समाजमन मरणपंथाला लागलेय का?

किमान मृत्यूनंतर तरी आपल्याला न्याय मिळेल या भाबड्या आशेने ज्या कोवळ्या जीवाने तळहातावर ज्यांच्या पापाचा हिशेब मांडत आपला जीव सोडला, तेच आता तिच्या निस्तेज देहाच्या चिंधड्या करत आहेत.
समाजमन मरणपंथाला लागलेय का?
Published on

कोर्टाच्या आवारातून

ॲड. विवेक ठाकरे

किमान मृत्यूनंतर तरी आपल्याला न्याय मिळेल या भाबड्या आशेने ज्या कोवळ्या जीवाने तळहातावर ज्यांच्या पापाचा हिशेब मांडत आपला जीव सोडला, तेच आता तिच्या निस्तेज देहाच्या चिंधड्या करत आहेत.

गेले काही दिवस फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने महाराष्ट्राचे राजकीय-सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. बीडसारख्या ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख बनलेल्या प्रदेशातून एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर एमबीबीएसचे शिक्षण घेते आणि सातारा जिल्ह्यातील फलटणसारख्या प्रस्थापित जिल्ह्यात शल्यचिकित्सक म्हणून रूजू होते ही छोटी गोष्ट नाही. पण हीच गोष्ट तिच्या मृत्यूचे कारण बनेल हे प्रत्यक्ष त्या डॉक्टरला किंवा तिच्या आप्तस्वकियांना माहीत नव्हते. पण हेच सत्य आहे. सचोटीने सेवाधर्म निभावताना तिला आपला जीव गमवावा लागला. मात्र मृत्यूनंतरही तिचे शुक्लकाष्ठ संपायला तयार नाही. किमान मृत्यूनंतर तरी आपल्याला न्याय मिळेल या भाबड्या आशेने ज्या कोवळ्या जीवाने तळहातावर ज्यांच्या पापाचा हिशेब मांडत आपला जीव सोडला तेच तिच्या निस्तेज देहाच्या चिंधड्या करत आहेत.

काय आहे हे आत्महत्या प्रकरण

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक या गावातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील ही डॉक्टर तरुणी दोन वर्षांपूर्वी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू झाली होती. कामामध्ये ती अतिशय तत्पर, प्रामाणिक व वक्तशीर होती, असे तिचे सहकारी सांगतात. तिच्या कार्यकाळात एकाही रुग्णाने रुग्णसेवेबद्दल तक्रार केली नव्हती ही तिच्या कामाची पोचपावती होती. मात्र हाच तिचा प्रामाणिकपणा व्यवस्थेच्या आड येत होता. तिच्यावर रुग्ण तपासणीबरोबरच शवविच्छेदनाचीही जबाबदारी होती. अनेक वेळा पोलिसांनी आणलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून फिट-अनफिट रिपोर्ट द्यावे लागत असत. मात्र बऱ्याच वेळा आरोपींची तब्येत ठीक नसतानाही फिट रिपोर्ट द्यावे म्हणून पोलीस डॉक्टरांवर दबाव टाकत असत. मात्र डॉक्टर योग्य तोच रिपोर्ट देत असल्याने पोलिसांची अडचण होत असे. त्यात माजी खासदाराकडून व पीएकडून सोईचे रिपोर्ट मिळण्यासाठीही दबाव टाकला जात होता. तसेच रात्री-अपरात्री आणलेल्या मृतदेहावर तातडीने पोस्टमॉर्टेम करण्यासाठी व रिपोर्टसाठी दबाव टाकत असत. रात्री उशिरा पोस्टमाॅर्टेम करणे योग्य नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. यातून डॉक्टर व पोलिसांमध्ये संघर्ष सुरू होता. याविषयी जून व ऑगस्ट २०२५ मध्ये डॉक्टरांनी आपला छळ होत असल्यामुळे डीवायएसकडे तक्रार केली होती. मात्र कारवाई होत नसल्याने त्यांनी माहितीच्या अधिकाराखालीही माहिती मागवली होती. तरीही सहकार्य मिळत नसल्याने अखेर त्यांनी चार पानांचा तक्रार अर्ज सातारा जिल्हा शल्य चिकित्सकांना केला होता. इतके होऊनही डॉक्टरांना तपासात कुठलेही सहकार्य मिळाले नाही. उलट पोलिसांनी केलेल्या तोंडी तक्रारीवर जिल्हा शल्य चिकित्सकांनी डॉक्टरांकडूनच खुलासा मागवला होता व हे प्रकरण मिटवायला सांगितले. या सगळ्या प्रकरणात न्याय मिळत नसल्याने त्या प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या. त्यातच त्या राहात असलेली खोली घरमालकाने लॉक लावून बंद केली. त्यामुळेच डॉक्टरांना मध्यरात्री दीड वाजता हॉटेलचा आश्रय घावा लागला. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी केली.

यंत्रणाच आरोपीच्या पिंजऱ्यात

ऐन दिवाळीच्या दिवशी सगळीकडे आनंदोत्सव साजरा होत असताना या हुरहुन्नरी-लढवय्या डॉक्टरने आत्महत्या करणे जितके धक्कादायक आहे, तितकेच संशयाला वाव देणारे आहे. हॉटेलमालकाच्या म्हणण्यानुसार, डॉक्टर तरुणीने बारामतीला जायला उशीर झाल्याने रात्री दीड वाजता येऊन हॉटेलमध्ये रूम मागितली आणि सकाळी लवकर हॉटेल सोडणार असल्याचे सांगितले होते. तसेच सकाळी ११ वाजता आम्ही दार ठोठावले, पण दार न उघडल्याने दुपारी व संध्याकाळी पुन्हा दार ठोठावले. पण तरीही दार न उघडल्याने सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी स्वतःच्या उपस्थितीत डुप्लिकेट चावीने दार उघडल्यावर सदर तरुणी पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसल्याचे हॉटेल मालक रणजित भोसले यांनी सांगितले. हा सगळा प्रकारच संशयास्पद आहे. रात्री १.३० वाजता आलेली तरुणी दिवाळीच्या दिवशी सकाळी आणि दुपारी दार उघडत नसल्यावर व जेवायलाही बाहेर न आल्यावर हॉटेल मालकाने तत्काळ पोलिसांना कळवायला पाहिजे होते व पोलिसांच्या उपस्थितीत दार उघडायला पाहिजे होते. पण हॉटेलवाल्यांनी संध्याकाळी साडेसहा वाजता दार उघडून तब्बल १७ तासांनंतर पोलिसांना बोलावले. पोलिसांनीही बॉडी ताब्यात घेऊन हॉस्पिटलला पोस्टमाॅर्टेमसाठी पाठवली. “मी बहिणीच्या मोबाईलवर फोन केल्यावर तो फोन उचलून तुमच्या बहिणीने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी आम्हाला सांगितले, मात्र घटना घडल्यावर उशिरापर्यंत आम्हाला काही सांगितले नाही,” असे मयत डॉक्टरच्या भावाचे म्हणणे आहे. “माझ्या मरणाचे कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने, ज्याने माझ्यावर ४ वेळा रेप केला आणि प्रशांत बनकर ज्याने ४ महिने शारीरिक व मानसिक छळ केला”, असे मयत तरुणीने हातावर लिहिले होते. हे पोलिसांना पोस्टमाॅर्टेमच्या वेळी दिसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जी मुलगी गेले वर्षभर व्यवस्थेविरुद्ध लढते आहे, लेखी तक्रारी करते आहे ती आत्महत्या करेल आणि केली तरी त्याची लेखी चिठ्ठी लिहिणार नाही ही केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. पोलिसांनीच पुरावे नष्ट केले नसतील कशावरून? या संशयालाही जागा आहे.

पोलीस यंत्रणेने दबाव टाकल्याचे व त्रास दिल्याची लेखी तक्रार मयत डॉक्टरांनी वरिष्ठांकडे केली होती. माहितीचा अधिकार टाकूनही कारवाई झाली नाही. पोलीस अधीक्षकांपर्यंत याची माहिती होती. या तक्रारीची वेळीच योग्य दखल घेतली असती व कारवाई झाली असती तर एक निष्पाप जीव वाचला असता. आता वरिष्ठांपर्यंत जी पोलीस यंत्रणा आरोपीच्या पिंजऱ्यात आहे तीच यंत्रणा याचा तपास करत आहे ते अतिशय धक्कादायक आणि धोकादायक आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संवेदनशील प्रकरणात तत्काळ लक्ष घालून पोलीस अधीक्षक दोषीसहित सगळ्याच दोषींना तत्काळ निलंबित करून तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमायला पाहिजे होती. सत्ताधारी वर्गातील एक मोठा गट या मुलीला बदनाम करण्यासाठी आणि बदचलन ठरवण्यासाठी मोहीम चालवत आहे. मृत्यूनंतरही लेकी-बाळींनाच आपल्या चारित्र्यावरून अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागत आहे, ही क्रूर थट्टा आहे. पोलिसांचा तपास सुरुवातीपासून संशयाच्या घेऱ्यात आहे तिथे न्याय कसा मिळणार? मोजके अपवाद सोडले, तर विरोधी पक्ष सावध पावले टाकताना दिसत आहे. महिला आयोगाची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. राज्यातील इतर सामाजिक संस्था, संघटना, महिला संघटना तसेच डॉक्टर संघटनांही फारसा आवाज उठवताना दिसत नाहीत. आमचे समाजमन हळूहळू मरतेय का या शंकेला वाव यावा इतपत परिस्थिती गंभीर आहे. त्या निष्पाप डॉक्टर मुलीला आपल्याकडून न्यायाची अपेक्षा नव्हती म्हणूनच तिने आत्महत्या करून आपली सुटका करून घेत या जगाचा निरोप घेतला. आम्ही मात्र ‘तुला न्याय देणारच नाही’ या गोष्टीवर शिक्कामोर्तब करतोय इतकंच..!! जी यंत्रणा मृत डॉक्टर मुलीलाच दोषी ठरवण्यासाठी कामाला लागली आहे, तिला आता मात्र काही फरक पडणार नाही, कारण ती मेलीय.. तिचा आत्मा हरवून गेला आहे... आता लढाई आपल्या आत्म्याची आहे..!

वकील, मुंबई उच्च न्यायालय

logo
marathi.freepressjournal.in