इराण-पाक हल्ले आणि शिया-सुन्नी संघर्ष

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दोन वर्षे झाली, तरी थांबलेले नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेले हमास आणि इस्रायलमधील संघर्ष अजूनही थांबायला तयार नाही.
इराण-पाक हल्ले आणि शिया-सुन्नी संघर्ष

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे

विश्वसंचार

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दोन वर्षे झाली, तरी थांबलेले नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेले हमास आणि इस्रायलमधील संघर्ष अजूनही थांबायला तयार नाही. अशात इराणने अगोदर पाकिस्तानवर केलेले सर्जिकल स्ट्राइक आणि त्याला पाकिस्तानने दिलेले प्रत्युत्तर, यामुळे या दोन देशांमध्ये संघर्ष पेटतो की काय अशी भीती निर्माण झाली. दोन्ही देशांमधले ताजे वैर आणखी वाढणार तर नाही?

इराण आणि पाकिस्तान हे दोन देश मुस्लीम असले, तरी त्यांच्यात कायम छुपा संघर्ष असतो. अमेरिका पाकिस्तान आणि सौदी अरेबियाचा मित्र असताना इराण या दोन्ही देशांविरोधात होता. इराण आणि पाकिस्तानला सध्या कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. दोन वर्षांपूर्वी तालिबान पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळे अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेल्या या दोन्ही देशांसाठी अडचणी वाढल्या. एवढेच नाही, तर इराकच्या पश्चिम सीमेवरही इराणला सतत अडचणींचा सामना करावा लागतो. पाकिस्तानला पूर्व सीमेवर कमी आव्हाने नाहीत. पाकिस्तानची पूर्व सीमा भारताला लागून आहे. पाकिस्तान आणि इराणला इतर अनेक क्षेत्रांमध्येही गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर इराणने मागील आठवड्यामध्ये पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल केलेला हल्ला या घटनांमुळे या दोन मुस्लीम राष्ट्रांमधला तणाव जगाला ओढतो की काय, अशी शंका यायला लागली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर इराणमध्ये असताना आणि इराण तसेच पाकिस्तानचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी एकमेकांना भेटून बैठका घेत असतानाच इराणने सर्जिकल स्ट्राइक केला. हल्ल्याच्या एक दिवस आधी इराणच्या राष्ट्रपतींचे विशेष दूत आणि अफगाणिस्तानमधील इराणचे राजदूत हसन काझेमी-कोमी यांनी इस्लामाबादच्या अधिकृत भेटीदरम्यान पाकिस्तानी अधिकाऱ्यांची भेट घेऊन शांतता आणि स्थैर्यासाठी एक प्रादेशिक संपर्क गट तयार करण्याचे मान्य केले. त्यामुळे हल्ल्याबद्दल सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.

पाकिस्तानमधील ‘जैश-अल-अदल’ या अतिरेकी गटाच्या स्थानांवर इराणने सर्जिकल स्ट्राइक केला असता इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दुल्लाहियान यांनी पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल-हक यांची भेट घेतली. ही भेट दावोस येथे आयोजित वार्षिक ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्ये झाली. या बैठकीत इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दहशतवाद हा दोन्ही देशांसाठी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असल्याचे वर्णन केले आणि या संदर्भात दोघांमध्ये आधीच झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला गेला. ताज्या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमध्ये गंभीर राजकीय तणाव निर्माण झाला; मात्र सिस्तान आणि बलुचिस्तानच्या भागात सरकारविरोधी संघटनांच्या सततच्या कारवाया आणि इराणमध्ये नुकताच झालेला आत्मघातकी हल्ला हे हल्ल्यामागील प्रमुख कारण असू शकते, असा अंदाज बांधणे अवघड नाही. या संघटनांच्या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्कराचे मोठे नुकसान झाले. ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी इराणच्या दक्षिणेला असलेल्या कैरमानमध्ये बॉम्बस्फोट झाला. त्यात मोठ्या संख्येने लोकांचे प्राण गेले. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असली तरी इराण या हल्ल्यामागे इस्रायलला मुख्य शक्ती मानतो. हा गट देशाच्या सीमेला लागून असलेल्या भागात सक्रिय असल्याचे काही इराणी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इराणने स्फोटासाठी इस्रायलकडे बोट दाखवले होते.

इराण आपल्या सीमावर्ती भागात इस्लामिक रिपब्लिकच्या कायद्याच्या अंमलबजावणी दलाचे सैन्य तैनात करतो; पण २०१४ पासून त्यांनी सिस्तान आणि बलुचिस्तानमध्ये येणाऱ्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेच्या मोठ्या भागाच्या संरक्षणाची जबाबदारी ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड’कडे सोपवली आहे. सीमेवरील हा अंदाजे ३०० किलोमीटर लांबीचा भाग अत्यंत संवेदनशील आहे. हा भाग इराणला शेजारील पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशी जोडतो. अलीकडच्या काळात चीन हा पाकिस्तान आणि इराण या दोन्ही देशांचा मित्र आहे. या संपूर्ण प्रकरणावर भारताची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली गेली. पाकिस्तानमधील कथित दहशतवादी तळांवर झालेल्या हल्ल्याचे भारताने समर्थन केले. भारताने याला स्वसंरक्षणार्थ उचललेले पाऊल म्हटले. हा इराण आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्न आहे; परंतु दहशतवादाबाबत भारताची भूमिकादेखील कोणत्याही प्रकारे तडजोड करणारी नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इराकमधील कुर्दिश भागात आणि सीरियामध्ये इराणने केलेल्या हल्ल्याबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काहीही म्हटलेले नाही. हे तिन्ही हल्ले एकाच दिवशी झाले. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव लवकरच भारत दौऱ्यावर येणार असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. यावरून इराण आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंध वाढत असून इराणला चीनच्या कह्यातून सोडवण्याचे भारताचे प्रयत्न दिसून येत आहेत. अर्थात भारताने इराणच्या अन्य हल्ल्यांचे समर्थन केलेले नाही. गाझामधील इस्रायलचे युद्ध, येमेनमधील हौथी बंडखोरांवर केलेला हल्ला आणि लाल समुद्रामधील जहाजांवर हौथी बंडखोरांनी केलेला हल्ला यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असताना भारताने इराणला पाठिंबा दिला. याद्वारे भारताने बालाकोट हवाई हल्ल्याचे समर्थन केले. २०१९ मध्ये बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला होता. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध संपुष्टात आले होते. बलुचिस्तानने कायम भारताची मदत मागितली. त्याला स्वतंत्र व्हायचे आहे. पाकिस्तानला ते खुपते आहे; परंतु बलुचिस्तानातील नैसर्गिक संपत्ती चीनच्या हवाली करायची आणि तिथल्या विकासकामांकडे दुर्लक्ष करायचे या पाकिस्तानी नीतीमुळे हा भाग विकासापासून कोसोदूर आहे. त्यामुळे तिथे दहशतवादाला पोषक वातावरण तयार झाले आहे. पाकिस्तान हा सुन्नी बहुसंख्य देश आहे. इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केलेल्या जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेचा सुन्नी सलाफी दहशतवादी गटाशी संबंध आहे आणि त्याचे इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादशी घनिष्ठ संबंध आहेत. इराणमध्ये बहुतांश शिया मुस्लीम आहेत. त्याने सुन्नीबहुल सीरियावरही हल्ले केले आहेत. इराकशी त्यांचे जुने वैर आहे. तिथल्या मोसादच्या तळांना लक्ष्य करत इराणने कुर्दिस्तानवरही क्षेपणास्त्रे डागली आहेत. शिया आणि सुन्नी यांच्यातील वैर हे इस्लामच्या सर्वात प्राणघातक आणि जुन्या संघर्षांपैकी एक आहे. दोन्ही समुदाय कुराण आणि शरियतवर विश्वास ठेवत असले तरी प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल त्यांची मते भिन्न आहेत. पाच देशांमधील मुस्लीम लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक शिया आहेत. यामध्ये इराणमध्ये ९० ते ९५ टक्के लोक शिया पंथाचे अनुसरण करतात. याउलट, पाकिस्तानमधील ९० ते ९५ टक्क्यांहून अधिक मुस्लीम सुन्नी आहेत. त्यातून हा संघर्ष सुरू असतो.

logo
marathi.freepressjournal.in