
मत आमचेही
ॲड. हर्षल प्रधान
रेल्वे अपघातांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारी मनुष्यहानी हा गंभीर विषय बनला आहे. मध्य रेल्वेवर दररोज सरासरी सहा-सात प्रवाशांचा मृत्यू होतो. २०१९-२० मध्ये शून्य प्रवासी मृत्यूची नोंद असली, तरी २०२३-२४ मध्ये ४० अपघातांत ३१३ लोकांचा मृत्यू झाला. लालबहादूर शास्त्रींसारख्या नेत्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याची उदाहरणे असताना, आताचे रेल्वेमंत्री निवांत दिसतात. मुंबईतील मुंब्रा-दिवा अपघात, तसेच देशभरातील अनेक मोठ्या अपघातांमुळे केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रेल्वे अपघात झाल्यावर मृतांच्या कुटुंबाप्रति सहानुभूती आणि आर्थिक मदत केली की सरकारची जबाबदारी संपली. तेवढ्यापुरते वृत्त वाहिन्यांसमोर उभे राहून राजकारणी आपली बाईटबाजी करतात आणि दिवस ढकलतात. पण या रेल्वे अपघातात मृत वा जखमी झालेल्या जीवांचे काय? रेल्वेच्या अपघाताला केवळ केंद्रीय मंत्री नव्हे, तर संपूर्ण केंद्र सरकारच जबाबदार असते. त्यांना गर्दीच्या वेळी मुंबईच्या लोकलमधून असा जीवघेणा लटकून प्रवास करायला लावायला हवा म्हणजे त्यांना त्याचे गांभीर्य कळेल.
देशाची रेल्वे व्यवस्था केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित येते. रेल्वे मंत्रालय १०८,७०६ किमी ६७,५४७ मैलपेक्षा जास्त ट्रॅकची देखभाल करते आणि दररोज १३,००० हून अधिक गाड्या चालवते. रेल्वे मंत्रालयाच्या मते, १९६१ ते २०१९ पर्यंत ३८,५०० हून अधिक रेल्वे अपघात झाले आहेत. २०१९-२० मध्ये, भारतीय रेल्वेने इतिहासात पहिल्यांदाच अपघातांमुळे शून्य प्रवासी मृत्यूची नोंद केली. २०२३-२४ मध्ये ४० रेल्वे अपघातांमध्ये किमान ३१३ लोकांचा मृत्यू झाला आणि मागील दहा वर्षांत ६३८ रेल्वे अपघातांमध्ये ७४८ लोकांचा मृत्यू झाला. आताचे रेल्वेमंत्री याबाबत निवांत आहेत. कारण पूर्वीच्या काळातील नेत्यांसारखा नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा वगैरे देण्याची मानसिकता या सरकारची नाही. यांना फक्त सत्ता हवी आहे.
लालबहादूर शास्त्री यांची आठवण
तमिळनाडूमध्ये ६७ वर्षांपूर्वी थुथुकुडी एक्स्प्रेसचे (अरियालूर रेल्वे अपघात) सात डबे नदीत बुडाले होते. त्याची जबाबदारी घेत तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आंध्र प्रदेशमधील महबूबनगरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला, ज्यामध्ये ११२ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्रींनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला होता; परंतु, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लालबहादूर शास्त्रींचा तो राजीनामा स्वीकारला नव्हता. त्याचवर्षी आंध्र प्रदेशमधील महबूबनगर रेल्वे अपघातानंतर आणखी एक रेल्वे अपघात झाला तो अरियालूर येथे. अरियालूर रेल्वे अपघातात ११४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत पुन्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंकडे आपला राजीनामा दिला. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी राजीनामा स्वीकारला. लालबहादूर शास्त्रींनी दुसऱ्यांदा दिलेला राजीनामा स्वीकारताना पंतप्रधान नेहरूंनी सांगितलं की, हे एक उदाहरण म्हणून राहावं यासाठी मी राजीनामा स्वीकारतोय. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्रींनी दोन्ही अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारताना दिलेला राजीनामा स्वीकारू नका, अशी विनंती त्यावेळच्या तीस लोकसभा खासदारांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरूंकडे केली होती. शास्त्रींनी अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला, याबाबत त्यांचं कौतुक केलं पाहिजे, मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारू नये, असं खासदारांचं म्हणणं होतं. रेल्वेमंत्री म्हणून लालबहादूर शास्त्री वैयक्तिकरीत्या दुर्घटनेसाठी जबाबदार नव्हते. दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे झाली होती. त्यामुळे या रेल्वे दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे प्रशासनानं घेणे गरजेचे आहे, असे खासदारांचे मत होते. रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्री यांचा राजीनामा देण्याचा निर्णय, अनेकदा मंत्र्यांना त्यांच्या नैतिक जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी आठवणीत आणून दिला जातो. पण आतापर्यंत फारच कमी नेत्यांनी आपली नैतिक जबाबदारी ओळखून लालबहादूर शास्त्रींच्या निर्णयाचे अनुकरण केले आहे.
मुंब्रा-दिवादरम्यान अपघात कसा झाला
मुंबईमध्ये मुंब्रा-दिवा स्टेशनदरम्यान लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा जीव गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाने अपघात कसा झाला ते सांगितले. कसाऱ्यावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल प्रवाशांनी गच्च भरली होती. काही प्रवासी पायदानावर उभे राहून प्रवास करत होते. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून डाऊन दिशेने जाणारी एक लोकल समोरून आली. या ठिकाणी या दोन्ही लोकल गाड्या एकमेकांच्या बाजूने जात होत्या. या भागात दोन रेल्वे रुळांमध्ये अंतर कमी आहे तसेच अनेक प्रवासी दरवाजात उभे होते. त्यांच्या पाठीवर बॅगा देखील होत्या. हे प्रवासी डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलला घासले गेले. त्यांच्या बॅगा दुसऱ्या लोकलवर आदळल्या. त्यामुळे दरवाज्यात उभे असलेले आठ प्रवासी खाली पडले. दिवसभर राजकीय नेत्यांनी अपघातग्रस्तांना भेटी दिल्या आणि अपघात कसा झाला याची माहिती दिली. पण हे रेल्वे अपघात का होतात, याची कारणमीमांसा कोणी केली नाही.
२०१५ मध्ये झालेले रेल्वे अपघात
२० मार्च २०१५ - उत्तर प्रदेश रेल्वे अपघात : उत्तर प्रदेशातील रायबरेलीजवळ डेहराडून-वाराणसी जनता एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने किमान ५८ जणांचा मृत्यू झाला आणि १५० हून अधिक जण जखमी झाले.
४ ऑगस्ट - हरदा जुळ्या रेल्वे रुळावरून घसरल्या : मध्य प्रदेशातील कुरावन आणि भिरिंगी स्थानकांदरम्यान कामायनी एक्स्प्रेस आणि जनता एक्स्प्रेस गाड्या रुळावरून घसरल्याने किमान ३१ जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले.
२०१६ मध्ये झालेले रेल्वे अपघात
२० नोव्हेंबर - पुखरायण रेल्वे रुळावरून घसरली : उत्तर प्रदेशातील कानपूर नगर जिल्ह्यातील पुखरायणजवळ इंदूर-पाटणा एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरल्याने किमान १५२ जणांचा मृत्यू झाला आणि २६० हून अधिक जण जखमी झाले.
२०१७ मध्ये झालेले रेल्वे अपघात
२१ जानेवारी- कुनेरू रेल्वे रुळावरून घसरली : आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील कुनेरूजवळ हिराखंड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने किमान ४१ जणांचा मृत्यू झाला आणि ६९ जण जखमी झाले.
२०१८ मध्ये झालेले रेल्वे अपघात
१९ ऑक्टोबर - अमृतसर रेल्वे दुर्घटना : पंजाबमधील अमृतसरजवळ दसरा उत्सव पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या गर्दीवर दोन गाड्या आदळल्याने किमान ५९ जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले.
२०२३ मध्ये झालेले रेल्वे अपघात
२ जून- २०२३ ओदिशा रेल्वे टक्कर : ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्टेशनजवळ तीन गाड्यांमध्ये झालेल्या भारतातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांत १२०० हून अधिक लोक जखमी झाले आणि २९६ जणांचा मृत्यू झाला.
२३ ऑगस्ट - मिझोराममधील सैरांगजवळील बैराबी-सैरांग मार्गावरील कुरुंग नदीवरील बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून पश्चिम बंगालमधील किमान ३६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला.
२०२५ मध्ये झालेले रेल्वे अपघात
१५ फेब्रुवारी - २०२५ च्या प्रयाग महाकुंभ मेळ्याला उपस्थित राहण्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी गर्दी झाल्याने गोंधळलेल्या घोषणांमुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत किमान २० जण ठार झाले आणि अनेक जखमी झाले.
देशभरातील रेल्वे दुर्घटना व त्यात झालेली अपरिमित वित्त व मनुष्यहानी लक्षात घेता, देशाचे नेतृत्व संवेदनशील नेत्याकडे वा संघटनेकडे असावे. देशात माणसे रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडोत वा चक्रीवादळात वा महामारीत यांना फक्त सत्ता कशी मिळवायची याचीच काळजी असते. अशा असंवेदनशील सरकारची भारताला खरंच आवश्यकता आहे का?
- प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष