरून खूप मोठ्या प्रमाणात क्ष-किरणे येत असल्यास आपण तिथे कृष्णविवर असू शकेल, असे विश्वासपूर्वक समजू शकतो. कृष्णविवरामध्ये वस्तुमान पडत असते तेव्हा त्यात खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा येत असते. ती ऊर्जा या क्ष-किरणांचीच असते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ही क्ष-किरणे पृथ्वीच्या वातावरणातून खालपर्यंत येऊ शकत नाहीत. म्हणूनच त्यांचा अभ्यास करण्यासाठी काही अन्य प्रकारे अभ्यास करण्याची गरज निर्माण होते. पूर्वी त्यासाठी संशोधक बलून अर्थात मोठे फुगे पाठवायचे. हॉट एअर बलून वा हेलियम बलून पाठवून निरीक्षणे घेण्याचा तो एक प्रयत्न असायचा. मात्र आता प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपग्रह पाठवणे आणि त्याद्वारे अचूक निरीक्षणे घेणे, माहिती मिळवणे सहजसोपे झाले आहे. हे उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत अशा ताऱ्यांवर लक्ष केंद्रित करतील आणि त्याद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे अभ्यासपूर्ण संशोधन करून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतील.
‘इस्रो’ने या मोहिमेसाठी पाठवलेली उपकरणे आणि उपग्रह वेगवेगळ्या उंचीवरून माहिती घेणार आहेत. याचेदेखील महत्त्व जाणून घ्यायला हवे. जसे की, उपग्रह एका ठरावीक कक्षेतून पृथ्वीची परिक्रमा करतो. ती करताना तो आपल्या ध्रुवीय कक्षेला किती कललेला आहे, यावरही काही गोष्टी अवलंबून असतात. आपले काही उपग्रह पृथ्वीच्या विषुववृत्तावरून प्रवास करत राहतात, तर काही उपग्रह ध्रुवीय असतात. म्हणजेच ते पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरून प्रवास करत राहतात. असे असताना नुकत्याच पाठवलेल्या उपग्रहांच्या कक्षेचा कोन आपल्या अक्षाशी ६-७ अंशाने कललेला आहे. अशा कललेल्या स्थितीमुळे आपल्याला संपूर्ण आकाशाचे निरीक्षण करणे शक्य होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे उपग्रहाचा माग घेणे म्हणजेच त्याचे ट्रॅकिंग करणेही सोपे होते. या दोन्ही हेतूंनी या उपग्रहाची कक्षा काहीशी कललेली ठेवण्यात आली आहे.
‘इस्रो’ने पाठवलेले हे उपग्रह पुढील पाच वर्षे काम करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या अवकाश संस्थेचा इतिहास पाहिला तर सांगितलेल्या वेळेपेक्षा बराच अधिक काळ हे उपग्रह काम करताना दिसतात. उदाहरणार्थ, ‘अॅस्ट्रोसॅट’ही पाच वर्षांसाठीच अवकाशात पाठवण्यात आला होता. पण आज दहा वर्षे झाली तरी तो काम करत आहे. अजूनही त्याद्वारे महत्त्वपूर्ण माहिती मिळत आहे. त्यामुळेच अलीकडे पाठवण्यात आलेल्या उपग्रहाचा कार्यकाळ पाच वर्षे इतका सांगण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात तो त्यापेक्षा अधिक काळ काम करणे शक्य आहे. एकदा या उपग्रहाकडून माहिती येण्याचे महत्त्व दोन प्रकारे असेल. एक म्हणजे खगोलशास्त्राच्या अभ्यासात याचा चांगला उपयोग होईल. संशोधन करत असताना उपग्रहाकडून मिळालेल्या या अचूक आणि सविस्तर माहितीमुळे नक्कीच आपल्या ज्ञानात भर पडते. दुसरा भाग तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतो. जसे की, अशा पद्धतीची उपकरणे बनवणे हे एक प्रकारे ‘रॉकेट सायन्स’च असते. मात्र ते कौशल्य आत्मसात करून प्रत्यक्ष उपकरणे तयार होतात तेव्हा आपल्या जीवनात मोठे बदल घडून येतात.
दुसरी बाब म्हणजे त्यासाठी लागणारे सर्वच सुटे भाग सरकार तयार करू शकत नाही. उदाहरणार्थ, चांद्रयान मोहिमेसाठी लागणारे सर्व साहित्य, सामग्री केवळ ‘इस्रो’मध्ये तयार झालेली नाही तर ‘टाटा’चेही बरेच मोठे योगदान आहे. त्यांनी या मोहिमेसाठी मोठा प्लॅटफॉर्म तयार केला. त्यात ‘इस्रो’चा काहीही सहभाग नव्हता. म्हणजेच अशा प्रकल्पांमधून सरकार आणि खासगी संस्था यांच्यातील भागीदारीही पुढे येते. सर्वात चांगली बाब म्हणजे ‘इस्रो’चा नवीन पिढीला उपक्रमात सहभागी करून घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. एखाद्या मोहिमेत तरुण संशोधक, अभ्यासकांनी तयार केलेली उपकरणे वा छोटे उपग्रह वापरले जातात तेव्हा त्यांना फार मोठे प्रोत्साहन मिळते. आज काही संस्थांमध्ये युवावर्गाला उपग्रह तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातून नवीन काहीतरी समोर येऊ शकते, नवीन तंत्रज्ञान जन्माला येऊ शकते. ही बाब देशाला खचितच नव्या युगाकडे नेणारी आहे. त्यामुळेच ‘इस्रो’चे हे योगदानही दुर्लक्षित करून चालणार नाही. अशा प्रकारे सगळ्यांचा सहभाग मिळतो, सर्वांना कामाबद्दल आत्मियता वाटू लागते, अभिमान दुणावतो तेव्हा देश विकासाचा पुढचा टप्पा गाठणार हे निश्चित असते. पुढे जाऊन हीच मुले देशासाठी शास्त्रज्ञ वा अभियंते म्हणून काम करू शकतात. म्हणूनच अशा महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये त्यांचे योगदान आणि त्यातून मिळणारा अनुभवदेखील मोठा भाग आहे, असे म्हणता येईल.
या पार्श्वभूमीवर आदित्य पहिला लॅग्रेंजियन बिंदू म्हणजे एल-१ च्या कक्षेत स्थापित करण्यात आलेल्या यशाचे महत्त्वही अधोरेखित होते. भारताची ही पहिली सौर मोहीम सूर्याचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा शोध घेत असून त्यातील सात पेलोड्सद्वारे दररोज १,४४० छायाचित्रे पृथ्वीवर उपलब्ध होणार आहेत. सहाजिकच सूर्याचे अंतरंग जाणून घेण्याकामी याची मोलाची मदत मिळणार आहे. सूर्य न्यूक्लियर फ्यूजनद्वारे ऊर्जा निर्माण करतो. सूर्याच्या फोटोस्फियरचे तापमान ६,००० अंश सेल्सिअस आहे. सूर्याच्या या थरातून जीवनासाठी महत्त्वाचा असणारा प्रकाश बाहेर पडतो. सूर्याचा सर्वात बाहेरचा थर असणाऱ्या कोरोनाचे तापमान अनेक दशलक्ष अंश सेल्सिअस इतके आहे. ते देखील अल्ट्राव्हायोलेट आणि एक्स-रे रेडिएशन उत्सर्जित करते, जे पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी घातक आहे. सूर्याच्या आतील थरांपेक्षा कोरोना किती जास्त उष्ण आहे याबाबतचे रहस्य भेदता आलेले नाही. मात्र आदित्य एल-१ कडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे या रहस्याची उकल करण्याची शक्यता आहे. खेरीज सूर्यावरील स्फोटांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सौर वाऱ्याचा अभ्यास करण्यासाठी सौर वातावरण आणि कोरोनाचे सतत निरीक्षण करणे आवश्यक आहे. हे कार्य सूर्याच्या शक्यतितक्या जवळ जाऊन पूर्ण केले पाहिजे. यामुळे सौर उद्रेकाची पूर्वसूचना देण्यात मदत होईल, तसेच त्यामुळे येणारा व्यत्यय कमी करण्यासाठी पावले उचलण्यास मदत होईल. अशा एक ना अनेक प्रकारे भारताची ही सौर मोहीम महत्त्वपूर्ण आहे.