केजरीवाल यांना साक्षात्कार

मुख्यमंत्री केजरीवाल यांना आता भारताच्या चलनी नोटांवर गणेश आणि लक्ष्मी यांची चित्रे असावीत,असा दृष्टांत झाला.
केजरीवाल यांना साक्षात्कार

दिवाळी संपली असली तरी या दिवाळीच्या निमित्ताने आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मनात हिंदू देवदेवतांबद्दल अचानक कमालीचे प्रेम निर्माण झाले आहे. दिल्लीकर जनतेला फटाक्यांविना दिवाळी साजरी करण्याचे आणि फटाके उडविल्यास कारागृहात डांबण्याचे फर्मान काढणाऱ्या मुख्यमंत्री केजरीवाल यांना आता भारताच्या चलनी नोटांवर गणेश आणि लक्ष्मी यांची चित्रे असावीत,असा दृष्टांत झाला. भारतीय चलनी नोटांवर भगवान गणेश आणि माता लक्ष्मी यांची चित्रे छापण्याबाबत केंद्र सरकारने गंभीरपणे विचार करावा, अशी मागणीवजा सूचना केजरीवाल यांनी केली आहे. ‘आप’चे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आताच ही मागणी का केली, याआधी असा विचार त्यांच्या मनात का आला नाही, या प्रश्नाचे उत्तर साधे आहे. दिली आणि पंजाबमधील सत्ता प्राप्त केल्यानंतर केजरीवाल यांच्या पक्षाचे पुढील लक्ष्य गुजरात आहे. गुजरातमध्ये प्रदीर्घ काळ सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षास पराभूत करून त्तेथे ‘आप’ची सत्ता आणण्याचा त्या पक्षाचा मानस आहे. गुजरातमधील किंवा देशात जेथे भाजपची सरकारे आहेत तेथील सत्ता मिळवायची असेल किंवा आपल्या पक्षाचे अस्तित्व दाखवायचे असेल तर हिंदुत्वाचे कार्ड वापरायला हवे, हा विचार त्यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकार परिषदेत बोलताना, चलनी नोटांच्या एका बाजूस महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूस भगवान गणेश आणि माता लक्ष्मी यांचे चित्र छापता येऊ शकेल, असे केजरीवाल म्हणाले. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तशी विनंती करणारे पत्र लिहिणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गणेश आणि लक्ष्मी यांची चित्रे का असावीत याचे समर्थन करताना केजरीवाल म्हणाले की, आमच्या पाठीशी देवी- देवतांचा आशीर्वाद नसेल तर अनेक वेळा प्रयत्न करूनही यश मिळत नाही. केजरीवाल एवढ्यावरच थांबले नाहीत. त्याही पुढे ते म्हणतात, चलनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मी यांची चित्रे असतील तर आपला देश नक्कीच प्रगती करू शकेल! देशाच्या प्रगतीमध्ये हिंदू - देवदेवता किती महत्वाची भूमिका बजावू शकतात आणि तेही केवळ चलनी नोटांवर देवदेवतांची छायाचित्रे छापल्याने, याचा ‘आत्मसाक्षात्कार’ दिवाळी सणाच्या दरम्यान केजरीवाल यांना झाला! आपला भारत म्हणावी तशी प्रगती का करू शकत नाही, याचे नेमके कारण केजरीवाल यांना समजले! केजरीवाल यांना हा साक्षात्कार आताच व्हावा, याचे कारण स्पष्ट आहे. भाजपच्या हिंदुत्वाची धार बोथट करायची असेल तर आपणही हिंदुत्वाची कास धरायला हवी. तसे केल्यास भाजपचे समर्थक मतदार आपल्यामागे येऊ शकतील, असा केजरीवाल यांचा कयास असावा! केजरीवाल यांनी आपल्या भूमिकेत जो बदल केला त्यामागे आगामी गुजरातमधील निवडणुका आहेत हे स्पष्ट आहे. केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षाने जोरदार टीका केली आहे. केजरीवाल यांनी केलेली मागणी पाहता त्यांचा हिंदू बनण्याचा प्रयत्न असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. तर काँग्रेसने, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि आपण भारतीय घटनेची शपथ घेतली असल्याचा विसर केजरीवाल यांना पडलेला दिसतो, अशी टीका काँग्रेसने केली आहे. संवैधानिक पदावर बसून अशी मागणी करणे, आपल्या स्वार्थासाठी हिंदू देवदेवतांचा वापर करणे त्यांना शोभत नाही. असे प्रकार त्यांनी बंद करावेत, अशी मागणी दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केली आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रता यांनी, केजरीवाल यांची पाखंडी अशी संभावना करून, असली ढोंगबाजी बंद करण्याचा, हिंदू देवदेवतांचा अपमान करणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. निवडणुका आल्या की हिंदू समाजाची मते आपणास मिळावीत यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांकडून विविध मार्ग अवलंबिले जातात हे सर्वविदित आहेच. अरविंद केजरीवाल यांनी जी मागणीवजा सूचना केली आहे ती अशाच प्रकारात मोडणारी म्हणावी लागेल. केजरीवाल यांची ही मागणी पाहता ते आपला हिंदूविरोधी चेहरा लपविण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत असल्याची टीका भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी केली आहे. केजरीवाल यांना खरोखरच असे काही वाटत असेल तर त्यांनी हिंदू देवदेवतांच्या विरुद्ध बोलल्याबद्दल आपल्या पक्षातून माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम आणि ‘आप’चे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इतालिया यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही तिवारी यांनी केली आहे. गुजरात निवडणुका जसजशा जवळ येतील तसे आणखी आत्मसाक्षात्कार कोणत्या नेत्यांना आणि पक्षांना होतात ते पाहायचे!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in