तरुणांमध्ये वाढतेय सांधेदुखी

तरुणांमध्ये बैठ्या आणि निष्क्रिय जीवनशैलीमूळे सांधेदुखीचे प्रमाण वाढत आहे
तरुणांमध्ये वाढतेय सांधेदुखी

सांधेदुखी आता केवळ वयोवृद्धांपुरती मर्यादित राहिलेली नाही तर तरुणही या समस्येचे शिकार ठरत आहेत. तरुणांमध्ये बैठ्या आणि निष्क्रिय जीवनशैलीमूळे सांधेदुखीचे प्रमाण वाढत आहे. जर तुम्ही दररोज व्यायाम करत असाल, संतुलित आहार घेत असाल आणि वजन नियंत्रणात ठेवूनही आपल्याला सांध्यांची दुखी असेल, तर आपल्याला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

आजकाल तरुणांमध्ये सांधे आणि हाडांचे दुखणे ही एक सामान्य घटना ठरत आहे. संधिवात, सांध्याभोवतालच्या कुशनिंग पॅडची जळजळ, लठ्ठपणा, ल्युपस, गाऊट, सांध्यांना झालेली दुखापत, फायब्रोमायल्जिया आणि ऑस्टिओपोरोसिस हे सांधेदुखीमागील काही चिंताजनक घटक आहेत. हल्ली २५ ते ५० वयोगटातील तरुण सांधेदुखीची तक्रार घेऊन उपचाराकरिता डॉक्टरांकडे धाव घेत असल्याचे पहायला मिळते. वर्क फ्रॉम होम आणि त्याचबरोबर जास्त चरबीयुक्त आणि शर्करायुक्त आहार घेतल्याने सांधेदुखीची तक्रार वाढत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन ते तीन महिन्यांत ३०० ते ३५० हून अधिक रुग्ण सरकारी रुग्णालयांमध्ये ऑर्थोओपीडीमध्ये सांधे, पाठ आणि मानदुखीच्या तक्रारी करत आहेत. ३५ ते ५० वर्षांतील तरुणांचे दर महिन्याला ४ ते ५ रुग्णांचे निरीक्षण करत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आरोग्य तज्ज्ञांनी याचे श्रेय बैठी जीवनशैली आणि कोरोनाच्या झालेल्या परिणामांना दिले आहे.

जेव्हा हाडे कमकुवत होतात, त्यांची झीज होते तेव्हा संधिवात आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या अनेक परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते. टेंडिनाइटिस, किंवा हाडांची जळजळ, हाड किंवा सांध्याचा संसर्ग, सांध्याची झीज, कर्करोग, मुडदूस, व्हिटॅमिन ‘डी’ च्या कमतरतेमुळे सांधेदुखी होऊ शकते. तरुणांना सांधेदुखी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.

पालिका आरोग्य विभागातील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, " बहुसंख्य वृद्ध लोक दरवर्षी सांधेदुखीवर उपचार घेतात. सध्या, २०, ३० आणि ४० च्या वयाचे तरुण देखील सांधेदुखीची तक्रार करत आहेत. सांधे सुजणे, लाल होणे, सतत दुखणे आणि ताप येणे ही त्याची लक्षणे आहेत. १५-२० टक्के तरुण रुग्णांना त्यांच्या ४०शीच्या सुरुवातीच्या काळात सांधेदुखीचा त्रास होतो,” असे सरकारी रुग्णालयातील वरिष्ठ ऑर्थोपेडिक म्हणाले.

“तरुणांमध्ये सांधेदुखी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक सामान्यतः सांधेदुखीने त्रस्त आहेत. दररोज ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांपैकी २-३ रुग्णांना सांधेदुखीचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. सुमारे ५-७ वर्षांपूर्वी, बहुतेक संधिवात रुग्ण ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. आता, रुग्ण अगदी १६ वर्षांचा देखील असू शकतो. ३० वर्षांचे तरुण त्यांच्या सांध्यातील वेदना, सांधेदुखी घेऊन आमच्याकडे येत आहेत,” असे ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हणाले .

"व्हिटॅमिन बी १२ आणि कॅल्शियमची कमतरता यासारख्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास सांधेदुखी होऊ शकते. “गेल्या २-३ महिन्यांत आम्ही ३० रुग्णांना सांधेदुखीच्या समस्येने ग्रासलेले पाहिले आहे. त्यापैकी, ६०% महिला आणि ४०% पुरुष - सर्व २५-४० वयोगटातील होत्या. सांधेदुखी काहीवेळा, काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे देखील समस्या उद्भवते,” असे सर्जन म्हणाले.

'या' आजाराचे शंभर प्रकार !

संधिवात हा सांध्यातील वेदना आणि सूज यांच्याशी संबंधित आजार आहे. या आजाराचे शंभर प्रकार आहेत. त्यापैकी ऑस्टियोआर्थरायटिस, रूमेटोइड, गाउट, फायब्रोमायल्जिया, चाइल्डहुड आर्थरायटिसचे प्रमाण जास्त आहे. ही एक असाध्य वैद्यकीय स्थिती आहे. एकदा का आजार हा जडला तर त्यासोबत तुम्हाला आयुष्यभर जगावे लागेल. मात्र, उपचाराने हा आजार आटोक्यात ठेवता येतो. जर बराच काळ सांधेदुखीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास सांध्याच्या कार्यासोबतच त्याचा आकारही प्रभावित होतो. आणि हा त्रास बळावू शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या आजाराची लक्षणे

सांध्याला सूज येणे, सांधा दुखत राहणे, हाताचे व छोटे सांधे सकाळी आखडणे, वेदना वाढत जाणे, त्यानंतर सांध्यांची सूज व दुखणे कमी होणे, ही सांधेदुखीची लक्षणे आहेत. रिम्युटाइट आर्थरायटीस अर्थात अनुवांशिक अथवा तारुण्यातील सांधेदुखीच्या आजारामध्ये हातापायांचे लहान सांधे सुजणे, दुखणे ही प्राथमिक लक्षणे आढळून येतात.

काय उपचार कराल?

- सांधेदुखीच्या समस्येपासून सुटका होण्यासाठी कमी कॅलरीज असलेल्या अन्नाचे सेवन, जंक फूड, प्रक्रिया केलेले आणि हवाबंद डब्यातील अन्नपदार्थ खाणे टाळावे. आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा, दररोज व्यायाम करा आणि कोणत्याही सप्लिमेंट्सचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करा.

- हॉट ॲंड कोल्ड थेरपीचा पर्याय निवडल्याने सांधेदुखी कमी होऊ शकते. उडी मारण्यासारख्या सांध्यावर अतिरिक्त ताण येण्यासारख्या कृती करू नका. हलक्या हाताने मसाज करा जेणेकरून सांधेदुखीपासून आराम मिळेल.

तरुणांमध्ये हाडांच्या समस्या वाढत आहेत. बहुतांश तरुणांचा जास्त वेळ ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर जातो. त्यातच एका जागी बसून, चुकीच्या पद्धतीने पाठदुखी, लठ्ठपणा आणि मानेचे आजार वाढतात. काही फिजिओथेरपीने बरे होऊ शकतात. कालांतराने, जेव्हा हाडे ठीसूळ होतात, तेव्हा ते संधिवात आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या अनेक परिस्थितींना आमंत्रण देऊ शकतात.

- डॉ. एकनाथ पवार, एचओडी, ऑर्थोपेडिक विभाग

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in