आज जगभर ज्युलियन असांज (जन्म १९७१) हे नाव चर्चेत आहे. असांज ही एक ऑस्ट्रेलियन पत्रकार, संपादक आणि विविध चळवळींशी जीवंत संबंध ठेवलेली व्यक्ती आहे. आजच्या आंतरजालाच्या जगात त्याने इ.स. २००६ साली ‘विकीलिक्स’ हे संकेतस्थळ सुरू केले. या संकेतस्थळाच्या नावात हे संकेतस्थळ सुरू करण्याचा हेतू स्पष्ट होतो. हा हेतू म्हणजे विविध प्रकारची महत्वाची माहिती जी जगभरची सरकारं या ना त्या कारणाने दडवून ठेवतात, ती अशी माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे. सुरूवातीला ‘विकीलिक्स’कडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. पण या संकेतस्थळाने २०१० साली अमेरिकच्या संरक्षण विभागाचे गुप्त कागदपत्रं संकेतस्थळावर टाकली. यानंतर एकच भडाका उडाला.
तसं पाहिलं तर या प्रकारे सरकारची गोपनीय कागदपत्रं समाजासमोर आणणं हे कार्य वृत्तपत्रांनी अनेकदा केलेले आहे. अमेरिकेतील वृत्तपत्रं तर याबाबतीत आघाडीवर असतात. १९७१ साली ‘न्युयॉर्क टार्इम्स’ ने अमेरिकेच्या व्हिएतनाममधील उचापत्या वेशीवर टांगण्यास सुरूवात केली. यातील पहिला लेख 13 जून १९७१ रोजी प्रसिद्ध झाला. तिसऱ्याच दिवशी अमेरिकन सरकारने या प्रकाशनावर बंदी आणली. नंतर ‘न्युयॉर्क टाइम्स’ सर्वोच्च न्यायालयात गेले. पंधरा दिवसांनी म्हणजे ३० जून १९७१ रोजी सर्वोच्च न्यायालयाचा (६ विरूद्ध ३ न्यायमूर्ती) निर्णय देऊन हा निर्णय रद्द ठरवला. तेव्हापासून अमेरिकेत अशा प्रकारे शासन आणि माध्यमं यांच्यात अधूनमधून वादावादी होत असते. या पार्श्वभूमीवर ज्युलियन असांज प्रकरणाची चर्चा करावी लागते.
या प्रकारामुळे अमेरिका असांजच्या मागे हात धुवून लागली. त्याला अ़मेरिकेने सळो की पळो करून सोडले होते. अमेरिकन पोलिसांपासून लपून राहण्यासाठी असांजने अनेक हिकमती केल्या. याची सुरूवात स्वीडन या देशापासून झाली. स्वीडनने २०१० साली असांजवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या खटल्याची सुनावणी जेव्हा २०१२ मध्ये सुरू होती तेव्हा त्याने स्वीडनमध्ये हजर राहावे अशी नोटीस बजावली. असांजला यात काहीतरी काळंबेरं आहे असा संशय आला. स्वीडनच्या मदतीने अमेरिकेने आपल्याला अटक करण्याचा कट केला आहे असा त्याचा ग्रह झाला. एवढेच नव्हे तर यात इंग्लंडचीसुद्धा स्वीडन आणि अमेरिकेला साथ आहे असेही त्याला वाटायला लागले. एवढी वर्षं असांजला इंग्लंडमध्ये सुरक्षित वाटत होते. आता मात्र तो मनातून घाबरला. मात्र उघडपणे इंग्लंडमधून बाहेर पडणे शक्य नव्हते. म्हणून मग त्याने नामी युक्ती केली. असांजने हेल्मेट घातले आणि मोटारसायकलवरून इक्वेडोर या देशाच्या दुतावासात आश्रय घेतला. त्यानंतर बरीच वर्षे असांज इक्वेडोरमध्ये होता. पण गप्प बसेल तो असांज कसला? त्याने तेथेही त्या देशातील भ्रष्टाचाराची प्रकरणं उजेडात आणली. सरतेशेवटी २०१९ मध्ये इक्वेडोरनेसुद्धा त्याला लंडनमधील दुतावास सोडून जाण्यास सांगितले. त्यानंतर ब्रिटनने त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर खटले भरले. यात असांजला पन्नास आठवडयांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली. याबद्दल जगातील अनेक विचारवंतांनी इंग्लंडच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. यात अमेरिकन विचारवंत नोआम चोम्स्की आघाडीवर होते. भारतातील अरूंधती रॉयनेसुद्धा असांजला पाठिंबा दिला आहे. असांजच्या समर्थनार्थ पाश्चात्य देशांतील अनेक शहरात मोठमोठे मोर्चे निघाले आहेत.
असांज प्रकारणातील पेच व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. इंग्लंडमध्ये खटले चालले आणि त्यात असांजला शिक्षा झाली. त्यानंतर आता त्याला अमेरिकेला पाठवण्याची काय गरज आहे, हा खरा प्रश्न आहे. याबद्दल अमेरिकेप्रमाणे आज युरोपमध्ये जबरदस्त वादावादी सुरू आहे. असांजला अमेरिकेच्या ताब्यात दिले तर आविष्कार स्वातंत्र्य आणि माध्यमांचं स्वातंत्र यावर गदा येते वगैरे वादाचे विषय आहेत. दुसरे म्हणजे यात असांज एकटा नव्हता. त्याला जर शिक्षा द्यायची असेल तर त्याला मदत करणाऱ्यांना शिक्षा का नको? असांजने अमेरिकेची गुप्त कागदपत्रं वेशीवर टांगली ती कागदपत्रं त्याला चेल्सिया मॅनिंग या व्यक्ती दिली. असांजला जर शिक्षा देत असाल तर मग चेल्सियाला का नाही? असे टोकदार प्रश्न उपस्थित होत आहेत.
२०१९ पासून असांज इंग्लंडमधील तुरूंगात आहे. दरम्यान त्याची प्रकृती खराब झाली. याबद्दलसुद्धा जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जगभर ‘लँन्सेट’ वैद्यकीय नियतकालिक आदरणीय समजले जाते. या नियतकालिकांत जेष्ठ डॉक्टरांच्या एका टीमने जाहीर पत्र लिहून असांजच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ही घटना दखलपात्र आहे. लँन्सेट मासिक अशी राजकीय भूमिका, तीसुद्धा अशी जाहीरपणे कधीच घेत नाही. यातून असांजबद्दल जगातल्या काही वर्गांत किती आपुलकीची भावना आहे हेच लक्षात येते.
सध्याच्या स्थितीनुसार १७ जुन २०२२ रोजी इंग्लंडच्या गृहमंत्री श्रीमती प्रीति पटेल यांनी असांज याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. इंग्लंडमधील नियमांनुसार येत्या सतरा दिवसांच्या आत असांजला गृहखात्याच्या निर्णयाच्या विरोधात याचिका दाखल करावी लागेल. ही याचिका जर फेटाळली गेली तर असांज मानवी हक्क आयोगापुढे दाद मागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शीतयुद्धाच्या काळात घडत होते तसे आता असांजबद्दल होत आहे. एका बाजूला असांज अमेरिकेला हवा आहे तर दुसरीकडून रशियाचे सर्वेसर्वा पुतीन असांजच्या खांद्यावर बंदुक ठेवून अमेरिकेवर निशाणा साधत आहे. अमेरिका ज्याप्रकारे असांजच्या मागे हात धुवून लागली आहे त्याचा उल्लेख करत पुतीन अमेरिकन समाजाला जाहीर प्रश्न विचारत आहेत की हीच तुमची लोकशाही आहे का? यामुळे अमेरिकन सरकार अधिकच चिडले आहे.
अमेरिकेला असांजचा राग येण्याचे आणखी एक कारण म्हणजे २०१३ साली असांजने एडवर्ड स्नोडेनला अमेरिकेतून बाहेर पडण्यास मदत केली होती. इ.स. २०१२ आणि २०१३ च्या दरम्यान स्नोडेन यांनी असांजला न्युझिलंड सरकारच्या विरोधात भरपूर कागदपत्रं मिळवून दिली होती. एवढेच नव्हे तर २०१६ साली जेव्हा अमेरिकेत राष्ट्रापतीपदाची निवडणूक जोरात होती तेव्हा असांजने हिलरी क्लिंटनच्या विरोधात जाणारी काही कागदपत्रं संकेतस्थळावर टाकली. काही अभ्यासकांच्या मते यामुळे हिलरी क्लिंटनचा पराभव झाला आणि ट्रम्प विजयी झाले.
मार्च २०२२ मध्ये असांजने तुरूंगात असतांनाच स्टेला मॉरीस या त्याच्या प्रेयसीशी लग्न केले. ते दोघे २०१५ सालापासून ‘लिव्हइन’ संबंधात होते. त्यांना दोन मूलं आहेत. त्यांच्या तुरूंगातील लग्नाला दोन्ही मूलं हजर होती. आता तीसुद्धा असांजच्या बचावासाठी जोरदार आणि जागतिक पातळीवर प्रयत्न करत आहे.
असांजला जर अमेरिकेत पाठवले तर तिथे त्याच्यावर १९१७ सालच्या हेरगिरी कायद्याखाली खटला भरण्यात येणार आहे. असांजवर अनेकदा तो अमेरिकाविरोधी असल्याचा आरोप करण्यात येतो. असांजने हा आरोप नेहमीच फेटाळला आहे. त्याच्या मते तो किंवा त्याची यंत्रणा कोण्या एका व्यक्तीच्या विरोधात किंवा देशाच्या विरोधात नाही. आमची यंत्रणा अशी माहिती मिळवून प्रसिद्ध करतो. ज्यामुळे काही चांगला बदल होईल. असांजच्या पत्रकारितेच्या संदर्भात एका बाबीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. इतर पत्रकार माहिती मिळवतात. तिचा अभ्यास करतात आणि मग त्यांनी लावलेला अन्वयार्थ वाचकांसमोर मांडतात. ‘विकीलिक्स’ची पत्रकारिता वेगळी आहे. ‘विकीलिक्स’ माहिती मिळवते आणि जशीच्या तशी वाचकांसमोर ठेवते. वाचकांनी स्वतः या माहितीचा अर्थ लावावा. ही वेगळया प्रकारची पत्रकारिता आहे जी एका पातळीवर कौतुकास्पद आहेच.
असांज प्रकरणाचे काय होईल हे लवकरच कळेल. मात्र या ऑस्ट्रेलियन माणसाने पाश्चात्य आणि अमेरिकन पत्रकारीतेसमोर आणि लोकशाही शासनव्यवस्थेसमोर मूलभूत प्रश्न ठेवले आहेत, यात शंका नाही