काकस्पर्श

आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात आणि म्हणून त्यांना जेवणाचे ताट गच्चीत ठेवतात. अपुरी इच्छा आणि वासना मागे ठेवून एखादी व्यक्ती मेली, तर कावळा शिवत नाही. ती इच्छा पूर्ण करण्याचे वचन नातेवाईकाने दिले, तरच कावळा पिंडाला शिवतो, अशी अंधश्रद्धा आहे. त्याचा मृतात्म्याच्या इच्छेशी काहीही संबंध नाही. पिंडाला कावळा शिवणे हा प्रकार मुस्लिम, ख्रिश्चन धर्मीयांत नाही.
काकस्पर्श
Published on

भ्रम -विभ्रम

डॉ. अस्मिता बालगावकर

आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात आणि म्हणून त्यांना जेवणाचे ताट गच्चीत ठेवतात. अपुरी इच्छा आणि वासना मागे ठेवून एखादी व्यक्ती मेली, तर कावळा शिवत नाही. ती इच्छा पूर्ण करण्याचे वचन नातेवाईकाने दिले, तरच कावळा पिंडाला शिवतो, अशी अंधश्रद्धा आहे. त्याचा मृतात्म्याच्या इच्छेशी काहीही संबंध नाही. पिंडाला कावळा शिवणे हा प्रकार मुस्लिम, ख्रिश्चन धर्मीयांत नाही. मग या धर्मांतील सर्व व्यक्ती मरतेवेळी समाधानी असतात काय?

आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व श्रद्धा व्यक्त करण्याच्या काळास पितृपंधरवडा किंवा श्राद्धपक्ष असे म्हटले जाते. मग ही कृतज्ञता व श्रद्धा गरजू, पीडित व्यक्तीस सहकार्य करून, दान करून, सत्कार्य करून सुद्धा व्यक्त करू शकतो. परंतु अनेकदा लोक वर्षानुवर्षे करत आलेल्या गोष्टीचे अंधानुकरण करतात. त्यात पुरोहितास बोलावून मंत्र, पूजा, जेवण, दक्षिणा, वस्त्र, पात्र इ. गोष्टी केल्या जातात. या काळात आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात आणि म्हणून त्यांना जेवणाचे ताट गच्चीत ठेवून कावळ्याला भोजन देणे शुभ मानले जाते. पण या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.

मुळात दहीभात किंवा माणूस खातो, असे कोणतेही पदार्थ हे कावळ्याचे अन्न नाही. जे त्याचे अन्नच नाही ते खायला देऊन आपण कावळ्याची पचन क्षमताच बिघडवत असतो. असे करून आपण कोणत्याही प्रकारे निसर्ग व प्राणी यांना जपत नाही. खरे पाहता कावळा उघड्यावर, उकिरड्यावर असलेली घाण, मेलेले छोटे प्राणी खाऊन तो पर्यावरण स्वच्छ ठेवणारा एक स्वच्छतादूत आहे.

पूर्ण समाधानी जीवन जगून कसलीही अतृप्त इच्छा मागे न ठेवता जर व्यक्ती मेली, तर तिच्या पिंडाला कावळा पटकन शिवतो. अपुरी इच्छा आणि वासना मागे ठेवून एखादी व्यक्ती मेली, तर कावळा शिवत नाही. ती इच्छा पूर्ण करण्याचे वचन नातेवाईकाने दिले, तरच कावळा पिंडाला शिवतो, अशी अंधश्रद्धा आहे. प्रामाणिकपणे विचार केल्यास मरणारी प्रत्येक व्यक्ती एक किंवा अनेक इच्छा मागे ठेवूनच मरते. शेवटपर्यंत कोणीही समाधानी नसते. म्हातारपणात आपल्याला कामलीला करता येणे अशक्य वाटल्याने ययाती आपल्या मुलाचे तारुण्य मागून घेतो. हा ययाती माणसाच्या वासनांचा प्रतिनिधी आहे. मी आता सुखाने मरतो, राजे सुखरूप गडावर पोहोचले, असे म्हणत मरणारे बाजीप्रभू हजारोंत एखादे. याचा अर्थ असा, की एखादा अपवाद सोडला, तर प्रत्येक मृत व्यक्तीच्या बाबतीत पिंडाला कावळा शिवता कामा नये. पण प्रत्यक्ष निरीक्षणात असे दिसत नाही. बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत पिंडाला कावळा पटकन शिवतो. या संदर्भात २० मृत व्यक्तींच्या पिंड घटनांचे निरीक्षण केले असता, त्यात ऐन तारुण्यात अपघातात ठार झालेल्या व्यक्ती, लहान मुले पाठीमागे ठेवून आजारामुळे मरण पावलेल्या व्यक्ती, मुलीचा विवाह ठरवायचा प्रयत्न चालला असताना वारलेले वडील इत्यादी प्रकारच्या व्यक्ती होत्या. जवळजवळ या सर्वच केसेस बाबतीत पिंडाला कावळा पटकन शिवल्याचे निरीक्षण आढळले. यावरून सूज्ञांनी योग्य तो निष्कर्ष काढावा.

मग काही वेळा कावळा पिंडाला लगेच शिवणे, तर काही वेळा उशिराने शिवणे असे का घडते? याचा मृतात्म्याच्या इच्छेशी काहीही संबंध नाही. कावळ्यासारख्या घाणेरड्या पक्ष्याच्या रूपाने आपला प्रिय व्यक्ती येते ही कल्पनाच मुळात हास्यास्पद आहे. कावळा हा इतर पक्ष्यांपेक्षा धीट पक्षी आहे. तो सर्वत्र आढळतो. स्मशानभूमीच्या आसपास सरावलेले कावळे असतील, तर पिंडाजवळची माणसे आपल्याला हाकलत नाहीत, हे त्यांच्या अनुभवाने लक्षात आलेले असते. त्यामुळे ते लगेच पिंडाला शिवतात. शहरातील स्मशानभूमीत हा अनुभव येतो. शहराच्या जवळ इतर खाद्यपदार्थांची कमतरता असल्याने अशा ठिकाणच्या परिसरातील कावळे अधिक भुकेले असण्याचा संभव जास्त. त्यामुळे पिंडाला पटकन शिवणे घडते. खेड्यात कावळ्यांना ज्वारीची कणसे, मक्याची कणसे इत्यादी पदार्थ खायला मिळतात. असे कावळे भुकेले नसतील, तर ते पिंडाला शिवण्याची घाई कशाला करतील? आणि मरणाच्या घटना खेड्यात तुलनेने कमी असल्याने स्मशानभूमीत तळ ठोकण्याचे कावळ्यांना कारण काय? सराईत नसलेले कावळे पिंडाजवळ येतात. त्यांना जीवाची भीती असतेच. जवळ बसलेल्या माणसांना भिऊन ते लगेच दूर उडून जातात. ही माणसे लांब जाऊन बसली, की मग ते धोका नाही हे ओळखून पिंडाला शिवतात. पिंडाला कावळा शिवणे हा प्रकार मुस्लिम, ख्रिश्चन धर्मीयांत नाही. मग या धर्मांतील सर्व व्यक्ती मरतेवेळी समाधानी असतात काय?

मरतेवेळी पिंडावर पुढील जन्माच्या प्राण्याची आकृती उमटते, हे खरे नाही. पिठावरून मुंगळा अगर इतर कीटक सरपटल्याने ज्या रेघा उमटतात. त्यांना प्राणी समजण्याचा आपला भ्रम असतो. पीठ सारवलेल्या सुपात ठेवले असेल, तर सारवलेले सूप वाळताना पोपडे सुटतात. त्यामुळे पिठाच्या पृष्ठभागावर उंचवटे अगर खळगे तयार होतात. त्यातून प्राण्याची आकृती कल्पिली जाते.

मुळातच अनेक शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी आत्म्याचे गृहितक नाकारतात. त्यांचा असा विश्वास आहे की मेंदूच्या न्यूरल फायरिंग्समुळे वर्तन घडून येते आणि न्यूरोसायन्स हा आत्मा समजून घेण्यासाठी संबंधित एकमेव वैज्ञानिक अभ्यास आहे. मृत्यूनंतर व्यक्ती पंचतत्त्वात विलीन होते. आपल्या शिक्षणाचा बुद्धीचा वापर करून पितृपक्ष म्हणून असलेल्या असंख्य अंधश्रद्धा आपण विवेकी विचारांनी, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून सोडून दिल्या पाहिजेत, थांबवले पाहिजे, जर कोणी करत असेल, तर त्यांना समजून सांगितले पाहिजे. ज्या गोष्टी प्रत्यक्षात घडणे कदापी शक्यच नाही, असे अगदी लहान मुलेही तार्किक विचारांनी सांगू शकते, अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये.

आई- वडील जेष्ठ मंडळी जो पर्यंत जिवंत आहेत तो पर्यंत त्यांची काळजी घेणे, त्यांना काय हवे नको ते पाहणे, त्यांच्याशी संवाद साधणे हे जास्त महत्त्वाचे असते. त्यांच्या जन्मदिनी, मृत्युदिनी दरवर्षी गरजूंना दान करणे, चांगले विचार-आचार लोकांपर्यंत पोहोचवणे, हा विवेकी विचारांचा स्पर्श लोकांना, समाजाला मिळणे जास्त गरजेचा आहे. त्या काकस्पर्शापेक्षा हा नक्कीच समाज उपयोगी ठरेल.

संत कबीर म्हणतात...

माटीका एक नाग बना के, पुजे लोग लुगाया

जिंदा नाग जब घर निकले, ले लाठी धमकाया

जिंदा बाप कोई न पूजे, मरे बाद पुजवाया

मुठ्ठीभर चावल ले के, कौवे को बाप बनाया

लेखिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in