जागतिक वसुंधरा दिन ; नुसतंच म्हणतो धरणीमाय, तिच्यासाठी करतो काय?

बांधकामांमुळे पर्यावरणाला धोका अधिक; पर्यावरण तज्ज्ञांचे मत
जागतिक वसुंधरा दिन ; नुसतंच म्हणतो धरणीमाय, तिच्यासाठी करतो काय?

मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे. त्याच वेगाने मुंबईचे क्राॅकिटकरण होत आहे. मुंबईत सुरू असलेली बांधकामे हे प्रदूषणाला आमंत्रित करत असून विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल ही पृथ्वीच्या विनाशाची वाटचाल सुरू आहे. पर्यावरणाचा "रास" व वाढत्या प्रदूषणास कोण एक जबाबदार नसून याला सगळेच कारणीभूत आहेत. पृथ्वी माणसाची गरज आहे, याचा विसर पडला असून ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे 'पृथ्वी जगली तर मनुष्य जगेल' असे मत पर्यावरण तज्ज्ञ ॠषी अग्रवाल यांनी तर मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे, असे मत आवाज फाउंडेशनच्या संस्थापक सुमेयरा अब्दुल अली यांनी दैनिक 'नवशक्ति' शी बोलताना व्यक्त केले.

वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उदिद्ष्ट आहे. ‘माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करू शकते, पण हाव नाही. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भसाभस अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंध:कारमय आहे हे निश्चित. पर्यावरणीय बदल, वाढते प्रदूषण याला रोखण्यासाठी जनजागृती, प्रबोधन करण्यासाठी दरवर्षी २२ एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो.

मुंबईचा विकास झपाट्याने होत असला, तरी तो मुंबईकरांच्या मुळावर उठून करणे योग्य नाही. मुंबईत गाड्याची संख्या वाढत असून यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. मुंबईतील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक अर्थात बेस्ट बसेसची संख्या वाढवावी. पादचाऱ्यांना फुटपाथ राहिलेले नाही, फुटपाथची रुंदी कमी केली जात आहे, जिकडे तिकडे विकास आणि क्राॅकिटकरण होत आहे. कचऱ्याची विल्हेवाट पालिकेच्या २४ वॉर्ड स्तरावर लावणे गरजेचे आहे, जेणे करून ओला व सुका कचऱ्यावर वॉर्ड स्तरावर प्रक्रिया होईल आणि प्रदूषणाला खतपाणी घातले जाणार नाही. याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाला अनेक वेळा सूचना केली; मात्र अंमलबजावणी कागदावरच आहे, असा आरोप ॠषी अग्रवाल यांनी केला आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील जंगलात भर दुपारच्या उन्हात कामासाठी गेलो होतो, या ठिकाणचे जंगल बचाव मोहीम हाती घेतली आहे. पण त्याठिकाणी झाडांमुळे हिटचा काही त्रास जाणवला नाही; मात्र मुंबईतील क्राॅकिटीकरणामुळे वाहतूक बेटावर हिटमुळे परिणाम होत आहे. मुंबईत दुपारच्या उन्हात एक तास आपण फिरलो, तर हिटचा फटका शंभर टक्के बसणार आणि झाडांची होत असलेली कत्तल यामुळे आरोग्यावर परिणाम होणार आणि होत आहे. त्यामुळे मुंबईत तरी झाडांचे संवर्धन करणे काळाची गरज असून यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत अग्रवाल यांनी व्यक्त केले.

पर्यावरण संरक्षणात मुंबई महापालिका नापास!

मुंबईचे सौंदर्यीकरण, क्राॅकिटकरण होत आहे. परंतु पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नियोजन करण्याकडे मुंबई महापालिका दुर्लक्ष करत आहे. कचऱ्याची समस्या, झाडांची कत्तल हे आजही राजरोसपणे सुरू आहे. मुंबई महापालिका म्हणते वर्षांला एवढ्या झाडांची लागवड केली, पण प्रत्यक्षात ज्या ठिकाणी झाडांची लागवड केली तेथे झाडचं नसते हा अनुभव आहे. लाखो झाडे लावण्याची घोषणा न करता किमान एक हजार झाडांची लागवड करण्याबाबत नियोजन करावे. त्यामुळे पर्यावरण रक्षणात मुंबई महापालिका नापास झाली असा शेरा दिला आहे.

- ॠषी अग्रवाल, पर्यावरण तज्ज्ञ

प्रदूषणास बांधकामे कारणीभूत

मुंबईतील बदलत्या वातावरणास आपण सगळे जबाबदार आहोतच. मुंबईत सुरू असलेली विविध प्राधिकरणाची कामे, मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना कुठल्याही नियमांचे पालन केले जात नाही. मुंबईच्या तापमानात ज्या झपाट्याने वाढ होत असून, याला मुख्य कारण झाडांची कत्तल आहे. मुंबईचा विकास करण्यासाठी झाडांचा बळी दिला जात असून, आता मुंबईच्या धर्तीवर ग्रामीण भागात ही झाडांची कत्तल केली जाते. मुंबईत झाडांची होणारी कत्तल यामुळे मुंबईत हिट वेव्ह जाणवू लागली आहे. उन्हाचा तडाखा बसत असून, लोकांनी झाडाच्या सावलीचा आसरा घ्या, असे सांगितले जाते. पण मुंबईत सावलीसाठी झाडे कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो. क्राॅकिटचे जाळे विस्तारले जात आहे. यामुळे हिटमुळे वाहतूक बेटांवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला बांधकामे तितकीच जबाबदार आहे जितके तुम्ही आम्ही. मुंबई प्रदूषण मुक्तीसाठी सरकारी स्तरावर व लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

- सुमेयरा अब्दुल अली, संस्थापक, आवाज फाउंडेशन

म्हणून 'अर्थ डे’

वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी मांडली. त्यांनी अमेरिकेतील २ कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा ह्रास या मुद्यावर तेथील समाजाच्या सर्व थरांतील लोकांनी आवाज उठवला. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे मोठा राजकीय दबाव निर्माण झाला अशा प्रकारे १९७० सालापासून हा ‘अर्थ डे’ जगभर साजरा केला जात आहे.

ग्लोबल वार्मिंगचा धोका!

येणाऱ्या दिवसात हवामान बदलाचे ग्लोबल वार्मिंचे परिणाम झपाट्याने अनुभवायला मिळणार आहे. पुढील आठ वर्षात म्हणजेच २०३०पर्यंत मुंबई, कोची, मंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरमचा किनारी भाग संकुचित होईल तसेच समुद्राचे पाणी जमीन गिळंकृत करेल. इतकेच नाही, तर काही लोकांना त्यांची घरं आणि व्यवसाय सोडावे लागतील. राहण्याची जागा बदलावी लागेल. २०५० पर्यंत या शहरांची स्थिती बिकट होईल. समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीचा मुंबईतील किमान एक हजार इमारतींना फटका बसणार आहे. किमान २५ किमी लांबीचा रस्ता खराब होईल. जेव्हा भरती येईल, तेव्हा २४९० इमारती आणि १२६ किलोमीटर लांबीचा रस्ता पाण्याखाली जाईल, असा अहवाल नुकताच आरएमएसआयने जारी केला आहे.

जागतिक वसुंधरा दिनाचे महत्व !

जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने समाजात पृथ्वीवर होत असलेल्या प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात यावी, यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येतात. याबाबत विविध इको क्लबही जनजागृती करतात. पर्यावरणाला हानी करणाऱ्या विविध यंत्रणा, कारखाने, आदीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो. सध्या अनेक नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यांचे प्रदूषण रोखणे गरजेचे आहे, त्यासाठी प्रयत्न करुन जनजागृती करणे. समाजातील नागरिकांना प्रदूषण न करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी या दिवसाला महत्व प्राप्त झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in