भारतीय चलनाचा रंजक इतिहास

भारतीय चलनाच्या उत्क्रांतीचा समृद्ध असा इतिहास आहे. रुपयाच्या महत्त्वासोबत भारतीय चलन कसे विकसित झाले, भारतीय चलनी नोटा आणि नाणी यांचे स्वरूप आवश्यकतेप्रमाणे कसकसे बदलत गेले, याबद्दलची तसेच खराब झालेल्या व फाटलेल्या कागदी बँक नोटा बदलून घेण्याची सोय कशाप्रकरे करण्यात आली आहे याबद्दलची रंजक माहिती या लेखात दिली आहे.
भारतीय चलनाचा रंजक इतिहास
Published on

ग्राहकमंच

सुमिता चितळे

भारतीय चलनाच्या उत्क्रांतीचा समृद्ध असा इतिहास आहे. रुपयाच्या महत्त्वासोबत भारतीय चलन कसे विकसित झाले, भारतीय चलनी नोटा आणि नाणी यांचे स्वरूप आवश्यकतेप्रमाणे कसकसे बदलत गेले, याबद्दलची तसेच खराब झालेल्या व फाटलेल्या कागदी बँक नोटा बदलून घेण्याची सोय कशाप्रकरे करण्यात आली आहे याबद्दलची रंजक माहिती या लेखात दिली आहे.

प्राचीन भारतात इसवी सनापूर्वी ५व्या शतकात विद्वान ऋषीमुनी पाणिनी यांनी प्रथम चलनाला ‘रुप्य’ असे संबोधिले. याचे कारण म्हणजे त्या काळात मौल्यवान धातू म्हणून बहुत करून चांदीची नाणी चलनात असावीत आणि चांदीला संस्कृतमध्ये ‘रौप्य’ म्हणतात. आर्य चाणक्य यांनी लिहिलेल्या ‘कौटिल्य कौटिलीय अर्थशास्त्र’ या ग्रंथातही त्यांनी रुप्यरूप, सुवर्णरूप, ताम्ररूप आणि शिसरूप अशा संज्ञा लिहिल्या आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या रुपी म्हणजे चांदीचे नाणे. पहिले महायुद्ध होण्यापूर्वी जेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते, तेव्हा सुद्धा चांदीचे नाणे चलनात होते. ‘रुप्य’चे रूपांतर कालांतराने ‘रुपया’ असे झाले असावे.

भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत देशाची मध्यवर्ती मुख्य बँक आहे. एक एप्रिल १९३५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया १९३४ ॲक्टच्या तरतुदींनुसार आरबीआयची स्थापना झाली. १९४९ साली झालेल्या राष्ट्रीयीकरणानंतर आरबीआय पूर्णपणे भारत सरकारच्या अखत्यारीत आली. ती आपल्या देशातील सर्व मूल्यांच्या चलनी नोटा आणि नाणी प्रसारित करते.

भारत स्वतंत्र झाल्यावर १९५० साली एक नया पैसा, दोन, पाच, १० पैशांची नाणी प्रसारित केली. यापैकी एक पैशाचे नाणे कास्य धातूचे आणि बाकीची नाणी निकेल या धातूची होती. १९५७ ते १९६७ या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेने एक, दोन, तीन, पाच आणि १० पैशाची अल्युमिनिअमची नाणी चलनात आणली होती. असे करत करत टप्प्याटप्प्याने सर्व नाणी निकेल या धातूची तयार केली गेली. यानंतर १९८८ साली १०, २५, आणि ५० पैशांची स्टेनलेस स्टीलची, तसेच एक व पाच रुपयांची पितळेची नाणी चलनात आली. १९९७ ते २००२ या काळात १०, २५ आणि ५० पैशांची नाणी चलनातून काढली. २००५ ते २००८ या कालावधीत ५० पैशांची व एक, दोन आणि पाच रुपयांची नाणी कमी वजन असलेली आणि लोखंड मिश्रित स्टेनलेस स्टीलची बनलेली नव्याने प्रसारित केली. हे बदल करण्याचे मुख्य कारण म्हणजे पूर्वीची नाणी वितळल्यावर त्या धातूला जेवढी किंमत येईल ती त्या नाण्याच्या दर्शनी किंमतीपेक्षा जास्त होती.

२०१० साली भारत सरकारतर्फे भारतीय रुपयासाठी(चलनासाठी) “₹” हे चिन्ह अधिकृतरीत्या स्वीकारले गेले. २०११ साली सर्व पैशांची नाणी परत घेतली आणि एक, दोन, पाच व १० रुपयांची नवीन ‘₹’ हे चिन्ह असलेली नाणी चलनात आणली. सध्या आपल्याला ५० पैशांची नाणी कमी प्रमाणात दिसतात. त्याऐवजी एक, दोन, पाच, १० आणि २० रुपयांची नाणी मात्र आपल्याला बऱ्याच संख्येने उपलब्ध आहेत. ही सर्व नाणी भारत सरकारच्या मुंबई, हैद्राबाद, कोलकाता आणि नोएडा या चार ठिकाणी असलेल्या टांकसाळीत बनतात. नाण्यांप्रमाणेच भारत स्वतंत्र झाल्यावर काही वर्षांनी नाण्यांप्रमाणेच महात्मा गांधींचे छायाचित्र असलेल्या कागदी नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसारित करायला सुरुवात केली. भारत सरकारने एक रुपयाच्या व आरबीआयने ५,००० आणि १०,००० रुपये मूल्याच्या नोटा प्रसारित केल्या. १९७० मध्ये २० व ५० रुपयाच्या नोटा प्रसारित केल्या आणि १०० रुपयांच्या वरील सर्व नोटा बंद केल्या.

स्वातंत्र्यानंतरचे पहिले निश्चलनीकरण १६ जानेवारी, १९७८ रोजी अमलात आले. तेव्हा रुपये एक हजार, पाच हजार आणि दहा हजारच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. १९८७ मध्ये ५०० रुपयांची आणि २००० साली २,००० रुपयांची नोट प्रसारित केली गेली. त्याआधी १९९५ मध्ये एक व दोन रुपयांच्या नोटा प्रसारित करण्याच्या बंद केल्या.

बँक नोटेचे रेखाटन केंद्रीय प्रशासन आरबीआय रिझर्व बँकेच्या मध्यवर्ती मंडळाच्या अनुमोदनाने मंजूर करते. भारतातील चलनी नोटा या नाशिक, देवास, सल्बोनी, म्हैसूर आणि नर्मदापूरम येथे छापल्या जातात. भारताच्या कागदी चलनी नोटेवर १७ भाषांमध्ये नोटेचे मूल्य छापलेले असते. एक रुपयाच्या नोटेवर अर्थ सचिव यांची सही असते, तर बाकीच्या सर्व नोटांवर रिझर्व बँकेच्या गव्हर्नरची सही असते.

८ नोव्हेंबर २०१६ रोजी रिझर्व बँकेने स्वातंत्र्योत्तर काळातील दुसरी नोटबंदी जाहीर केली आणि ५०० व १,००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करून फक्त ५०० रुपयांच्या व २,००० रुपयांच्या नवीन नोटा प्रसारित केल्या. भारतीय चलनी नोटा आणि नाणी यांचे स्वरूप आवश्यकतेप्रमाणे कसकसे बदलत गेले ते यावरून वाचकांच्या लक्षात येईल.

खराब झालेल्या व फाटलेल्या कागदी बँक नोटा बदलून घेण्याची सोय भारतीय रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शाखांमध्ये केली आहे. यासंबंधी रिझर्व बँकेने दिनांक एक जुलै, २०१९ रोजी एक परिपत्रक काढून नोटा व नाणी कशी बदलावीत, त्याचे निर्देश सर्व बँकांना दिले आहेत.

भारतीय चलनी नोटेवर त्याचे मूल्य कोरलेले असते. जेणेकरून अंध व्यक्तींना नोटेचे मूल्य ओळखणे सोपे जाईल. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी जानेवारी २०२०मध्ये मोबाईल एडेड नोट आयडेंटिफायर - मनी (MANI) हे ॲप्लिकेशन प्रसारित केले. हे ॲप मोबाईलमध्ये एकदा इन्स्टॉल केल्यावर इंटरनेटशिवाय चालते. या ॲपवरून भारतीय नोटेचे मूल्य श्राव्य सूचनेवरून ओळखता येते. त्यामुळे दृष्टिहीन व्यक्तींना सुद्धा भारतीय नोटांचे मूल्य ओळखण्यास मदत होते. ही सूचना हिंदी, इंग्रजी शिवाय ११ भारतीय भाषांत मिळू शकते. ‘मनी’ हे ॲप पूर्णपणे मोफत आहे आणि प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करता येते.

आरबीआय, रिझर्व बँकेचे मुद्रा संग्रहालय मुंबईत फोर्ट येथे आहे. तेथे प्राचीन काळातील बार्टर (एका वस्तूच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूची देवाण घेवाण) विनिमय पद्धतीपासून ते आताच्या काळातील चलनी नाणी, कागदी नोटा आणि आधुनिक काळातील इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केलेले व्यवहार या सर्वांची उत्क्रांती कशी झाली याची माहिती दिली आहे. हे संग्रहालय सर फिरोझशाह मेहता मार्ग, मुंबई -१ येथे आहे. या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांनी आणि जिज्ञासूंनी या संग्रहालयाला अवश्य भेट द्यावी.

mgpshikshan@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in