
शिक्षणनामा
रमेश बिजेकर
शोषणाचे ब्राह्मणी सांस्कृतिक बंध हे जीवनाचे सर्वोच्च मूल्य मानले जातात, हे जोतीरावांनी ओळखले होते. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना अब्राह्मणी भौतिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाची गरज वाटली. याच दृष्टिकोनातून ते शिक्षणाकडे पाहत होते.
शूद्रांच्या अवनतीला अज्ञान कारणीभूत आहे, हे जोतीराव फुलेंनी ‘विद्येविना मती गेली... एवढे अनर्थ एका अविद्येने केले’ या सुप्रसिद्ध वचनातून सांगितले. हे अज्ञान कोणते, हे त्यांनी स्पष्ट केले. पितृसत्ता, जातिव्यवस्था आणि साम्राज्यवादी व्यवस्था या शोषणावर आधारित आहेत. या तिन्ही शोषण आणि शासन संस्था एकत्र येऊन काम करतात. या शोषणव्यवस्थेच्या समर्थनासाठी प्रभुत्वशाली वर्ग धर्म आणि संस्कृतीचा वापर करतो. शोषणाची व्यवस्था, तिचे कारण आणि संस्कृती यांच्यातील संबंधांबद्दल जनतेमध्ये अज्ञान आहे, हे जोतीरावांनी अधोरेखित केले. हे मूलभूत चिंतन त्यांच्या लिखाणात आणि कार्यात केंद्रस्थानी होते. अविवेकी कर्मकांड, प्रथा आणि परंपरांमध्ये अडकल्यामुळे भौतिक व मानसिक शोषण कसे होते, याचे मार्मिक विश्लेषण त्यांनी केले. शोषणाचे ब्राह्मणी सांस्कृतिक बंध हेच जीवनाचे सर्वोच्च मूल्य मानले जातात, हे जोतीरावांनी ओळखले होते. यातून सुटका करण्यासाठी त्यांनी अब्राह्मणी भौतिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाची गरज व्यक्त केली. शिक्षणाकडे ते याच दृष्टीने पाहत होते.
हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनात त्यांनी ब्राह्मणी गुलामगिरीतून शूद्रांची सुटका व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तेव्हाची प्रचलित शिक्षण पद्धती उच्चवर्णीय प्रभुत्वाखाली काम करत होती आणि केवळ त्यांच्या हिताचेच काम करत होती. या पद्धतीतून अनुपयोगी ज्ञानाला प्रोत्साहन दिले जात होते, ज्यामुळे जीवनोपयोगी ज्ञान मिळत नव्हते. तर्क आणि चिकित्सेला वावच नव्हता. गुलामगिरीतून सुटकेचा संबंध त्यांनी शिक्षणाशी अशा प्रकारे जोडला: ‘...गुलामगिरीचे जे पाश ब्राह्मणांनी शूद्र बांधवांच्या गळ्याभोवती घट्ट आवळले आहेत, त्यातून त्यांची मुक्तता करण्याचे श्रेय सरकारने स्वतःहून मिळवावे. त्याचबरोबर, शिक्षणाचा लाभ झालेल्या प्रत्येक शूद्र बांधवाचे हे कर्तव्य आहे की, त्याने आपल्या बांधवांची ब्राह्मणी दास्यातून सुटका व्हावी म्हणून यथाशक्ती प्रयत्न करावेत.’
शाळांमध्ये शिक्षक नियुक्ती आणि अभ्यासक्रमावर सामाजिक उतरंडीचा प्रभाव असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. व्हर्नाक्युलर शाळांमध्ये बहुतेक शिक्षक ब्राह्मण होते आणि ते व्यावहारिकदृष्ट्या अनुपयुक्त व प्रगतिशील नसलेला अभ्यासक्रम शिकवत होते. हा अभ्यासक्रम ब्रिटिश सत्ता आणि ब्राह्मणी व्यवस्थेला पोषक होता. जातिव्यवस्थेमुळे ब्राह्मण शिक्षक विद्यार्थ्यांशी फटकून वागत. त्यांच्या सुख-दुःखात ते सहभागी होत नव्हते. याचा परिणाम म्हणून शूद्र विद्यार्थ्यांना शाळा आपली वाटत नव्हती. शूद्र (ओबीसी) समाज उत्पादक असल्यामुळे, त्यांच्या उत्पादक संस्कृतीचा शाळेच्या वातावरणाशी मेळ बसत नव्हता. ब्राह्मण शिक्षक हा मेळ घालण्यात असमर्थ होते. व्यावहारिकदृष्ट्या निरुपयोगी आणि प्रगतिशील नसलेला अभ्यासक्रम त्यांना परका आणि अवघड वाटत होता. व्यावहारिक उपयोगिता आणि प्रगती यांचा संबंध उत्पादन, वितरण तत्त्वे आणि कौशल्यांशी आहे. या ज्ञानाशी शूद्र विद्यार्थी लवकर जुळवून घेऊ शकत होते. म्हणूनच, जोतीरावांनी उत्पादक ज्ञानाला प्रोत्साहन दिले.
सामूहिकता, न्याय, प्रगती, लोकशाही ही मूल्ये उत्पादन आणि वितरणाच्या तत्त्वांमध्येच अंतर्भूत असतात. पण हे संबंध जातींमध्ये बंदिस्त झाल्यामुळे अन्याय, अधोगती आणि शोषण अस्तित्वात आले. ही कोंडी फोडण्यासाठी जोतीरावांनी अभ्यासक्रमाची पुनर्रचना आणि ब्राह्मणेतर शिक्षकांच्या नियुक्तीचा आग्रह धरला. अभ्यासक्रमात शेतीचे ज्ञान आणि ‘आदर्श’ शेती योजना राबवण्याचा पर्याय त्यांनी सुचवला. ‘अभ्यासक्रमात मोडी-बाळबोध, लेखन-वाचन, हिशेबाची माहिती, सर्वसाधारण इतिहास, भूगोल, व्याकरण याचे प्राथमिक ज्ञान, शेतीचे प्राथमिक ज्ञान, तसेच नीती आणि आरोग्य यासंबंधीचे सोपे धडे असावेत... विद्यार्थ्यांना शेतीवरील पाठांच्या जोडीने प्रत्यक्ष व्यावहारिक शिक्षण देता यावे म्हणून एक आदर्श शेतीची छोटीशी योजना असल्यास ती निश्चितच फायदेशीर ठरेल.’ अभ्यासक्रमाच्या पर्यायात जोतीरावांनी उत्पादक, मूलभूत ज्ञान आणि मानव्य ज्ञान शाखांना महत्त्व दिले. हा शिक्षणविषयक दृष्टिकोन ब्राह्मणी ज्ञान नाकारणारा आणि अब्राह्मणी ज्ञान शाखांना प्रोत्साहन देणारा होता.
जोतीराव फुलेंच्या शिक्षण आशयाचा अब्राह्मणी दृष्टिकोन त्यांनी सुरू केलेल्या शाळांमधूनही व्यक्त होतो. मुक्ता साळवे ही विद्यार्थिनी जोतीराव आणि सावित्रीबाईंच्या शाळेत शिकली. तिने सातवीत असताना ‘महार-मांगाच्या दुःखाविषयी’ हा निबंध लिहिला. तिच्या निबंधात तिने तत्कालीन व्यवस्थेला निरुत्तर करणारे प्रश्न विचारले आहेत. तिच्या लिखाणात तर्क, चिकित्सा, इतिहास आणि व्यवस्थेचे भान व्यक्त झाले आहे. या लिखाणात भावनिक असूनही तिने विचारांची पकड सोडली नाही, हे तिच्या लिखाणाचे दुसरे वैशिष्ट्य आहे. वेदांतिक ब्राह्मणी धर्म ब्राह्मणांसाठी राखीव होता. इतरांना वेदाध्ययन करण्यास मनाई होती. इतरांनी तसे करणे पाप मानले जात असे. मग ‘आमचा धर्म कोणता?’ असा मार्मिक प्रश्न तिने उपस्थित केला. केवळ प्रश्न विचारून ती थांबली नाही, तर तिने धर्म नाकारण्याची भूमिका घेतली. जो धर्म किंवा ज्ञान सर्वांसाठी नाही, असा धर्म पृथ्वीवरून नष्ट व्हावा, अशी इच्छा ती व्यक्त करते.
पेशवाईतील क्रूर आणि अमानवीय प्रथेमुळे जातिव्यवस्थेचा क्रूर चेहरा मुक्ता साळवेने उघड केला. एवढेच नव्हे, तर जातींमध्ये बंदिस्त झालेल्या उत्पादन संबंधांची उकल केली आणि जाती-उत्पादन संबंधाचे नाते शिक्षणबंदीशी जोडले. जातिव्यवस्थेच्या टोकाच्या शोषणाचे दुःख तिने उघड्यावर बाळंत होणाऱ्या स्त्रीचे उदाहरण देऊन मांडले. हे दुःख मांडताना तिने ते वैश्विक बनवून एका परिपक्व राजकीय दृष्टिकोनाचा परिचय दिला. इंग्रज आल्यामुळे महार-मांगांचे दुःख पूर्वीसारखे राहिले नाही, अस्पृश्यता थोडी कमी झाली, पण पूर्णपणे संपलेली नाही. ती संपवण्यासाठी तिने शिक्षणाची कास धरण्यास सांगितले. शिक्षणातून सुसंस्कृत पिढी तयार होईल अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. जोतीराव फुलेंनी जाती-पुरुषसत्ताक शोषण व्यवस्थेच्या ज्ञानात्मक अधिष्ठानाला आव्हान दिले. जातीभेद नष्ट करणे आणि स्त्री-पुरुष समतेच्या ज्ञानव्यवहाराला महत्त्व दिले व शिक्षणात त्याला प्रोत्साहन दिले. याचा पुरावा म्हणून आपण मुक्ता साळवेच्या निबंधाकडे पाहू शकतो. जोतीराव फुलेंच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाचे तीन सिद्धांत डॉ. उमेश बगाडे यांनी मांडले आहेत. सामाजिक उतरंडीतील व्यक्तीचे स्थान, उत्पादक ज्ञान आणि मानवी संबंध हे त्यांनी पुढीलप्रमाणे मांडले आहेत: ‘...व्यक्ती आणि समुदायाला स्वतःचे अस्तित्व आणि ओळख देणारे परंपरा व इतिहासाचे ज्ञान. या ज्ञानाला सत्तेच्या वर्चस्वाचे आणि त्यातून मुक्त होण्याचे असे दुहेरी स्वरूप असल्याचे जोतीरावांनी दाखवले आहे... जोतीरावांनी सांगितलेले दुसऱ्या प्रकारचे ज्ञान म्हणजे अनुभवाधिष्ठित ज्ञान. संपूर्ण मानव जातीने हजारो वर्षांच्या प्रक्रियेत जमा केलेले निसर्ग आणि भौतिक व्यवहाराचे ज्ञान म्हणजे अनुभवाधिष्ठित ज्ञान... जोतीरावांच्या संकल्पनेतील तिसरा घटक म्हणजे माणसा-माणसांमधील संबंध निश्चित करणारे नीती ज्ञान होय... राजसंस्थेला स्वतःचा स्वतंत्र कायदा नसल्यामुळे ब्राह्मणी धर्मसंस्थाच सामाजिक नीती-नियमांचे आधारस्थान होती... जाती पंचायती, गाव समुदाय आणि राज्यसंस्था यांनी ब्राह्मणी धर्माच्या नीतिसंहिता व दंडविधानानुसार मानवी संबंधांचे नियंत्रण करण्याची भूमिका सातत्याने बजावली... जोतीरावांनी सामाजिक संबंधांच्या ज्ञानाची पुनर्रचना करण्याची भूमिका घेतली.’
या तीन ज्ञान सिद्धांतांतून ब्राह्मणी ज्ञान व्यवहार आणि परंपरेची चिकित्सा करून एक पर्याय दिला. ज्ञानाला दोन परस्परविरोधी बाजू असतात, त्यापैकी व्यवस्थेचे भान देऊन स्वतःची ओळख जागृत करणाऱ्या अब्राह्मणी ज्ञानाला त्यांनी प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाने भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये एकाच प्रकारच्या ब्राह्मणी ज्ञान परंपरेला प्रोत्साहन दिले आहे. जोतीराव फुलेंच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनातून या आव्हानाला सामोरे जाता येईल, असा विश्वास आहे.
rameshbijekar2@gmail.com