गुंतवणूक आणि संपत्तीची निर्मिती; पी.व्ही.सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत ( भाग ३ )

प्रत्येकाला आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्या सारख्याच नसतात.
गुंतवणूक आणि संपत्तीची निर्मिती; पी.व्ही.सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत ( भाग ३ )

आपली खर्च करण्याची पद्धत बदलूनही आपण बरीच बचत करू शकतो याबद्दल काय सांगाल?

- हे तुमच्याशिवाय कोणी ठरवू शकत नाही. तुम्ही तरुण असाल आणि कोणतीही जबाबदारी नसेल तर अधिक पैसे वाचवू शकाल. आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करू शकाल. तेव्हा या वयात अधिकाधिक शिल्लक कशी राहील यावर लक्ष केंद्रित करा. जर निवृत्तीच्या जवळ आला असाल तर उपलब्ध साधनातून अधिकाधिक परतावा कसा मिळवू शकतो याचा विचार करा. हे सुद्धा व्यक्तीसापेक्ष आहे. प्रत्येकाला आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्या सारख्याच नसतात.

आजकाल घोटाळे वाढत आहेत अशा परिस्थितीत चांगला सल्लागार कसा शोधावा?

- घोटाळे, फसवणूक, गैरव्यवहार आधीही होत होते, आताही होतात. फक्त आता ते जास्त रंगवून सांगितले जातात. या गोष्टी ताबडतोब फ्लॅश होतात, जगभर पसरतात. त्याला मीठ मसाला लावला जातो. त्याला कधी कधी जातीय रंगही दिला जातो. नकारात्मक गोष्टी पटकन मनाची पकड घेतात. त्याच गोष्टी वारंवार फॉरवर्ड केल्या जातात. अनेकदा अनेकांकडून पुनः पुन्हा त्या आपल्याकडे येत राहतात. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करावं. तरीही एखादी कंपनी/एखादा फंड संशयास्पद वाटत असेल तर त्यातून बाहेर पडावं. आपल्या बाबतीत असं होणारच नाही का हे सांगता यायचं नाही. फ्रेंक्लीन, अक्सिसमध्ये काही घोटाळे झाले, जे झालं ते निश्चित चांगलं झालं म्हणता येणार नाही. पण याचा अर्थ गुंतवणूकदारांचे सर्व पैसे घेऊन फंड मॅनेजर पळाले असा नाही. आपल्याला या बातम्यांनी ताण येत असल्यास बातम्या पाहू नका, समाज माध्यमापासून दूर राहा. नकारात्मक गोष्टीपासून दूर राहिलात की आपोआपच सर्व सकारात्मक होईल.

शेअर आणि म्युच्युअल फंड याशिवाय अजून असे काही गुंतवणूक प्रकार आहेत का ज्यात गुंतवणूक केली जावी?

- असे अनेक पर्याय आहेत, पण त्यात खूप गुंतवणूक करावी लागेल. तुलनेत त्यातून फार परतावा मिळणार नाही. त्यामुळे ते सामान्य लोकांसाठी नाहीत. भरपूर संपत्ती असल्यास तुम्ही अनेक घरं घेऊ शकता, त्यांची देखभाल करू शकता, परतावा मिळण्यासाठी अति दीर्घकाळ थांबू शकता. यासाठी खूप मोठी रक्कम लागते, जी आपल्याकडे नसते. तेव्हा एसआयपी करणे/वाढवणे, संयम बाळगणे, शांत राहणे हेच आपल्यापुढे असलेले पर्याय आहेत.

गुंतवणूक कधीही करावी असं म्हणतात. तसंच ती काढून कधी घ्यायची याबद्दलची एखादी योजना आपण सांगू शकाल का?

- माझे यासंबंधीचे विचार वेगळे आहेत. अशी काही योजना मुळात असावी असे मला वाटत नाही. काही गुंतवणूक विशिष्ट उद्देशाने केलेली असते ती चालूच ठेवावी, बंद करू नये. या उद्दिष्ट ठेवलेल्या गरजा पूर्ण करणारा फंड वगळून बाजार चांगला आहे, मिळणारा परतावा उत्तम आहे. अशा परिस्थितीत काही पैसे काढून घेऊन आपल्या सुप्त इच्छा जसे वर्ल्ड टूर, मोठा स्क्रीन असलेला टीव्ही अशांसाठी खर्च करावेत म्हणजे घरच्यांचंही समाधान होईल आणि खात्री होते की यातून काहीतरी मिळतंय. फक्त असं करत असताना आपण फक्तच चैन करतोय असं होणार नाही, याची काळजी घ्यावी. आर्थिक अडचणीत येऊ किंवा कोणी आजारी पडलंय यासाठी आपले पैसे काढण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. यामुळे गुंतवणुकीचे मूळ उद्देश सफल होत नाहीत. यासाठी आपल्याकडे इमर्जन्सी फंड हवा, मेडिकल इन्शुरन्स हवा.

म्युच्युअल फंड गुंतवणूक थेट करावी की मध्यस्थाची मदत घेऊन?

- जर तुम्ही या गोष्टी स्वतः करता येत असतील तर करू शकता. तुम्ही गावी चालला आहात आणि जर तुम्ही फिट असाल तर आपली बॅग प्लॅटफॉर्मवरून स्वतः घेऊन जाऊ शकता, पण समजा तुम्ही ते करण्यास सक्षम नाही असं वाटतंय तर तुम्ही अन्य कोणाची मदत घेऊ शकता. अगदी तसंच आहे हे. त्यासाठी फार खर्च करावा लागत नाही. प्रत्येक वेळी सल्लागाराची जरूर असते असंही नाही. जेव्हा जरूर असेल तेव्हा सल्लागाराची मदत घ्यावी. तुमचा सल्लागार तुमच्यासाठी काय करतो, तो तुम्हाला कसं मार्गदर्शन करतो, तुमचा गुंतवणूक संच यथायोग्य बनवून देऊन तुमचा जीवन विमा, आरोग्य विमा, कर-देयता याची काळजी घेतो का? या सर्वांवर याचे उत्तर अवलंबून आहे.

असा एक प्रश्न आहे की, आम्ही मुंबईत स्वतःसाठी एक बीएचके घर घेऊ इच्छितो. आमच्याकडे डाऊन पेमेंट देण्यासाठी पैसे नाहीत अशा परिस्थितीत आम्ही आमची गुंतवणूक मोडू का?

- नाही, तुमच्याकडे डाऊन पेमेंट देण्यास पैसे नसतील तर घर घेण्याचा विचारही करू नका. माझी यासंबंधी निश्चित अशी मतं आहेत.

तुमच्या उभयतांच्या (नवरा-बायको) वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट रकमेचे घर घ्या.

तुमच्याकडे घराच्या किमतीच्या ४० टक्के रक्कम स्वत:कडे तयार असायला हवी.

गृहकर्ज २० वर्षांहून अधिक कालावधीचे नको.

सर्व प्रकारच्या कर्जाचा एकत्रित र्इएमआय कापून जाऊन हातात येणाऱ्या मासिक प्राप्तीच्या ३० टक्केहून अधिक नको.

हे चारही निकष पूर्ण होत असतील तेव्हाच घर घेण्याचा विचार आपण करा अन्यथा भाड्याने राहा.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in