अय्यो रामा, इडलीमे भी मिलावट?

इडली हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचंच कम्फर्ट फूड आहे. पण या इडलीतही भेसळ होत असल्याचं निदर्शनास आले आहे. दुधापासून तुपापर्यंत कोणताच पदार्थ आज भेसळीशिवाय आपल्या ताटापर्यंत पोहोचत नाही. अधिक नफा मिळवण्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातो. भेसळ रोखणारी संबंधित शासकीय यंत्रणा अत्याधुनिक तंत्रज्ञान मदतीला असतानाही अन्न भेसळमुक्त करण्याबाबत अयशस्वी ठरत आहे.
अय्यो रामा, इडलीमे भी मिलावट?
Published on

- ग्राहक मंच

- नेहा जोशी

इडली हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचंच कम्फर्ट फूड आहे. पण या इडलीतही भेसळ होत असल्याचं निदर्शनास आले आहे. दुधापासून तुपापर्यंत कोणताच पदार्थ आज भेसळीशिवाय आपल्या ताटापर्यंत पोहोचत नाही. अधिक नफा मिळवण्यासाठी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातो. भेसळ रोखणारी संबंधित शासकीय यंत्रणा अत्याधुनिक तंत्रज्ञान मदतीला असतानाही अन्न भेसळमुक्त करण्याबाबत अयशस्वी ठरत आहे.

गेल्या काही दिवसांत ‘Any day , any time, the best comfort food’, ‘perfect comfort food for every mood’, अशा प्रकारच्या आकर्षित करणाऱ्या टॅगलाईन्स आपण सगळ्यांनी ऐकल्या असतीलच. आठवले ना तुम्हाला! अगदी बरोबर, नुकताच ३० मार्चला साजऱ्या झालेल्या ह्या ‘इडली डे’च्या निमित्ताने अशा टॅगलाईन्स आपल्याला दिसल्या. तसे पाहिले तर इडली हा घराघरातील नाश्त्याचा लाडका प्रकार आहे. अगदी बाहेर फिरायला गेलो तरी हलकी-फुलकी इडली सकाळी सकाळी खाल्ली की आपला मूड एकदम झक्कास होतोच.

पण अचानक एक दिवस वर्तमानपत्रातून तुम्हाला बातमी मिळाली, की आपली आवडती इडली सेवनासाठी सुरक्षित नाही तर? बसला ना धक्का. अगदी खरे आहे. नुकतेच कर्नाटकच्या अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या २५१ इडली नमुन्यांच्या परीक्षणातून मिळालेल्या निष्कर्षांनुसार तेथील ५२ हॉटेलांमधल्या इडलीमध्ये प्लॅस्टिकचा अंश सापडला आहे. इडली तयार करताना ह्या हॉटेल्समध्ये प्लॅस्टिक शीटचा वापर केला जात होता, असे समोर आले. इडली तयार करण्याची मूळ पद्धत ही इडलीचे मिश्रण कापडावर वाफवण्याची आहे. तमिळमध्ये एक शब्द आहे ‘इट्ट-अवी’. याचा अर्थ एखादा पदार्थ ताटलीत पसरवून वाफवणे. हे दोन्ही शब्द जोडल्यानंतर ‘इट्टअवी’ हा एक शब्द तयार होतो. कालांतराने त्याचे ‘इट्टवी’ व पुढे ‘इडली’ असे बदल घडत गेले. पदार्थ ताटलीला चिकटू नये म्हणून कापडाचा वापर केला जातो. जेव्हा कापडाऐवजी प्लॅस्टिकचा वापर पदार्थ वाफवताना होतो तेव्हा प्लॅस्टिकमधील विषारी घटक अन्नात मिसळून मानवी शरीरास धोका निर्माण होतो. यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला आमंत्रण मिळते. सध्या तरी कर्नाटक सरकारने कर्नाटक राज्यात इडली बनविताना होणाऱ्या प्लॅस्टिक वापरावर बंदी आणली आहे.

वरील उदाहरणावरून अन्न भेसळीचा मुद्दा परत अधोरेखित होतो. अन्न ही आपली मूलभूत गरज असल्याने अन्न भेसळीचे अनेक प्रकार आहेत. ते आपल्याला माहित हवेत. अन्न भेसळ बहुतेकदा किमतीवरील नफा वाढवण्यासाठी केली जाते. नफावाढीसाठी किंवा सोयीसाठी बदललेली अन्न बनविण्याची किंवा साठवण्याची पद्धत अनेकवेळा सदोष असते. त्यामुळे अन्न दूषित होते. जे आपण वरील इडलीच्या प्रकरणात पाहिले. दुसरा प्रकार म्हणजे अन्न उत्पादनांमध्ये जाणूनबुजून निकृष्ट, हानिकारक किंवा अनधिकृत पदार्थ बेमालूमपणे मिसळणे. यामुळेही पदार्थाची गुणवत्ता आणि सुरक्षितता धोक्यात येते.

आता ही पुढचीच कर्नाटकामधीलच बातमी बघा. नुकतेच कर्नाटक राज्यातील ‘फूड सेफ्टी अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन’ला तळलेल्या हिरव्या मटारमध्ये बंदी असलेला कृत्रिम डाय ‘टार्ट्राझिन’ हा घटक ६४ नमुन्यांमध्ये सापडला आहे. ‘टार्ट्राझिन’ डाय हा घटक तळलेला मटार हिरवागार दिसावा म्हणून वापरला जातो. थोडेसे विज्ञान समजून घेतले तर आपल्या लक्षात येईल, की मटारचा हिरवा रंग हा क्लोरोफिल ह्या रंगद्रव्यामुळे असतो. तळण्याच्या प्रक्रियेदरम्यान क्लोरोफिलचे विभाजन होऊन अन्य रंगद्रव्ये दिसू लागतात. ज्यामुळे मटारचा हिरवा रंग ऑलिव्ह ग्रीन किंवा मातकट हिरवा दिसू लागतो. त्यामुळे तळलेला मटार हिरवागार दिसणे कधीच शक्य नाही.

स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी पारंपरिक भारतीय पदार्थांमध्ये तुपाचा समावेश केला जातो. शिरा, मोदक, पुरणपोळी, वरणभात या पदार्थांची आपण तुपाशिवाय कल्पनाच करू शकत नाही. आयुर्वेदातील माहितीनुसार तुपाच्या सेवनामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त तुपामुळे आरोग्याला पोषण मूल्यांचा पुरवठा होतो. तूप हा तुलनेने महाग पदार्थ आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये गुजरातमध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त तूप छापे घालून जप्त केले आहे. हे तूप जवळ जवळ ४००० किलो आणि १.७५ लाख किमतीचे होते. ह्या डेअरीला गैरव्यवहार थांबवण्यासाठी दोन वेळा नोटीस देखील बजावण्यात आली होती. तुपातील ही अन्न भेसळ सोयाबीन ऑइल आणि वेजिटेबल फॅट्स (चरबी) ही सामुग्री वापरुन केलेली होती. थोडक्यात रूढ अर्थाने प्रचलित असलेले डालडा हे शुद्ध साजूक तुपात मिसळलेले असते.

हे सगळे ऐकल्यावर असे वाटते, की चांगल्या, सकस अन्न पदार्थांसाठी पुरेपूर किंमत मोजून देखील आपल्याला मिळणारे पदार्थ खरोखरच सकस, सेवनासाठी शुद्ध, सुरक्षित आहेत का? आणि ह्या अन्न भेसळीपासून स्वतःचे, आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करायचे तरी कसे? उत्तर सोपे आहे. काही सवयी अंगीकारून आणि सजग राहून!

शक्यतो घरी बनविलेले ताजे अन्न खावे.

रस्त्यावर सुट्टे मिळणारे अन्नपदार्थ खरेदी करू नयेत. आकर्षक रंग, पॅकिंगला भुलून खरेदी करू नये.

खरेदी करताना थोडी माहिती घेऊन खरेदी करावी. आपल्या सुरक्षेसाठी सरकारी आस्थापनांनी फूड लेबल संदर्भात नियमावली बनवली आहे. त्याची माहिती करून घ्यावी. उदाहरणार्थ, अन्न पदार्थात कोणते अन्न घटक वापरलेले आहेत, ते वाचावे. काही बोध चिन्हे जसे की ऍगमार्क, FSSAI मार्क बघून मगच खरेदी करावी.

काही सोप्या चाचण्या आपल्याला घरच्या घरी करता येतात. ज्याची माहिती ‘भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) ह्यांच्या अधिकृत सोशल वेबसाईट आणि इंस्टाग्रामवर उपलब्ध असते. उदाहरणार्थ, तुपात बटाट्यासारख्या पिष्टमय पदार्थाची भेसळ असेल तर टिंचर आयोडीन वापरून ती ओळखता येते. हे टिंचर आयोडिन केमिस्टच्या दुकानांमध्ये मिळते. जर तुपात बटाट्याची भेसळ असेल तर तूपाचा हलका सोनेरी रंग, त्यात टिंचर आयोडीन मिसळल्यावर काळा होतो.

सणासुदीच्या काळात खव्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आढळते. त्यामुळे या काळात माव्याची मिठाई शक्यतो टाळावी.

काही वेळा बाहेर खावे लागते. अशा वेळी शक्यतो माहितीच्या खात्रीशीर ठिकाणी जावे.

अन्न भेसळ आढळ्यास किंवा शंका आल्यास ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) या यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी.

कुठल्याही प्रलोभनांना न भुलता शक्यतो घरच्या घरी भेसळमुक्त पदार्थ करता येतील का? यासाठी प्रयत्न करावा. बघा, विचार करा आणि सजग, सुरक्षित रहा.

मुंबई ग्राहक पंचायत

mgpshikshan@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in