ज्याची भीती होती, तो कोरोना पुन्हा मुंबईसह राज्यात हातपाय पसरू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात एन्फ्लुएन्झाबरोबरच कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझरने स्वच्छता, वेळीच निदान व योग्य उपचार या बाबी आता पुनश्च आवश्यक बनल्या असून कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यायला हवी. कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार मागील २४ डिसेंबर २०२२पासूनच राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत ५२ रुग्णांपैकी ११ रुग्ण पुणे, मुंबई येथे आढळले आहेत. नवी मुंबई, अमरावती, सांगली, छत्रपती संभाजीनगर, सातारा येथे प्रत्येकी एक रुग्ण; तर गुजरातमध्ये सहा रुग्ण, उत्तर प्रदेशमध्ये चार, केरळमध्ये तीन तर तमिळनाडू, राजस्थान, ओडिशा येथे प्रत्येकी दोन आणि गोवा, आसाम, बिहार, तेलंगण, हैदराबाद, चेन्नई येथील प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे.
मागील चोवीस तासात मुंबई व परिसरातील १७९ रुग्णांसह राज्यात २४८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुणे, नाशिक, अकोला, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि कोल्हापुरातही रुग्णसंख्या वाढत चालली आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाचे दोन बळी गेल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तेथील जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये तसेच बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्कसक्ती करतानाच आठवडी बाजार, बसस्थानक परिसर, यात्रा, मेळावे, विवाह समारंभ यासारख्या ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मास्कसक्तीचे पहिले पाऊल उचलले आहे व सध्याचे सर्दी, ताप, खोकल्याचे वाढते प्रकार लक्षात घेता राज्यातही त्या दिशेने वाटचाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे महत्त्वाची बाब म्हणजे, देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बुस्टर डोससाठी विचारणा होऊ लागली असली तरी मुंबईमध्ये कोणत्याच शासकीय लसीकरण केंद्रावर कोव्हिशिल्ड आणि कोबरेव्हॅक्स या लसींचा साठा उपलब्ध नाही.
जे.जे. रुग्णालयामध्ये लसीकरण केंद्र सुरू असले तरी कोव्हीशिल्ड आणि कोबरेव्हॅक्स या लशी उपलब्ध नाहीत. त्यामुळे केवळ कोव्हॅक्सीन घेतलेल्या नागरिकांनाच बुस्टर डोस दिला जात आहे. याशिवाय, मुंबईतील सरकारी लसीकरण केंद्रांवर फक्त ‘कोव्हॅक्सीन’ हीच लस उपलब्ध असल्यामुळे कोव्हिशिल्ड या लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे. कोव्हिशिल्डचा साठा कधी येणार याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयामध्ये जाऊन कोव्हिशिल्डची लस घ्यावी लागत आहे. राज्यात साथरोग कायदा लागू असल्यामुळे खासगी दवाखान्यांतील तपासणीचे दर हे पूर्वीचेच दर आहेत, हा भाग अलाहिदा. मात्र, राज्य सरकारने आपल्या सर्व रुग्णालयात लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यायला हवेत. बहुतेक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून ते लवकर बरे होणारे आहेत. मात्र वृद्ध, सहव्याधी, गर्भवती महिला यांच्यात कोरोनाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी योग्य उपचाराबरोबरच चाचण्यांवर भर देण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. मुंबईतील सरकारी रुग्णालये, महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सेव्हन हिल आणि कस्तुरबा रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध आहेत. तथापि,रुग्ण संख्येत वाढ झाल्यास उपनगरीय रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या सक्रिय रुग्णसंख्या अंदाजे ३५३२ वर गेली आहे. यात दिलासा देणारी बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्के आहे. कोरोनाच्या साथीचे वाढते प्रमाण लक्षात घेता, मुंबई महापालिकेसह राज्य सरकारने आरोग्य यंत्रणांना सतर्क करायला हवे. त्याचबरोबर लसी, खाटा यांची कमतरता भासू नये यादृष्टीने उपाययोजना करायला हव्यात. तसेच, कोरोना, त्याची लक्षणे, उपचार केंद्रे, मदत केंद्रेही नव्याने कार्यरत करण्याची गरज आहे. कोरोनाच्या महामारीच्या भयावह आठवणी लक्षात घेता, सरकारने जनजागृतीसोबतच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. तसेच, महापालिका, सरकारी यंत्रणांना वेळीच सतर्कही करायला हवे. तसेच, कोरोनाच्या महामारीवर आरोग्य यंत्रणेने बारकाईने लक्ष देऊन वेळोवेळी नागरिकांना आवश्यक त्या सूचना द्यायला हव्यात. मागील अनुभवातून शहाणे होऊन कोरोनाविषयी अधिक सावधगिरी बाळगणे सर्वांच्याच हिताचे ठरावे.