- शरद जावडेकर
शिक्षणनामा
आपल्याकडे शिक्षण तज्ज्ञ हे विशेषण फार गुळगुळीत पद्धतीने कोणासाठीही वापरले जाते. पण हे विशेषण ज्यांच्यासाठी समर्पक ठरेल अशा थोड्या व्यक्ती असतात. त्यात स्वातंत्र्योत्तर काळातील एकमेव नाव म्हणजे जे. पी. नाईक! म्हणूनच युनेस्कोने जी १०० जागतिक शिक्षण तज्ज्ञांची यादी ‘थिंकर्स ऑन एज्युकेशन’ म्हणून १९९७ मध्ये प्रसिद्ध केली. त्यात भारतातील म. गांधी, रवींद्रनाथ टागोर व जे. पी. नाईक या तीन व्यक्तींचा समावेश आहे यातच सर्व काही येते.
जे.पी. नाईक यांचा जन्म, ५ सप्टेंबर १९०७ मध्ये अतिशय गरीब कुटुंबात बहिरेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव विठ्ठल हरी घोटगे! सात वर्षांपर्यंत त्यांचे आयुष्य घरची गुरे राखण्यात गेली. पुढे मग गांधींच्या असहकाराच्या चळवळीत भूमिगत असताना त्यांनी नाव बदलले. ते जयंत पांडुरंग नाईक झाले. प्रचंड कुशाग्र बुद्धी असूनही त्यांना शालेय शिक्षणासाठी अनेक अडचणी आल्या होत्या. त्यावर मात करून कोल्हापूरला राजाराम कॉलेजमधून त्यांनी गणित विषयात पदवी प्राप्त केली. पुढे इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याची त्यांची मनीषा पूर्ण झाली नाही. ते शिक्षण त्यांना अर्धवट सोडावे लागले. याच काळात सुरू झालेल्या असहकारिता चळवळीत त्यांनी उडी घेतली व म. गांधींच्या संपर्कात ते आले आणि हा अनुभव त्यांच्या जीवनाला व कुशाग्र बुद्धीला कलाटणी देणारा ठरला. १९३०चा मिठाचा सत्याग्रह ही राजकीय ‘स्वातंत्र्याची हाक’ नव्हती, तर ती ‘सामाजिक व शैक्षणिक स्वातंत्र्याची हाक’ होती. ग्रामीण भागात व गरिबीत जन्मलेल्या जे. पी. नायकांना या नव्या स्वातंत्र्याच्या हक्काचे आकर्षण वाटले व म. गांधींकडे येथे आकर्षित झाले. पुढचे त्यांचे सर्व आयुष्य शिक्षण, विकास, आरोग्य, ग्रामविकास, नई तालीम या विषयांसाठी त्यांनी खर्च केले.
जे. पी. नाईक यांच्या शैक्षणिक विचारावर फुले-शाहू-आंबेडकर, म. गांधी व मार्क्स यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. भारत स्वतंत्र झाल्यावर केंद्र सरकारबरोबर सल्लागार म्हणून त्यांनी एक रुपया मानधनावर शेवटपर्यंत काम केले. तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर त्यांनी जागतिक पातळीवर शिक्षणाच्या संदर्भात योगदान दिले.
अनेक अहवाल, संशोधनपर लेख, पुस्तके असे मोठे वैचारिक योगदान जे. पी. नाईक यांनी भारतीय शिक्षणाच्या संदर्भात केले आहे. पहिला शिक्षण आयोग (१९६४-६६) जो कोठारी आयोग म्हणून ओळखला जातो त्याचे पूर्ण लिखाण जे. पी. नाईक यांनी केले आहे. त्यांच्या सर्व लिखाणाचे सहा गटात वर्गीकरण केले जाते.
एक, भारताचा शिक्षणाचा इतिहास. दोन, गांधींचे शिक्षण विचार, बुनियादी तालीम. तीन, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, प्राथमिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, अनौपचारिक शिक्षण. चार, शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन. पाच, शैक्षणिक अहवाल. सहा, शिक्षण-समाज-विकास यांचा संबंध. शिक्षण नियोजन व प्रशासनासाठी महत्त्वाच्या संस्थांची उभारणी करण्याचे पायाभूत काम जे. पी नाईक यांनी केले. उदा. एनसीईआरटी, एनआयईपीएआयआयई, आयसीएसएसआरई.
भारतीय शिक्षणाचा इतिहास हा ‘ओमिशन व कमिशन’चा इतिहास आहे. भारतात शिक्षणाच्या संदर्भात इतके आयोग स्थापन झाले आहेत की, त्यांचे अहवाल व त्यांच्या शिफारशी एकावर एक रचल्या, तर विद्यार्थी चंद्रावर पोहोचेल, असे ते गमतीने म्हणत असत. जे. पी. नाईक, म. गांधींच्या चळवळीतून पुढे आली असल्यामुळे त्यांचे विचार वास्तववादी व मूलगामी आहेत. भारतातील शिक्षणाच्या तीन समस्या आहेत. अभिजन वाद, श्रेणीबद्ध समाज, जातींची उतरंड व भांडवलशाही आणि दारिद्र्य असे ते म्हणत. जे. पी. नाईक यांच्या विचारांचे सार सूत्र रूपाने त्यांच्या शेवटच्या दोन पुस्तकात आले आहे. एक, एज्युकेशन फॉर अवर पीपल (१९७८) व दोन, एज्युकेशन कमिशन अँड आफ्टर (१९७९). कोठारी आयोगाच्या अहवालात अनेक मूलगामी शैक्षणिक बदल त्यांनी नमूद केले आहेत. उदा. शिक्षण व विकास यांचा संबंध, समान शाळांची स्थापना, अभ्यासक्रमात कार्यानुभव व उत्पादन कार्याचा सहभाग, शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च करण्याची आवश्यकता, शिक्षणाची समान संधी, मुलांना, अपंगांना, सामाजिक मागास घटकांना शिक्षणाची संधी, विज्ञान शिक्षण व संशोधन, पाठ्यपुस्तकांची निर्मिती, परीक्षा पद्धत, साक्षरता प्रसार व प्रौढ शिक्षण, अल्पसंख्यांकांचे शिक्षण इ. पण कोठारी आयोगाच्या धोरणांना मर्यादित यश आले. त्याची कारणे व अपयशातून घ्यायचे धडे याची चर्चा जे. पी. नाईक यांनी मोकळेपणाने आपल्या दुसऱ्या पुस्तकात केली आहे. जे. पी. नाईक यांनी शैक्षणिक परिवर्तनाच्या पूर्वअटी खालीलप्रमाणे सांगितल्या आहेत.
एक, शिक्षण हे राजकारण आहे. दोन, शिक्षण धोरणावर समाजाच्या आर्थिक राजकीय सामाजिक पर्यावरणाचा परिणाम होत असतो. तीन, शिक्षणात परिवर्तन करायचे असेल तर त्याचबरोबर समाजात आर्थिक सामाजिक परिवर्तनाची चळवळसुद्धा चालवावी लागेल. शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाची चळवळ हातात हात घालून गेल्या तरच शिक्षणात परिवर्तन शक्य आहे. चार, शैक्षणिक परिवर्तनासाठी जनआंदोलन आवश्यक आहे. शैक्षणिक परिवर्तनासाठी शिक्षण व्यवस्थेतून व बाहेरून सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण करणे गरजेचे असते. अशा प्रकारची चळवळ स्वातंत्र्यानंतर भारतात झाली नाही असे ते खेदाने नमूद करतात. पाच, प्रौढ शिक्षण हे केवळ साक्षरतेचे शिक्षण नाही तर ते अधिकार, कर्तव्य व यांच्या जाणीव जागृतीचे शिक्षण आहे, अशी त्यांची भूमिका होती. पाउलो फेअरीच्या विचारांशी त्यांचे नाते होते. सहा, शैक्षणिक परिवर्तनासाठी प्रत्येक समाजाला परिवर्तनाची किंमत मोजावीच लागते. म्हणून क्रांतीची सुरुवात क्रांतीनेच करणे आवश्यक असते असे ते म्हणतात.
भारतात शिक्षण हे ‘ऑफ द पीपल, फॉर द पीपल व बाय द पीपल’ असायला पाहिजे असे ते म्हणतात. पुढे ते असेही म्हणतात की, शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च करणे महाग वाटत असेल तर, ते न करणे जास्त महाग होईल. जे. पी. नाईक यांच्या परिप्रेक्षातून जर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० कडे पाहिले, तर असे म्हणावे लागेल की, हे धोरण ‘अभिजनांचे शिक्षण, अभिजनांसाठी शिक्षण व अभिजनांकडून शिक्षण’ असे आहे. म्हणून या प्रतिकूल परिस्थितीत जे. पी. नाईक यांच्या विचारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
सध्याची शिक्षण पद्धती ही जनतेला शिक्षण देण्यासाठी केलेली व्यवस्था आहे असे म्हणणे चूक आहे, तर जनतेला शिक्षण नाकारण्यासाठीची ही व्यवस्था आहे. प्रत्यक्षात याचे प्रमुख उद्दिष्ट हे जनतेत शिक्षणाचा प्रसार न करणे हाच आहे. काही निवडक व्यक्तींना अभिजन वर्गात सामील करून घेण्याची व कोणी अभिजन वर्गात राहायचे हे ठरवणारी कार्यक्षम व अमानुष अशी ही यंत्रणा आहे.
- जे. पी. नाईक, भारतीय जनतेचे शिक्षण (१९७८)
(लेखक अ. भा. समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष आहेत.)
sharadjavadekar@gmail.com