स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या आपल्या कृषिप्रधान देशातील ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरी भागातही मुलांना खेळण्यासाठी पुरेशी मैदाने अथवा स्टेडियम्स नाहीत. तसेच, खेळासाठी लागणारी साधनसामग्री घेणेही अनेकांना परवडत नाही. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ जिद्द, चिकाटी व वैयक्तिक मेहनतीच्या जोरावर काही खेळाडू गाव, तालुका, जिल्हापातळीवरील स्पर्धांमध्ये चढत्या भाजणीने उल्लेखनीय यश मिळवत जातात. एवढेच नव्हे, तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवितात. विविध पदकांची कमाई करून राज्याला व देशाला मानसन्मान प्राप्त करून देतात. विजेत्या क्रीडापटूंची आपल्या गावखेड्यातून सुरू झालेली वाटचाल खडतर असते. म्हणूनच ते देशातील उदयोन्मुख खेळाडूंचेही प्रेरणास्थान बनतात. अलीकडच्या काळात आपल्या देशातील कितीतरी खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आहेत. त्यापैकी काहींना प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. असे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळविणारे कुस्तीपटू जेव्हा आपल्यावरील अन्यायाविरुद्ध पत्राद्वारे केंद्र सरकारकडे दाद मागतात; तेव्हा त्यांच्या पत्राची तेवढ्याच तत्परतेने दखल घेणे आवश्यक ठरते. तथापि, संपूर्ण देशाच्या तरुणाईचे रोलमॉडेल बनलेल्या या कुस्तीपटूंच्या पत्रांना समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत, ही बाबच क्रीडापटूंचा अवमान करणारी ठरते. त्याचीच प्रचिती सध्या देशातील नामवंत महिला कुस्तीपटू घेत आहेत. मुळात, राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष व भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. त्यांच्याविरोधात ख्यातनाम कुस्तीपटूंनीच गंभीर तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची तेवढ्याच गांभीर्याने दखल घेऊन त्याची सत्यता पडताळून पाहण्याची सरकारची जबाबदारी होती. मात्र, सरकारदरबारी त्यांच्या मागण्या, निवेदनांना केराची टोपली दाखवली गेली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या काही कुस्तीपटूंनी मागील २३ एप्रिल २०२३ रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन पुकारले. या आंदोलनाला महिना उलटून गेला तरी बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही अथवा ते पूर्णपणे निर्दोष असल्याचेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कुस्तीपटूंनी नव्या संसद भवन परिसरात रविवारी महिला महापंचायत आयोजित केली होती. या महापंचायतीकडे आपला मोर्चा वळविण्याचा प्रयत्न आंदोलक कुस्तीपटूंनी केला. तेव्हा आंदोलक व पोलीस यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना अक्षरश: फरफटत नेले. धक्काबुक्की करीत पोलिसांच्या गाड्यांमध्ये कोंबले. ऑलिम्पिक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगट, विनेश फोगट यांच्यासह सातशे जणांची धरपकड करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ‘लैंगिक शोषण करीत असलेला गुंड आज संसदेत बसला आहे आणि आम्हाला रस्त्यावर फरफटत नेले जात आहे. हा दिवस भारतीय खेळाडूंसाठी अत्यंत वेदनादायी आहे,’ अशी प्रतिक्रिया कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी व्यक्त केली आहे. ‘एक आयपीएस अधिकारी आम्हाला गोळ्या घालण्याची भाषा करीत आहेत. भाई समोर उभा आहे, सांगा कुठे यायचेय गोळी खायला? शपथ आहे, पाठ नाही दाखवणार, छातीवर तुझी गोळी झेलू’ असे संतप्त उद्गार सुप्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी काढले आहेत. ‘खेळाडूंना न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरावे लागतेय, हे पाहून दु:ख होतेय. आपल्या देशाला अभिमान वाटेल असे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेत. त्यामुळे जे काही घडतेय, ते कधीच घडायला नको होते. हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. त्याकडे अत्यंत निष्पक्षपातीपणे आणि पारदर्शकपणे पाहायला हवे. संबंधित प्राधिकारणाने यावर तातडीने कारवाई करत, न्याय देण्याचा विश्वास दिला पाहिजे,’ असे मत ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा यांनी व्यक्त केले आहे. या खेळाडूंना न्याय मिळेल का, असा सवाल माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनीही व्यक्त केला आहे. देशातील नामवंत खेळाडूंच्या या बोलक्या प्रतिक्रिया लक्षात घेता, केंद्र सरकारने वेळकाढूपणा न करता हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळायला हवे. खरेतर, जगातील अन्य क्रीडाप्रेमी देशांप्रमाणे आपल्या देशात क्रीडासंस्कृती रुजलेली नाही. क्रीडापटू घडविण्यासाठी सरकार फारसा पुढाकार घेत नाही. खेळाडूंना प्रोत्साहन देत नाही. त्यामुळेच जागतिक पदक विजेत्या देशांच्या तालिकेत आपला देश बऱ्याचदा तळागाळातच रुतलेला असतो. पुढील ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अनेक देश व त्या देशातील खेळाडू आतापासूनच तयारीला लागले आहेत. त्या तुलनेत आपल्या खेळाडूंची पूर्वतयारी ‘दिल्ली बहोत दूर’ या वर्गात मोडणारी आहे. त्यातच, आंदोलनकर्त्या खेळाडूंचे म्हणणे ऐकून न घेताच त्यांना हुसकावून लावण्याची सरकारची वृत्ती अखिलाडूपणाची आहे. सरकारने किमान खेळात तरी राजकारण आणू नये, ही अपेक्षा.