
- विचारभान
- संध्या नरे-पवार
पर्यटन ही काश्मीरची रोजीरोटी आहे. असं असतानाही काश्मीरच्या हिताचा बळी देत दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारलं. हा क्षण संपूर्ण भारताने एकजूट दाखवत दहशतवादाविरोधात एकत्र उभं राहण्याचा आहे. मात्र अशा नाजूक वेळी त्यांनी धर्म विचारून मारलं, असं सांगत हिंदू म्हणून एक व्हा, अशी हाक दुसऱ्या बाजूने दिली जात आहे. म्हणूनच पहलगाममध्ये नेमकं कोण मारलं गेलं, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाही किसन मारला, नाही हसन मारला,
त्यांनी माणूस मारला, त्यांनी माणूस मारला..
शाहीर संभाजी भगत यांचं हे कवन एकीकडे आणि दुसरीकडे समाज माध्यमांवरून फिरणारे, ‘त्यांनी हिंदू मारला..’ हे सांगणारे संदेश. पहलगामच्या अतिरेकी घटनेने सुरक्षा यंत्रणेतील गलथानपणापासून ते पाकिस्तानच्या वाढत्या मुजोरीपर्यंतचे जे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत, त्यातला महत्त्वाचा प्रश्न पहलगाममध्ये नेमकं कोण मारलं गेलं? हाही आहे.
पहलगाममधलं हत्याकांड अत्यंत निर्घृण आहे. हे हत्याकांड घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना, त्यामागच्या मास्टरमाइंडना धडा शिकवला गेला पाहिजेच. कठोर शिक्षाही झाली पाहिजे. पण या हत्याकांडाची बातमी येते न येते तोच समाज माध्यमांवरून एक मेसेज प्रामुख्याने फिरत होता.
“त्यांनी राज्य विचारलं नाही,
भाषाही विचारली नाही,
जात सुद्धा विचारली नाही..
विचारला तो फक्त धर्म..
आणि 'हिंदूं'ना थेट गोळ्या घातल्या..”
या संदेशाखाली ‘हिंदू’ म्हणून एकजूट होण्याची किती आणि कशी गरज आहे, हेही सांगितलं जात होतं. म्हणजे तुम्ही कोणत्याही राज्याचे असाल, जातीचे असाल, कोणतीही भाषा बोलणारे असाल, तरी केवळ ‘हिंदू’ आहात म्हणून मारले जात आहात, तेव्हा ‘एक व्हा’ असं हा संदेश सांगत आहे. धर्माच्या आधारे खेळलं जाणारं राजकारण दोन्ही बाजूंनी कसं खेळलं जातं याचं हे एक दाहक उदाहरण आहे.
अर्थात या संदेशात जे म्हटलं गेलं त्यात खोटं काहीच नाही. कारण घटनेचं जे वृत्त आलं त्यात गोळ्या घालण्याच्या आधी ‘धर्म विचारला गेला’ हे आलेलं आहे. ‘हिंदू’ हे उत्तर मिळाल्यावर गोळ्या घातल्या गेल्या, हेही वृत्तामध्ये आहेच. एखादी व्यक्ती विशिष्ट धर्माची आहे म्हणून तिची हत्या करणं, हा धार्मिक कट्टरतावाद आहे आणि त्याचा निषेध जितका करावा तितका थोडा आहे. मात्र या वृत्ताच्या आधारे जो संदेश तयार केला गेला, तोही दुसऱ्या बाजूने धार्मिक अंधतेकडे नेणारा, दुही अधिक तीव्र करणारा तर आहेच, पण त्याचवेळी समाजातल्या विविध दुहींचं सत्यकथन करणारा आहे.
जेव्हा राज्य विचारून गोळ्या घातल्या जातात, अत्याचार केले जातात, तेव्हा तो ‘प्रांतीय दहशतवाद’ असतो.
जेव्हा भाषा ऐकून तुम्हाला नाकारले जाते, अत्याचार केले जातात, तेव्हा तो ‘भाषिक दहशतवाद’ असतो.
जेव्हा जात विचारून गोळ्या घातल्या जातात, तेव्हा तो ‘जातीय दहशतवाद’ असतो.
आणि जेव्हा तुम्ही विशिष्ट लिंगाचे आहात म्हणून तुम्हाला जाळलं जातं, मारलं जातं तेव्हा तो ‘लैंगिक दहशतवाद’ असतो.
आणि हा प्रांतिक, भाषिक, जातीय व लैंगिक असा सगळ्या प्रकारचा दहशतवाद धार्मिक दहशतवादाच्या बरोबरीने या देशात अस्तित्वात आहे, हेच नकळत या संदेशातून अधोरेखित केलं जात आहे. म्हणजे हा संदेश लिहिणाऱ्या आणि तो पुढे फॉरवर्ड करणाऱ्यांचा हेतू इतर सगळ्या दहशतवादांना नाकारत धार्मिक दहशतवादाला अधिक तीव्र करणं हा असला तरी याच संदेशातून धार्मिक दहशतवादाच्या या कथनाला छेद देणारं दुसरं वास्तव समोर येतं. तुम्ही हिंदू असलात तरी या देशात तुम्ही केवळ आमच्या राज्याचे नाहीत, आमच्या जातीचे नाहीत, आमच्या भाषेचे नाहीत म्हणून मारले जाता, हेही एक वास्तव आहेच.
या महाराष्ट्र राज्याची निर्मितीच आपल्याच देशात १०५ हुतात्मे देऊन झालेली आहेत. का बळी गेले हे १०५ जण? ते हिंदू नव्हते? देशात भाषावार प्रांतरचनेचं सूत्र स्वीकारलेलं असताना मराठी माणसाला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा द्यावा लागला आणि त्यात १०५ जणांना गमवावं लागलं. मुंबई शहरातच या १०५ हुतात्म्यांचं स्मारक आहे. हा प्रांतिक अत्याचार नव्हता?
विशिष्ट जातींचे आहात, मागास जातीचे आहात, म्हणून या देशात आजवर किती बळी गेले, याची यादी काढली तर? शाळेतल्या माठातलं पाणी प्याला म्हणून एका विद्यार्थ्याला आजच्या काळातही मरेस्तोवर मारलं जातं. दलित जातीचा वर घोड्यावर बसून वरात काढतोय म्हणून त्याला मारलं जातं. आंतरजातीय विवाह केले म्हणून आजवर किती जणांचे, जणींचे बळी गेले? समाजशास्त्रीय अभ्यासशाखेत त्याचा ‘ऑनर किलिंग’, ‘प्रतिष्ठेसाठी केलेल्या हत्या’ म्हणून स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागतो, इतकं या हत्यांचं प्रमाण व्यापक आहे. प्रेमात पडून एकमेकांसोबत नव्या आयुष्याचं स्वप्न पाहणारे वेगवेगळ्या जातींचे हे तरुण-तरुणी एका धर्माचे नसतात? जवखेडा येथील तिहेरी दलित हत्याकांड, खर्डा येथील नितीन आगेचं हत्याकांड, भोतमांगे भगिनी... ही नावं लक्षात आहेत का? आणि हो, जातीय दंगलींचा तर इतिहास आहे राज्यात आणि देशातही.
हे सगळे हिंदू नाहीत? हे सगळे हिंदू असताना या देशात, या मातीत मारले गेले आहेत. ‘त्यांनी जात विचारली नाही’ असं हा संदेश सांगतो. पण या देशात ‘जात’ विचारूनच रोटीबेटी व्यवहारापासून घरांच्या खरेदी-विक्रीपर्यंतचे सगळे व्यवहार होतात आणि जात विचारण्याचा अधिकार आजही एक वर्ण स्वत:ला भूदेव म्हणवत स्वत:च्या हातात ठेवून आहे. या देशातील सांस्कृतिक सत्ता आजही उच्चवर्णीयांच्या हातात आहे. अशा वेळी त्यांनी जात विचारली की नाही, हा प्रश्न महत्त्वाचा ठरत नाही. कारण या देशात आजही जात विचारूनच अनेक गोष्टी होतात, हे वास्तव आहे.
दहशतवाद्यांना धर्म असला तरी दहशतवादाला धर्म नसतो, जात नसते, भाषा नसते. तिथे फक्त विद्वेष असतो आणि एकदा का हा विद्वेष डोक्यात भरला की मग विशिष्ट धर्माचे, जातीचे, भाषेचे दहशतवादी तयार होतात.
सीमेपारच्या शत्रूला या भूमीत दुहीची बीजं पेरायची आहेत, जी पेरलेली आहेत ती अधिक जोमाने वाढवायची आहेत. यातलीच एक चाल पर्यटकांना धर्म विचारून मारणं, ही आहे. हा धर्म विचारून मारण्याचा संदेश तयार करून तो पसरवणे ही याच दुहीच्या राजकारणाची दुसऱ्या बाजूने खेळली गेलेली चाल आहे.
पण सच्चा भारतीय या दोन्ही चाली ओळखतो आणि या दोन्ही चालींचा निषेध करतो. तो जात-भाषा-लिंग-धर्म यांच्या पल्याड जात पहलगामची घटना धिक्कारतो. हा क्षण भारतीय म्हणून एकजूट होण्याचा आहे, अधिक विभागले जाण्याचा नाही. पर्यटकांच्या बाजूने उभे राहत काश्मीरमधल्या मुस्लिमांनी हे दाखवून दिलं आहे, देशभरातल्या मुस्लिमांनी तातडीने या घटनेचा निषेध केला आहे, तर परत येणारे पर्यटक स्थानिकांनी आपल्याला किती आणि कशी मदत केली, हे सांगत ‘हिंदू म्हणून मारलं’ या कथनातून निर्माण होणारी द्वेषाची आग रोखत आहेत. सर्वसामान्यांच्या शहाणपणाचं आणि एकजुटीचं प्रदर्शन या दु:खद काळात होत आहे, हीच एक जमेची बाजू आहे.
पहलगामच्या घटनेने आणखी एक सत्य अधोरेखित केलं आहे. दहशतवाद हा अंतिमत: कोणाचाच नसतो. पर्यटन ही काश्मिरी जनतेची रोजीरोटी आहे, काश्मीर राज्याच्या महसुलाचा मोठा भाग पर्यटनातून येतो. अशा वेळी पर्यटकांना मारणं म्हणजे सामान्य काश्मिरी जनतेला उपाशी मारणं आहे. काश्मिरी जनतेचा आणि दहशतवाद्यांचा धर्म एकच असतानाही जर दहशतवाद्यांनी हे असं आततायी पाऊल उचललं, याचाच अर्थ त्यांना काश्मिरी जनतेची अजिबातच फिकीर नाही, हेच यातून दिसून येतं. काश्मिरी जनतेच्या हिताचा बळी देऊनच पर्यटकांची हत्या करण्यात आली आहे, हे निर्विवाद सत्य आहे.
वीस मिनिटं बेधुंद गोळीबार सुरू होता. अशावेळी तो एकटा भिडला दहशतवाद्यांना. का भिडला तो स्थानिक घोडेवाला दहशतवाद्यांना? ‘हे निष्पाप आहेत, यांना मारू नका’, असं सांगत तो दहशतवाद्यांच्या हातातली बंदूक हिसकावून घेत होता आणि त्यातच त्याला गोळी लागून तो मारला गेला. काही न करता जे होतंय ते बघत तो शांतपणे बाजूला उभा राहिला असता, तर तो वाचला असता. पण पर्यटकांना मारणं म्हणजे काश्मीरच्या पोटावर पाय देणं आहे, पर्यायाने काश्मीरलाच मारणं आहे, हे त्याने ओळखलं. त्या बर्फाळ पर्वतावरच्या चिंचोळ्या मार्गावरून घोड्यावर बसवून पर्यटकांना वर नेणं आणि खाली आणणं ही त्याची रोजीरोटी होती. अतिशय दुर्गम भागातल्या धोकादायक रस्त्यावरून चढ-उतार करताना पर्यटकांनाही या स्थानिक घोडेवाल्यांचाच विश्वास असतो. आदिलने हा विश्वास सार्थ ठरवत आपल्या रोजीरोटीच्या धर्माशी इमान राखलं आणि नि:शस्त्र असतानाही तो दहशतवाद्यांना भिडला आणि मेला.
त्याचं नाव सय्यद आदिल हुसेन शाह होतं. त्याच्या आईचा तो एकुलता एक मुलगा होता. घरातला एकटा कमावता पुरुष होता. तो कोणत्या धर्मात जन्माला आला, यापेक्षा मरताना त्याने माणुसकीच्या धर्माला कवटाळलं, हे आजच्या भारतासाठी मोलाचं आहे. सय्यद आदिल हुसेनने आपल्या छातीवर गोळ्या झेलून ‘त्यांनी हिंदू मारला’ या कथनातील ‘विखारा’ला छेद दिला आहे.
कारण दहशतवाद्यांनी आदिलला नाही मारलं, त्यांनी माणूस मारला, माणुसकी मारली...हेच सत्य आदिलच्या मृत्यूने मागे ठेवलं.
आदिलसह पहलगामच्या भूमीवर मारल्या गेलेल्या सगळ्या पर्यटकांना नमन.
sandhyanarepawar @gmail.com