अमेरिका : नाट्यमय घडामोडींची मालिका

हॅरिस निवडून आल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष असतील.
अमेरिका : नाट्यमय घडामोडींची मालिका
Published on

भावेश ब्राह्मणकर

देश-विदेश:

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीने अतिशय नाट्यमय वळण घेतले आहे. ट्रम्प यांच्यावरील जीवघेणा हल्ला, बायडेन यांनी घेतलेली माघार, ट्रम्प यांनी घेतलेली आघाडी आणि कमला हॅरिस यांची निश्चित होणारी दावेदारी या साऱ्याकडेच संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण महासत्तेचे नेतृत्व कुणाकडे असेल यावर पुढील पाच वर्षेच नाही तर त्यापुढील मोठा काळ अवलंबून असणार आहे आणि जगाचे राजकारण त्यानुसार आकार घेणार आहे. हॅरिस निवडून आल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष असतील. ही घडामोडही महत्त्वाची असेल.

कुठल्याही राष्ट्राची सार्वत्रिक निवडणूक ही तेथील जनता, प्रशासन, राजकीय पक्ष आणि नेते यांच्यासाठी महत्त्वाची असते. मात्र, अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशातील निवडणूक ही त्या देशापुरती निश्चितच नसते. कारण जागतिकीकरण, आधुनिकीकरण आणि उदारीकरणामुळे संपूर्ण जगच छोट्या खेड्यासारखे झाले आहे. तसेच अमेरिकेसारख्या देशाशी अविकसित, विकसनशील किंवा विकसित अशा प्रत्येक गटातील देश जोडले गेलेले आहेत. मग ते आर्थिक संबंध असोत की लष्करी, सामाजिक असोत किंवा अन्य स्वरूपाचे. म्हणूनच केवळ जगभरातील विविध देश, त्या देशांचे प्रमुख यांचेच नाही, तर खासगी कंपन्या, त्यांचे प्रमुख यांचेही या निवडणुकीकडे अत्यंत बारकाईने लक्ष आहे.

अमेरिकेत सध्या डेमोक्रॅटिक पक्ष सत्तेत आहे. विद्यमान अध्यक्ष जो बायडेन हेच पक्षाचे पुन्हा उमेदवार ठरले. वयाची ८१ वर्षे पूर्ण केलेले बायडेन हे शरीर आणि मनानेही थकलेले आहेत. त्याची झलक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिसली. असंबद्ध बोलणे, हात थरथरणे आदींची प्रचंड चर्चा झाली. रिपब्लिकन पक्षाचे नेते व राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी हीच संधी साधली. तसे पाहता ट्रम्प यांचेही वय सध्या ७८ वर्षे एवढे आहे. टीव्ही माध्यमाच्या थेट मुलाखतीत बायडेन आणि ट्रम्प यांची जुगलबंदी पहायला मिळाली. पण त्यात ट्रम्प हे बायडेन यांच्यापेक्षा वरचढ ढरले. भलेही ट्रम्प बिनदिक्कत खोटे बोलत असले तरी ते रेटून आणि ठामपणे बोलत होते. पक्षांतर्गत दबाव आणि सूचना लक्षात घेता अखेर बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. तशी घोषणा करताना त्यांनी विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस (वय ५९) यांच्या नावाला अध्यक्षपदासाठी पसंती दर्शविली आहे. या नाट्यमयरीत्या झालेल्या घडामोडी जगभर चर्चेच्या ठरल्या.

त्याचबरोबर प्रचारादरम्यान, ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्या दिशेने झाडलेली बंदुकीची गोळी त्यांच्या कानाला लागून गेली. त्यात ते जखमी झाले. कान आणि गालातून रक्त येत असलेल्या अवस्थेतील ट्रम्प यांचे व्हिडीओ व फोटो प्रचंड व्हायरल झाले. या हल्ल्यानंतर कानाला पट्टी लावून त्यांनी काही प्रचारसभा घेतल्या. यातून सहानुभूतीचे वातावरण तयार होईल आणि ट्रम्प यांचा विजय सुकर होईल, हे लक्षात घेऊनही बायडेन यांनी माघार घेणे पसंत केले आहे. आता महत्त्वाचा मुद्दा ट्रम्प यांच्या विरोधात कोण उभे राहणार? हा आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस होणार आहे. त्यात अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. सध्या तरी कमला हॅरिस यांचे पारडे जड आहे. बायडेन यांच्या घोषणेनंतर आतापर्यंत हॅरिस यांनी कोट्यवधी रुपयांचा पक्ष निधी जमविण्यात आघाडी घेतली आहे. ही सुद्धा जमेची बाब आहे. पक्षातून त्यांना किती आणि कशी पसंती मिळते यावरच सारे काही ठरणार आहे. मात्र ट्रम्प यांना याचाही फायदा होतो आहे. कारण पुढील एक महिना तरी त्यांच्यासमोर उमेदवारच नाही. ही बाब डेमोक्रॅटिक पक्षासाठी अडचणीची ठरू शकते. शिवाय ट्रम्प यांना टक्कर देण्यासाठी हॅरिस या अत्यंत प्रभावी उमेदवार आहेत का, याबाबतही तेथील माध्यमांमध्ये आणि जाणकारांमध्ये मतभेद आहेत.

अमेरिकन निवडणुकीतील प्रचारात काही महत्त्वाचे मुद्दे अग्रभागी आहेत. त्यात रोजगार, गर्भपात अधिकार, अन्य देशातून अमेरिकेत येणारे लोंढे, व्यापार वृद्धी हे चर्चेत आहेत. हॅरिस या गर्भपाताचे समर्थन करतात, तर ट्रम्प त्याला विरोध करतात. महिला या नात्याने त्यांची ही भूमिका त्या ठामपणे मांडू शकल्या तर ते सुद्धा निर्णायक ठरू शकते. तरुणांसाठी रोजगार निर्माण व्हावा हा सुद्धा तिथला कळीचा प्रश्न आहे. बाहेरून येणाऱ्यांना रोखणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करणे यात साधर्म्य आहे. यासंदर्भात आपल्याकडे काय स्ट्रॅटेजी आहे ते सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाला जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचवावे लागेल. ट्रम्प यांच्यावर न्यायालयांमध्ये एकूण चार खटले सुरू आहेत. त्यात ते दोषी ठरले आणि त्यांना शिक्षा सुनावण्यात आली तर ती बाब सुद्धा निवडणुकीवर परिणाम करू शकते. हे निकाल जर निवडणुकीपूर्वी आले तर ट्रम्प अडचणीत येऊ शकतात.

हॅरिस या निवडणूक जिंकल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील. हा इतिहास घडविण्याची संधी डेमोक्रॅटिक पक्ष आणि हॅरिस यांना आहे. या निवडणुकीत अनेकांनी विशेष रस घेतला आहे. उदाहरणार्थ, जगातील सर्वात धनाढ्य व्यक्ती असलेले इलॉन मस्क. त्यांनी उघडपणे ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे विविध व्यक्ती आणि मान्यवरांची या निवडणुकीत काय भूमिका असेल, हे सुद्धा निर्णायक ठरणार आहे.

नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संघटनेत एकूण ३२ देश आहेत. त्यातील युरोपीय सदस्य धास्तावलेले आहेत. कारण, ट्रम्प निवडून आले तर अमेरिका नाटोमधून बाहेर पडण्याची भीती त्यांना सतावते आहे. आपल्या जीडीपीच्या दोन टक्के निधी नाटो संघटनेला देणे अनेक सदस्यांना शक्य होत नाही. हे लक्षात घेऊनच तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांनी नाटोतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. तो आता खरा ठरण्याची भीती त्यांना वाटत आहे. ट्रम्प यांनी चीनशी थेट पंगा घेत अनेक घोषणा केल्या होत्या. आताही ते सत्तेत आले तर अमेरिका आणि चीन यांचे छुपे किंवा उघड युद्ध सुरू होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास या युद्धांवरही नव्या अमेरिकन अध्यक्षांचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सत्तेत कोण येते यावरून बऱ्याच बाबी निश्चित होणार आहेत. निवडणुकीला अजून साधारण चार महिने आहेत. तोवर काय काय घडते यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

(संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक आणि मुक्त पत्रकार)

logo
marathi.freepressjournal.in