

महाराष्ट्रनामा
गिरीश चित्रे
भाजपबरोबर दोन हात करत असतानाच, पक्षांतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांची शिवसेना अस्वस्थ झाली आहे. त्यामुळे हा सत्तासंघर्ष आगामी काळात कसे वळण घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ज्या शिलेदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत जबर धक्का दिला, तेच शिलेदार आता एकनाथ शिंदे यांच्यासाठी घातक ठरतायत की काय, अशी भीती राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. आधीच भाजपकडून एकनाथ शिंदे यांची कोंडी होत असतानाच आता विश्वासू शिलेदारच शिंदे यांच्या विरोधात बंड पुकारणार, अशी राजकीयदृष्ट्या अगदी नाजूक परिस्थिती शिवसेनेत निर्माण झाली आहे. भाजपबरोबर दोन हात करत असतानाच, त्यात पक्षांतर्गत संघर्ष वाढीस लागल्यामुळे सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि भाजपशी जवळीक साधली. ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करणे, भाजपशी हातमिळवणी करणे यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जबर धक्का दिला आणि देशातील राजकारणात शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू अर्थातच महाराष्ट्र होता.
एकनाथ शिंदे यांचा सूरत-गुवाहाटी-गोवा असा राजकीय प्रवास सुरू झाला. या राजकीय प्रवासात उदय सामंत, दीपक केसरकर, शहाजी बापू, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक असे दिग्गज नेते शिंदेंच्या सोबतीला होते. ठाकरेंच्या ४० नेत्यांना बरोबर घेत एकनाथ शिंदे यांनी नव्या राजकीय इनिंगला सुरुवात केली. स्वतःची शिवसेना स्थापन केली, पक्ष-चिन्ह या दोन्ही गोष्टी निवडणूक आयोगाने शिंदे सेनेला बहाल केले. संघर्ष करत एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत भाजपच्या मदतीने राज्यात सत्तापालट केला आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हे त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पचनी पडले नसावे. त्यामुळे आडमार्गाने एकनाथ शिंदे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न झाला असावा. त्यातूनच एकनाथ शिंदे विरुद्ध फडणवीस असा वाद हळुवार समोर येऊ लागला. दुसरीकडे मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिंदेंच्या शिलेदारांनी खदखद व्यक्त करण्यास सुरुवात केली. एकीकडे भाजपकडून नाक दाबण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे आपल्याच शिलेदारांची वाढती नाराजी, यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत संघर्ष वाढत असून भविष्यात हा संघर्ष पेटणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. महायुती सरकारच्या स्थापनेनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सत्तेचा गोडवा अनुभवत असली, तरी पक्षांतर्गत नाराजी आणि विरोधाची धार तीव्र होत चालली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून सत्ता हस्तगत केली, तेव्हा त्यांच्याकडे मोठ्या संख्येने आमदारांचा पाठिंबा होता. परंतु सत्ता टिकवण्यासाठी केलेल्या भाजपवरील अवलंबित्वामुळे शिवसेना शिंदे गटाची स्वतंत्र ओळख धूसर होत चालली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खरी शिवसेना म्हणून आपण समोर आलो, पण प्रत्यक्षात भाजपच्या धोरणांना अनुसरून चालण्याशिवाय आता शिंदे सेनेकडे पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेची मूळ शैली, लढाऊपणा आणि स्वबळावर राजकारण करण्याची प्रतिमा कमकुवत होत चालली आहे. एकीकडे पक्ष चिन्ह यावरचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शीतयुद्ध आणि पक्षातील नेत्यांची नाराजी यामुळे एकनाथ शिंदेंची चहुबाजूंनी नाकाबंदी झाली, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
मंत्रिपदे, संस्थांच्या नियुक्त्या, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यांमध्ये अनेक जणांना अपेक्षित स्थान न मिळाल्याने नाराजी वाढत आहे. त्यात स्थानिक पातळीवर भाजप आपली संघटना अधिक मजबूत करत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना शिंदे गटातील आमदारांना स्वतःची जागा टिकवण्यासाठी भाजपकडे झुकावे लागत आहे. त्यात ठाकरेंच्या शिवसेनेशी सुरू असलेला संघर्ष, भाजपबरोबरील शीतयुद्धामुळे शिंदेंच्या शिवसेनेला सावध भूमिका घ्यावी लागत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी सध्याचे आव्हान म्हणजे अंतर्गत विरोध शमवणे, कार्यकर्त्यांशी संवाद, संघटनात्मक सुधारणा आणि स्वतंत्र ओळख मजबूत करणे हे आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाची खरी परीक्षा ठरणार आहे. कारण सत्ता मिळवणे जितके कठीण तितकेच ती टिकवण्यासाठी पक्षातील ऐक्य आवश्यक आहे आणि तेच आज शिंदे यांच्या शिवसेनेत सर्वाधिक डळमळीत झालेले दिसून येते.
महाराष्ट्रातील सत्तेचा राजकीय पट सतत बदलत असताना महायुतीतील तीन प्रमुख घटक - एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस - यांच्यातील नातेसंबंध दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहेत. एकत्रितपणे सत्ता उपभोगत असताना सार्वजनिकरीत्या उमटणारे वाद, टोला-टिप्पण्या आणि परस्परांवरील नाराजी, विशेषतः शिवसेनेत वाढत चाललेली अस्वस्थता, हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चिंताजनक आहे. भाजपच्या नेत्यांकडून झालेली प्रसंगी टीका, महत्त्वाच्या निर्णयांत शिवसेनेची मागे पडलेली भूमिका, तसेच मंत्रिमंडळात अपेक्षित तितकी प्रतिष्ठा न मिळाल्याच्या चर्चा, यामुळे शिवसेनेतील खासदार‐आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. “सत्तेत आहोत, पण निर्णय कुठे आपल्या हातात आहेत?” असा सूर आळवला जात आहे. महायुतीतल्या या अंतर्गत संघर्षाची सार्वजनिक झलक नुकत्याच झालेल्या सभांमध्येही दिसली, जिथे शिवसेना आणि भाजप नेत्यांत टोलेबाजी उफाळून आली. त्यात शिवसेनेचे अनेक नेते भाजपशी जवळीक साधून आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वतःची शिवसेना स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना आता आपलेच शिलेदार नवी खेळी खेळतील आणि शिवसेना एकाकी पडेल, अशी भीती सतावणे स्वाभाविक आहे.
महायुतीतील तणाव लगेच वाढणार नाही, पण तो वाढत गेला तर आगामी निवडणुकीत त्याची मोठी राजकीय किंमत महायुतीला मोजावी लागू शकते. सत्तेची एकजूट टिकवण्यासाठी परस्परांतील मतभेद सोडवणे, निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे आणि सर्व घटक पक्षांना समान प्रतिष्ठा देणे आवश्यक ठरणार आहे. त्यात जानेवारी २०२६ मध्ये पक्ष व चिन्ह याचा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय असेल हे गुलदस्त्यात असले तरी तुम्ही-आम्ही समजू शकतो. तरीही निकाल शिंदेंच्या शिवसेनेविरोधात गेला तर मात्र शिवसेनेला भाजपमध्ये विलीन होणे हाच पर्याय राहील. एकीकडे भाजपशी शीतयुद्ध, पक्षांतर्गत वादावादी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार यामुळे शिवसेना अस्वस्थ झाली आहे, हेही तितकेच खरे.
gchitre4@gmail.com