
- महाराष्ट्रनामा
- गिरीश चित्रे
“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” ही तत्त्वज्ञानी उक्ती आज केवळ घोषवाक्यापुरतीच उरली आहे का, असा प्रश्न पडतो. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे वैद्यकीय व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ही घटना केवळ एका रुग्णालयापुरती सीमित नाही; तर ही संपूर्ण आरोग्य व्यवस्थेतील बेजबाबदारी, असंवेदनशीलता आणि खासगीकरणाच्या विळख्याची दाहक जाणीव करून देते.
‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ हे शब्द आता ऐकीवातच चांगले वाटतात. ‘खिशात पैसा तरच उपचार’ असा कारभार बहुतांश सगळ्याच रुग्णालयांत सर्रास सुरू आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला पैसे भरा तरच दाखल करून घेणार, असा प्रकार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडला. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे महिलेला जीव गमवावा लागला, अशी संतापजनक घटना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली.
पैशांअभावी उपचारास नकार ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील पहिलीच घटना आहे असे नाही, तर पैशांअभावी उपचारास नकार दिल्याच्या घटना याआधी देखील उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे रुग्ण सेवेच्या नावाखाली ‘आरोग्याचा बाजारच मांडला’ आहे.
सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या धर्मादाय नोंदणी असलेल्या रुग्णालयातच रुग्णसेवेला तडा गेला आहे. गर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली. ‘एका गर्भवती महिलेला उपचारासाठी दाखल करण्याआधी १० लाख रुपये भरा, त्यानंतर दाखल केले जाईल’, असा संतापजनक प्रकार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडला. वेदना सहन होत नसल्याने महिलेला प्रसूतीसाठी अन्य रुग्णालयात दाखल केले; मात्र महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आणि महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश जारी केले. चौकशी होणार, लहान माशांवर कारवाई होणार, काही दिवसांनी सगळे काही शांत आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा कारभार पुन्हा सुरळीत सुरू होणार; मात्र त्या दोन जुळ्या मुलींची काय चूक? आईने जन्म दिला आणि आईचे तोंड बघण्याचे सुख मुलींच्या आयुष्यात नाही! ही खंत आयुष्यभर त्या दोन्ही मुलींच्या मनात घर करून राहणार.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर राज्यातील राज्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत यापुढे असा प्रकार घडणार नाही, यासाठी कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे, अन्यथा अशा घटना घडणार, चौकशीचे आदेश पारित होणार आणि निष्पाप लोकांचा जीव जाणार. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर योग्य उपचार करणे रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी असून, रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी कठोर कायदा अंमलात आणणे गरजेचे आहे, अन्यथा पैशांसाठी रुग्णांचा जीव कवडीमोलाचा, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर सेंटरमध्ये अग्निभडका उडाला आणि १० निष्पाप चिमुकल्यांचा जीव गेला. भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये अग्निभडका उडाला आणि ११ निष्पाप लोकांचा बळी गेला. या घटनेनंतर चौकशीचे आदेश, काही दिवस ओरड नंतर सगळं शांत. खासगी रुग्णालय असो वा सरकारी रुग्णालय; रुग्णालयात घडणारे असे धक्कादायक प्रकार यामुळे वैद्यकीय व्यवस्थेवर आणि सुविधांवर प्रश्न चिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
रुग्णालयात घटना घडली की, चौकशी समिती स्थापन, दोषींवर कारवाई असा सगळा घटनाक्रम बघायला मिळतो. परंतु भविष्यात अशी घटना होऊ नये यासाठी वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेत्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे, अन्यथा काही बेजबाबदार आणि असंवेदशील रुग्णालयांमुळे अशा घटना वारंवार घडतच राहणार, हेही तितकेच खरे.
राज्यात विश्वस्त रुग्णालयांसाठी भूखंड देताना रुग्णालयातील ३९ टक्के खाटा (बेड) हे गरीब रुग्णांसाठी आरक्षित करण्याची अट घालण्यात आली आहे; मात्र ज्यावेळी लोकप्रतिनिधी गरीब रुग्णांसाठी या खाटा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयांकडे संपर्क करतात, त्यावेळी खाटा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते, असा अनुभव लोकप्रतिनिधींना आला आहे. त्याचबरोबर आरक्षित जागांवर बोगस रुग्ण दाखवून सरकारकडून खासगी रुग्णालये पैसे उकळतात. त्यामुळे धर्मदाय रुग्णालयावर नियंत्रण आणणे काळजी गरज बनली आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातून येणाऱ्या नकारात्मक आणि दुःखद घटना नित्याच्या होणे, हे आरोग्य व्यवस्थेचे अपयशच. महाराष्ट्रात नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथे सरकारी रुग्णालयांत घडलेल्या मृत्यू तांडवामुळे देशाला हेलावून टाकले. नांदेडमध्ये १६ नवजात बाळांसह ३१ जणांचा मृत्यू होणे, ही सामान्य घटना नाही.
राज्यातील बहुतांश शासकीय रुग्णालयांमध्ये हीच स्थिती आहे. सर्व शासकीय रुग्णालयांतील कमतरता दूर करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. रिक्त पदे भरणे, पुरेसा औषधसाठा उपलब्ध करणे, रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांबरोबर संयमाने वागणे याचे धडे देणे यावर राज्य सरकारने लक्ष केंद्रित करणे काळाची गरज बनली आहे.
खासगीकरणावर लगाम!
राज्यातील सरकारी रुग्णालयात योग्य उपचार पद्धती यामुळे रुग्ण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात; मात्र सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रिक्त पदे यामुळे रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. सरकारी रुग्णालये अधिक सक्षम करणे, रिक्त पदे भरणे यावर जोर देणे गरजेचे असताना खासगी कंत्राटदाराच्या हाती सरकारी रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. खासगी सुरक्षारक्षक, कंत्राटी कामगार यामुळे सरकारी रुग्णालयाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात रिक्त पदे कायमस्वरूपी भरणे यावर लक्ष केंद्रित करत खासगीकरणावर लगाम घालणे काळाची गरज बनली आहे.
gchitre4@gmail.com