काळाकुट्ट दिवस!

फुटबॉल मैदानात उतरलेला खवळलेला जमाव विरुद्ध पोलीस असे वळण या संघर्षास लागले
काळाकुट्ट दिवस!

इंडोनेशियातील मलांग शहरातील कंजुरूहान स्टेडियमवर शनिवारी आयोजित फुटबॉल सामन्याचवेळी भयंकर घटना घडली. मलांग शहराच्या अरेमा एफसी या संघाचा सुरबायाच्या पर्सेबाया संघाने पराभव केल्याने तो सहन न होऊन पराभूत संघाच्या संतप्त समर्थकांनी मैदानात धाव घेतली. त्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी प्रथम लाठीमार केला. पण जमाव नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात आल्याने अश्रूधूर सोडून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. फुटबॉल मैदानात उतरलेला खवळलेला जमाव विरुद्ध पोलीस असे वळण या संघर्षास लागले. जमावावर पोलिसांनी अश्रूधूर सोडल्याने जमाव वाट फुटेल तिकडे धावू लागला. मैदानातील प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि १२५ जणांचा हकनाक बळी गेला. प्रेक्षक फुटबॉल सामना बघायला येतात काय आणि पाहता पाहता त्या मैदानाला एखाद्या रणभूमीचे स्वरूप प्राप्त होऊन त्यामध्ये चेंगरून किंवा गुदमरून १२५ प्रेक्षक मरण पावतात, हा सर्वच प्रकार अत्यंत धक्कादायक! मनोरंजनासाठी आणि आपल्या आवडत्या संघाचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी अशी काही अपेक्षाच केली नसावी! फुटबॉल सामन्याच्या वेळी खेळाडूंमध्ये किंवा समर्थकांमध्ये हातघाईवर येण्याचे प्रकार घडत असल्याचे अनेकदा अनुभविण्यास मिळते. यापूर्वीही अशाच दोन - तीन घटनांमध्ये सामन्याच्या दरम्यान झालेल्या हिंसाचार, हुल्लडबाजी, पोलीस कारवाई यामुळे शेकडो प्रेक्षक दगावल्याची घटना घडल्या आहेत. मलांग शहरातील स्टेडियमवर घडलेल्या घटनेत अन्य ३२० प्रेक्षक जखमी झाले आहेत. स्टेडियमवर घडलेल्या अशाप्रकारच्या घटनांपैकी ही एक अत्यंत भयानक घटना असल्याचे सांगण्यात येते. या घटनेबद्दल भाष्य करताना, फुटबॉल खेळाशी जे जोडले गेले आहेत त्यांच्यासाठी हा काळाकुट्ट दिवस आहे, असे ‘फिफा’चे अध्यक्ष गियानी इन्फान्टिनो यांनी म्हटले आहे. देशांतर्गत सामन्यांवर ‘फिफा’चे नियंत्रण नसले तरी स्टेडियमवर अश्रुधुराचा वापर करण्यात येऊ नये, असे ‘फिफा’चे म्हणणे आहे. फुटबॉल स्टेडियमवर घडलेली ही घटना म्हणजे पोलीस यंत्रणेचे आणि सामना आयोजकांचे अपयश मानावे लागेल. आपल्या आवडत्या संघांचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने येणार याची पोलिसांना व आयोजकांना कल्पना नव्हती काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षक संतापले तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्या परिस्थितीवर हिंसाचाराविना नियंत्रण मिळविण्यासाठी काय दक्षता घ्यायला हवी, याचे नियोजन तेथील पोलीस यंत्रणेकडून वा सामना आयोजकांकडून न झाल्यानेच सव्वाशे प्रेक्षक दगावले आणि ३२० प्रेक्षक जखमी झाले. आता इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी या घटनेची चौकशी होईपर्यंत वरच्या श्रेणीतील कोणतेही लीग सामने होणार नाहीत, असे घोषित केले आहे. केवळ फुटबॉलच्याच नव्हे तर सर्वच क्रीडाक्षेत्राच्या दृष्टीने ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे. फुटबॉल सामन्याच्या वेळी अशा भीषण घटना यापूर्वीही घडल्या आहेत. २४ मे १९६४ या दिवशी पेरूची राजधानी लिमा येथील नॅशनल स्टेडियमवर अर्जेंटिनाने पेरूच्या संघाचा पराभव केल्यानंतर अशीच हिंसक घटना घडली होती. त्यावेळी जो हिंसाचार झाला त्यामध्ये ३०० प्रेक्षक दगावले होते तर अन्य ५०० प्रेक्षक जखमी झाले होते. ऑलिम्पिक पात्रतेसाठीचा तो सामना होता. अशीच अन्य घटना इंग्लंडमध्ये घडली होती. १५ एप्रिल १९८९ या दिवशी शेफील्ड येथील हिल्सबरोज स्टेडियमवर उसळलेल्या हिंसाचारात ९७ प्रेक्षक मरण पावले होते आणि शेकडो जखमी झाले होते. तर १२ मार्च १९८८ या दिवशी काठमांडूमधील दशरथ स्टेडियमवर घडलेली घटना नैसर्गिक आपत्तीमुळे घडली. स्टेडियमवर हजारो प्रेक्षक उपस्थित असताना प्रचंड गारपीट सुरु झाली. त्यापासून वाचण्यासाठी प्रेक्षक बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. पण बाहेर पडण्याचे दरवाजे कुलूपबंद असल्याने जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये ९३ प्रेक्षक मरण पावले. वानगीदाखलच्या अशा या तीन घटना. गेल्या ४० वर्षांमध्ये जगातील विविध देशांमधील स्टेडियमवर दंगल उसळणे, चेंगराचेंगरी होणे, स्टेडियम कोसळणे, स्टेडियमला आग लागणे अशा प्रकारच्या घटनाही घडल्या आहेत. मलांग शहरातील स्टेडियमवर मैदानात घुसलेल्या प्रेक्षकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. हातातील संरक्षक ढालींचाही मारहाण करण्यासाठी पोलिसांनी वापर केला. पोलिसांनी जेव्हा अश्रूधूर सोडला तेव्हा मैदानास धुराने व्यापून गेलेल्या युद्धभूमीचे स्वरूप आले होते, असे या घटनेचे साक्षीदार असलेल्या प्रेक्षकांनी सांगितले. या घटनेच्या सखोल तपासानंतर या हिंसाचारास नेमके कोण जबाबदार, कोणामुळे एवढे हकनाक बळी गेले याची माहिती बाहेर येईलच. पण भविष्यात कोणत्याही प्रकारच्या सामन्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांवर असा काळाकुट्ट दिवस पाहण्याची वेळ येऊ नये याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यायला हवी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in