कात्रजचा घाट आणि शिवसेना !

सध्या शिवसेनेतील वाद सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर सुरू आहे. अशा वेळी ‘कात्रज’ मध्येच सत्ताधारी शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यात हा हल्ला झाला.
कात्रजचा घाट आणि शिवसेना !

नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्याचा दौरा करीत असताना ‘कात्रज’ मध्ये माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यावर हल्ला करून गाडी फोडण्यात आली. या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. यानिमित्ताने ‘कात्रज’ची आठवण झाली. यापूर्वी शिवसेना मुंबईपुरती मर्यादित होती; परंतु त्यानंतर शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्र दौरा सुरू करण्याचे जाहीर केले. त्यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे उजवे हात म्हणवून घेणारे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आव्हान दिले होते. हिंमत असेल तर ‘कात्रज’चा घाट तरी चढून दाखवा आणि बाळासाहेबांनी ते आव्हान स्वीकारून शिरूर, सातारा, वाई येथे जाहीर सभा घेतल्या होत्या. त्याच ‘कात्रज’मध्ये शिवसैनिकांनी शिवसेनेच्या माजी मंत्र्यांवर हल्ला करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. हा योगायोग म्हणायचा की, काळाने उगवलेला सूड आहे, असे समजावे.

राज्यात सध्या सेना-भाजप राज्य सरकार अस्तित्वात आले आहे. अशा वेळी शिवसेनेतील एक गट, शिवसेनेच्या दुसऱ्या गटाविरोधात ‘कात्रज’मध्ये ठाकला असल्याचे दिसून येते. सध्या शिवसेनेतील वाद सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर सुरू आहे. अशा वेळी ‘कात्रज’ मध्येच सत्ताधारी शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यात हा हल्ला झाला. सेनेत हे चालले आहे, त्यामुळे राष्ट्रवादी व भाजप सध्या खूश आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे होते. त्यांनी अनेकांना ‘कात्रज’चा घाट दाखवून जेलमध्ये बसवले होते. एसटी कामगार नेते गुणरत्न सदावर्ते यांनी एसटीच्या मेळाव्यात भडकावू भाषण केले होते. त्याचा आधार घेऊन पती-पत्नीस जेलमध्ये टाकले होते. त्या कामगार मेळाव्यात त्यांनी शरद पवारांवर टीका केली होती. तो आधार घेऊन त्यांना ‘कात्रज’चा घाट दाखविण्यात आला होता. तर हनुमान चाळिशीचा मुद्दा काढला राज ठाकरे यांनी. एवढेच कशाला, शरद पवारांवर टीका करताना पवारांनी राज्यात जातीयवाद आणला, अशी उघड टीका केली, तर त्यानंतर भोंग्यांचा प्रश्‍न आला आणि भोंगे बंद झाले नाही तर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू, असा इशारा दिला; परंतु महाविकास आघाडीने त्यांना अटक करण्याची अथवा खटला दाखल करण्याची हिंमत दाखविली नव्हती. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे आमदार पती रवि राणा यांनी आम्ही मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा म्हणू, असे जाहीर करताच (प्रत्यक्षात त्यांनी माघार घेऊन निर्णय मागेही घेतला होता) त्यांना वरळी, मुंबई येथील घरातून अटक करून कात्रजचा घाट दाखविला. तीच स्थिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबतीत झाली.

एवढेच कशाला मुंबई महानगरपालिका आपल्याकडे आहे म्हणून १५ ते २० वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांना नोटिसा दिल्या जातात. याहीपेक्षा गंभीर म्हणजे सिने अभिनेत्री कंगना रणावतने उद्धवजी ठाकरे यांच्यावर टीका करताच ती घरात नसताना तिचे कार्यालय तोडण्यात आले व कात्रजचा घाट दाखविण्यात आला. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जो त्या काळात लिहिल, बोलेल त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात ‘कात्रज’चा घाट दाखविण्यात येत होता. एवढेच कशाला, आदित्य ठाकरे हे मंत्रिपदाची झूल अंगावर असताना बंडखोर शिवसेना आमदारांना जाहीरपणे आव्हान देत होते. हिंमत असेल तर मुंबईत येऊन दाखवा. आमच्या डोळ्याला डोळा लावण्याची हिंमत होणार नाही, असे भडकावू भाषण करीत असताना सत्ता आहे म्हणून त्यांना कात्रज दाखविला जात नाही. त्याहीपेक्षा आश्‍चर्याची आणि संतापाची बाब म्हणजे ‘कात्रज’मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा लागली असता १ मैलाच्या अंतरावर शिवसेना युवानेते, माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या सभेस पोलिसांची परवानगी दिली कशी? आणि त्याच पार्श्वभूमीवर उदय सामंत या शिंदे शिवसेना गटाच्या नेत्यावर ‘कॉनव्हॉय’ मागे असताना हल्ला होतो आणि तो ‘कात्रज’मध्येच! या हल्ल्यामागे नक्की कोण आहे?

खरं पाहू गेल्यास ज्या शिवसेना प्रमुखांना तत्कालीन राष्ट्रवादीचे माजी खासदार कलमाडी ‘कात्रज घाट’ तर चढून दाखवा, असे आव्हान दिले गेले होते. त्याच कात्रजमध्ये शिंदे गटाच्या सत्ताधारी आमदारांच्या गाडीवर सशस्त्र हला केला जातो, हे अत्यंत गंभीर आहे. राजकारणात कालचे मित्र आजचे वैरी होतात. तर कालचे वैरी आजचे मित्र होतात म्हणून कात्रज भागातच निष्ठावंत यात्रा काढण्याची वेळ आदित्य ठाकरे यांच्यावर आली आहे. नियतीला अजून पाहायचे तरी काय आहे?

शिवसेनेमधून जो फूटून बाहेर पडतो, त्यांना आजपर्यंत ‘कात्रजचा घाट’ दाखविण्याचा प्रयत्न यापूर्वी करण्यात आला. त्यात बळी गेला ठाण्यात श्रीधर खोपकर यांचा, तर बाळासाहेबांचे सुरुवातीपासून अत्यंत जवळचे राहिलेले ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांना अज्ञातवासात जावे लागले. तर केवळ कुठे तरी चार शब्द शिवसेना नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोलले असल्याचा संशय घेऊन लोकसभेचे माजी सभापती, माजी मुख्यमंत्रीच काय शिवसेनेतील नंबर २ चे नेते समजले जाणारे मनोहर जोशी यांना डोळे पुसत, अश्रू गाळीत शिवाजी पार्कच्या जाहीर मेळाव्यातून स्टेज सोडावे लागले होते. तर यावर मात केली ती फक्त छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे व आता एकनाथ शिंदे यांनीच या नेत्यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या मूळ सेनेला कात्रजच्या घाटात अडकवले आहे, एवढे निश्चित!

शिवसेनेत ज्या-ज्या वेळी बंड झाले, त्याचे प्रतिध्वनी देशभर नव्हे, तर जगात महत्त्वाच्या देशात उमटले आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उठाव केला, त्याचे पडसाद जगातील ३३ देशांत उमटल्याचे पुढे आले आहे. कारण मुंबई आहे. हे शहर भारत देशाची आर्थिक राजधानी आहे. तेथे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे व त्यांच्या सेनेला कात्रजचा घाट दाखवून खिळखिळी केली आहे. ५५ आमदारांपैकी ४० शिवसेनेचे आमदार, १२ खासदार फुटतात हे महत्त्वाचे आहे. म्हणून तर आजही सेनेतून छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक हे सत्तेच्या सारीपाटात राजकारणात टिकून आहेत. तर ठाकरे घराण्यातील ‘राज ठाकरे’ यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. हे नाकारता येणार नाही. राज ठाकरेंकडे फारसे आमदार नसले तरी त्यांनी यापूर्वी स्वतंत्र निवडणूक लढविल्याने त्यांनी शिवसेना-भाजपला सत्तेपासून १४ वर्षे दूर ठेवण्यात यश मिळवले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आगगाडीच्या इंजिनावर पहिल्या निवडणुकीत १३ आमदार विधानसभेत दिसून आले होते. त्या काळात राज ठाकरे यांनी आपल्या काकांना, शिवसेना प्रमुखांच्या हयातीत कात्रजचा घाट दाखविला होता. याची अनेक उदाहरणे देता येतील; परंतु एक कसे आहे. मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर जे घडले, त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी ‘दाऊद इब्राहीम’ या दहशतवाद्यास आव्हान दिल्याने व बाळासाहेब ठाकरे यांची ओळख एक हिंदूंचा कडवा नेता, अशी झाली होती व ती आजही कायम आहे. हा कडवेपणा उद्धव ठाकरेंना जमला नसल्याने त्यांचा ‘कात्रज’ झाला. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर सत्तानाट्य २०२२ सारखे झाले नव्हते. ४० आमदार सेनेला पाठिंबा देणारे १० अपक्ष व राज्यमंत्री बंड करतात, हा साधासुधा प्रयत्न नाही. शिवसेना प्रमुखांनी शिवसेनाच संपते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. म्हणून तर जगातील ३३ राष्ट्रांत यावर चर्चा झाली. नुकतेच ब्रिटिश हायकमिशन अलेक्स इलिस यांनी शिवसेनेतील या बंडाला ‘बॉलिवूडची पटकथा’ असे म्हटले आहे, ते खरं आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात सत्तांतर झाले. त्यावर आमचे म्हणजे ब्रिटिश सरकारचे बारीक लक्ष होते. एखाद्या बॉलिवूड चित्रपटाची पटकथा असावी, असा हा सत्तांतराचा खेळ रंगत गेला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही त्याचे हिरो ठरलात, असे हे ब्रिटिश उच्चायुक्त इलिस म्हणाले.

आज तरी खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे यांनी सत्तेच्या मारामारीत उद्धव ठाकरेंना कात्रजचा घाट दाखविला आहे, असे म्हणावे लागेल. सत्तेत बसलेल्या बाप-लेकांना एकनाथ शिंदे यांनी ५५ पैकी ४० आमदार, १२ खासदार नेले, हा मोठा धक्का आहे. आता न्यायालयात जे काही होईल ते होईल; परंतु ‘इलिस’ यांच्या म्हणण्याप्रमाणे एकनाथ शिंदे हे चित्रपटातील हिरो झाले आहेत, हे नक्की! एकनाथ शिंदे हे तब्बल २० जूनच्या मध्यरात्रीपासून आजपर्यंत ४९ दिवस झाले मूळ शिवसेनेस शह देत आहेत. हा भूकंप राजकीय सत्तानाट्यात अभूतपूर्व असा होता. त्यामुळेच आज इंग्लंडसारख्या देशातील उच्चायुक्त म्हणतात, ‘शिंदे हे हिरो आहेत.’ गेले अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे होते. खरं पाहू गेल्यास ठाकरे घराण्याने एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे म्हणण्यापेक्षा शब्द फिरवला आहे. “मी बाळासाहेबांना शब्द दिला होता की, मी एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन;” परंतु उद्धव ठाकरे यांनी धड शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद दिले नाही. तर शरद पवारांचे नाव पुढे करून मुख्यमंत्रिपदाची खुर्ची बळकावली होती, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे, बाळासाहेब हे कधीही आपला शब्द फिरवत नव्हते. येथे तर उलटे झाले आहे. प्रारंभी राज्यपालांकडे शिवसेनेने पत्र दिले, त्यात एकनाथ शिंदे यांचे नाव होते; परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीने घोळ घातल्यानंतर शरद पवारांचे नाव करून स्वतः खुर्ची बळकावली. शरद पवार यांना ‘मराठा’ मुख्यमंत्री होऊ द्यायचा नव्हता म्हणून त्यांनी प्रशासकीय अनुभव नसलेल्या उद्धवजींना अनेक तडजोडी करण्यास लावून मुख्यमंत्री केले. या बातमीच्या शेवटपर्यंत पवारांनी किंवा दस्तुरखुद्द उद्धव ठाकरेंनी उल्लेख केला नाही, उलट त्या दिवसापासून शिंदे हे उद्धवजी व त्यांच्याभोवती असलेले त्यांच्या रडारवर राहिले. विशेष म्हणजे, वर्षभरापासून शिंदे यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे पुढे आले. या सर्वांवर मात करून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना कात्रजचा घाट दाखवलाच आहे. आता पाहूया, सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय काय येतो तो!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in