
प्रासंगिक
पांडुरंग भाबल
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या 'महापरिनिर्वाण दिना'निमित्त त्यांच्या पत्रकारितेचा आढावा घेणे आवश्यक आहे. आज पत्रकारितेची जी अवस्था झालेली आहे ती पाहता बाबासाहेबांची पत्रकारिता किती वेगळी होती, जनकेंद्री होती, हे समजून घेतले तर आजच्या पत्रकारितेत काही बदल होऊ शकेल.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे कैवारी, अर्थतज्ज्ञ, कायदे पंडित, कामगार नेते, पत्रकार, वक्ते व भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे १९ व्या शतकातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे ‘युगपुरुष’ आहेत. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोठे आहे. दुर्दैवाने स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. ते विद्यासंपन्न, राजकारणाने सर्वव्यापी, बुद्धिप्रामाण्यवादी, पत्रकारितेने लढवय्ये व सामाजिक पुनर्घटनेचे भाष्यकार होते. म्हणूनच जनतेच्या हृदयात त्यांना अढळ प्राप्त झाल्याचे दिसते.
महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये दर्पण हे नियतकालिक सुरू करून मराठी पत्रकारितेचा प्रारंभ केल्यानंतर त्यावर ब्राह्मणशाहीचेच वर्चस्व होते. त्याला छेद देण्याचा प्रयत्न कालांतराने महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून झाला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता क्षेत्राकडे आजही विश्वासाने पाहिले जाते. त्याची विश्वासार्हता जपण्यासाठी लोकशाही मूल्यांशी निष्ठा राखून
प्रबोधनाचा वारसा चालवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
१८३२ ते १८४० हा ‘दर्पण ते प्रभाकर’चा काळ मराठी वृत्तपत्रांच्या जडणघडणीचा काळ होता. १८७४ नंतर महात्मा फुले, नारायण लोखंडे व भालेकर यांनी ‘दीनबंधू’ची स्थापना केली. यातूनच पुढे दलितांच्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी बाबासाहेबांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूक नायक’ हे पाक्षिक सुरू केले. त्यानंतरच्या दोन-तीन दशकात अनेक मराठी वृत्तपत्रे जन्माला आली. त्यातूनच काही संपादकांच्या हाती चळवळींचे नेतृत्व आले. अर्थात प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून यश मिळवणाऱ्यांमध्ये डॉ. बाबासाहेबांची कर्तबगारी महत्त्वपूर्ण व वरची ठरलीआहे. अर्थात लोकहित आणि लोककल्याण ही त्यांच्या पत्रकारितेची बिरुदावली होती,तर लोकशिक्षण, प्रबोधन, हित, कल्याणव विकास ही त्यांच्या पत्रकारितेची पंचमूल्ये होती.
दलित बांधवांनी मुलांना विद्यासंपन्न करावे या इच्छेपोटी दलितांना हक्क व अधिकारांची जाणीव करून देताना त्यांनी काय खावे व प्यावे हे सांगितले. त्यांना स्वाभिमान शिकवताना व त्यांच्या हक्कांची कैफियत मांडून सभा, संमेलने, परिषदा व सत्याग्रहातून त्यांच्या अस्तित्वाचे व अस्मितेचे लढे तीव्र केले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचा पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसार व प्रचार केला. त्यासाठी वृत्तपत्रासारखी साधने त्यांना सिद्ध करावी लागली.
‘मूकनायक’पासून खऱ्या अर्थाने त्यांच्या पत्रकारितेच्या जीवनाला प्रारंभ झाला. त्यावेळी मूकनायकच्या पहिल्या १४ अंकांचे अग्रलेख हे बाबासाहेबांनी स्वतः लिहिले होते. दरम्यानच्या काळात उच्च शिक्षणासाठी त्यांचे लंडनला जाणे व घरगुती अडचणी यामुळे ८ एप्रिल १९२३ रोजी त्यांना ‘मूकनायक’ बंद करावे लागले. या कटू अनुभवानंतरही डगमगून न जाता परदेशातून आल्यावर विस्कटलेली आर्थिक घडी त्यांनी पुन्हा बसवली. आपले वृत्तपत्र आणि चळवळ भक्कम पायावर उभारण्यासाठी त्यांनी ३ एप्रिल १९२७ ला मुंबईतून ‘बहिष्कृत भारत’ हे नवे पाक्षिक सुरू केले. त्याचे संपादन मात्र स्वतःच करीत असल्याने त्यातून अग्रलेख लिहिताना गंभीर विचार, ज्वलंत सामाजिक तळमळ, तर्कशुद्ध विवेचन व नि:पक्षपाती कठोर टीका असे वैचारिक बालामृत देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ओघवती भाषा, नेटका आशय व आकर्षक शीर्षके अशी त्यांची स्फुटे असत. त्यांच्या अग्रलेखातून मूकनायकचा आढावा, महाडचा सत्याग्रह, महार वतने, बालविवाह, ब्राह्मण्यवाद, वर्णाश्रम, शुद्धी कार्य, मनुस्मृती दहन, मंदिर प्रवेश, राजकीय व सामाजिक स्थित्यंतरे, हिंदू धर्मशास्त्र, देशाचे भवितव्य, सत्यशोधक कार्य, गिरणी मालक व कामगार संबंध, हिंदू महासभा आणि अस्पृश्यता तसेच पर्वती सत्याग्रह आदींवर त्यांनी कठोर प्रहार करताना स्पष्टपणे व निर्भीडपणे आपले विचार व्यक्त केले.
पत्रकारिता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य पैलू होता. परंतु दलितांसाठी राजकीय हक्कांचे रक्षण करण्याची वेळ आल्याने अखेर ‘बहिष्कृत भारत’साठी वेळ देता येत नाही, या जाणिवेमुळे अखेर १५ नोव्हेंबर १९२९ ला ते बंद करावे लागले. आजही दलित व दलितेतरांच्या आरक्षणावर संशयाची टांगती तलवार असल्याचे वातावरण आहेच. कालांतराने राजकारण, मजूर पक्षाची स्थापना व कामगारांचे प्रश्न यामध्ये ते व्यस्त असूनही, समाजसेवा संघाच्या ‘समता’ व ‘जनता’ या साप्ताहिकांमध्ये काही काळ त्यांनी संपादन केले. १९५६ मध्ये ‘जनता’चे ‘प्रबुद्ध भारत’मध्ये रूपांतर केल्यावर २५ वर्षे संपादक म्हणून भूमिका बजावली. दरम्यान, आपल्या लेखन कलेची चुणूक देशाला दाखवून निखळ व निस्पृह अशा पत्रकारितेच्या अंगाची प्रचिती आणून दिली. स्वतःचे उच्च शिक्षण, राजकारण, समाजकारण व राज्यघटनेचे महान कार्य करीत रात्रंदिवस अतोनात परिश्रम करताना, प्रसंगी त्यांनी विदेशातूनही वार्तापत्रे पाठवली. वृत्तपत्रीय ऋण हे लौकिक ऋण म्हणताना निस्वार्थी पत्रकारिता करणारे ते एकमेव असे ‘लोकपत्रकार’ ठरतात. अर्थ, राज्य, इतिहास, समाजशास्त्र व कायदा या ज्ञानशाखांचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. म. फुलेंचा आदर्श घेताना लोकपत्रकारितेची प्रेरणा मात्र त्यांनी ब्राह्मणेत्तर वृत्तपत्रांपासून घेतली. तत्पूर्वी जांभेकर, टिळक, आगरकर, परांजपे, केळकर, खाडिलकर व परुळेकर आदींच्या वृत्तपत्रीय कारकीर्दींचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. पत्रकारितेच्या या कामी सयाजीराव गायकवाड व राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना पाठबळ दिले होते.
सामाजिक हक्क मिळवण्यासाठी समाज जागृती, सनातनी सवर्ण व सरकार यांच्याशी दोन हात करणे अशा तीन पातळ्यांवर त्यांचा लढा सुरू होता. लोकजागृती करत, लोक लढे उभारून लेखणीच्या मदतीने लढ्यांचे नेतृत्व करणे ही त्यांच्या पत्रकारितेची दिशा होती.
‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ ही शिकवण दलित समाजामध्ये रुजावी म्हणून त्यांनी वृत्तपत्रांची निर्मिती केली. प्रभावशाली व प्रतिभावान ध्येयवादी संपादक म्हणूनही त्यांचे कार्य कायमचे स्मरणात राहणार आहे.
देशाला आदर्श राज्यघटना देणाऱ्या या प्रज्ञासूर्य महामानवाचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महानिर्वाण झाले. त्यांचे मुंबईत भव्यदिव्य स्मारक लवकरच उभे राहणार असल्याने त्याद्वारे त्यांच्या महान कार्याची ओळख नव्या पिढीला प्रेरणादायी ठरावी. भारतमातेच्या या थोर सुपुत्रास मानाचे वंदन!
लेखक आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक आहेत.