सर्जिकल स्ट्राईक, युद्ध की आणखी काही?

पहलगाम हल्ल्यानंतर भारतवासीयांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. ‘होऊन जाऊ द्या एकदाचे’, ‘पीओके आता घेऊनच टाका’, ‘करा एक घाव आणि दोन तुकडे’ अशा घोषणा आणि सोशल पोस्टचा सुळसुळाट आहे. भारत सरकार आणि सैन्य दलांवर कमालीचा दबाव निर्माण झाल्याने आता काय होणार? सर्जिकल स्ट्राईक, युद्ध की आणखी काही?
सर्जिकल स्ट्राईक, युद्ध की आणखी काही?
Published on

देश-विदेश

भावेश ब्राह्मणकर

पहलगाम हल्ल्यानंतर भारतवासीयांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. ‘होऊन जाऊ द्या एकदाचे’, ‘पीओके आता घेऊनच टाका’, ‘करा एक घाव आणि दोन तुकडे’ अशा घोषणा आणि सोशल पोस्टचा सुळसुळाट आहे. भारत सरकार आणि सैन्य दलांवर कमालीचा दबाव निर्माण झाल्याने आता काय होणार? सर्जिकल स्ट्राईक, युद्ध की आणखी काही?

काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात जेवढी संतापाची लाट उसळली आहे, तेवढीच अपेक्षांची सुद्धा. बहुमतात असलेले एनडीए सरकार आता कठोर निर्णय घेईल आणि सैन्य दले अचूक कारवाई करतील, असा विश्वास भारतीयांना आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकद्वारे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची स्थळे उद्ध्वस्त करण्यात आली. आताही तशाच प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक होणार का? की पाकव्याप्त काश्मीर पुन्हा आपल्या ताब्यात मिळविण्यासाठी युद्ध छेडले जाणार? की पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा काहीतरी जबरदस्त संघर्ष सुरू होणार? अशा बहुविध चर्चा सुरू झाल्या आहेत. आततायी माध्यमांकडून अतिरंजित वृत्तांची बरसात केली जात आहे. अखेर केंद्र सरकारकडून विशेष नियमावली जारी करून माध्यमांना जबाबदारीची जाणीव करून दिली गेली आहे. दिल्लीत बैठकांचा सिलसिला कायम असल्याने केवळ भारतवासीयांचेच नाही, तर जगाचेही लक्ष भारत-पाककडे लागले आहे.

सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की, छुपे किंवा थेट युद्ध पुकारून दहशतवाद संपुष्टात येत नाही. अनेकांना वाटते की, भारताने मोठी कारवाई केली की दहशतवादी हल्ले बंद होतील किंवा पाकव्याप्त काश्मीर भारतात आले की, काश्मीर खोरे शांत होईल; मात्र, असे काहीच होण्याची सुतराम शक्यता नाही. आजवरचा इतिहास धुंडाळला, तर लक्षात येईल की, युद्ध, संघर्ष किंवा आक्रमणाने कुठलाही प्रश्न कायमस्वरूपी मिटलेला नाही. उलट त्यातून असंख्य धुमारे फुटतात. जखम चिघळते आणि वेदनांची ठसठस तेवढी उरते. कुठल्याही देश किंवा प्रदेशातील वादाकडे पाहिल्यास त्याची खात्री मिळते.

सामरिकशास्त्रातील काही तज्ज्ञांच्या मते, भारत-पाक यांना युद्धात खेचण्यासाठी पहलगाम हल्ला घडविण्यात आला आहे. त्याचा सूत्रधार चीन असू शकतो. भारताशी त्याचे फारसे सख्य नाही. दिवाळखोर पाक त्याला सर्वांगाने हवा आहे. शिवाय भारत हा जगातील तिसरी अर्थव्यवस्था होणार आहे. पहिल्या दोघात अमेरिका आणि चीन हेच आहेत. महासत्ता वाटचालीत चीनला केवळ भारताचा अडथळा आहे. कारण, भारताची बाजारपेठ आणि क्षमता. त्यातच भारतात बहुमताचे सरकार कार्यरत असून, लोकशाही व्यवस्था सुद्धा बळकट आहे. त्यामुळे भारताला शह देण्यासाठी पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा वापर करण्यात आला. याद्वारे भारत व पाक युद्धात उतरतील. पाक थेट चीनला शरण जाईल. तसेच, भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, विकासाचा वेग मंदावेल आणि जीवितहानीही मोठी होईल. म्हणजेच, एखाद्या षडयंत्राला आपण बळी पडत आहोत का? याचा विचारही प्रत्युत्तर देताना करावा लागणार आहे.

युद्ध हे कुणालाही परवडणारे नसते. त्याची किंमत वसूल केली जातेच. भारत-पाक युद्ध झाले, तर सरकार जनतेवरील करात वाढ करू शकते. याचा परिणाम नागरिकांच्या खर्च आणि गुंतवणूक यावर होईल किंवा भारत सरकार कर्जही घेऊ शकते. ते कुणाकडून घेणार? यातून कर्जबाजारीपणाचा रोग येणार. सरकार दिवाळखोरीच्या दिशेने जाऊ शकते. किंवा नोटा छापण्याचा पर्याय आहे. यातून चलन फुगवटा वाढेल. युद्धामुळे महागाई वाढते. जनता होरपळून निघते. आताच्या घडीला युद्ध पुकारणे योग्य आहे का? याचा सारासार विचार सरकारला करावाच लागेल. विशेष म्हणजे, युद्ध सुरू करणे सोपे आहे पण ते थांबवणे अवघड. केव्हा आणि कसे थांबवायचे याचा निर्णय घेणे अतिशय कठीण असते. तसेच त्यात किती कालापव्यय होईल? हे सांगता येत नाही.

दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाले की, अन्य देश त्यांचे हिशोब चुकते करण्याची संधी शोधतात. त्यातूनही युद्धग्रस्त देशांना मोठी झळ पोहचते. याचा मागमूसही त्या देशांना लागत नाही. तसेच, सद्यस्थितीत भारताने युद्ध छेडले, तर संरक्षण सामग्रीची मोठी मागणी तयार होईल. त्याचा पुरवठा कुठून आणि कसा होणार? देशांतर्गत संरक्षण उत्पादने होत असले, तरी त्याचे प्रमाण कमीच आहे. रशियासारख्या देशाकडून आपण बहुतांशी उत्पादने व सामग्री घेतो. सध्या रशियाच युक्रेनसोबतच्या युद्धात गुंतला आहे. तेथे त्यांचेच वांदे आहेत. त्यामुळे भारताला संरक्षण उत्पादनांचा पुरवठा होणे शक्य नाही. ऐनवेळी अन्य देशांकडून ती घ्यायची ठरली, तर तो पर्याय भारत स्वीकारेल का? भारतीय शस्त्रास्त्रांना ऐनवेळचे सुटे भाग योग्य ठरतील का? मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन बिघडले की, दर अवाक्याबाहेर जातात. या समस्येलाही तोंड द्यावे लागेल. कारगील युद्धाचा इतिहास पाहिला, तर काही देशांनी आपल्याला जुनाट, कामचलाऊ निकृष्ट दर्जाची किंवा बिघडलेली शस्त्रास्त्रे विकली होती. त्यावेळी आपल्याला नितांत गरज होती. शस्त्रास्त्रे मिळूनही त्याचा फायदा झाला नाही. असाच प्रकार आताही घडू शकतो.

एखादा पट्टीचा मल्ल आक्रमक चिथावणी देऊन दुसऱ्या मल्लाला आखाड्यात येण्यास भाग पाडतो. आताची स्थिती तशीच आहे का? हे सुद्धा पडताळून पहायला हवे. जेव्हा आपल्याला राग येतो त्यावेळी रागातील सर्वप्रथम कृती ही घातकच असते. तावातावात घेतलेले निर्णय अंगलट येतात. बाण सुटून गेल्यावर काहीच करता येत नाही. तो कुठे? कसा? आणि केव्हा? सोडायचा याचे भान असायला हवे. तसेच, स्टेडियममध्ये प्रेक्षक किंवा चाहते हे आपल्या आवडत्या खेळाडूचा प्रचंड जयघोष करतात. त्यांच्या अपेक्षा आणि दबावाकडे खेळाडूने लक्ष दिले, तर त्याचे लक्ष विचलित होते आणि त्याचा बळी जातो. अशाच प्रकारे सध्या देशवासीयांच्या आशा-अपेक्षा पाहता भारत सरकार आणि सैन्य दलांनी सबुरीने निर्णय घेणे गरजेचे आहे. आततायीपणा हा अचूक परिणाम साधत नाही.

आता प्रश्न निर्माण होतो की, पाकिस्तानला धडा शिकवायचा नाही का? दहशतवादी हल्ला झाला तरी युद्धाचे परिणाम जाणून गप्प बसायचे का? तर बिल्कूल नाही. उलट आपण थंड डोक्याने विचारपूर्वक आणि चाणाक्ष खेळी करून त्याचा बदला घ्यायला हवा. महागाई, दारिद्र्य अशा असंख्य समस्यांनी ग्रस्त पाकला जेरीस आणण्यासाठी अनेकानेक मुत्सद्देगिरीची शस्त्र उपलब्ध आहेत. ती परजून त्यांचा चपखल वापर करणे गरजेचे आहे. पाकची आर्थिक आणि सर्वच पातळ्यांवर कोंडी करायची, दहशतवाद्यांना मिळणारी विविध रसद बंद पाडायची, वेळप्रसंगी सर्जिकल स्ट्राईकचा मारा करायचा, अतिरेक्यांचे मनसुबे सफल होणार नाहीत अशी मजबूत सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणा सज्ज ठेवायची, आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकला तोंडघशी पाडायचे अशा विविध आघाड्यांवर आपल्याला एकाचवेळी काम करावे लागणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ, संशोधक आणि जाणकारांची फळी तयार करावी लागेल. त्यांच्याकडून येणाऱ्या सल्ल्यांना गांभीर्याने घेऊन कृती आराखडा निश्चित करता येईल. सैन्य दल, गुप्तहेर खाते आदींना मोकळीक देऊन इच्छित परिणाम साध्य करता येईल. भले हल्ल्याचा बदला घेण्यास काही कालावधी जाईल. पण त्याचा फार विचार करण्याची गरज नाही किंवा दबावाला बळी पडण्याचीही. एकाचवेळी विविध पातळ्यांवरील प्रभावी डावपेच यशस्वी होतील जेव्हा या साऱ्यात एकसूत्रता आणि समन्वय असेल. कुटील आणि धूर्त खेळींना अचूक डावपेचांनी आक्रमक उत्तर दिले, तर एकाच दगडात अनेक पक्षी मारले जातील. शिवाय भविष्यकालीन हल्ल्यांचे नियोजन करणाऱ्यांना सुरुंगही लागेल. वर्तमान हा अपेक्षा आणि दबावाचा असला, तरी भविष्याचा विचार करूनच भारत सरकार आणि सैन्य दलांनी व्यूहनीती आखायला हवी. तसे झाले तर पहलगामचे हल्लेखोर, त्यांना बळ देणारे आणि खरे सूत्रधार हे सारेच गारद होतील. शिवाय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असून, भारताने केलेल्या कारवाईची जगभर यथोचित दखलही घेतली जाईल. जगाच्या दहशतवादविरोधी लढ्यात हा मैलाचा दगड ठरेल.

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिक विषयांचे अभ्यासक

logo
marathi.freepressjournal.in