अंतर्गत दुफळी, फोडाफोडीने भाजप हैराण

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचे पानिपत झाले. विजयाच्या अपेक्षेने जी तोडफोड केली होती, पक्ष पळवले होते ते काहीच कामी आले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

- अरविंद भानुशाली

निवडणूक विशेष

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचे पानिपत झाले. विजयाच्या अपेक्षेने जी तोडफोड केली होती, पक्ष पळवले होते ते काहीच कामी आले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे वेगवेगळ्या मतदारसंघातील राजकीय गणिते जुळली नाहीत. खऱ्या अर्थाने युती झालीच नाही. प्रत्येकाने आपापली खेळी खेळली आणि परस्परांची प्यादी मारली.

लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी आले आणि महाराष्ट्रात भाजपला धोबीपछाड मिळाला. २०१९ मध्ये भाजपने सेनेबरोबर युती केली होती तेव्हा २३ जागा जिंकल्या होत्या, तर २०२४ मध्ये भाजप केवळ ९ जागांवर आला. उत्तर प्रदेश व महाराष्ट्राने ठेंगा दाखविल्याने भाजप स्वबळावर २७२ जागासुद्धा जिंकू शकला नाही. आता एनडीए म्हणून सरकार स्थापन झाले तरी तो २०१९ चा करिष्मा आता उरला नाही. महाराष्ट्रात तर शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे पक्ष फोडल्यानंतरही ते जिंकले. जनतेला भाजपचे पक्ष फोडाफोडीचे राजकारण मुळीच भावले नाही. देवेंद्र फडणवीस यांचाही करिष्मा संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता फडणवीस विरोधक सक्रिय झाल्यास आश्चर्य वाटायला नको. त्याचा मोठा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार यात शंका नाही.

मराठवाड्यात मराठा आंदोलनाचा भाजपला मोठा फटका बसला. जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पराभूत झाले. नांदेडमध्ये काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये आले. त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच झाला. प्रतापराव चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांना टक्कर देऊन २०१४-२०१९ मध्ये विजय मिळवला होता. आता अशोक चव्हाण बरोबर असताना चिखलीकर पराभूत होतात, याचा अर्थ काय? निव्वळ भाजपकडून राज्यसभेची जागा मिळवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये आले का, अशीच चर्चा सुरू आहे. त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस उमेदवारास उघडपणे मदत केली. जालन्यामधून गेले चार ते पाच वेळा रावसाहेब दानवे निवडून येत होते. त्यांनी तर उघडपणे मराठा आंदोलनाचे नेते जरांगे-पाटील यांना पाठिंबा दिला होता. परंतु मराठा समाजाने दानवे यांना मतदान केले नाही हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

या लोकसभा निवडणूक निकालाचा परिणाम राज्य सरकारच्या स्थैर्यावर नक्की होणार. भाजपच्या उमेदवारांना पाडण्याचे उद्योग भाजप पक्षाच्या नेत्यांनी केले असले तरी सत्ताधारी गटाकडून भाजप वाढू नये यासाठी या निवडणुकीत खेळी खेळली आहे. एका मतदारसंघात जिथे भाजप उमेदवार आहे, तेथे तिसरा उमेदवार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समर्थक होता, ही बाब लपून राहिली नाही. आता पराभवाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचे जाहीर करताच त्यांच्या समर्थकांची गर्दी सागर बंगल्यावर झाली आहे. मुळात भाजप प्रदेशमध्ये अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात होता, आहे आणि त्यातूनच हे राजीनामानाट्य घडले आहे. हे राजीनामानाट्य शरद पवारांसारखे होऊ नये एवढी अपेक्षा! भाजपने देशभरात लोकसभेची तयारी गेली वर्ष-दीड वर्ष चालविली होती. मात्र महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज भरेपर्यंत उमेदवार निश्चित नव्हते. २०१९ मध्ये भाजपने सेनेबरोबर युती केली. त्यावेळी जागावाटप २६ + २२ असे होते. यावेळी मात्र तो निकष बाजूला पडला. सर्वात कमी जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाने लढविल्या. प्रारंभी युती करताना चार जागा आम्हाला पाहिजेत असे अजित दादांनी सांगितले, मात्र त्यानंतर भुजबळ यांनी आग्रह धरला. नाशिकच्या जागेसाठी भुजबळ हट्ट धरून बसले आणि शेवटी नाशिकच्या शिवसेनेच्या जागेवर पराभव पत्करावा लागला. कारण राष्ट्रवादीकडून भुजबळांनी सेनेच्या गोडसेंना मदत करण्याऐवजी पाडण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे.

नाशिक पट्ट्यात खान्देशमध्ये भाजपने तीनपैकी दोन जागा जिंकल्या आहेत. तिसरी भामरेंची जागा गेली आहे. खडसे हे राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आले असून त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे या रावेरमधून व चित्रा वाघ या जळगावमधून निवडून आल्या आहेत. येथे खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा वाद आहे. म्हणून तर अधिकृतपणे एकनाथ खडसे हे भाजपमध्ये आलेले नाहीत. भाजपने उमेदवार निवडीचाही घोळ केला. ईशान्य मुंबई हा मतदारसंघ संमिश्र आहे. तिथे निवडून येणारे उमेदवार दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत बदलले जातात. किरीट सोमय्या तिथून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. परंतु २०१४ मध्ये त्यांचा पत्ता कट केला गेला. २०१९ मध्ये मनोज फाटक हे विजयी झाले असतानाही तिथे उमेदवार बदलला आणि हमखास येणारी सीट भाजपला गमवावी लागली.

विदर्भात भाजपचे अक्षरशः पानिपत झाले. नितीन गडकरी हे स्वबळावर निवडून आले, तर अकोल्याची परंपरागत जागा संजय धोत्रे यांच्या मुलाने आपल्याकडे कायम ठेवली. बाकी ९ जागांवर भाजपचा पराभव झाला. दरम्यान, विरोधकांनी आवई उठवली होती की, गडकरींना पराभूत करण्यासाठी फडणवीस, मोदी-शहा यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु निकालानंतर ती आवईच ठरली. नागपूरमधून पाच लाखांच्या वरचे मताधिक्य द्या, असे गडकरी-फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना जाहीर केले होते; परंतु ते मताधिक्य मिळाले नाही. यामागचे गुपित पुढे-मागे स्पष्ट होईल. निवडणुकीपूर्वी माध्यमांनी व काही नेत्यांनी गडकरी हे रा. स्व. संघाच्या मदतीने पंतप्रधानपदी पोहचू शकतात असे म्हटले होते. आता २४० जागा भाजपला मिळाल्यानंतर ते शक्य नाही. परंतु तसे प्रयत्न सुरू होते हे मात्र नक्की! भंडारा-गोंदिया ही जागा भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची. तिथून प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे भाजपमध्ये २०१४ मध्ये निवडून आले होते. ती जागा पराभूत होते. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोकणात नारायण राणे शेवटी प्रभावी ठरले. शिवसेना कोकण हा आपला गड मानत होती. त्यांना राणेंनी प्रभावीपणे शह दिला. राणे यांनी निवडणुकीचे नियोजन हे खूप नियोजनबद्ध ठेवले होते आणि ही भाजपची जमेची बाजू!

ओदिशा हा प्रांत भाजपच्या दृष्टीने मित्र राज्य. यावेळी लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्या गेल्या. तेथे लोकसभाबरोबर विधानसभेतही भाजपने बहुमत मिळवले आणि महाराष्ट्र-उत्तर प्रदेशमध्ये सत्तारूढ असताना मोठ्या प्रमाणात नाराजी बाहेर आली. त्याचा मोठा फटका भाजपला लोकसभेत बसला. ज्या अयोध्येत भव्य राम मंदिर-प्राणप्रतिष्ठा झाली त्या अयोध्येमध्ये भाजप पराभूत व्हावा यापेक्षा दुसरे आश्चर्य ते कोणते? महाराष्ट्रात भाजप अंतर्गत दुफळीने व फोडाफोडीच्या राजकारणाने बदनाम झाला. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत बसला. आता या पराभवाचे कवित्व सुरू होईल. भाजपमधील एक गट आता देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कार्यरत झाला असून त्याला दिल्लीतील एका गटाचा, नेत्यांचा पाठिंबा आहे एवढे निश्चित! भाजपच्या पराभवाची चर्चा सुरूच राहणार असून प्रदेश अध्यक्ष यांचीही गच्छंती होणार हे निश्चित! भाजपने उमेदवार बदलण्याचे नाटक केल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. बीडमध्ये पंकजा मुंडेंची जागा ही जातीय राजकारणातच गेली. मराठा विरुद्ध ओबीसी या फॅक्टरने त्यांचा घात केला.

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आता मोठे बदल होणार आहेत. महाराष्ट्रात तीन पक्षांत जागावाटप होताना झाला तेवढाच त्रास प्रत्येकाची मते दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराकडे वळवताना झाला. शिवसेना-भाजप युती पूर्वीपासून होती. परंतु ती मते काँग्रेसकडे वळविताना दमछाक झाली असणारच. विधान सभेची निवडणूक महाविकास आघाडीला सोपी जाणार, असे म्हटले जात असले तरी ते परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे. साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील. शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना (उबाठा) या दोन्ही गटांनी राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबर युती केल्यानंतर निवडणुकीत तोंड देण्याची ही पहिलीच वेळ होती. जागावाटप करताना भाजपची दमछाक झाली. निवडून येणाऱ्या जागांवर पाणी सोडावे लागले. तीच स्थिती उबाठाची झाली. सांगलीमधून पहेलवान उभा केला त्यांचा निवडणूक अर्ज भरेपर्यंत सेनेचे प्रवक्ते संजय राऊत सांगलीत ठाण मांडून बसले होते; परंतु विशाल पाटील यांनी पहेलवानाबरोबरच भाजपच्या विद्यमान खासदारासही पाणी पाजले. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर व एमआयएमची जादू कुठेही चालली नाही. अकोल्यात यावेळी प्रकाश आंबेडकर एकाच ठिकाणी उभे राहिले होते, ते तेथे तीन नंबरवर गेले. ओवैसी यांच्या पक्षाला मते खाण्याचा उद्योग जमला नाही. उत्तर भारतात मुस्लिमांनी काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या उमेदवारांना भरभरून मते दिली. महाराष्ट्रातही उबाठाकडे मुस्लीम मते वळली. महाराष्ट्रात वंचितमुळे काँग्रेस पक्षाच्या पारंपरिक जागा भाजपकडे गेल्या होत्या. यावेळी वंचितला कुठेही प्रभाव पडत आला नाही. मुंबईतील सहापैकी तीन जागा उबाठा गटाने जिंकल्या असून खऱ्या अर्थाने हा मोठा शह भाजप-शिंदें शिवसेनेला आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तेथे आज तरी उबाठाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपने मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी फिल्डिंग लावली होती; परंतु तीन पक्षांच्या कोंडवाड्यात अडकल्याने भाजप तिसऱ्या नंबरवर गेला आहे. महाविकास आघाडीला राज्यात सत्तेवर येण्याची जास्त संधी आहे. शरद पवारांनी काँग्रेसमध्ये सामील होण्याचे सूतोवाच आधीच केले आहे. त्याप्रमाणे कार्यवाही झाल्यास महाराष्ट्रातील काँग्रेस अधिक मजबूत होईल. त्याप्रमाणे सुप्रिया सुळे यांच्या रूपाने नवीन मुख्यमंत्री काँग्रेसला मिळेल, अशी स्वप्ने रंगवली जात आहेत.

(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in