कन्याकुमारीतील साधनेतून साकारले नवे संकल्प

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपवून कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे भारतमातेच्या चरणाशी बसण्याची संधी मला मिळाली. निवडणुकीच्या काळातील कोलाहलापासून स्वत:ला दूर ठेवले.
कन्याकुमारीतील साधनेतून साकारले नवे संकल्प
X| @BJP4India

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

विशेष लेख

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपवून कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे भारतमातेच्या चरणाशी बसण्याची संधी मला मिळाली. निवडणुकीच्या काळातील कोलाहलापासून स्वत:ला दूर ठेवले. माझ्या आध्यात्मिक प्रवासात भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी, भारताच्या लक्ष्यासाठी अखंड विचार उमटत होते. कन्याकुमारीच्या उगवत्या सूर्याने माझ्या विचारांना नवी उंची दिली, सागराच्या विशालतेने माझ्या विचारांना व्यापकता दिली आणि क्षितिजाच्या विस्ताराने ब्रह्मांडामध्ये खोलवर सामावलेल्या एकात्मकतेची अखंड अनुभूती दिली.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

लोकशाहीच्या जननीत लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महापर्वाचा एक टप्पा पूर्ण झाला. तीन दिवस कन्याकुमारीतील आध्यात्मिक यात्रेनंतर दिल्लीला रवाना होण्यासाठी मी विमानात बसलो आहे. काशी आणि अनेक मतदारसंघांत मतदान सुरू होते. अनेक अनुभव आहेत, अनेक अनुभूती आहेत... स्वतःमध्ये अपार ऊर्जेचा प्रवाह मी अनुभवत आहे.

२०२४ च्या या निवडणुकीत खरेच अनेक सुखद योगायोग आले आहेत. अमृतकाळातल्या या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानाची सुरुवात मी १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थळ मेरठ इथून केला. या निवडणुकीतली माझी शेवटची प्रचारसभा पंजाबच्या होशियारपूर इथे झाली. संत रविदासजी यांची तपोभूमी, आपल्या गुरूंची भूमी पंजाबमध्ये शेवटची प्रचारसभा होण्याचे भाग्य विशेष आहे. त्यानंतर मला कन्याकुमारीमध्ये भारतमातेच्या चरणाशी बसण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या क्षणांमध्ये निवडणुकीचा कोलाहल तन-मनात दाटला होता. रॅली, रोड शोमध्ये पाहिलेले असंख्य चेहरे नजरेसमोर येत होते. माता-भगिनींचा तो अपार स्नेहाचा उमाळा, त्यांचा आशीर्वाद... त्यांच्या नजरेतला माझ्याप्रति असलेला विश्वास, ती आपुलकी... मी हे सगळे सामावत होतो. माझे डोळे पाणावत होते. मी निरवतेमध्ये जात होतो, साधनेत प्रवेश करत होतो.

काही क्षणातच राजकीय वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप...आरोपांचा आवाज आणि शब्द सारे काही अंतर्धान होऊ लागले. माझ्या मनातला विरक्त भाव अधिक गडद झाला... माझे मन बाह्य जगतापासून पूर्णपणे अलिप्त झाले. इतक्या मोठ्या दायित्वामध्ये अशी साधना कठीण असते, मात्र कन्याकुमारीची भूमी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेने ती सोपी केली. या विरक्ततेत, शांतता आणि निरवतेत माझ्या मनात भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी, भारताच्या लक्ष्यासाठी अखंड विचार उमटत होते. कन्याकुमारीच्या उगवत्या सूर्याने माझ्या विचारांना नवी उंची दिली, सागराच्या विशालतेने माझ्या विचारांना व्यापकता दिली आणि क्षितिजाच्या विस्ताराने ब्रह्मांडामध्ये खोलवर सामावलेल्या एकात्मकतेची अखंड अनुभूती दिली.

कन्याकुमारीचे हे स्थान नेहमीच माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ राहिले आहे. कन्याकुमारीमध्ये विवेकानंद शिला स्मारकाची निर्मिती श्री एकनाथ रानडेजींनी केली होती. एकनाथजींसोबत भटकंती करण्याची संधी मला मोठ्या प्रमाणावर मिळाली होती. या स्मारकाच्या उभारणीच्या काळात कन्याकुमारीत काही काळ राहणे, तिथे ये-जा करणे स्वाभाविक स्वरूपात होत असायचे.

काश्मीरपासून कन्याकुमारी ही प्रत्येक देशवासीयाच्या अंतर्मनात कोरली गेलेली आपली सामायिक ओळख आहे. हे ते शक्तिपीठ आहे जिथे माता शक्तीने कन्याकुमारीच्या रूपात अवतार घेतला. या ठिकाणी विवेकानंद शिला स्मारकाबरोबरच संत तिरुवल्लूवर यांची भव्य मूर्ती, गांधी मंडपम् आणि कामराजर मणीमंडपम आहे. महान नायकांच्या विचारांचे हे प्रवाह येथे राष्ट्रचिंतनाचा संगम तयार करत आहेत. यामुळे राष्ट्रनिर्मितीच्या महान प्रेरणांचा उदय होत आहे. जे लोक भारताच्या राष्ट्र असण्याविषयी आणि देशाच्या एकतेविषयी शंका व्यक्त करतात, त्यांना कन्याकुमारीची ही भूमी एकतेचा अमीट संदेश देते.

कन्याकुमारीत संत तिरुवल्लूवर यांची भव्य मूर्ती, समुद्रातून भारतमातेचा विस्तार पाहत असल्याचे प्रतीत होत आहे. त्यांची ‘तिरुक्कुरल’ ही रचना तामिळ साहित्याच्या रत्नांनी जडलेल्या एका मुकुटाप्रमाणे आहे. यात जीवनाच्या प्रत्येक भागाचे वर्णन आहे, जे आपल्याला स्वतःला आणि देशासाठी आपले सर्वश्रेष्ठ देण्याची प्रेरणा देते. अशा महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करणे देखील माझे परम भाग्य आहे.

मित्रांनो, स्वामी विवेकानंदजींनी सांगितले होते- Every Nation Has a Message To deliver, a mission to fulfil, a destiny to reach.

भारत हजारो वर्षांपासून याच भावनेने सार्थक उद्दिष्टासह पुढे वाटचाल करत राहिला आहे. भारत हजारो वर्षांपासून विचारांच्या संशोधनाचे केंद्र राहिला आहे. आज भारताचे प्रशासनिक प्रारूप जगातील अनेक देशांसाठी एक उदाहरण म्हणून समोर आले आहे. अवघ्या १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीच्या अवस्थेतून बाहेर काढणे ही अभूतपूर्व बाब आहे. भारताचा विकास आपल्याला जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहायचा आहे आणि त्यासाठी आपण भारताचे अंतर्भूत सामर्थ्य समजून घेणे आवश्यक आहे. आपल्याला भारताची ताकद स्वीकारून ती मजबूतही करावी लागेल आणि जगाच्या हितासाठी तिचा संपूर्ण उपयोगही करावा लागेल. आजच्या वैश्विक परिस्थितीमध्ये युवा राष्ट्र म्हणून भारताचे सामर्थ्य आपल्यासाठी सुखद संयोग आणि सुसंधी असून आता आपल्याला मागे वळून पाहायचे नाही.

२१ व्या शतकातील जग आज भारताकडे खूप आशेने पाहत आहे. वैश्विक परिदृश्याचा विचार करता पुढे जाण्यासाठी आपल्याला काही बदलही करावे लागतील. सुधारणा याबाबतचा पारंपरिक विचारही आपल्याला बदलायला हवा. भारत, सुधारणा केवळ आर्थिक बदलांपुरता मर्यादित ठेवू शकत नाही. आपल्याला जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणेच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागेल. आपल्या सुधारणा विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला अनुरूप असायला हव्यात.

देशासाठी सुधारणा ही कधी एकतर्फी प्रक्रिया होऊ शकत नाही. म्हणून मी देशासाठी रिफॉर्म (सुधारणा), परफॉर्म (कामगिरी) आणि ट्रान्सफॉर्म (परिवर्तन) दृष्टिकोन समोर ठेवला आहे. सुधारणा, ही नेतृत्वाची जबाबदारी असते. त्या आधारावर नोकरशाही कामगिरी बजावते आणि जनता जनार्दन यात जोडले जातात तेव्हा परिवर्तन घडताना दिसू लागते. भारताला विकसित भारत बनवायचे असेल तर आपल्याला उत्कृष्टता मूलभाव बनवावा लागेल. आपल्याला क्षणोक्षणी या गोष्टीचा अभिमान वाटायला हवा की ईश्वराने आपल्याला भारतभूमीत जन्माला घातले आहे. ईश्वराने आपल्याला भारताची सेवा आणि त्याच्या सर्वोच्च प्रवासात आपली भूमिका पार पाडण्यासाठी निवडले आहे. आपल्याला प्राचीन मूल्यांचा आधुनिक स्वरूपात अंगीकार करताना आपला वारसा आधुनिक रूपात पुनर्परिभाषित करावा लागेल.

आपल्याला एक राष्ट्र म्हणून जुनाट विचारसरणी आणि मान्यता यांचा त्याग करावा लागेल. आपल्याला आपल्या समाजाला व्यावसायिक निराशावादींच्या दबावातून बाहेर काढायचे आहे. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की नकारात्मकतेपासून मुक्ती, यश साकार करण्याच्या दिशेने पोहचण्याची पहिली पायरी आहे. सकारात्मकतेच्या वातावरणातच यशाला गवसणी घालता येते. भारताच्या अनंत आणि अमर शक्ती प्रति माझी आस्था, श्रद्धा आणि विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मी गेल्या १० वर्षांत भारताचे हे सामर्थ्य आणखी वाढताना पाहिले आहे आणि ते अनुभवले आहे.

ज्याप्रकारे आपण २० व्या शतकाच्या चौथ्या-पाचव्या दशकाचा आपल्या स्वातंत्र्यासाठी वापर केला त्याचप्रकारे २१ व्या शतकातील या २५ वर्षांमध्ये आपल्याला विकसित भारताची पायाभरणी करायची आहे. आज बलिदानाची नव्हे तर निरंतर योगदान देण्याची वेळ आहे.

स्वामी विवेकानंद यांनी १८९७ मध्ये म्हटले होते की, आपल्याला पुढील ५० वर्षे केवळ आणि केवळ राष्ट्रासाठीच समर्पित करायची आहेत. त्यांच्या या आवाहनानंतर बरोबर ५० वर्षांनंतर, १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला.

आज आपल्याकडे तशीच सुवर्णसंधी आहे. आपण पुढील २५ वर्षे केवळ आणि केवळ राष्ट्रासाठीच समर्पित करूयात. आपले हे प्रयत्न भावी पिढ्या आणि आगामी शतकांसाठी नवभारताचा भक्कम पाया बनून अमर राहतील. मी देशाची ऊर्जा पाहून असे म्हणू शकतो की लक्ष्य आता दूर नाही. चला, वेगाने पावले टाका, एकत्र चालूया, भारताला विकसित राष्ट्र बनवूया. हे विचार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जून रोजी संध्याकाळी ४.१५ ते ७ दरम्यान कन्याकुमारीहून नवी दिल्लीला परत येत असताना विमानप्रवासात लेखणीबद्ध केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in