गाझा युद्धाची झळ
- सचिन दिवाण
ऑर्बिट
हमास-इस्रायल युद्ध सुरू होऊन आता सात महिने होत आले आहेत. अमेरिका, इजिप्त, कतार आदी देशांच्या मध्यस्थीने युद्धबंदीचे अनेक प्रयत्न होत आहेत. पण त्यांना यश येताना दिसत नाही. आता इस्रायल आणि इराणने एकमेकांवर थेट हल्ले केल्याने युद्धाची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. युद्धात आजवर दोन्ही बाजूंचे अतोनात नुकसान झाले आहे. जीवितहानी आणि आर्थिक नुकसान दोन्हींचे आकडे फुगतच चालले आहेत.
पॅलेस्टीनच्या गाझा पट्टीतील हमास संघटनेने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केला आणि हमास-इस्रायल युद्धाला सुरुवात झाली. त्याला आता सात महिने पूर्ण होत आले आहेत. युद्धात दोन्ही बाजूंचे भरमसाट नुकसान झाले आहे. मध्यस्थीचे प्रयत्न निष्फळ ठरल्याने युद्ध थांबण्याची तूर्तास चिन्हे दिसत नाहीत. उलट इराण आणि इस्रायलमधील थेट हल्ल्यांनी परिस्थिती चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे. हमासच्या हल्ल्यात इस्रायलचे सुमारे १२०० नागरिक मारले गेले आणि साधारण २४० जणांना ओलीस ठेवले गेले. त्यातील काही जणांची तात्पुरत्या युद्धबंदीत सुटका झाली. तसेच इस्रायलचे काही सैनिकही युद्धात मारले गेले आहेत. त्याउलट पॅलेस्टीनची हानी खूप मोठी आहे. गाझा पट्टीची लोकसंख्या साधारण २३ लाख आहे. त्यातील ८५ टक्के लोक निर्वासित झाले आहेत. गाझातील जवळपास ३४ हजार नागरिक मारले गेले आहेत. त्यात ७२ टक्के भरणा लहान मुले आणि महिलांचा आहे. शिवाय ७७ हजार पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत. तसेच ७ हजार जण बेपत्ता आहेत. संयुक्त राष्ट्रांचे २०० स्वयंसेवकही मारले गेले आहेत.
युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने गाझा पट्टीत साधारण ७५ हजार टन स्फोटके डागली आहेत. त्यात तेथील ६२ टक्के घरे जमीनदोस्त झाली आहेत, असे गाझातील प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे. गाझातील ९० हजार घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर सुमारे ३ लाख घरांचे कमी-जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. जागतिक बँक आणि संयुक्त राष्ट्रांनी २ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार युद्धाच्या पहिल्या चार महिन्यांत गाझातील सुमारे १८.५ अब्ज डॉलर किमतीच्या पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार गाझातील ३६ पैकी २६ रुग्णालये नष्ट झाली आहेत. त्यात ३५० डॉक्टर आणि परिचारिकांचा मृत्यू झाला असून ५२० आरोग्य कर्मचारी जखमी झाले आहेत. गाझातील मूळच्या २३ लाख लोकसंख्येपैकी ११ लाख जणांची गंभीर उपासमार होत आहे. भूक आणि विविध रोगांनी १० हजारांमधील २ वयस्क नागरिक आणि ४ लहान मुले दररोज मरत आहेत.
ही झाली थेट जीवित आणि मालमत्तेची हानी. व्यापक आर्थिक नुकसान त्याहून खूप मोठे आहे. युद्धात पॅलेस्टीनच्या (गाझा पट्टी आणि वेस्ट बँक मिळून) २०२२ सालच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी (जीडीपी) ९७ टक्के किमतीच्या पायाभूत सुविधा नष्ट झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आकडेवारीनुसार युद्धाच्या सहा महिन्यांत गाझाच्या खासगी क्षेत्रातील ९० टक्के नोकऱ्या संपल्या आहेत. जूनपर्यंत पॅलेस्टीनच्या विविध विद्यापीठांतून ३० हजार विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडणार आहेत. त्यांचे भवितव्य अंध:कारमय आहे.
युद्धामुळे इस्रायलचीही बरीच मोठी हानी झाली आहे. युद्धाच्या पहिल्या चार ते पाच महिन्यांत इस्रायलच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) ५ ते १० टक्क्यांची घट झाली आहे. देशाची निर्यात १८ टक्क्यांहून जास्त प्रमाणात घटली आहे. देशातील स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक ६७ टक्क्यांनी घटली आहे. खासगी क्षेत्रातील खर्चात २६ टक्क्यांनी कपात झाली आहे. युद्धामुळे इस्रायलच्या पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी फेब्रुवारीत इस्रायलला ३ लाख १९ हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली होती. यंदाच्या फेब्रुवारीत तेथे केवळ ६८ हजार पर्यटक आले होते. युद्धाने इस्रायलच्या शेतीवरही बराच परिणाम झाला आहे. पश्चिम सीमेवर गाझा पट्टीत युद्ध सुरू आहे. त्या आघाडीवर देशातील बरेच तरुण लढत आहेत. राखीव सैन्यही त्यांना मिळाले आहे. उत्तर सीमेवर लेबॅननमधील हिजबुल्ला संघटनेबरोबर रोज गोळीबार आणि तोफांचा मारा होत आहे. त्यामुळे उत्तरेकडील ८० हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. हे प्रामुख्याने शेतकरी आहेत. त्यामुळे त्या भागातील शेतीची कामे ठप्प पडली आहेत. इस्रायलच्या संरक्षण खर्चात अब्जावधी डॉलरची वाढ झाली आहे.
ही झाला थेट इस्रायल आणि पॅलेस्टीनला बसलेला फटका. पण इस्रायलविरोधात गाझातील हमासबरोबरच लेबॅननमधील हिजबुल्ला, येमेनमधील हुथी आदी संघटनाही लढत आहेत. त्यांना इराणची मदत आहे. हुथी संघटनेने तांबड्या समुद्रात आणि एडनच्या आखाताजवळच्या प्रदेशात इस्रायल आणि त्यांच्या मित्रदेशांच्या व्यापारी जहाजांवर हल्ले चालवले आहेत. त्याने जगातील अनेक व्यापारी जहाज कंपन्यांनी सुएझ कालव्याचा मार्ग सोडून आफ्रिकेला वळसा घालून प्रवास सुरू केला आहे. त्याने या जहाज कंपन्यांना वेळ, इंधन आणि विमा यावरील खर्च अनेक पटींनी वाढला आहे.
त्यामुळे आता युरोप आणि मध्य-पूर्वेतील अनेक देशांना भारत, चीन आणि अन्य आशियाई देशांशी व्यापार करण्यासाठी अधिक लांबचा मार्ग वापरावा लागणार आहे. युरोपमधून आशियाच्या किनाऱ्यावर येण्यासाठी त्यांच्या जहाजांना आता भूमध्य समुद्र, सुएझ कालवा आणि तांबड्या समुद्राऐवजी संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून अटलांटिक महासागरातून हिंदी महासागरात प्रवेश करावा लागणार आहे. आफ्रिकेच्या दक्षिणेकडील केप ऑफ गुड होपला वळसा घालून येताना या जहाजांना किमान ३५०० सागरी मैलांचा जादा प्रवास करावा लागणार आहे. युरोपमधून भूमध्य समुद्र-सुएझ कालवा-तांबडा समुद्र आणि हिंदी महासागर असा प्रवास साधारण १० हजार सागरी मैलांचा आहे. त्यात आता आणखी ३५०० सागरी मैलांची वाढ होऊन तो प्रवास सुमारे १३,५०० सागरी मैलांचा होणार आहे. युरोपमधून तांबड्या समुद्रामार्गे प्रवास करून आशियात येण्यास जहाजांना साधारण २५ दिवस लागतात. आता आफ्रिकेला वळसा घालून येताना त्यात दहा दिवसांच्या प्रवासाची भर पडणार आहे. त्यासाठी अधिक इंधन खर्ची पडणार आहे. शिवाय, जहाजांना युद्धातील संभाव्य नुकसानापासून भरपाई देणाऱ्या विम्याचा दरही वाढला आहे. ही परिस्थिती अधिक काळ सुरू राहिली तर आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल, नैसर्गिक वायू, धान्य आदी पदार्थांच्या किमती बऱ्याच वाढण्याची शक्यता आहे.
‘युद्धस्य कथा रम्य:’ असे म्हटले जाते. ते युद्धभूमीपासून दूरवर असलेल्या लोकांसाठी खरे आहे. प्रत्यक्ष युद्धात होरपळल्या जाणाऱ्या लोकांचे हाल त्यांना समजू शकणार नाहीत. पण आज जागतिकीकरणामुळे जग इतके जोडले गेले आहे की, कोठेही युद्ध झाले तरी त्याचे कमी-अधिक प्रमाणावर परिणाम आपल्यावर होतातच. तेव्हा हमास-इस्रायल युद्ध असो किंवा रशिया-युक्रेन युद्ध त्याची थोडी का होईना झळ आपल्यालाही बसल्याशिवाय राहणार नाही.