भारताचा वाॅरेन बफे !

स्टोक मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे अनुभवी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी तरुणपणी गुंतवणूक करण्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले.
भारताचा वाॅरेन बफे !

शेअर बाजारात गुंतवणूक हा जुगार समजला जातो. चार दशकांपूर्वी तर कुणीही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचं धाडस करत नव्हतं. अशा वेळी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी राकेश झुनझुनवाला यांनी पाच हजार रुपयांपासून सुरुवात केली. या पैशांपासून ४० हजार कोटी रुपयांचं उत्पन्न कमावणारे राकेश झुनझुनवाला यांची भारताचे ‘वॉरेन बफे’ अशी ओळख बनली. त्यांच्या निधनानं गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला.

स्टोक मार्केटचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे अनुभवी गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी तरुणपणी गुंतवणूक करण्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले. तेव्हा वडिलांनी स्पष्ट नकार दिला. त्यांचे वडील राधेश्यामजी झुनझुनवाला यांनी त्यांना सांगितलं की, तुला गुंतवणूक करायची असेल तर स्वत: कष्ट करून कमव; कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज नाही. काही दिवसांनी राकेश झुनझुनवाला अवघ्या पाच हजार रुपयांसह शेअर बाजारात दाखल झाले. क्वचितच कोणाला माहीत असेल की, आजच्या तारखेला सुमारे ४० हजार कोटींची कमाई करणाऱ्या व्यक्तीने १९८५ मध्ये मुंबईच्या दलाल स्ट्रीटमध्ये केवळ पाच हजार रुपये घेऊन पाऊल ठेवलं होतं. आज त्याच पाच हजार रुपयांच्या जोरावर त्यांनी कोट्यवधींचा व्यवसाय निर्माण केला. अवघ्या काही हजार रुपयांपासून शेअर बाजारात सुरुवात करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी राकेश हे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, वडील राधेश्यामजी यांच्याकडून प्रेरणा घेऊन व्यवसायात उतरलो; पण शेअर बाजारात पैसे गुंतवायचं ठरवलं, तेव्हा वडिलांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या राकेश यांनी सुरुवातीला टाटा समूहाच्या ‘टाटा टी’ या कंपनीतून भरपूर पैसे कमावले. त्या वेळी त्यांनी टाटा टीचे पाच हजार शेअर्स ४३ रुपये दराने विकत घेतले आणि काही दिवसांनी १४३ रुपये दराने विकले. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत खरेदी केले आणि काही दिवसांनी ते महागड्या भावात विकले. त्यांनी काही दिवसांमध्ये कोट्यवधी रुपयांचा नफा कमावला. यानंतर त्यांनी ‘टायटन’मध्ये पैसे गुंतवले. या स्टॉकने त्यांना ‘बिग बुल’ बनवलं. त्यांच्याकडे टायटनचे सुमारे ४.५ कोटी शेअर्स होते, त्याचं मूल्य सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं.

आज भारतातले लाखो लोक झुनझुनवाला यांच्या टिप्समुळे करोडो रुपये कमावत आहेत. ते नेहमी ‘रिस्क’ घेण्याचा सल्ला द्यायचे. शेअर बाजारात मोठे चमत्कार घडू शकतात, असं त्यांचं म्हणणं होतं. भारताचा शेअर बाजार आणि कोट्यवधी गुंतवणूकदार ज्या एका इशाऱ्याची वाट पाहायचे, त्या झुनझुनवाला यांनी मात्र जगाचा निरोप घेतला. अवघ्या पाच हजार रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणुकीची सुरुवात करणाऱ्या या दिग्गज व्यक्तीची सध्याची संपत्ती ४३ हजार कोटींहून अधिक आहे. अनेक नामांकित कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यांनी अलीकडेच ‘आकासा एअरलाइन्स’च्या रूपात एविएशन सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक केली. बहुतेक विमान कंपन्या तोट्यात असताना ही गुंतवणूक झाली आहे. बाजारातले जाणकार याला बालीश गुंतवणूक म्हणत असले तरी झुनझुनवाला या क्षेत्राच्या वेगवान विकासाबद्दल आश्‍वस्त होते. मातीचं सोन्यामध्ये रूपांतर करण्याबाबत ते खात्री बाळगून असत. नवीन गुंतवणूकदारांसाठी त्यांच्या काही टिप्स लाखोंची उलाढाल घडवायच्या. कदाचित, म्हणूनच लाखो लोक त्यांना फॉलो करायचे.

चुकांना कधीही घाबरू नका, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी अनेक निर्णय घ्यावे लागतात. कधी कधी निर्णय चुकीचाही असतो; पण आधीच भीती वाटत असेल तर तुम्ही निर्णय घेऊ शकणार नाही, असं ते सांगायचे. माझ्याकडूनही चुका होतात. कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत सखोल संशोधन केलं पाहिजे. कंपनीचा व्यवसाय, ताळेबंद, त्याचं व्यवस्थापक आणि आगामी योजना याबाबत सखोल संशोधन आवश्यक आहे, असं ते सांगत. झुनझुनवाला नेहमी दीर्घकालीन गुंतवणुकीबद्दल बोलत. शेअर बाजारात टिकून राहायचं असेल तर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा, असं ते नवीन गुंतवणूकदारांना आवर्जून सांगायचे. बाजारात पैसा परिपक्व होण्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे. बाजारात थोडी वाट पाहिली, तर परतावा नक्कीच मिळेल. पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नका, असं ते सांगत. त्यामुळे धोका टळत होता.

झुनझुनवाला यांनी लोकांना नेहमीच उत्तम टिप्स दिल्या. त्यांनी गुंतवणुकीचे काही मूलभूत फंडे आत्मसाद केले होते. ते म्हणायचे की, फक्त छोटी गुंतवणूक उत्तम परताव्याची हमी देते. स्टॉक कमी झाला तर खरेदी करत राहा. त्यामुळे तुमच्या खरेदीची सरासरी कमी होईल. किंमत पाहून कंपनीच्या शेअरमध्ये कधीही गुंतवणूक करू नका. जास्त किमतीचे स्टॉक कदाचित जास्त परतावा देऊ शकत नाहीत. गुंतवणूक करताना शेअरची किंमत नाही तर कंपनीचं मूल्य पाहा, असा त्यांचा लाखमोलाचा सल्ला असे.

झुनझुनवाला यांचं बॉलिवूडशीही चांगलं कनेक्शन होतं. या धमाल इंडस्ट्रीत पैशांची सतत गरज असल्यामुळे इंडस्ट्रीशी संबंधित लोक मोठी गुंतवणूक करतात; मात्र झुनझुनवाला २०१२ मध्ये या उद्योगात आले होते. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘इंग्लिश विंग्लिश’ हा चित्रपट झुनझुनवाला निर्मित होता. त्यामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी होती. २६ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने कमाल केली. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन ७८.५७ कोटी होतं. ‘इंग्लिश-विंग्लिश’नंतर झुनझुनवाला यांनी ‘शमिताभ’ आणि ‘की अॅण्ड का’ या आणखी दोन चित्रपटांची निर्मिती केली. ‘शमिताभ’मध्ये अमिताभ बच्चन, धनुष आणि अक्षरा हसन चमकले. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच वेळी ‘की अॅण्ड का’मध्ये अर्जुन कपूर आणि करिना कपूरची जोडी दिसली होती. जवळपास ५२ कोटींची कमाई करून हा चित्रपट ‘अर्ध हिट’ ठरला होता.

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राकेश झुनझुनवाला हे ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’मध्ये दाखल झाले. त्यांनी १९८५ मध्ये केलेल्या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे २०१८ पर्यंत ११ हजार कोटी रुपये झाले होते. वयाच्या ६२व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या राकेशजींनी गेल्या वर्षी जुलैमध्ये देशातल्या सर्वात स्वस्त विमान प्रवासाची घोषणा केली होती. आधी केलेल्या घोषणेनुसार वर्षभरात त्यांनी ‘आकासा’ ही विमान वाहतूक कंपनी सुरू केली. ७ ऑगस्ट रोजी ‘आकासा’ने मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान पहिलं उड्डाण घेतलं. देशातल्या सर्व भागांमध्ये विमानसेवेचा विस्तार करून सर्वात स्वस्त सेवा देण्याअगोदरच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या कंपनीचं बंगळुरू ते कोची विमानही सुरू झालं. झुनझुनवाला यांनी विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर या उद्योगाचे दिवस बदलतील, अशी अपेक्षा होती. त्यांनी ‘आकासा’च्या विस्ताराची योजना आखली होती. कंपनी १९ ऑगस्टपासून बंगळुरू-मुंबई आणि १५ सप्टेंबरपासून चेन्नई-मुंबईसाठी सेवा सुरू करणार आहे. वचन दिल्याप्रमाणे त्यांनी ‘आकासा’चा प्रवास सर्वात स्वस्त ठेवला. मुंबई-अहमदाबाद मार्गावर बोईंग ७३७ मॅक्स विमानाने ‘आकासा एअर’ची व्यावसायिक उड्डाणं सुरू झाली. ‘आकासा’ने मुंबई-अहमदाबाद मार्गावरील किमान एकेरी प्रवासाचं किमान भाडं ३,९४८ रुपये ठेवलं. या मार्गावर चालणाऱ्या इतर विमान कंपन्यांचं किमान भाडं ४,२६२ रुपयांपासून सुरू होतं. देशभर स्वस्त विमानप्रवासाचं त्यांचं स्वप्न मात्र मागे राहिलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in